गोपाळ गणेश आगरकर माहिती | Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

आगरकर यांचा अल्प परिचय

गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादाच्या आधारावर समाजसुधारणेचा पुरस्कार करणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १४ जुलै, १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. त्यांच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. या परिस्थितीचे चटके त्यांना लहान वयातही बसले होते. लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांना जीवन जगावे लागले होते. घरच्या गरिबीमुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गोपाळरावांवर कऱ्हाड, रत्नागिरी, अकोला अशा वेगवेगळ्या गावी भ्रमंती करण्याची पाळी आली होती. शिक्षण घेत असतानाच कारकून, दवाखान्यातील कम्पौन्डर यांसारख्या लहानसहान नोकऱ्याही त्यांना वेळोवेळी कराव्या लागल्या होत्या. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण पुरे करण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगली होती; त्यामुळे परिस्थितीवर मात करून स्वतःचे शिक्षण त्यांनी सुरूच ठेवले. सन १८७५ मध्ये आगरकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

शिक्षण

मॅट्रिक झाल्यावर उच्च शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्थात, पुण्यातही प्रतिकूल परिस्थितीने त्यांचा पिच्छा पुरविला होताच; पण त्याचबरोबर या परिस्थितीवर मात करण्याची त्यांची जिद्दही कायम होती. त्यामुळेच आपले कॉलेज- शिक्षण पूर्ण करणे त्यांना शक्य झाले. १८७८ मध्ये इतिहास, अर्थशास्त्र, संस्कृत, गणित व इंग्रजी हे विषय घेऊन ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर सन १८८० मध्ये एम. ए. ची पदवीही त्यांनी संपादन केली.

त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गरिबीशी झगडण्यातच गेले होते. शिक्षण पूर्ण केल्यावर चांगल्या प्रकारची नोकरी मिळविणे त्यांना सहज शक्य होते; कारण त्या काळात इतके उच्च शिक्षण घेतलेल्या भारतीय तरुणांची संख्या अतिशय थोडी असे. पण गोपाळरावांनी वैयक्तिक मान-सन्मान आणि मोह बाजूला ठेवून समाजाविषयीच्या आपल्या कर्तव्याला जागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी स्वतःला समाजसेवेच्या व जनजागृतीच्या कार्याला वाहून घेतले.

ते पुण्यात शिक्षण घेत असतानाच ते बाळ गंगाधर टिळक यांच्या सहवासात येण्याचा योग जुळून आला. एम. ए. च्या वर्गात असताना टिळक एलएल्. बी.चा अभ्यास करीत होते. याच काळात त्यांचा परस्परांशी परिचय झाला. राष्ट्रसेवेच्या समान ध्येयाने झपाटलेल्या या दोघा युवकांनी आपल्या मातृभूमीच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्यानुसार प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी, १८८० रोजी पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल‘ची स्थापना केली. लवकरच टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा‘ (२ जानेवारी, १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी‘ (४ जानेवारी, १८८१) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. ‘केसरी’च्या संपादकपदाची जबाबदारी आगरकरांवर होती. २४ ऑक्टोबर, १८८४ रोजी टिळक-आगरकरांनी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. त्याच्या पुढील वर्षी म्हणजेच २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने पुण्यातच ‘फर्ग्युसन कॉलेज‘ कार्यान्वित झाले. ऑगस्ट, १८९२ मध्ये याच कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्रे आगरकरांच्या हाती आली.

टिळक व आगरकर यांनी काही वर्षे एकत्र काम केले तरी पुढे लवकरच त्यांच्यात मतभेदाला सुरुवात झाली. मतभेदाचा प्रमुख मुद्दा ‘आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य?’ हा होता. राजकीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला अग्रक्रम द्यावा, अशी टिळकांची भूमिका होती. याउलट, आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष उचलून धरला होता. या दोघांमधील मतभेद पुढे सतत वाढतच गेले; त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर, १८८७ रोजी ‘केसरी’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर १५ ऑक्टोबर, १८८८ रोजी त्यांनी ‘सुधारक‘ नावाचे आपले वेगळे साप्ताहिक सुरू केले. ‘सुधारक‘ हे पत्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध केले जात होते. त्याच्या मराठी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी आगरकरांनी, तर इंग्रजी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांभाळली होती. अशा प्रकारे आगरकरांनी प्रथम ‘केसरी’ व नंतर ‘सुधारक’ या वृत्तपत्रांद्वारे जनजागृतीचे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले होते.

१७ जून, १८९५ रोजी त्यांचे पुणे येथे अकालीच निधन झाले.

व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य यांचा पुरस्कार गोपाळ गणेश आगरकर यांनी शुद्ध बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. ‘बुद्धिवाद’ व ‘व्यक्तिवाद’ यांचे सुसंगत तत्त्वज्ञान महाराष्ट्रीय लोकांपुढे मांडून त्याआधारे सुधारणावादाचा पक्ष मजबूत करण्याचे कार्य प्रथम त्यांनीच केले. त्यांच्या सुधारणावादी विचारांचा प्रमुख आधार व्यक्तिवाद हाच होता. त्यांनी व्यक्ती हे स्वयंभू मूल्य मानले होते. व्यक्तीच्या कल्याणासाठी समाज आहे, समाज हे स्वयंभू मूल्य नाही; व्यक्तीच्या कल्याणातून समाजाचे कल्याण आपोआप साधते म्हणून व्यक्तीच्या विकासावर व स्वातंत्र्यावर कोणतीही अस्वाभाविक बंधने घालणे उचित नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

आगरकर व्यक्तिवादी असल्याने व्यक्तिस्वातंत्र्याला त्यांनी अतिशय महत्त्व दिले होते. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय समाजातील चातुर्वर्ण्य पद्धती व जातिव्यवस्था यांना विरोध केला होता. हिंदू संस्कृतीमधील चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे विचार, विवाह व व्यवसाय यांबाबतीत प्रत्येक व्यक्ती विविध बंधनांत पूर्णपणे जखडली गेलेली असते. तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. साहजिकच, व्यक्तीला स्वतःचा पूर्ण विकास साधता येत नाही. तेव्हा व्यक्तिविकासासाठी तिला स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे; पण हिंदू संस्कृतीने व्यक्तीवर अनेक निर्बंध घातले असल्याने तिला खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही; म्हणून हिंदू संस्कृतीमधील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारी ही बंधने झुगारून दिली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

आगरकरांनी व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड देऊन सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा केला होता. बदलत्या परिस्थितीनुसार समाजातही परिवर्तन होऊन तो गतिशील बनला पाहिजे, त्याकरिता भौतिकवाद व बुद्धिवाद यांच्या निकषावर समाज- रचनेची नवी मूल्ये आपण निर्भयपणे स्वीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

सामाजिक सुधारणांचा पुरस्कार

आगरकरांनी भारतीय समाजातील बालविवाह, केशवपन, जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनेक अनिष्ट चालीरीती व रूढींना विरोध केला होता. आपल्या समाजातील या अनिष्ट चालीरीती, रूढी बंद केल्याखेरीज व्यक्तीला चांगल्या प्रकारचे जीवन जगता येणार नाही; तसेच आपल्या समाजाचीही उन्नती होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यासाठीच त्यांनी समाजसुधारणेचा पक्ष मोठ्या हिरीरीने उचलून धरला होता.

जातिव्यवस्थेस विरोध

आगरकरांनी चातुर्वर्ण्य पद्धती व जातिव्यवस्था यांना सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला होता. आपल्यातील जातिभेदामुळेच व्यक्तीचा व राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. यासंबंधीचे आपले विचार त्यांनी अतिशय परखडपणे लोकांसमोर मांडले होते. पुण्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काही लोकांना दिलेल्या एका चहापार्टीवरून सनातन्यांनी मोठेच काहूर माजविले होते. त्या पार्टीला आगरकर हजर होते, असा आरोप करून त्यांनी आगरकरांना आपल्या हल्ल्याचे लक्ष्य बनविले होते. सनातन्यांच्या या टीकेला उत्तर देताना आगरकरांनी म्हटले होते की, “ब्राह्मणेतरांच्या हातचा चहा पिण्यात आम्हास दोष वाटत नाही. इतकेच नव्हे तर महार व ब्राह्मण एका पंक्तीत बसले तर आम्हास मोठे कृतार्थ वाटेल.”

बालविवाहाच्या प्रथेस विरोध

बालविवाहाच्या प्रथेला आगरकरांचा तीव्र विरोध होता. या संदर्भात ते म्हणतात-

“बालविवाह बंद झाल्यास आज प्रत्येक घरी ज्या हतभागी बालविधवा दृष्टीस पडतात त्या पडेनाशा होतील, तसेच तरुणांस आपापल्या मनाप्रमाणे बायका पसंत करण्याची सवड मिळून स्त्री-पुरुषांच्या सुखाची वृद्धी होईल. स्त्रियांनाही आपली सांसारिक जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास योग्य वातावरण तयार होईल.” त्यांच्या या भूमिकेतूनच त्यांनी ‘संमती वय विधेयका‘स पाठिंबा दिला होता व त्याचे जोरदार समर्थन केले होते. या ‘संमती वय विधेयका’स सनातनी गटाने मोठाच विरोध केला होता.

अशा प्रकारच्या विधेयकामुळे सरकारचा आमच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप होतो, असा त्यांचा युक्तिवाद होता, पण आगरकरांना हा युक्तिवाद मान्य नव्हता. आपल्या धर्मातील दुष्ट प्रथा त्वरित नष्ट झाल्या पाहिजेत; मग त्यासाठी कायद्याचा आधार घेणे गरजेचे वाटले तरी तो घेण्यास हरकत नाही. सामाजिक सुधारणेसाठी कायद्याची मदत घेतल्याने कसलाही अनर्थ ओढवणार नाही, असे त्यांचे मत होते, म्हणून केशवपनासारखी दुष्ट प्रथा कायद्याच्या मार्गानेच बंद केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.

बुद्धिवादाचा आश्रय

हिंदू धर्मातील मूर्खपणाच्या आचारविचारांवर त्यांनी कडाडून टीका केली होती. धर्माच्या नावाखाली या ठिकाणी अनेक लज्जास्पद प्रकार चालू असतात. ते देखील त्वरित बंद होणे समाजाच्या दृष्टीने हिताचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. शिमग्याच्या सणाविषयी त्यांनी एके ठिकाणी लिहिले होते की, ‘इतका बीभत्स सण दुसऱ्या कोणत्याही देशात पाळला जात नसेल.’ हिंदू धर्मीयांच्या ऐहिक जीवनाला गौण मानून पारमार्थिक जीवनाला अधिक महत्त्व देण्याच्या वृत्तीवरही त्यांनी टीका केली होती. अशा वृत्तीमुळेच आपला समाज निष्क्रिय बनला आहे, असे त्यांचे मत होते.

आगरकरांच्या सर्व लिखाणातून त्यांची समाजहिताची तळमळ जागोजागी व्यक्त होते. त्यांच्या जहाल सुधारणावादाच्या मुळाशी ही तळमळच प्रधान होती. त्यांची प्रज्ञा स्वतंत्र होती. ग्रंथप्रामाण्य त्यांनी कधीच मानले नाही. आपल्या लोकांनी बुद्धिवाद व भौतिकवाद यांचा आश्रय घेऊन स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. समाजहिताच्या तळमळीपोटीच त्यांनी आपल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व दांभिकता यांवर प्रखर हल्ला चढविला. त्यांचे विचार येथील समाजाला फारसे रुचले नाहीत. त्या वेळच्या सनातनी मंडळींनी तर आगरकरांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढली होती. तथापि, समाज परिवर्तनासाठी वाटेल ते कष्ट सोसण्याची व अवहेलना सहन करण्याची आगरकरांची तयारी होती; म्हणूनच महाराष्ट्राच्या द्रष्ट्या समाजसुधारकांमध्ये त्यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते.

‘डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस’ (१८८२) हा गो. ग. आगरकरांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. या ग्रंथात लोकमान्य टिळकांसह मुंबई येथील डोंगरीच्या तुरुंगात त्यांनी सोसलेल्या पहिल्या तुरुंगवासाची हकीकत सांगितली आहे.

Leave a Comment