गोपाळ कृष्ण गोखले माहिती मराठी | Gopal Krishna Gokhale Information in Marathi

google-news-icon
नावगोपाळ कृष्ण गोखले
जन्म९ मे १८६६
जन्म स्थानकोतळुक गाव , रत्नागिरी जिल्हा, भारत
मृत्यु१९ फेब्रुवारी १९१५
वडिलांचे नाव कृष्णराव गोखले
आईचे नाव वालुबाई गोखले
भाऊ बहीण माहीत नाही
लग्न दोनदा लग्न झालं
पहिलं लग्न – इसवी सन १८८० मध्ये
दुसरं लग्न – इसवी सन १८८७ मध्ये
अपत्य दोन मुली
काशीबाई आणि गोदुबाई
शिक्षण बी ए
नोकरी [Occupation]प्राध्यापक आणि राजकारणी
नागरिकत्व [Nationality]भारतीय
संस्था [Organisation]इंडियन नॅशनल कांग्रेस, डेक्कन एजुकेशन सोसाइटी
संस्थापक [FounderMember]सर्वेन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी
आंदोलन [Movement]भारतीय राष्ट्रवादी आंदोलन [Indian Nationalist Movement]
उल्लेखनीय काम भारतीय शिक्षण प्रणालीत योगदान

गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे, तिच्या पहिल्या कालखंडातील एक प्रमुख नेते होते. कॉँग्रेसमधील मावळमतवादी नेते म्हणून ते ओळखले जातात. सार्वजनिक जीवनाच्या शुद्धतेवर त्यांचा विशेष कटाक्ष होता. ‘राजकारणाच्या अध्यात्मिकरणा’चा महत्वाचा विचार त्यांनी मांडला होता.

गोपाळ कृष्ण गोखले – अल्प परिचय आणि शिक्षण

गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या गावात झाला. त्यांचे वडील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल संस्थानात फौजदार होते; त्यामुळे त्यांचं बालपण कागल इथेच गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण पण त्याच गावात झालं. पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले. गोपाळ कृष्ण गोखले जेव्हा १३ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला. त्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे त्यानंतर त्यांचं जीवन खूप हलाखीचं झालं होतं. खूप संकटांना सामोरं जात त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.

सन १८८१ मध्ये गोखले मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक पास झाले. त्यांनंतर त्यांनी त्यांचं शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून गणित विषयात बी ए ची पदवी पूर्ण केली.

बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जानेवारी १८८५ मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यांनंतर काही कालावधीने १८८६ , पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले. इसवी सन १८८७ पासून ते या संस्थेच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून पण काम केले. इसवी सण १८९५ मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर ‘फेलो’ म्हणून नियुक्ती पण झाली.

गोपाळ कृष्ण गोखले – परिवार

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या परिवाराविषयी फार माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्णराव गोखले आणि आईचं नाव वालुबाई गोखले असं होतं. त्यांचं दोन वेळा लग्न झालं होतं. पहिलं लग्न इसवी सन १८८० मध्ये सावित्रीबाई यांच्याशी झालं. पण उपचार न होणाऱ्या अशा आजाराने त्या ग्रस्त होत्या त्यामुळे काही काळातच त्यांच निधन झालं. त्यांनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. १८८७ मध्ये त्यांनी आनंदीबाई यांच्याशी लग्न केलं होतं. दुसऱ्या पत्नी कडून त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण १८९९ मध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नीचही निधन झालं.

गोपाळ कृष्ण गोखले- कॉँग्रेसच्या कार्यात सहभाग

गोखले हे नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आल्यावर त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. या सुमारास देशात घडलेली एक महत्वाची घटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसची स्थापना झालेली. या संघटनेच्या १८८५ मध्ये झालेल्या स्थापनेमुळे देशाच्या भवितव्याची व सर्वसामान्य जनतेच्या हिताची काळजी वाहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले; त्यामुळे या देशातील अनेक सुशिक्षित व राष्ट्रप्रेमी व्यक्ती कॉँग्रेसच्या कार्याशी निगडीत झाल्या.

गोपाळ कृष्ण गोखले हेदेखील इतर राष्ट्रप्रेमी लोकांप्रमाणे कॉँग्रेसकडे आकृष्ट झाले. सन १८८९ पासून त्यांचा कॉँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला आणि तो त्यांच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत कायम राहीला. लवकरच त्यांची कॉँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये गणना केली जाऊ लागली. कॉँग्रेसच्या विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले. कॉंग्रेसच्या अनेक राष्ट्रीय अधिवेशनांना ते उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले. डिसेंबर १९०५ मध्ये ते बनारस येथे भरलेल्या कॉँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.

याच सुमारास कॉँग्रेसमध्ये मावळमतवादी आणि जहालमतवादी असे दोन गट निर्माण झाले. यांतील नेमस्तवादी गटाचे अध्वर्यू म्हणून गोखले ओळखले जाऊ लागले. पुढे हे दोन्ही गट एकमेकांपासून अलग झाले; परंतु कॉँग्रेसची अशा प्रकारे दोन भाग होणे त्यांना मनापासून पसंत नव्हते. त्यांनी मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्याचे आपल्या परीने प्रयत्न केले; मात्र या प्रयत्नांत त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही.

सर्वेन्ट्स ऑफ इंडिया सोसाइटी ची स्थापना

सन १९०५ मध्ये गोखले जेव्हा कॉँग्रेस चे अध्यक्ष झाले यावेळी त्यांनी सर्वेन्ट्स ऑफ इंडिया सोसाइटी ची स्थापना केली होती. सर्व भारतीयांना सुशिक्षित करण्याचा यामागचा त्यांचा हेतु होता. गोखलेंच्या मते- “जेव्हा भारतीय शिक्षण घेतील तेव्हा ते भारताच्या प्रति आपले कर्तव्य काय आहे समजतील आणि त्यासाठी काम करतील.”

त्यांच्या मते त्या काळातील शिक्षण पद्धत ही भारतीयांच्या विकासासाठी पुरेशी नाही. याचसाठी त्यांनी सर्वेन्ट्स ऑफ इंडिया सोसाइटी ची स्थापनाकेली जेणेकरून भारतीयांना योग्य शिक्षण मिळेल आणि त्यांचा विकास होईल. पुढे जाऊन भारताच्या राजकारणात ते स्वतःचं योगदान देतील. या संस्थेने अनेक शाळा आणि कॉलेजच्या स्थापना केल्या. शिवाय रात्री पण शाळा भरवल्या जात होत्या जेणेकरून जे दिवस काम कारायचे त्यांना रात्री शिक्षण मिळेल.

महात्मा गांधी चे गुरु गोखले

गांधींच्या सुरुवातीच्या काळात गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे गुरु होते. सन १९१२ साली गांधींच्या आमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेत पण गेले होते. त्यावेळी गांधी नुकतेच बॅरिस्टर झाले होते. आणि दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनानंतर ते भारतात परतले होते. त्यावेळी भारतीयांच्या विचारांना जाणून घेण्यासाठी त्यांना समजण्यासाठी त्यांनी गोखलेंकडे मार्गदर्शन घेतले होते.

गोपाळ कृष्ण गोखलेंचे राजकीय विचार

गोखले यांच्या राजकीय विचारांवर न्यायमूर्ती रानडे याच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. रानडे यांना ते गुरस्थानी मानत असत. गोखले यांच्या विचारांवर ब्रिटिश उदारमतवादी प्राणलीचाही प्रभाव होता. भारतीय राजकारणात ते उदारमतवादाचे पुरस्कर्ते म्हणूनच प्रसिद्ध होते. राजकीय क्षेत्रातील कोणताही प्रश्न चर्चेच्या, परस्पर-विचारविनीमयाच्या मार्गाने सोडविला जाऊ शकतो, असा त्यांना विश्वास होता. दहशतवादी मार्गाचा राजकारणात अवलंब केला जाऊ नये, असे त्यांचे मत होते.

गोपाळ कृष्ण गोखले-इंग्रजी सत्तेविषयीची मते

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना हा ईश्वरी संकेत होय, हे अन्य मवाळमतवादी मत गोखले यांनाही मान्य होते. भारताची एकोणिसाव्या शतकात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये जी काही प्रगती झाली त्यास इंग्रजी सत्ताच कारणीभूत झाली होती. भारतात कायद्याचे राज्य सर्वप्रथम इंग्रजांनीच प्रस्थापित केले. या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे कार्य इंग्रजी राजवटीनेच केले.

भारतात आधुनिक विचारांचे बीजारोपण ब्रिटीशांमुळेच होऊ शकले. त्यांनी या देशात अनेक सुधारणा केल्या. थोडक्यात, इंग्रजांचा भारताशी आलेला संबंध आपल्या हिताचाच ठरला आहे. इंग्रजी सत्ता हे भारताला मिळालेले ईश्वरी वरदानच होय, असे गोखले यांचे मत होते.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेच्या हितासाठी आतापर्यंत बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या आहेत आणि यापुढेही ते भारतीय जनतेला न्याय मिळवून देण्याच्या कयामत कसूर करणार नाहीत, असा विश्वास गोखल्यांनी व्यक्त केला होता. ते इंग्रजी सत्तेविषयी आपुलकी बाळगणारे नेते होते. ब्रिटिश संस्कृतीबाबतही त्यांना आस्था वाटत होती.

गोपाळ कृष्ण गोखले-स्वदेशी चळवळीस पाठिंबा

गोपाळ कृष्ण गोखले यांचा स्वदेशीच्या चळवळीला पाठिंबा होता. स्वदेशीची चळवळ ही राष्ट्रभक्तीची आणि आर्थिक अशा दोन्ही प्रकारची चळवळ आहे. स्वदेशीच्या चळवळीमुळे भारतीय लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होण्यास मदत झाली आहे. आपल्या मातृभूमीसाठी स्वतःहून काही त्याग करावा अशी भावना ही चळवळ सामान्य माणसांच्या रुजविते; तसेच स्वदेशीच्या वापरामुळे आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तूंना ग्राहक मिळवून देण्याचे आणि त्यायोगे त्या वस्तूंच्या उत्पादनास चालना देण्याचे अतिशय महत्वाचे आर्थिक उद्दिष्टही सध्या होते, असे त्यांनी म्हटले होते.

गोपाळ कृष्ण गोखले -सामाजिक कार्य

गोपाळ कृष्ण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांच्या परंपरेतील समाजसुधारक होते. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार केला होता.

आगरकरांनी ऑक्टोबर १८८८ मध्ये सुधारक या नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ते मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून निघत असे. त्यांपैकी मराठी विभाग आगरकर स्वतः सांभाळत असत; तर इंग्रजी विभागाची जबाबदारी त्यांनी गोखले यांच्यावर सोपविली होती. सुधारक मधील लिखाणाद्वारे गोखल्यांनी समाजसुधारणेचा सतत पाठपुरावा केला. सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काही काळ काम पहिले. तसेच सार्वजनिक सभेच्या नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

लेजिस्लेटिव्ह काऊंसिलचे सदस्य

गोपाळ कृष्ण गोखले यांनी मानाची अनेक पदे भूषविली होती. सन १८९९ मध्ये मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. १९०२ मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे (Indian Legislative Council) सभासद म्हणून त्यांची निवड झाली आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते त्या सभागृहाचे सभासद म्हणून राहिले, कायदेमंडळाचे सदस्य या नात्याने त्यांनी गौरवास्पद कार्य केले होते. अर्थसंकल्पावरील त्यांची भाषणे तर त्या वेळी अतिशय गाजली होती. एकदा गोखले काही कारणाने अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेऊ शकले नव्हते. त्यावर त्या वेळचे अर्थमंत्री सर ये फ्लिटवूड विल्सन यांनी उद्गार काढले होते की, “गोखले यांच्याशिवाय अर्थसंकल्पावर चर्चा करणे म्हणजे प्रिन्स ऑफ डेन्मार्कशिवाय हॅम्लेट नाटक करण्यासारखे आहे.’

गोखले यांनी सन १८९७ मध्ये वेल्बी कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला भेट दिली. त्यानंतर आणखी सहा वेळा ते इंग्लंडला गेले. १९१२ मध्ये त्यांची भारतातील सनदी नोकऱ्यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्याच वर्षी ते महात्मा गांधींच्या निमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही चळवळीला साहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला. होता. अशा प्रकारे सार्वजनिक जीवनाच्या अनेक क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. ‘खराखुरा भारतसेवक’ या शब्दांत त्यांचा उचित गौरव केला जातो. मृत्यू – १९ फेब्रुवारी, १९१५

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment