मानवेंद्रनाथ रॉय माहिती मराठी | Manavendra Nath Roy Information in Marathi

google-news-icon

मानवेंद्रनाथ रॉय हे एक महान भारतीय क्रांतिकारक व मूलगामी राजकीय विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे नवमानवतावादी तत्त्वज्ञान म्हणजे राजकीय विचारांच्या क्षेत्रात त्यांनी घातलेली मोलाची भर समजली जाते. बुद्धिप्रामाण्यवादी व भौतिकवादी विचारवंत, अशी त्यांची ख्याती आहे.

मानवेंद्रनाथ रॉय यांचा परिचय

मानवेंद्रनाथ रॉय यांचे आयुष्य अनेक चमत्कृतिपूर्ण व रोमांचकारी घटनांनी भरलेले आहे. त्यांचा जन्म २९ मार्च, १८८७ रोजी बंगालमधील चोवीस परगणा जिल्ह्यात झाला. अर्थात, रॉय यांच्या जन्मतारखेबाबत त्यांच्या चरित्रकारांत एकवाक्यता नाही; त्यामुळे १८८६ ते १८९३ या दरम्यानच्या वेगवेगळ्या वर्षांचा उल्लेख त्यांचे जन्मवर्ष म्हणून चरित्रकारांनी केला आहे.

मानवेंद्रनाथ रॉय यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य असे होते. त्यांचे वडील दीनबंधू भट्टाचार्य हे पेशाने शिक्षक होते. मानवेंद्रनाथांच्या शालेय शिक्षणाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोलकाता येथील नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; परंतु त्याच वेळी ते राजकारणात ओढले गेले; त्यामुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

हावडा कट

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या बालपणाचा काळ हा राजकीयदृष्ट्या देशातील व विशेषतः बंगालमधील अतिशय धामधुमीचा कालखंड होता. इंग्रजी सत्तेच्या विरोधात राजकीय वातावरण तापू लागले होते. १९०५ मधील बंगालच्या फाळणीने तर संपूर्ण देशातील लोकमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले. बंगाल प्रांतात सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास ठेवणाऱ्या क्रांतिकारक तरुणांचे गट ठिकठिकाणी तयार होऊ लागले. अशाच एका क्रांतिकारकांच्या गटात मानवेंद्रनाथ रॉय विद्यार्थिदशेतच सामील झाले. भूमिगत चळवळीत व गुप्त कट यांतील सहभागामुळे सरकारची वक्र दृष्टी त्यांच्याकडे वळली. सन १९१० मध्ये त्यांना हावडा कटाच्या खटल्यात गोवण्यात आले; परंतु सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

अनेक क्रांतिकारी कृत्यांत सहभाग

मानवेंद्रनाथ रॉय यांनी यानंतर अनेक प्रकारच्या क्रांतिकारी कृत्यांत भाग घेतला. कोलकात्यातील अतिशय गाजलेल्या ‘गार्डन रीच राजकीय दरोड्या’त त्यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना अटक झाली होती. सुप्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक जतिंद्रनाथ मुखर्जी यांनी रॉय यांना शस्त्रास्त्रे मिळविण्याच्या कामासाठी जर्मनीला पाठविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार १९१५ मध्ये रॉय यांनी ‘चार्ल्स मार्टिन‘ हे नाव धारण केले आणि गुप्त रीतीने भारताबाहेर प्रयाण केले. या वेळी त्यांनी इंडोनेशिया, कोरिया, फिलिपाईन्स, चीन, जपान इत्यादी देशांना भेटी दिल्या. मात्र शस्त्रास्त्रे मिळविण्याच्या कामी त्यांना यश आले नाही. त्यानंतर १९१६ मध्ये ते अमेरिकेला गेले. तेथेच त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय हे नाव धारण केले. अमेरिकेतील वास्तव्यात ते मार्क्सवादाच्या प्रभावाखाली आले आणि लवकरच ते एक कट्टर मार्क्सवादी बनले.

मेक्सिकोतील कम्युनिस्ट पक्षाची उभारणी

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या क्रांतिकारी चळवळीतील सहभागामुळे अमेरिकन सरकारने त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली; त्यामुळे त्यांनी अमेरिकेहून मेक्सिकोला स्थलांतर केले. मेक्सिकोच्या कम्युनिस्ट पक्षाच्या उभारणीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. याच ठिकाणी ते मायकेल बोरोदिन या रशियन साम्यवादी नेत्याच्या सहवासात आले.

मानवेंद्रनाथ रॉय आणि लेनिन

सन १९२० मध्ये रॉय सोव्हिएत युनियनला गेले. तेथे ते महान रशियन नेता लेनिन याच्या निकट सहवासात आले. मानवेंद्रनाथांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या दुसऱ्या काँग्रेसमध्ये भाग घेतला. त्या वेळी त्यांनी प्रतिपादन केले की, वसाहती राष्ट्रांतील सर्वच आंदोलने साम्राज्यशाहीविरोधी राहतील असे समजण्याचे कारण नाही. एखाद्या वसाहती राष्ट्रातील भांडवलदारी नेतृत्व आपल्या वर्गहितासाठी साम्राज्यशाही सत्तेशी ऐन वेळी तडजोड करण्यासही तयार होईल; म्हणून राष्ट्रवादी नेत्यांबरोबर आंदोलनात सहभागी होताना कम्युनिस्टांनी सावधपणा तर ठेवावाच; पण त्याच वेळी आपल्या वर्गीय संघटना उभ्या करून बहुजन समाजाची शक्ती आपल्यामागे उभी करावी. रॉय यांच्या विचारांची लेनिनसह अनेक कम्युनिस्ट नेत्यांवर छाप पडली. त्यातून रॉय यांची कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली. अशा प्रकारे जागतिक कम्युनिस्ट चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली.

कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे कार्य

कम्युनिस्ट इंटरनॅशनलने रॉय यांच्यावर ब्रिटिश साम्राज्यातील देशांत कम्युनिस्ट चळवळीचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सोपविली. सन १९२० च्या सुमारास ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा‘ची स्थापना झाली. या स्थापनाकार्यास रॉय यांचे मार्गदर्शन लाभले होते. १९२६ मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या वतीने त्यांना चिनी कम्युनिस्ट पक्षास मार्गदर्शन करण्यासाठी चीनला पाठविण्यात आले; परंतु यानंतर कम्युनिस्ट इंटरनॅशनलशी त्यांचे मतभेद वाढत गेले. या संघटनेवर रशियन नेत्यांचा असलेला प्रभाव त्यांना मान्य नव्हता. परिणामी, कम्युनिस्ट इंटरनॅशनलमधून त्यांना काढून टाकण्यात आले.

भारतात परत

मानवेंद्रनाथ रॉय १९३० मध्ये भारतात परतले; परंतु इंग्रज सरकारविरुद्ध कारवाया केल्याच्या आरोपाखाली लवकरच त्यांना अटक करण्यात आली. या वेळी त्यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासातून १९३६ मध्ये त्यांची सुटका झाली. यानंतर रॉय काँग्रेसच्या चळवळीत सहभागी झाले. १९३७ मध्ये त्यांनी ‘इंडिपेंडन्ट इंडिया‘ हे साप्ताहिक सुरू केले. पुढे त्याचे नाव ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट‘ असे ठेवण्यात आले.

लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन

रॉय यांनी १९३९ मध्ये काँग्रेसअंतर्गत ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन‘ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला. सन १९४० मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि ‘रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी‘ हा नवा पक्ष त्यांनी स्थापन केला; परंतु पुढे त्यांनी पक्षविरहित राजनीतीचा पुरस्कार केला; त्यामुळे १९४८ मध्ये त्यांनी आपल्या पक्षाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या सहा वर्षांच्या कालखंडात मानवेंद्रनाथ रॉय यांनी नवमानवतावादाचा किंवा प्रागतिक मानवतावादाचा पुरस्कार केला. नवमानवतावादाच्या आधारेच नव्या सुसंस्कृत व आधुनिक समाजाची उभारणी करता येईल, अशी त्यांची धारणा होती.

राजकीय तत्त्वज्ञान

मानवेंद्रनाथ रॉय आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात कट्टर मार्क्सवादी होते. मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित साम्यवादी समाजरचनेद्वारे शोषणविरहित समाजाची स्थापना करता येईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. या विश्वासातूनच आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत ते सहभागी झाले होते. या चळवळीत त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. कम्युनिस्ट इंटरनॅशनल या संघटनेच्या कार्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताबाहेरील अनेक देशांमध्ये साम्यवादाचा प्रसार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

मार्क्सवादाच्या पलीकडे

तथापि, सन १९३० नंतर मात्र रॉय यांचा साम्यवादाविषयी भ्रमनिरास झाला. कम्युनिस्ट इंटरनॅशनलमध्ये काम करीत असताना त्यांना जे अनुभव आले त्यांवरून मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील उणिवांची त्यांना जाणीव झाली. रशियात साम्यवादी क्रांतीनंतर ज्या प्रकारची समाजव्यवस्था अस्तित्वात आली त्यावरून तर साम्यवादाचे दोष अधिकच स्पष्ट झाले. शोषणविरहित समाजाची प्रस्थापना करण्याचे उद्दिष्ट रशियन क्रांतीद्वारे साध्य होऊ शकले नाही, असे त्यांचे मत बनले. त्यावरून रॉय अशा निष्कर्षाप्रत आले की, मार्क्सवादाच्या पलीकडे जाऊन सामाजिक जीवनाच्या सर्व अंगांचा शास्त्रीय पद्धतीने उलगडा करू पाहणाऱ्या नव्या सर्वस्पर्शी विचारप्रणालीचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवमानवतावाद

मानवेंद्रनाथ रॉय यांनी अशा प्रकारचे एक नवे तत्त्वज्ञान मांडले, त्यालाच ‘नवमानवतावाद‘ किंवा ‘प्रागतिक मानवतावाद‘ किंवा ‘शास्त्रीय मानवतावाद‘ असे म्हटले जाते.

मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या नवमानवतावादात व्यक्तीला केंद्रबिंदू मानले आहे. मानव हाच प्रत्येक गोष्टीचा मानदंड असला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. समाजव्यवस्थेत व्यक्तीला महत्त्वपूर्ण स्थान असले पाहिजे आणि व्यक्ती केंद्रस्थानी मानून समाजव्यवस्थेचा व राजकीय व्यवस्थेचा विचार झाला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला; म्हणून त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व दिले. मार्क्सवादातील मानवतावादी प्रेरणांचे आकर्षण रॉय यांना अखेरपर्यंत वाटत राहिले; पण मार्क्सवादातील काही तत्त्वे त्यातील मानवतावादी प्रेरणांशी विसंगत आहेत. मार्क्सवादाने व्यक्तीला समष्टीपुढे गौण स्थान दिले आहे, हा त्यांचा मार्क्सवादावरील प्रमुख आक्षेप होता.

रॉय यांच्या नवमानवतावादाने स्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य धर्मनिरपेक्ष नैतिकता या तीन मूल्यांचा पुरस्कार केला आहे. वरील तीन मूल्यांच्या आधारेच नव्या आदर्श समाजाची उभारणी होऊ शकेल, असा रॉय यांचा दावा होता. त्याकरिता प्रबोधनाच्या नव्या चळवळीची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. त्याचप्रमाणे पक्षविरहित लोकशाहीचा त्यांनी पुरस्कार केला. या लोकशाहीला त्यांनी संघटित किवा प्रागतिक लोकशाही असे नाव दिले. त्यांनी प्रागतिक लोकशाहीमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणावर विशेष भर दिला. सध्याच्या प्रातिनिधिक लोकशाहीतील सर्व दोषांवर प्रागतिक लोकशाहीच्या मार्गाने मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

गांधीवादाचे प्रमुख टीकाकार

मानवेंद्रनाथ रॉय हे गांधीवादाचे प्रमुख टीकाकार होते. महात्मा गांधी भारतीय समाजातील प्रतिगामी शक्तीचे नेतृत्व करतात; गांधीजींनी राजकीय कार्यक्रमात आध्यात्मिक तत्त्वांची सरमिसळ केल्यामुळे राजकीय गतिशीलतेचा बळी गेला आहे, असे त्यांचे मत होते. धार्मिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे पुरस्कर्ते म्हणून गांधीजी हे सामाजिक दृष्टीने अत्यंत प्रतिगामी राहतील; मग राजकीय दृष्टीने ते कितीही क्रांतिकारक वाटोत, असे रॉय यांनी म्हटले होते.

मानवेंद्रनाथ रॉय यांनी लिहिलेले पुस्तके

मानवेंद्रनाथ रॉय यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे –

  • संक्रमणकाळातील भारत
  • भारताची समस्या व तिचे उत्तर
  • असहकाराचे एक वर्ष
  • भारतीय राजकारणाचे भवितव्य
  • चीनमधील क्रांती व प्रतिक्रांती
  • रशियन राज्यक्रांती
  • फॅसिझम
  • भौतिकवाद
  • विज्ञान आणि अंधश्रद्धा
  • विज्ञान आणि तत्त्वज्ञान
  • गांधीवाद, राष्ट्रवाद व समाजवाद, भारताचा संदेश
  • साम्यवादाच्या पलीकडे
  • स्वातंत्र्याच्या समस्या
  • नवमानवतावाद
  • वैज्ञानिक राजकारण इत्यादी.

मृत्यू – २५ जानेवारी, १९५४.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment