राम गणेश गडकरी माहिती मराठी | Ram Ganesh Gadkari Information in Marathi

google-news-icon

“राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।। अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा। बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळवारी देशा ।। भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा । शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा ।।”
राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज)
कविता-महाराष्ट्र गीत.

अल्प परिचय

प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला स्फूर्तिदायक वाटावे असे हे ‘महाराष्ट्र गीत’ लिहिणारे कवी गोविंदाग्रज ऊर्फ राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे, १८८५ रोजी गुजरातमधील गणदेवी जिल्ह्यात नवसारी येथे झाला. श्रेष्ठ विनोदी लेखक, प्रतिभासंपन्न कवी, थोर नाटककार अशा विविध नात्यांनी ते महाराष्ट्रीय जनतेला परिचित आहेत. मराठी साहित्यात त्यांना अतिशय मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘प्रतिभेचा सम्राट‘ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला जातो.

साहित्यिक कार्य व मूल्यमापन

राम गणेश गडकरी यांना अवघे चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या लेखनाचा काळ तर १९११ ते १९१८ असा केवळ सहा-सात वर्षांचाच होता; परंतु एवढ्या अल्पकाळात त्यांनी आपल्या लेखनाने मराठी रसिकांच्या मनावर अपूर्व मोहिनी घातली आणि मराठी साहित्यात आपले ‘क्रांतिकारक युग‘ निर्माण केले.

गडकरी हे नाटककार, कवी व विनोदी लेखक या सर्वच नात्यांनी श्रेष्ठ साहित्यिक होते. नाटककार म्हणून तर ते कमालीचे लोकप्रिय ठरले होते. त्यांची ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी नाटके मराठी रंगभूमीवर अत्यंत यशस्वी झाली आहेत. त्यांच्या नाटकांमधून भाषासौंदर्य, भावनोत्कट प्रसंगांची निर्मिती, उत्तुंग कल्पकता आणि असामान्य प्रतिभाविलास यांचे दर्शन आपणास घडते. गडकऱ्यांच्या नाटकांतील चित्तवेधक संवाद हे तर त्यांचे खास बलस्थान समजले जाते.

राम गणेश गडकरी यांनी ‘गोविंदाग्रज‘ या नावाने काव्यलेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रेमकविता विशेष प्रसिद्ध आहेत. असफल प्रेमातील वैफल्याची भावना त्यांनी आपल्या कवितांमधून अत्यंत उत्त्कटतेने व्यक्त केली आहे. त्यांच्या कवितांमधून कल्पनेचा विलास वनर्म शृंगार यांचेही दर्शन घडते. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’ असे लिहिणाऱ्या या कवीस यथार्थतेने ‘प्रेमाचा शाहीर‘ असे म्हटले जाते. विनोदी वळणाच्या कविताही (चिंतातुर जंतू) त्यांनी लिहिल्या आहेत. राम गणेश गडकरी यांच्यावर केशवसुतांच्या कवितेचा विशेष प्रभाव होता. त्यांची ‘दसरा‘ ही कविता केशवसुतांच्या ‘तुतारी’ च्या मार्गाने जाते; तर त्यांची ‘मुरली’ ही कविता केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ च्या वळणाने जाते. काव्याच्या प्रांतात ते केशवसुतांचे जणू शिष्य होते.

राम गणेश गडकरी यांनी विनोदी लेखक या नात्यानेदेखील मराठी साहित्यात अपूर्व यश मिळविले आहे. ‘संपूर्ण बाळकराम’ हा त्यांचा विनोदी लेखांचा संग्रह प्रसिद्धच आहे. तथापि, या लेखसंग्रहाबरोबर त्यांनी विनोदासाठी आपल्या नाटकांचाही उपयोग करून घेतला आहे. त्यांच्या काही नाटकांत विनोदाला महत्त्वाचे स्थान मिळाले असल्याचे दिसून येते.

त्यांच्या नाटकांतील मध्यवर्ती पात्रांच्या जोडीनेच काही विनोदी पात्रेदेखील रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय झाली होती. राम गणेश गडकरी हे स्वतःला श्री. कृ. कोल्हटकर यांचे शिष्य म्हणवून घेत असले तरी त्यांचा विनोद पूर्णपणे स्वतंत्र होता आणि त्याचा दर्जा अतिशय उच्च होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटक आणि काव्याप्रमाणेच त्यांच्या विनोदातूनही त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा साक्षात्कार होतो. कल्पनाशक्तीचा अपूर्व विलास, शब्दांची मार्मिक निवड व भावनेची उत्कटता या गुणांचा संगम आपणास राम गणेश गडकरी यांच्या लेखनशैलीत आढळतो.

हास्यरस, करुणरस, रौद्ररस इत्यादी रसांचा आपल्या साहित्यात सारख्याच परिणामकारकपणे वापर करण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली होती. करुणरसाने पुरेपूर ओथंबलेल्या नाटकातदेखील त्यांनी हास्यरसाची कारंजी उडविली होती. गडकऱ्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष असा की, त्यांच्या लेखनात जागोजागी अप्रतिम सुभाषिते विखुरलेली आहेत.

‘जगण्यासारखे जोपर्यंत जवळ काही आहे तोपर्यंतच मरण्यात मौज आहे’; ‘पाणी चंचल आहे; पण मन पाण्याहून चंचल आहे’; ‘पुरुष परमेश्वराची कीर्ती आहे; तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे’ यांसारखी मनोवेधक सुभाषिते राम गणेश गडकरी यांच्या साहित्यात सर्वत्र आढळून येतात. थोडक्यात, मराठी साहित्यविश्व संपन्न आणि समृद्ध बनविण्यात राम गणेश गडकरी यांचे योगदान खूपच महत्त्वपूर्ण आहे.

मृत्यू – २३ जानेवारी, १९१९.

राम गणेश गडकरी यांची लेखनसंपदा

‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’, ‘राजसंन्यास’ इत्यादी नाटके; ‘वाग्वैजयंती’ हा कवितासंग्रह आणि ‘संपूर्ण बाळकराम’ हा विनोदी लेखसंग्रह.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment