श्रीधर व्यंकटेश केतकर माहिती मराठी | Shridhar Ketkar Information in Hindi

google-news-icon

मराठी ज्ञानकोशाचे उद्‌गाते

ज्ञानकोशकार केतकर यांची साहित्यिक म्हणून जशी प्रसिद्धी आहे; तशीच ती समाजशास्त्रज्ञ व इतिहासतज्ज्ञ म्हणूनही आहे. त्यांचे संपूर्ण नाव श्रीधर व्यंकटेश केतकर असे होते; पण मराठी ज्ञानकोशाच्या निर्मितीचे जे अद्वितीय कार्य त्यांनी आपल्या आयुष्यात केले त्यावरून ते ‘ज्ञानकोशकार केतकर‘ या नावानेच अधिक ओळखले जातात.

अल्प परिचय

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म २ फेब्रुवारी, १८८४ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर या गावी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले, तेथे कार्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. ही पदवी संपादन केली. पीएच. डी. साठी श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘द हिस्टरी ऑफ कास्ट्स इन इंडिया‘ हा प्रबंध सादर केला होता. या प्रबंधात त्यांनी मनुस्मृतीची कालनिश्चिती व त्या काळातील जातिसंस्थेचे स्वरूप यांसंबंधीचे काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडले होते.

अमेरिकेतून ते पुढे इंग्लंडला आले. इंग्लंडमधील वास्तव्यातच त्यांचा जर्मन ज्यू युवती मिस् इडिथ कोहेन यांच्याशी परिचय झाला. त्याची परिणती त्या दोघांच्या विवाहात होऊन १४ मे, १९२० रोजी मिस कोहेन ह्या शीलवतीबाई केतकर बनल्या. शीलवतीबाई आपल्या पतीच्या जीवनाशी व कार्याशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या. मराठी ज्ञानकोशनिर्मितीच्या कार्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता.

समाजशास्त्रीय संशोधन

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधनपर असे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. या संदर्भात अॅन एसे ऑन हिंदुइझम : इट्स फॉर्मेशन अँड फ्यूचर; अॅन एसे ऑन इंडियन इकॉनॉमिक्स; हिंदू लॉ अँड दी मेथड्स अँड दी प्रिन्सिपल्स ऑफ दी हिस्टॉरिकल स्टडी देअर ऑफ; व्हिक्टोरिअस इंडिया इत्यादी ग्रंथांचा उल्लेख करावा लागेल. आपल्या समाजशास्त्रीय संशोधनात त्यांनी काही महत्त्वाचे पण वादग्रस्त विचार व्यक्त केले आहेत.

भारतात अनेक मानववंशाच्या शेकडो टोळ्या आपापली वैशिष्ट्ये सांभाळून कित्येक वर्षे परस्परांच्या शेजारी राहिल्या आणि त्यातून येथील जातिबद्ध समाज तयार झाला, असे त्यांचे मत होते. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. मात्र या प्रश्नाचा अधिक मूलगामी दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे, असे त्यांना वाटत होते.

श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे साहित्यिक कार्य

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सन १९२७ मध्ये त्यांनी ‘गावसासू‘ ही पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांच्या ‘ब्राह्मणकन्या‘, ‘गोंडवनातील प्रियंवदा‘, ‘विचक्षणा‘, ‘आशावादी‘, ‘भटक्या‘ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून समाजाचे विविधांगी चित्रण केले. त्याबरोबरच त्यांनी ‘स्त्री सत्ता पराभव‘ हे नाटकही लिहिले. भिन्नधर्मीय पति-पत्नीची संतती, कलावंतिणीच्या विवाहाचा प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न, विवाहपूर्व अनुनय असे अनेक सामाजिक विषय त्यांनी हाताळले. आपल्या कादंबऱ्यांतून त्यांनी सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारक विचार मांडले; पण त्यांत कलात्मकतेचा अभाव आढळतो, अशी टीका केली जाते.

त्यामध्ये काही तथ्यही आहे. ललित वगैरे साहित्याच्या अंगांचा त्यांनी फारसा विधिनिषेध बाळगला नाही. रचनासौंदर्याकडे लक्ष दिले नाही; परंतु आपल्या साहित्यकृतींतून त्यांनी आपल्या प्रचंड वैचारिक सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी अन्य विषयांवरही माहितीपूर्ण व उद्बोधक लिखाण केले आहे. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, निःशस्त्रांचे राजकारण, ज्ञानकोश मंडळाचा इतिहास इत्यादी अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. याशिवाय ‘पुणे समाचार‘ हे दैनिक व ‘विद्यासेवक‘ हे मासिकही त्यांनी चालविले होते.

ज्ञानकोशनिर्मितीचे अद्वितीय कार्य

तथापि, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ज्या एका कार्यामुळे विशेष प्रसिद्धीला आले ते त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी संपादित केलेला ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश‘ हे होय, ज्ञानकोशाच्या या खंडांचे संपादन त्यांनी जवळजवळ एकट्याच्या जबाबदारीवर केले होते. हे कार्य खरोखरच अतिशय प्रचंड असे होते. त्या वेळच्या अनेक विद्वानांनी, केतकरांना आपल्या आयुष्यात तरी हे कार्य तडीस नेणे शक्य होईल काय, याबद्दल शंका व्यक्त केली होती; परंतु केतकरांनी ते यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेले आणि मराठीच्या ज्ञानभांडारात मोलाची भर घातली. त्यासाठी त्यांना अर्थातच अतोनात परिश्रम घ्यावे लागले होते. सन १९१६ मध्ये त्यांनी नागपूर येथे ‘ज्ञानकोश मंडळा‘ची स्थापना केली.

सन १९२६ मध्ये शारदोपासन संमेलनाचे अध्यक्ष, तर पुढे १९३१ मध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.

मृत्यू – १० एप्रिल, १९३७.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment