केशवसुत माहिती मराठी | Keshavsut Information in Marathi

google-news-icon

केशवसुतांना मराठीतील युगप्रवर्तक कवी मानले जाते. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते. मराठी काव्याला नवा आशय प्राप्त करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

अल्प परिचय

केशवसुत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी ७ ऑक्टोबर, १८६६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर केशवसुतांनी शिक्षकी पेशा पत्करला.

साहित्यिक कार्य व मूल्यमापन

संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे मराठीतील दुसरे महत्त्वाचे व बंडखोर कवी म्हणून केशवसुतांचा उल्लेख केला जातो. त्यांनी मराठी कवितेला नवे व आधुनिक वळण लावले. आधुनिक मराठी कवितेत त्यांनी अंतरंग व बहिरंग या दोन्ही बाबतींत क्रांती घडवून आणली. आशय, रचना व अभिव्यक्ती अशा सर्वच अंगांनी त्यांनी मराठी कवितेत आमूलाग्र बदल घडवून आणला. आधुनिक मराठी कवितेमधील सारे प्रवाह केशवसुतांच्या कवितेपासून सुरू झाले. निशाणाची प्रशंसा (राष्ट्रीय कविता); तुतारी, नवा शिपाई (सामाजिक कविता); झपूर्झा (गूढरंजनपर कविता); भृंग (निसर्गविषयक कविता); गोष्टी घराकडील (कौटुंबिक कविता) या उदाहरणांवरून वरील विधानाची सत्यता प्रत्ययास येईल.

केशवसुतांनी मराठी कवितेतील जुने संस्कृत वळणाचे संकेत बाजूला केले. तिचे वस्तुनिष्ठ व वर्णनपर स्वरूप त्यांनी बदलून टाकले. व्यक्तिगत अनुभव व भावना प्रकट करणारी आत्मनिष्ठा व संवेदनशीलता; सामाजिक प्रथा, रूढी व परंपरा यांविरुद्धची बंडखोर वृत्ती आणि निसर्गाकडे पाहण्याची नावीन्यपूर्ण दृष्टी इत्यादी वैशिष्ट्ये त्यांनी मराठी कवितेत आणली. मराठीत ‘सुनीत’ रचनेचा प्रयोग प्रथम त्यांनीच केला.

केशवसुतांच्या कवितांतून त्यांना वाटत असलेली आपल्या राष्ट्राच्या पारतंत्र्या- बाबतची खंत आणि स्वातंत्र्यासंबंधीची ओढ यांचा प्रत्यय येतो. त्यांनी अनेक कवितांमधून आपली राष्ट्रीय वृत्ती प्रकट केली आहे. समाजसुधारणेबद्दल त्यांना वाटत असलेल्या तळमळीचे दर्शनही त्यांच्या अनेक कवितांमधून घडते. सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य’ आपणास ठायी ठायी जाणवतो.

आपल्या ‘तुतारी’ या कवितेत त्यांनी- “जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एक्या ठायी ठाका सावध ! ऐका पुढल्या हाका; खांद्यास चला खांदा भिडवुनी”

असा संदेश नव्या पिढीला दिला. जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे आचारविचार आत्मसात करावेत, असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर-

“प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामें त्यावरती नोंदा बसुनि का वाढविता मेदा? विक्रम काही करा, चला तर !”

असे सांगून त्यांनी तरुणवर्गाला भावी वाटचालीची दिशा दाखवून दिली. केशवसुतांचा हा संदेश केवळ त्यांच्या काळातील नव्हे, तर आजच्या तरुणांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे. नव्या पिढीने समाजातील दुष्ट प्रथा व रूढी यांवर हल्ला चढवून समतेचा ध्वज उंच धरावा आणि नीतीची द्वाही पसरावी, असा त्यांचा आग्रह आहे. खरे तर, सामाजिक समतेसाठी क्रांतीची तुतारीच त्यांनी फुंकली आहे.

केशवसुत यांची समाधी

थोडक्यात, केशवसुतांची कविता भावपूर्ण, संवेदनशील व विचारगर्भ आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा संदेश ती आपणास देते. त्यांनी मराठी कवितेला प्राप्त करून दिलेल्या या नव्या रूपामुळे त्यांना ‘कर्वीचे कवी’, ‘युगप्रवर्तक कवी’, ‘आधुनिक कवी कुलगुरू’ यांसारख्या संबोधनांनी गौरविले जाते.

मृत्यू – ७ नोव्हेंबर, १९०५.

केशवसुत यांचे काव्यसंग्रह

केशवसुतांचे ‘झपूर्झा’, ‘हरपलेले श्रेय’, ‘केशवसुतांची कविता’ हे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment