विष्णुशास्त्री चिपळूणकर माहिती मराठी | Vishnushstri Chiplunkar Information in Marathi

google-news-icon

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे सुपुत्र होत. ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी मराठी गद्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले. विष्णुशास्त्रींना मराठी भाषेविषयी प्रखर अभिमान होता. मराठी भाषेस प्रतिष्ठेचे व योग्य स्थान मिळावे म्हणून त्यांनीच प्रथम आवाज उठविला; म्हणून त्यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ असे म्हटले जाते.

अल्प परिचय

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे, १८५० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पूना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथूनच ते १८७२ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘पूना हायस्कूल’ या सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे त्यांची रत्नागिरीच्या शाळेत बदली झाली. पण सरकारी नोकरीत राहून आपणास विशेष काही करता येणार नाही असे त्यांना वाटू लागले; त्यामुळे १८७९ मध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला.

टिळक-आगरकरांसमवेत

सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यावर विष्णुशास्त्रींनी स्वतःच एक नवी शाळा सुरू करण्याचा संकल्प केला. याच वेळी लोकमान्य टिळक व आगरकर हे राष्ट्रवादी विचारांनी भारावलेले दोन तरुण त्यांना येऊन मिळाले. या तिघांनी १ जानेवारी, १८८० रोजी पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. त्यांनी ही शाळा अल्पावधीतच भरभराटीला आणली. त्यानंतर १८८१ मध्ये चिपळूणकर, टिळक आणि आगरकर या तिघांनी मिळून ‘केसरी’ व ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यात वरील वृत्तपत्रांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.

निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री चिपळूणकरांना विद्यार्थिदशेपासूनच साहित्यक्षेत्रात रस होता. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक चालविले होते. सन १८६८ पासून विष्णुशास्त्री या मासिकाचे संपादक म्हणून काम करू लागले. लवकरच ‘शालापत्रका’ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. १८७४ मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला’ हे मासिक सुरू केले.

२५ जानेवारी, १८७४ रोजी निबंधमालेचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. निबंधमालेची सुरुवात ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ या निबंधाने झाली; तर आमच्या देशाची स्थिती’ या निबंधाने तिचा शेवट झाला. निबंधमालेचे एकूण ८४ अंक प्रसिद्ध झाले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर ती बंद पडली. निबंधमालेद्वारे महाराष्ट्रातील तरुणांत राष्ट्रवादी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले.

काशिनाथ नारायण साने, जनार्दन बाळाजी मोडक व शंकर तुकाराम शाळीग्राम यांच्या सहकार्याने विष्णुशास्त्रींनी काही काळ ‘काव्येतिहाससंग्रह’ नावाचे मासिकही चालविले होते. आर्यभूषण छापखाना, चित्रशाळा, किताबखाना यांच्या निर्मितीतही चिपळूणकरांचा महत्त्वाचा सहभाग होता. लोकशिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित विष्णुशास्त्री चिपळूणकर हे महाराष्ट्रातील एक प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय संस्कृतीचे कट्टर अभिमानी विचारवंत होते. त्यांनी भाषा, साहित्य, राजकारण, समाजकारण इत्यादी विविध विषयांवर लेखन केले.

स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा व स्वसंस्कृती यांविषयीचा प्रखर अभिमान ही त्यांच्या लेखनामागील मुख्य प्रेरणा होती. आपल्या लेखनाद्वारे येथील सुशिक्षित वर्गाच्या मनातही त्यांनी हा अभिमान जागविला. या ठिकाणी संस्कृति- अधिष्ठित राष्ट्रवाद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. लोकशिक्षण हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी आपले सर्व लेखन केले होते. विष्णुशास्त्रींनी मराठी गद्याला प्रौढता आणली. धारदार उपहास व उपरोध, सुभाषितांचा मार्मिक उपयोग, पल्लेदार वाक्यरचना ही त्यांच्या वाङ्मयीन शैलीची काही वैशिष्ट्ये होत.

पण सामाजिक सुधारणेच्या बाबतीत…

समाजसुधारणेच्या बाबतीत मात्र विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सतत विरोधाचा पवित्रा घेतला होता. भारतीय संस्कृतीत व समाजरचनेत काहीही दोष नाहीत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या लिखाणात स्वसंस्कृतीच्या श्रेष्ठत्वाबरोबरच ब्राह्मणांच्या वर्णश्रेष्ठत्वाचा व जातिश्रेष्ठत्वाचा अभिमानही पाहावयास मिळतो; त्यामुळे त्यांनी सुधारणावादावर प्रखर हल्ला चढविला. मराठी भाषेचे शिवाजी म्हणविणाऱ्या या भाषाप्रभूने भाषेवरील आपल्या प्रभुत्वाचा उपयोग समाजसुधारकांवर कठोर टीका करण्यासाठीच अधिक केला.

महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या समाजसुधारकांची त्यांनी भरपूर उपहास व कुचेष्टा केली. तसेच त्यांच्यावर तारतम्य सोडून टीका केली. थोडक्यात, विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सामाजिक क्षेत्रात संकुचित व प्रतिगामी विचारांचा पाळपुरावा करून समाजसुधारणेच्या कार्याला खीळ घालण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रातील सुधारणावादी पुरोगामी चळवळ मागे रेटण्याचेच कार्य विष्णुशास्त्रींनी केले. त्या दृष्टीने पाहता त्यांचा महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीशी एक प्रकारे जवळचाच संबंध पोहोचतो. १७ मार्च, १८८२ रोजी वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment