दामोदर चापेकर माहिती मराठी | Damodar Chapekar Information in Marathi

google-news-icon

हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेच्या जुलमी कार्यपद्धतीविरुद्ध ज्या भारतीय देशभक्तांनी सशस्त्र मार्गाने आपला असंतोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, अशा देशभक्तांमध्ये पुण्याचे चापेकर बंधू यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

टिळकांच्या विचारांचा प्रभाव

या चापेकर बंधूंपैकी एकाचे नाव दामोदर हरी चापेकर, तर दुसऱ्याचे नाव बाळकृष्ण हरी चापेकर असे होते. दामोदर हरी चापेकर यांचा जन्म २५ जून, १८६९ रोजी झाला. त्यांच्यावर प्रथमपासूनच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता. साहजिकच, इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदत होता. आपणास परकीय सत्तेच्या गुलामगिरीत लाजिरवाणे जिणे जगावे लागत आहे, याची त्यांना अतिशय चीड होती. त्यातच परकीय नोकरशाहीने स्थानिक जनतेविरुद्ध चालविलेल्या जुलूम- जबरदस्तीची भर पडली. त्यातून जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याचा निश्चय चापेकर बंधूंनी केला.

प्लेगची साथ आणि उन्मत्त प्रशासन

परकीय नोकरशाहीला मुळातच भारतीय जनतेच्या सुख दुःखाचे फारसे सोयरसुतक नव्हते. विशेषतः सर्वसामान्य जनतेविषयीची तिची वृत्ती अतिशय बेफिकीरपणाची होती; त्यामुळे सामान्य जनतेच्या अडीअडचणीच्या व संकटाच्या काळातही सहानुभूतिशून्य वृत्ती धारण करून आपल्या अधिकारांचे उन्मत्तपणे प्रदर्शन करण्याकडेच तिचा कल असे. नोकरशाहीच्या या वृत्तीचा अनुभव दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारतीय जनतेला अनेकदा आला होता. त्याची पुनरावृत्ती प्लेगच्या साथीच्या काळातही घडून आली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी सरकारने एका प्लेग कमिशनरची नियुक्ती केली. प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी प्लेग कमिशनर रँड याने पुण्यातील घराघरांत जाऊन प्लेगची लागण झालेली माणसे शोधून काढण्याची आणि त्यांना इतर लोकांपासून बाजूला करण्याची योजना आखली.

प्लेगच्या साथीचे निवारण करण्याच्या दृष्टीने रँड याची वरील योजना योग्य व आवश्यकच होती; परंतु दुर्दैवाने रँडने या योजनेची कार्यवाही अतिशय धसमुसळेपणाने व दहशतीच्या मार्गाने केली. त्याने या कामासाठी लष्कराचा वापर केला. लष्कराच्या जवानांनी रांगडेपणाने पुण्याच्या घराघरांत शिरून बायकामुलांची पर्वा न करता प्लेगच्या रोग्यांचा शोध सुरू केला. यासंबंधी लोकांनी केलेल्या तक्रारींची रँडने जराही दखल घेतली नाही; त्यामुळे प्लेगच्या जोडीने लष्कराच्या अत्याचारांनाही तोंड देण्याचा प्रसंग पुण्याच्या लोकांवर आला. साहजिकच, लोकांमध्ये रँड अतिशय अप्रिय झाला.

रँड व आयर्स्टचा वध

सामान्य लोकांवर होऊ लागलेल्या या अत्याचाराने संतापून जाऊन दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर या चापेकर बंधूनी रँडला त्याच्या कृत्याबद्दल धडा शिकविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरकमहोत्सवी समारंभाचा दिवस निश्चित केला. या महोत्सवानिमित्त पुण्याच्या राजभवनात २२ जून, १८९७ रोजी एक समारंभ आयोजित केला होता.

या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या रँड व आयर्स्ट या दोन अधिकाऱ्यांचा चापेकर बंधूंनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गणेशखिंडीत अतिशय साहसाने वध केला. त्यानंतर लगेच पोलिसांच्या चौकशीची चक्रे फिरू लागली. फितुरीमुळे चापेकर बंधू पकडले गेले. पुढे या कटाची माहिती पोलिसांना पुरविणाऱ्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या फितूर बंधूंना ८ फेब्रुवारी, १८९९ रोजी वासुदेव हरी चापेकर व म. वि. रानडे या दोघांनी ठार केले.

दामोदर चापेकर एक प्रेरणास्रोत

या प्रकरणी दामोदर चापेकर (१८ एप्रिल, १८९८), बाळकृष्ण चापेकर (१२ मे, १८९९), वासुदेव चापेकर (८ मे, १८९९) आणि म. वि. रानडे (१० मे, १८९९) या चौघाही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली; परंतु चापेकर बंधूंचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या बलिदानातून अनेक भारतीय क्रांतिकारकांना स्वदेशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा मिळाली.

अशा क्रांतिकारकांपैकीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक होत. त्यांनी आपल्या आत्मवृत्तात अशी नोंद करून ठेवली आहे की, “स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चापेकर फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जाता जाता चेतविलेली शत्रुंजय वृत्ती, यज्ञकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणे असेल तर त्याचे दायित्व आपल्यावरही पडत आहे, हा विचार माझ्या मनात बळावू लागला.” अशा मनोवस्थेतच सावरकरांनी आपल्या घरातील अष्टभुजा देवीसमोर अशी शपथ घेतली की, “देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन.”

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment