सरदार भगतसिंग माहिती मराठी | Sardar Bhagat Singh Information in Marathi

google-news-icon

क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत

सरदार भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सशस्त्र क्रांतिपर्वाचे अग्रणी होत. ‘भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी’ या शब्दांत त्यांचा गौरव केला जातो. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांपैकी सरदार भगतसिंग हे एक होते.

भारताने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळविले असे म्हटले जाते; परंतु भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास ठेवून अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उघड संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला होता. आपल्या ध्येयपूर्तीकरिता या क्रांतिकारकांनी आत्मबलिदानाचीही तयारी ठेवून अत्युच्च त्यागाचा आदर्शच आपल्या देशबांधवांपुढे निर्माण केला होता; म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यात अहिंसात्मक चळवळीबरोबर येथील क्रांतिकारकांनी चालविलेल्या क्रांतिकार्याचाही महत्त्वाचा वाटा होता, या वस्तुस्थितीचा विसर पडू देता येणार नाही.

सरदार भगतसिंग 21 वर्षाचे असताना
सरदार भगतसिंग 21 वर्षाचे असताना

भगतसिंग यांचा परिचय

सरदार भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९०७ रोजी तेव्हाच्या पंजाबमधील लाहोरजवळ असलेल्या बांगा या गावी झाला. त्यांचे संपूर्ण घराणेच क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे वडील किसनसिंग अनेक चळवळींत अग्रभागी राहिले होते. त्यांनी देशासाठी कारावासही भोगला होता. भगतसिंगांचे एक चुलते अजितसिंग यांना लाला लजपतराय यांच्याबरोबर हद्दपारीची शिक्षा झाली होती व मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. भगतसिंगांचे आणखी एक चुलते स्वर्णसिंग यांनाही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले होते.

भगतसिंग यांचे शिक्षण लाहोरच्या दयानंद अँग्लो वैदिक शाळेत झाले, या शाळेत शिकत असतानाच त्यांच्यावर राष्ट्रवादी विचारांचे संस्कार झाले होते. सन १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या विरोधात देशभर प्रचंड निदर्शने झाली. या कायद्याचा निषेध करण्यासाठी लाहोर येथे जो प्रचंड मोर्चा निघाला त्यामध्ये बारा वर्षे वयाच्या भगतसिंगांनीही भाग घेतला होता.

पुढे १९२० मध्ये महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. गांधीजींच्या आदेशानुसार भगतसिंगांनी शाळा सोडून या चळवळीत उडी घेतली. महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ पाठीमागे घेतल्यावर भगतसिंग पुन्हा शाळेत जाऊ लागले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लाहोरच्या नॅशनल कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला. याठिकाणी त्यांचा सुखदेव यांच्याशी परिचय झाला.

नौजवान भारत सभेची स्थापना

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९२५ मध्ये ‘नौजवान भारत सभे‘ ची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट, भारतातील इंग्रजी सत्ता नष्ट करून शेतकरी व कामगार यांचे प्रजासत्ताक स्थापन करणे आणि शोषणविरहित समाजाची निर्मिती करणे, हे होते. सरदार भगतसिंगांवर कॉलेज जीवनापासूनच मार्क्सवादाचा प्रभाव होता; म्हणून त्यांनी शेतकरी व कामगार यांचे राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगले होते. त्यांच्या नौजवान सभेच्या- ‘इन्किलाब झिंदाबाद‘ व ‘हिंदुस्थान झिंदाबाद‘ अशा दोन घोषणा होत्या.

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

यानंतर भगतसिंगांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न चालविला. त्यासाठी त्यांनी लाहोरबाहेरील दिल्ली, कानपूर इत्यादी शहरांतील क्रांतिकारकांशी संपर्क साधला. त्यातूनच त्यांचा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्यकर्त्यांशी परिचय झाला. या संघटनेनेच काकोरी कटाची योजना आखून सरकारी खजिना असलेली रेल्वेगाडी लुटली होती.

या कटातील क्रांतिकारकांना पकडून सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली; पण कटाचे सूत्रधार चंद्रशेखर आझाद हे मात्र सरकारच्या हाती लागले नाहीत. काकोरी कटामुळे सरकारने क्रांतिकारक नेत्यांवर करडी नजर ठेवली. त्यामुळे भगतसिंगांना काही काळ भूमिगत व्हावे लागले. तथापि, त्यांनी आपल्या कार्यात मात्र खंड पडू दिला नाही. याच काळात त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट झाली.

१९२८ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, बिहार इत्यादी भागांतील प्रमुख क्रांतिकारकांची दिल्लीजवळील खंडहर गावात एक बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रांतांतील क्रांतिकारकांच्या प्रतिनिधींची एक केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली. तसेच क्रांतिकारकांची नवी संघटना स्थापन करून तिचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ असे ठेवण्यात आले. संघटनेच्या नावात ‘सोशलिस्ट‘ या शब्दाचा अंतर्भाव करण्याची सूचना भगतसिंग यांनी मांडली व ती सर्वानुमते मंजूर झाली. स्वतंत्र भारतात शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करणे व शोषणविरहित समाजाची निर्मिती करणे, हीच आपली उद्दिष्टे असल्याचे या संघटनेने घोषित केले.

लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला

भारताला काही सुधारणा देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती केली; पण या कमिशनचे सातही सदस्य इंग्रज होते. त्यात एकही भारतीय नव्हता; म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. भारतातील अनेक शहरांत या कमिशनच्या विरोधात निदर्शन झाली. या कमिशनविरुद्ध लाहोर शहरात झालेल्या निदर्शनांचे नेतृत्व वयोवृद्ध काँग्रेस नेते लाला लजपतराय यांनी केले होते. त्या प्रसंगी पोलिसांनी निदर्शकांवर अमानुष लाठी-हल्ला केला; लाला लजपतराय या लाठी-हल्ल्यात जबर जखमी झाले व पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.

लालाजींच्या निधनाने देशात सर्वत्र संतापाची एकच लाट उसळली. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने तर लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय केला. लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्कॉट या अधिकाऱ्यास ठार करण्याची योजना आखण्यात आली. या कामासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू व जयगोपाळ यांची निवड झाली. त्यांनी १७ डिसेंबर, १९२८ रोजी स्कॉटला ठार मारण्याची जय्यत तयारी केली; परंतु या प्रयत्नात स्कॉटऐवजी सँडर्स हा दुसरा इंग्रज अधिकारी ठार झाला.

लाहोरहून कोलकात्यास

या घटनेनंतर लाहोरचे पोलीस भगतसिंग व त्यांचे सहकारी यांचा शोध घेऊ लागले; म्हणून भगतसिंगांनी गुप्तपणे लाहोर सोडले व ते थेट कोलकाताला जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांची जतींद्रनाथ दास यांच्याशी ओळख झाली. इतर बंगाली क्रांतिकारकही त्यांच्या परिचयाचे होते. जतींद्रनाथ दास यांना बॉम्ब बनविण्याची कला अवगत होती. भगतसिंग व जतींद्रनाथ यांनी बॉम्ब बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची योजना आखली आणि त्याप्रमाणे आग्रा येथे असा कारखाना सुरू केला. त्या ठिकाणी इतर क्रांतिकारकांनाही बॉम्ब बनविण्याचे शिक्षण दिले जाऊ लागले. लवकरच हा कारखाना देशातील क्रांतिकारकांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र बनला.

कायदेमंडळात बॉम्बस्फोट

याच सुमारास इंग्रज सरकारने ‘ट्रेड डिस्प्यूट बिल‘ आणि ‘पब्लिक सेफ्टी बिल‘ अशी दोन विधेयके केंद्रीय कायदेमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला. ही विधेयके कामगारवर्ग व सामान्य जनता यांच्या अधिकारांवर मर्यादा घालण्याच्या उद्देशाने तयार केलेली होती. सरकारी दडपशाहीला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाव मिळणार होता; म्हणून हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने या विधेयकांचा क्रांतिकारी मार्गाने निषेध करण्याचे ठरविले, त्यानुसार ट्रेड डिस्प्यूट बिल कायदेमंडळात मांडले जात असताना सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटाच्या प्रसंगी क्रांतिकारकांनी सभागृहात फेकलेल्या पत्रकांचा आशय असा होता-

“बहिऱ्यांनाही ऐकू यावे यासाठी मोठा आवाज करणे आम्हाला भाग पडले. सरकारने हिंदी जनतेवर चालविलेली जुलूमजबरदस्ती, लाला लजपतरायसारख्या परमपूज्य नेत्याची केलेली हत्या यांचा आम्ही या मार्गाने निषेध करीत आहोत, व्यक्तीची हत्या करता येते; पण विचारांची हत्या करता येत नाही. विचार नष्ट करण्याच्या प्रयत्नात प्रचंड साम्राज्येही नाश पावतात.”

खरे तर सभागृहात बॉम्बस्फोट झाल्यावर संपूर्ण सभागृह धुराने भरून गेले. सर्वत्र एकच गोंधळ उडला. लोकांची पळापळ सुरू झाली. नेमका काय प्रकार घडला असावा हे काही काळ कोणालाही समजले नाही. या गडबडीत भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना सभागृहाबाहेर सहज निसटून जाता आले असते; परंतु ते दोघेही ‘इन्किलाब झिंदाबाद‘, व ‘क्रांती चिरायू होवो‘ अशा घोषणा देत तेथेच थांबून राहिले; कारण “आम्ही हे सर्व कशासाठी करीत आहोत हे आपल्या देशबांधवांना व संपूर्ण जगाला सांगण्याची नामी संधी या निमित्ताने आपणास मिळत आहे, तिचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा,” असे भगतसिंगांचे मत होते. म्हणून ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले.

विविध आरोप, खटले व शिक्षा

त्यानंतर भगतसिंग व त्यांचे सहकारी यांच्यावर सरकारने निरनिराळ्या आरोपांखाली खटले भरले. पहिल्या खटल्यात त्यांच्यावर कायदेमंडळाच्या सभागृहात बॉम्बफेक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. भगतसिंगांनी न्यायालयात सांगितले की, “सभागृहात बॉम्ब फेकल्याचा आरोप आम्ही मान्य करतो; आम्हाला आमच्या कृत्याबद्दल अभिमान वाटतो. पण माणसे मारणे हा आमचा उद्देश नव्हता. आम्ही कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करीत नाही. उलट, मानवी जीवन आम्हाला अत्यंत पवित्र वाटते. तथापि, आमच्या मातृभूमीसाठी आम्हाला हे कृत्य करावे लागले. आम्ही शास्त्रशुद्ध समाजवादाचे पुरस्कर्ते आहोत. आमची क्रांती माणसाने माणसाच्या चालविलेल्या शोषणाविरुद्ध आहे. आमची क्रांती माणसाने माणसाला गुलाम करण्याविरुद्ध आहे. म्हणून आमचा इंग्रजी सत्तेला विरोध आहे.”

सँडर्सच्या खुनाबद्दल फाशी

या खटल्यात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. त्यानंतर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यासह एकूण चौदा क्रांतिकारकांवर लाहोर कटाचा दुसरा खटला भरण्यात आला. हा खटला सँडर्सच्या खुनाबद्दल होता. या वेळी हे सर्व क्रांतिकारक तुरुंगातच होते. तेथे सरकारने त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यास सुरुवात केली.

त्याविरुद्ध सर्व क्रांतिकारकांनी अन्न-सत्याग्रह सुरू केला. त्यामध्ये जतींद्रनाथ दास यांचे उपोषणाच्या त्रेसष्टाव्या दिवशी निधन झाले. क्रांतिकारकांच्या या अन्न-सत्याग्रहामुळे संपूर्ण देशातील लोकमत सरकारविरुद्ध प्रक्षुब्ध झाले. क्रांतिकारकांविषयी सर्वत्र प्रचंड आकर्षण निर्माण झाले. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांचे उपोषण तर एक्क्याऐंशी दिवस चालू राहिले. अखेर क्रांतिकारकांच्या निर्धारापुढे ब्रिटिश सरकारलाही माघार घेणे भाग पडले. त्याने क्रांतिकारकांच्या मागण्या मान्य केल्या.

धीरोदात्तपणे मृत्यूचा स्वीकार

भगतसिंग व त्यांचे सहकारी यांना अटक झाल्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यांत या क्रांतिकारकांच्या नावांचीच चर्चा चालू होती. त्यांच्यावर भारतीय जनता प्रेमाचा वर्षाव करू लागली होती. क्रांतिकारकांची ही वाढती लोकप्रियता पाहून इंग्रज सरकारनेही धसका घेतला. लाहोर कट खटल्याच्या सुनावणीमुळे भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांना परत एकदा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळून त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडेल अशी सरकारला भीती वाटली; त्यामुळे सर्व संकेत व तत्त्वे धाब्यावर बसवून हा खटला सरकारने गुप्तपणे चालविला.

या खटल्यात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली; तर शिववर्मा किशोरीलाल, गयाप्रसाद, जयदेव कपूर, विजयकुमार सिन्हा, महावीर सिंह आणि कमलापती तिवारी या सहा जणांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. २३ मार्च, १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आले. ‘इन्किलाब झिंदाबाद‘ च्या घोषणा देत ते हसत हसत मृत्यूला सामोरे गेले.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment