रँग्लर परांजपे माहिती मराठी | Rangler Paranjape Information in Marathi

पहिले भारतीय रँग्लर

रँग्लर परांजपे यांचे संपूर्ण नाव रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे असे होते; पण ते ‘रँग्लर परांजपे’ या नावानेच विशेष परिचित आहेत. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी, १८७६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुर्डी, अंजर्ला व दापोली या ठिकाणी झाले; तर पुढील शिक्षण पुणे व मुंबई या ठिकाणी झाले. त्यांच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती विशेष चांगली नव्हती; म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना मुंबईस आणले; त्यामुळे उच्च शिक्षण घेणे त्यांना शक्य झाले.

मुंबई विद्यापीठाची बी. एस्सी. परीक्षा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सन १८९६ मध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. तेथे केंब्रिज विद्यापीठात ‘मॅथेमॅटिकल ट्रायपास’ या परीक्षेत ते सर्वप्रथम आले आणि त्यांनी ‘सिनियर ऍलर’ हा बहुमान मिळविला. ‘रँग्लर’ ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय होत.

रँग्लर परांजपे यांचे शैक्षणिक कार्य

त्यानंतर त्यांनी काही काळ फ्रान्समधील ‘पॅरिस विद्यापीठ’ आणि जर्मनीमधील ‘गटिंग्टन विद्यापीठ’ या ठिकाणीही अध्ययन केले. १९०२ मध्ये ते भारतात परत आले. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून भारत सरकारने सनदी सेवेत त्यांना उच्च अधिकाराची जागा देऊ केली होती; परंतु रँग्लर परांजपे यांना सरकारी नोकरीपेक्षा मातृभूमीच्या सेवेत अधिक रस होता. त्यांच्यावर राष्ट्रवादी विचारांचे संस्कार झाले होते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता.

इंग्लंडमधील वास्तव्यात ते दादाभाई नौरोजी यांसारख्या देशभक्तांच्या सहवासात आले होते; त्यामुळे सरकारातील उच्च अधिकारपदाचा मोह त्यांना झाला नाही. तथापि, मातृभूमीच्या सेवेसाठी राजकारणात उतरण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात कार्य करणेच त्यांनी पसंत केले. म्हणून पुण्याच्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षणसंस्थेत दरमहा पंच्याहत्तर रुपये वेतनावर आजीव सेवक म्हणून काम करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. त्या संस्थेच्या फर्गसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला. पुढे फर्गसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

वैचारिक एकनिष्ठता

रँग्लर परांजपे बुद्धिप्रामाण्यवादी व इहवादी होते. त्यांचा ईश्वर, धार्मिक कर्मकांड, पुनर्जन्म, परलोक इत्यादी गोष्टींवर किंवा कल्पनांवर अजिबात विश्वास नव्हता. आपल्या या विचारांशी ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.

रँग्लर परांजपे यांनी राजकीय व सामाजिक चळवळींतही भाग घेतला होता. राजकीय क्षेत्रात ते नेमस्त राजकारणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाला त्यांचा विरोध होता. सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते म्हणूनही ते परिचित आहेत. त्यांच्या बुद्धिवादी दृष्टिकोनामुळे भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती-रुढी व धार्मिक कर्मकांड या गोष्टींना त्यांनी नेहमीच विरोध केला होता.

विविध मानसन्मान

रँग्लर परांजपे यांनी अनेक महत्त्वाची व सन्मानाची पदे भूषविली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. सन १९२१ मध्ये मुंबई इलाख्याचे शिक्षणमंत्री व अबकारी खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतमंत्र्यांच्या इंडिया कौन्सिलचे सभासद म्हणूनही त्यांनी काम केले होते.

लखनौ विद्यापीठ व पुणे विद्यापीठ या विद्यापीठांच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. पुढे १९४४ मध्ये ऑस्ट्रेलियातील भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने ‘नाईटहूड’ तसेच ‘कैसर-इ-हिंद’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.

आचार्य अत्रे यांनी “बुद्धिमत्तेमध्ये मेरू पर्वतासारखा उंच, विद्वत्तेमध्ये सागरासारखा खोल, अंतःकरणाने आकाशासारखा विशाल, कर्तृत्वामध्ये सूर्यासारखा प्रखर आणि स्वभावाने पौर्णिमेच्या चंद्रासारखा शीतल, वैयक्तिक जीवनात नुकत्याच डंवरलेल्या दवबिंदूसारखा निष्कलंक आणि पारिजातकासारखा कोमल,” अशा भावपूर्ण शब्दांत शैलर परांजपे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन केले होते.

मृत्यू – ६ मे, १९६६.

Leave a Comment