स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी | Swatantra Veer Savarkar Information in Marathi

google-news-icon

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची माहिती मराठीत

मातृभूमीचा निस्सीम भक्त

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे थोर देशभक्त, हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक, समाजसुधारक, साहित्यिक व विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महान कामगिरी बजाविली होती. हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करून त्यांनी आधुनिक भारताच्या राजकारणावर स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा परिचय

त्यांचं संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. त्यांचा जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांचे शिक्षण भगूर, नाशिक व पुणे या ठिकाणी झाले. सन १९०१ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजात प्रवेश घेतला. या कॉलेजमधूनच ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लहानपणापासूनच क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. आपल्या हिंदू धर्माचा व भारतीय संस्कृतीचा त्यांना अत्यंत अभिमान होता. आपल्या देशावर परकीयांनी राज्य करावे याची त्यांना मनापासून चीड होती. इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा देण्याचे विचार त्यांच्या मनात लहान वयातच मूळ धरू लागले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा

पुण्यातील प्लेगच्या साथीत सामान्य लोकांवर अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड याचा चापेकर बंधूनी खून केला. त्याबद्दल चापेकर बंधूना फाशीची शिक्षा झाली. ही बातमी ऐकल्यावर चौदा वर्षे वयाच्या सावरकरांचे मन अस्वस्थ झाले. या मनःस्थितीतच त्यांनी दुर्गामातेपुढे अशी प्रतिज्ञा केली की, “माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरे पर्यंत झुंजेन.” स्वातंत्र्यवीर सावरकरांची राष्ट्रभक्ती व मनाचा निर्धार यांची कल्पना येण्याच्या दृष्टीने ही घटना खूपच बोलकी आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा

शालेय शिक्षण घेत असतानाच सावरकरांनी १ जानेवारी, १९०० रोजी ‘मित्रमेळा‘ नामक संघटना स्थापन केली. पुढे १९०४ मध्ये मित्रमेळ्याचे ‘अभिनव भारत‘ या संघटनेत रूपांतर झाले. ‘पारतंत्र्याचे पाश तोडून हिंदमाता परदास्यमुक्त करून स्वतंत्र करण्यासाठी शक्यतो शांततेने व अशक्य तेथे दंडाने अशा सर्व उपायांनी झटावयाचे’ असे ‘मित्रमेळ्या’चे ध्येय ठरविण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजात शिकत असतानाही सरकारविरोधी चळवळीत उतरले होते. या काळात परदेशी कापडाची होळी केल्याबद्दल त्यांना कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनी वसतिगृहातून काढून टाकले होते व दहा रुपये दंड केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा

‘इंडिया हाऊस’च्या क्रांतिकारकांशी संलग्न

सन १९०६ मध्ये सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. त्यासाठी त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या शिफारशीवरून ‘शिवाजी शिष्यवृत्ती‘ दिली होती. इंग्लंडमध्ये गेल्यावरही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले क्रांतिकार्य चालूच ठेवले. लंडनच्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये भारतीय क्रांतिकारकांच्या सभा होऊ लागल्या. त्या सभांचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर करू लागले.

इंग्लंडमधील वास्तव्यातच क्रांतिकार्यासाठी शस्त्रास्त्रे जमविण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. बॉम्ब बनविण्याचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले. इंग्लंडमधून भारतात गुप्तपणे पिस्तुले पाठविण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. या कामी त्यांना इंग्लंडमधील भारतीय क्रांतिकारकांचे साहाय्य लाभले. अशा प्रकारे लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ हे भारतीय क्रांतिकारकांच्या चळवळीचे केंद्रच बनले. सावरकरांनी या काळात ‘जोसेफ मॅझिनी’ या नावाचे मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे चरित्र, ‘भारतीय स्वातंत्र्यसमर‘, ‘शिखांचा इतिहास‘ इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथही लिहिले होते.

इंग्लंडमध्ये अटक व अयशस्वी पलायन

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य ब्रिटिश सरकारच्या नजरेतून सुटले नाही. सरकारने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले; त्यामुळे ते काही काळ इंग्लंडहून फ्रान्सला गेले. परंतु भारतीय क्रांतिकारकांच्या प्रयत्नांमागे त्यांचीच प्रेरणा आहे याची खात्री सरकारला पटली होती; म्हणून ते फ्रान्सहून इंग्लंडला परतल्यावर सरकारने त्यांना ताबडतोब अटक केली आणि ‘मोरिआ‘ नावाच्या बोटीतून त्यांची भारतात रवानगी केली. तथापि, ही बोट फ्रान्सच्या किनाऱ्यावर असलेल्या मार्सेलिस बंदरात आल्यावर त्यांनी बोटीतून भर समुद्रात उडी घेतली आणि पोहत पोहत फ्रान्सचा किनारा गाठला; परंतु तेथे त्यांना पकडून परत इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले.

पन्नास वर्षांची शिक्षा व ‘माझी जन्मठेप’

पुढे इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतात आणले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. २३ डिसेंबर, १९१० रोजी या खटल्यात त्यांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उद्‌गार काढले, “पन्नास वर्षे! तोवर ब्रिटिश राज्य टिकले तर!” त्यांच्या या तेजस्वी उद्‌गारांची भारताच्या इतिहासात कायमची नोंद झाली आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानात पाठविले गेले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवलेली कोठडी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवलेली कोठडी

विठ्ठलभाई पटेल व रंगास्वामी अय्यंगार यांच्या प्रयत्नाने २ मे, १९२१ रोजी त्यांना अंदमानातून भारतात आणले गेले व रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले; परंतु पुढे ६ जानेवारी, १९२४ रोजी राजकीय चळवळीत भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातच वास्तव्य करण्याचे आणि सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय त्या जिल्ह्याची हद्द न ओलांडण्याचे बंधनही त्यांच्यावर घालण्यात आले. पुढे कूपर-जमना दास मंत्रिमंडळाने त्यांच्यावरील ही बंधने उठविली. तुरुंगवासाच्या काळातील आपल्या अनुभवांचे कथन करणारे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले आहे.

अंदमान येथील तुरुंग
अंदमान येथील तुरुंग

हिंदू संघटन व अखंड भारताचा पुरस्कार

रत्नागिरीतील वास्तव्याच्या काळातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदू महासभेशी संबंध आला. याच काळात त्यांनी अस्पृश्यता निवारण, सहभोजन, शुद्धीकरण मोहीम इत्यादी कार्याकडेही लक्ष पुरविले. रत्नागिरी येथे त्यांनी ‘पतितपावन मंदिरा‘ ची उभारणी केली. अखिल हिंदुंसाठी बांधलेल्या या मंदिराचे त्यांनी २२ फेब्रुवारी, १९३१ रोजी उद्घाटन केले. एवम् विविध कार्यक्रमांच्या वा उपक्रमांच्या माध्यमांतून हिंदू धर्मीयांचे ऐक्य घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केलें.

सन १९३७ मध्ये त्यांची बिनशर्त मुक्तता झाली. त्याच वर्षी हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. यापुढील काळात हिंदूंचे संघटन करण्याच्या कार्यावरच त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले. काँग्रेसचे मुस्लिमांच्या अनुनयाचे धोरण देशाच्या हिताचे नाही, असे त्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ‘अखंड भारता’चे पुरस्कर्ते होते. देशाच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता. पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले होते.

हिंदू राष्ट्रवाद

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदू राष्ट्रवादा’चा पुरस्कार केला होता. हिंदू समाज हे एकात्म राष्ट्र आहे आणि भारतभूमी ही सर्व हिंदूंची पितृभूमी तसेच पुण्यभूमीही आहे; म्हणून भारतभूमीवर खऱ्या अर्थाने हिंदूंचा हक्क आहे. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. हिंदूंची व्याख्या करताना त्यांनी म्हटले होते की, “आसिंधुसिंधूपर्यंत पसरलेली भारतभूमी ही ज्याची केवळ पितृभूमीच नव्हे तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू होय.” म्हणजे भारतात स्थापन झालेल्या बौद्ध, जैन, शीख इत्यादी सर्व धर्मांच्या लोकांचाही त्यांनी हिंदूंमध्ये अंतर्भाव केला आहे.

तथापि, मुस्लिम व ख्रिश्चन या धर्मांना मात्र त्यांनी परकीय धर्म मानले आहे. भारत हे हिंदू राष्ट्र असल्याने या ठिकाणी हिंदूंनाच महत्त्व मिळाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. मात्र हिंदू राष्ट्रात अन्य धर्मीयांनाही समान हक्क देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेचाही उल्लेख केला होता. ज्यांनी या देशाच्या भूमीशी आपली निष्ठा वाहिली आहे ते सर्वजण हिंदू राष्ट्राचेच घटक होत, असे त्यांचे म्हणणे होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू धर्माचे कट्टर अभिमानी असले तरी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांना मात्र त्यांनी जोरदार विरोध केला होता. अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता. हिंदू धर्मातील उच्च-नीच भेदभाव दूर करण्यावर त्यांनी भर दिला होता.

सर्व मानव समान आहेत, हे तत्त्व प्रमाण मानून हिंदू संघटन घडवून आणले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. सावरकर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठ होते; त्यामुळे हिंदू धर्मातील काही विचार त्यांना मान्य नव्हते. गाईला देवता मानण्यास त्यांचा विरोध होता. “गाय हा एक उपयुक्त पशू आहे,” असे त्यांनी म्हटले होते. हिंदू धर्मातील बुवाबाजीवरही त्यांनी कठोर टीका केली होती. आपल्यापुढील सर्व प्रश्नांचा बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, असे त्यांचे प्रतिपादन होते.

सावरकरांनी लिहिलेले पुस्तके

स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. माझी जन्मठेप, भारतीय स्वातंत्र्यसमर, सन्यस्त खड्ग, मला काय त्याचे, जोसेफ मॅझिनी, काळे पाणी, हिंदुत्व, हिंदुपदपादशाही इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. तसेच ‘कमला’ हा काव्यसंग्रहदेखील त्यांनी लिहिला आहे. सन १९३८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा असलेल्या या थोर क्रांतिकारकास भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्याने बजावलेल्या महान कामगिरीबद्दल ‘स्वातंत्र्यवीर‘ म्हणून गौरविले जाते.

मृत्यू – २६ फेब्रुवारी, १९६६.

सावरकर यांनी मराठीत दिलेले शब्द

सावरकरांनी मराठी भाषेत पण खूप योगदान दिलं आहे त्यांनी खालील शब्द मराठी भाषेला दिले आहे जे कदाचितच तुम्हाला माहीत असतील.

Dateदिनांक
Serial Numberक्रमांक
Tolkieबोलपट
backstageनेपथ्य
Costumeवेशभूषा
Directorदिग्दर्शक
Filmचित्रपट
Intervalमध्यंतर
Presentउपस्थित
Reflexप्रतिवृत्त
Municipalityनगरपालिका
Corporationमहापालिका
Mayorमहापौर
Supervisorपर्यवेक्षक
Trustedविश्वस्त
Fastत्वर्य/त्वरित
Populationगणसंख्या
Columnस्तंभ
Valueमूल्य
Feeशुल्क
Martyrहुतात्मा
Prohibitionनिर्बंध
head countशिरगणती
Special Number विशेषांक
Referendumसार्वमत
Fountain Penझरणी ( फाऊन्टनपेन )
Radioनभोवाणी (रेडिओ )
Televisionदूरदर्शन
Telephoneदूरध्वनी
Loudspeakerध्वनिक्षेपक
Assembleविधिमंडळ
Budgetअर्थसंकल्प
Playgroundक्रीडांगण
Principalप्राचार्य
Headmasterमुख्याध्यापक
Professorप्राध्यापक
Examinerपरीक्षक
Treaty of Armsशस्त्रसंधी
Post Officeटपाल
Mortgageतारण ( मॉर्गेज )
Paradeसंचलन (परेड )
Dynamicगतिमान
Leadershipनेतृत्व
Retirementसेवानिवृत्त
Salaryवेतन
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment