मुद्दे
दादासाहेब फाळके परिचय
‘दादासाहेब फाळके’ हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होत. त्यांचे संपूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असे होते; पण दादासाहेब फाळके या नावानेच ते विशेष प्रसिद्ध आहेत. दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ३० एप्रिल, १८७० रोजी झाला. मुंबईच्या मराठी हायस्कूलमधून १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ मध्ये प्रवेश घेतला.
पुढे ज्येष्ठ बंधू शिवरामपंत फाळके यांच्या प्रोत्साहनामुळे १८९० मध्ये त्यांनी बडोद्याच्या कलाभुवनमधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर वास्तुकला, साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास त्यांना प्रोसेस फोटोग्राफी व त्यावरील प्रक्रिया, हाफ्टोन ब्लॉक तयार करणे या गोष्टींचा छंद जडला.
बडोद्याच्या कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनाने दादासाहेब फाळके यांनी श्री कलर प्रोसेस, फोटोलिथो, छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत वेगवेगळे प्रयोग केले. त्यानंतर त्यांनी काही काळ बडोदा व गोध्रा या ठिकाणी छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून कामे केली. याशिवाय जादूविद्या शिकून त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आपले जादूचे प्रयोगही सादर केले.
सन १९०३ मध्ये दादासाहेब फाळके यांना भारत सरकारच्या पुराणसंशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून नोकरी मिळाली. तथापि, १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीमुळे राष्ट्रीय वृत्तीचे फाळके अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतूनच त्यांनी १९०६ मध्ये सुरक्षित अशा शासकीय नोकरीचा राजीनामा दिला.
यापुढील काळात फाळके यांनी १९०८ मध्ये लोणावळा या ठिकाणी ‘फाळकेज्’ एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग वर्क्स’ ही संस्था सुरू केली. पुढे ती मुंबईतील दादर येथे हलविली आणि तिचे रूपांतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये केले. १९०९ मध्ये ते जर्मनीहून तीन रंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले. त्यांनी थोडे दिवस ‘सुवर्णमाला’ हे मराठी-गुजराती भाषांतील कलापूर्ण सचित्र मासिकही चालविले.
चित्रपटक्षेत्राकडे आकर्षित
एप्रिल, १९९१ मध्ये दादासाहेबांच्या पाहण्यात ‘दि लाईफ ऑफ खाईस्ट’ (ख्रिस्ताचे जीवन) या नावाचा मूकपट आला. त्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला स्वतःचा चित्रपटव्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी प्रथम त्यासंबंधीचा आवश्यक तो अभ्यास केला. या अभ्यासाकरिता आवश्यक असलेले चित्रपटविषयक वाङ्मय त्यांनी परदेशातून मागवून घेतले. त्यानंतर लवकरच इंग्लंडला जाऊन चित्रपट- निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि अन्य साहित्य यांची खरेदी करून ते भारतात परतले.
एवढ्या पूर्वतयारीनंतर दादासाहेब फाळकेंनी १९१२ मध्ये प्रथम ‘रोपट्यांची वाढ’ हा लघुपट तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटनिर्मितीकडे वळले. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक ते भांडवल उभे करण्याकरिता त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण टाकावे लागले होते. तसेच मित्रमंडळींकडूनही काही मदत त्यांनी गोळा केली होती. या सर्व प्रयत्नांतून त्यांनी दादरमध्ये आपले स्वतंत्र चित्रपटनिर्मितिगृह सुरू केले.
पहिल्या भारतीय चित्रपटाचा जन्मदाता
दादासाहेबांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा होता, तो तयार करण्यासाठी दादासाहेबांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. ३ मे, १९१३ रोजी हा चित्रपट पहिल्यांदा मुंबईच्या कोरोनेशन हॉलमध्ये प्रदर्शित केला गेला. हाच भारतात तबार झालेला पहिला चित्रपट होय; म्हणून दादासाहेब फाळके यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ असे म्हटले जाते. आपल्या या पहिल्याच चित्रपटात त्यांनी लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, संकलनकार, कलादिग्दर्शक इत्यादी विविध भूमिका एकट्यानेच पार पाडल्या होत्या.
चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक अर्थातच दादासाहेब हेच होते. यावरून ते किती अष्टपैलू व हरहुन्नरी कलाकार होते याची कल्पना येते. त्या काळात फाळके स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि आपल्या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांना दाखवीत. त्यांच्या या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळविली होती.
त्या काळी पौराणिक विषयांवरील चित्रपटांनाच यश मिळण्याची शक्यता अधिक होती. ही गोष्ट ध्यानी घेऊन दादासाहेब फाळके यांनी पौराणिक चित्रपटनिर्मितीला विशेष प्राधान्य दिले. अशा चित्रपटांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उदा. देवालये, घाट, लेणी, मोठमोठे वाडे, नैसर्गिक परिसर इत्यादी, नाशिक शहरात जास्त प्रमाणात असल्याने दादासाहेबांनी आपले चित्रपट निर्मितिगृह मुंबईहून नाशिकला हलविले. त्या ठिकाणी त्यांनी ‘मोहिनी-भस्मासूर’ आणि ‘सत्यवान सावित्री’ हे दोन चित्रपट तयार केले. ते दोन्ही यशस्वी ठरले.
अनुबोधपटांचे जनकही फाळकेच
त्यानंतर फाळके लघुपट व व्यंगपट यांकडे वळले. त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट व शैक्षणिक लघुपट भारतात पहिल्यांदाच तयार केले. अशा प्रकारे भारतातील अनुबोधपटांच्या जनकत्वाचा मानही त्यांच्याकडेच जातो. दादासाहेबांनी ‘रंगभूमी’ नावाचे एक नाटकही लिहिले होते; पण ते व्यावसायिक- दृष्ट्या फारसे यशस्वी ठरले नाही.
१ जानेवारी, १९१८ रोजी फाळके यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. या कंपनीने एकूण ९७ चित्रपट काढले. त्यांपैकी ४० चित्रपट फाळके यांनी दिग्दर्शित केले होते. त्यांतील लंकादहन, श्रीकृष्णजन्म, कालियामर्दन इत्यादी चित्रपट विशेष गाजले. कोल्हापूर सिनेटोनसाठी फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगावतरण’ हा त्यांचा पहिला बोलपट होय. हा बोलपट ६ ऑगस्ट, १९३७ रोजी प्रदर्शित झाला.
दादासाहेब फाळके यांनी तयार केलेले काही लघुपट व अनुबोधपट पुढीलप्रमाणे होत- आगकाड्यांची मौज, लक्ष्मीचा गालिचा, केल्फाच्या जादू, धूम्रपानलीला, स्वप्नविहार, सिंहस्थपर्वणी, धांदल भटजींचे गंगास्नान, गंधर्वाचा स्वप्नविहार, खंडाळा घाट, विचवाचा दंश, खोड मोडली, वचनभंग इत्यादी.
१६ फेब्रुवारी, १९४४ रोजी या चित्रपट महर्षीचे- भारतीय चित्रपटसृष्टीच्या या उद्गात्याचे निधन झाले.
सन १९७० पासून म्हणजे फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ काळ उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत व तंत्रज्ञ यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रतिवर्षी देण्याचा उपक्रम देशात राबविला जात आहे.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!