वासुदेव बळवंत फडके | Vasudev Balvant Fadke information in Marathi

google-news-icon

आद्य क्रांतिकारक

वासुदेव बळवंत फडके यांना ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणून संबोधले जाते. सन १८५७ च्या ऐतिहासिक उठावानंतर हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेला कसलाही धोका राहिला नाही. ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढल्यावर त्यांच्या सत्तेला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही शक्ती या ठिकाणी अस्तित्वात राहिली नव्हती;

त्यामुळे सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने हिंदुस्थानातील इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याचा विचारही त्या काळात कोणी करू शकत नव्हते. तथापि, अशा प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या जुलूमजबरदस्तीच्या व अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून ब्रिटिश सत्तेविरुद्ध दोन हात करण्याचा प्रयत्न येथील काही क्रांतिकारकांनी केला होता. अशा क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

वासुदेव बळवंत फडके परिचय

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर, १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर न्या. रानडे यांच्या विचारांचा प्रभाव होता. तथापि, इंग्रजी सत्तेविषयी त्यांच्या मनात प्रथमपासूनच राग होता. इंग्रजी सत्तेविरुद्ध येथील तरुणांना संघटित करण्याचा विचार त्यांनी चालविला होता. त्यासाठी त्यांनी गावोगावी व्यायामशाळा उघडल्या. याशिवाय ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ या नावाची एक संस्थाही त्यांनी स्थापन केली होती.

इंग्रजांच्या अन्याय्य कारभारामुळे संतप्त

वासुदेव बळवंत फडके हे काही काळ सरकारी नोकरीत होते; परंतु इंग्रज सरकारचे येथील जनतेविषयीचे आणि विशेषतः दुष्काळग्रस्तांविषयीचे धोरण पाहून त्यांच्या मनात सरकारविषयी घृणा उत्पन्न झाली. सन १८७६ मध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत फार मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळात येथील गोरगरीब जनतेचे व सामान्य शेतकऱ्यांचे अतोनात हाल चालले होते.

अशा वेळी इंग्रज सरकारने दुष्काळग्रस्त जनतेला मदत तर केली नाहीच; पण तिच्याविषयी साधी सहानुभूतीही व्यक्त केली नाही. याउलट, दुष्काळामुळे सरकारी सारा देण्याच्या अवस्थेत नसलेल्या शेतकऱ्यांकडून तो जवा वसूल करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला. याच काळात येथील लोकांवर करावे ख ओझे लादण्याचाही निर्णय सरकारने घेतला.

इंग्रज सरकारचे गरीब जनतेविषयीचे हे बेपर्वाईचे व अमानुष धोरण पाहून वासुदेव बळवंत फडके यांना अतिशय संताप आला. त्या भरात त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा त्याग केला. इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड करण्याचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. जनतेच्या मुक्ततेसाठी व आपल्या राष्ट्राच्या उद्धारासाठी बंडाखेरीज दुसरा पर्याय नाही, असे त्यांचे ठाम मत बनले.

सशस्त्र लढ्याच्या मार्गाने

इंग्रज सत्तेविरुद्ध बंडाच्या पूर्वतयारीसाठी फडके यांनी येथील रामोशी, भि यांसारख्या मागासलेल्या पण लढवय्या जमातींतील लोकांना हाताशी धरण्याचे ठरविले, त्यांनी या लोकांना संघटित केले आणि त्यांच्या मदतीने इंग्रज सरकारविरुद्ध सशस्त्र लढा सुरू केला.

फडके यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करून परकीय सरकारच्या विरोधात प्रचाराची जोरदार आघाडी उघडली. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी निरनिराळ्या मार्गांनी शस्त्रास्त्रे गोळा केली. आपल्या या कार्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता भासू लागली; तेव्हा त्यांनी जुलमी शेठ-सावकार व श्रीमंत लोकांकडून जबरदस्तीने खंडण्या वसूल केल्या. ठिकठिकाणांच्या सरकारी कचेऱ्या व दप्तरे यांना आगी लावून ती जाळून टाकण्याचे सत्र त्यांनी आरंभिले. या मागनि इंग्रज सरकारविरुद्धचा आपला संताप व उद्विग्नता प्रकट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

सामाजिक पाठिंब्याचा अभाव

वासुदेव बळवंत फडके यांचा हा सशस्त्र लढा केवळ पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित नव्हता. महाराष्ट्राच्या जवळजवळ सात जिल्ह्यांमध्ये त्यांनी इंग्रजी सत्तेला शह देण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे इंग्रज सरकार काही काळ मोठ्याच अडचणीत सापडले होते. तथापि, फडके यांचा उदात्त हेतू त्यांच्या अडाणी व अशिक्षित अनुयायांना पूर्णपणे आकलन होऊ शकला नाही; त्यामुळे त्यांच्या उठावाला परकीय सत्तेविरुद्ध व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले नाही.

या उठावाची व्याप्ती दरोडे, जाळपोळ व लुटालूट एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली. त्यातही इंग्रज सरकारपेक्षा स्थायिक शेठ-सावकारांनाच त्याची विशेष झळ पोहोचली. अर्थात, या गोष्टीला त्या काळातील समाजस्थितीही काही प्रमाणात कारणीभूत ठरली होती. येथील समाजात राष्ट्रवादाची भावना पुरेशी प्रखर झाली नव्हती. सुशिक्षित व पांढरपेशा वर्गाची आपल्या व्यक्तिगत स्वार्थापलीकडे पाहण्याची तयारी नव्हती; त्यामुळे या वर्गाची साथ फडक्यांना मिळू शकली नाही.

समाजात बहुसंख्येने असलेल्या अशिक्षित लोकांकडून अशा प्रकारच्या उठावाला मदत मिळण्याची अपेक्षाच नव्हती; कारण राष्ट्रवादाचा अर्थही त्यांना माहीत नव्हता. अशाही परिस्थितीत फडके यांनी स्वप्रयत्नांनी जे थोडेफार सहकारी गोळा केले होते त्यांच्यापैकी बहुतेकजण लुटालूट करून पांगले; कारण पैसा मिळविण्याच्या उद्देशानेच ते बंडात सामील झाले होते.

एकाकी लढ्याची अखेर

सहकारी सोडून गेल्यामुळे फडक्यांना पुढे एकाकी लढा द्यावा लागला. अनुयायी व शस्त्रसामग्री या दोहोंचीही चणचण त्यांना भासू लागली. आत्मसमर्पणाचा विचारही त्यांच्या मनात आला होता; परंतु एकाकी अवस्थेतही त्यांनी सरकारविरुद्धचा संघर्ष चालूच ठेवला. इंग्रज सरकारनेही फडके यांचा हा उठाव मोडून काढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली.

त्यांना पकडून देण्यासाठी सरकारने मोठे इनाम लावले; पण फडक्यांनी सरकारच्या या प्रयत्नांना लवकर दाद दिली नाही. अखेरीस २१ जुलै, १८७९ रोजी कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी येथे फडक्यांना पकडले गेले. भारतीयांच्या फंदफितुरीच्या प्रवृत्तीचा ब्रिटिश राजवटीने पुन्हा एकदा फायदा उठविला. सरकारने त्यांच्यावर खटला भरला. या खटल्यात गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारले; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

न्या. न्यूनहॅम यांच्यासमोर चाललेल्या या खटल्यात वासुदेव बळवंत फडक्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. इंग्रज सरकारने त्यांची रवानगी देशाबाहेर एडनच्या तुरुंगात केली. या तुरुंगातूनही पळून जाण्याचा प्रयत्न एकदा फडक्यांनी केला होता; परंतु तो अयशस्वी ठरला. शेवटी एडनच्या तुरुंगातच १७ फेब्रुवारी, १८८३ रोजी त्यांचा अंत झाला.

लढाऊ राष्ट्रवादाचे जनकत्व

फडके यांचा इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला हे खरेच; परंतु हिंदुस्थानात परकीय सत्तेविरुद्धच्या सशस्त्र लढ्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य त्यांनीच केले हे मान्य करावेच लागेल. ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून त्यांना यथार्थतेने गौरविले जाते.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment