अण्णा हजारे माहिती मराठी | Anna Hajare Information in Marathi

google-news-icon

अण्णा हजारे यांचा परिचय

अण्णा हजारे हे विधायक कार्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करू पाहणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे संपूर्ण नाव किसन बाबूराव हजारे असे आहे; पण अण्णा हजारे या नावानेच ते परिचित आहेत. त्यांचा जन्म १५ जानेवारी, १९४० रोजी भिंगार येथे झाला. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण शिंदी (आताचे राळेगण सिद्धी) हे त्यांचे मूळ गाव होय.

याच गावात त्यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले. परंतु घरच्या गरिबीमुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पुढे ते मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पुढे चालू ठेवणे त्यांना शक्य झाले नाही. आपल्या उपजीविकेसाठी फुलांच्या विक्रीचा व्यवसाय ते करू लागले. १९६० मध्ये ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. १९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धात, तसेच १९६५ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात, त्यांनी भाग घेतला होता. १९७५ मध्ये ते सैन्यदलातून निवृत्त झाले.

अण्णा हजारे यांनी केलेली समाजसेवा

लष्करातून निवृत्त झाल्यावर अण्णा हजारे आपल्या राळेगण शिंदी या गावी परत आले. त्यांचा मूळचा पिंड समाजसेवकाचा होता; त्यामुळे गावी परतल्यावर त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे विधायक कार्य हाती घेतले आणि त्यामध्ये नेत्रदीपक असे यश संपादन केले. अर्थात, सुरुवातीच्या काळात त्यांच्यापुढे अनंत अडचणी उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे गाव दुष्काळी प्रदेशात मोडणारे होते. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे सामान्य लोक दारिद्र्याच्या सीमारेषेवर जीवन जगत होते. संपूर्ण गाव व्यसनात बुडालेला होता. वृक्षतोडीमुळे गावचे शिवार उजाड झाले होते. अनेकजण कर्जबाजारी बनले होते. निवडणुकीच्या राजकारणामुळे गावात दुही माजली होती. तथापि, अण्णा हजारेंनी मनाशी जिद्द बाळगून आपल्या कार्याला सुरुवात केली.

सामान्य माणूस हाच कार्याचा केंद्रबिंदू

राळेगण शिदी या गावाच्या विकासासाठी अण्णा हजारे यांनी अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. ग्रामविकासासंबंधी त्यांचे मत असे आहे की, ग्रामविकास म्हणजे केवळ भौतिक सुधारणा करणे नव्हे, तर गावातील माणसाला आचारशील व विचारशील बनविणे होय. म्हणजे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून ग्रामविकासाच्या कार्याला लागले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.

वरील दृष्टिकोनातून त्यांनी प्रथम गावातील लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी तरुणांना हाताशी धरून त्यांना या कार्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या सहकार्याने अण्णा हजारे यांनी गावातील हातभट्ट्या बंद पाडल्या. तसेच व्यसनाधीन लोकांचे मतपरिवर्तनही घडवून आणले. त्यानंतर लोकांतील अज्ञान दूर करणे, अस्पृश्यता निवारण, सामुदायिक विवाह, ग्रामसफाई, हुंडाबंदी यांसारखे उपक्रम त्यांनी हाती घेतले. गावातील लोकांना विधायक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी खूप प्रयत्न केले. परस्परसहकार्यातून ग्रामविकास या तत्त्वाचे महत्त्व त्यांनी ग्रामवासीयांच्या मनावर ठसविले.

‘राळेगण शिंदी …. ते राळेगण सिद्धी’

अशा प्रकारे सर्व गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांद्वारे अण्णा हजारे यांनी आपल्या गावात अनेक विधायक कामे हाती घेतली व ती पूर्णत्वास नेली. गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, बालवाडी, वसतिगृह, वाचनालय यांच्यासाठी सार्वजनिक इमारती उभ्या केल्या. लोकांनी आपल्या मुलांना शाळेत घातलेच पाहिजे, अशी सक्तीही त्यांच्यावर करण्यात आली. श्रमदानाने सामुदायिक विहिरी खोदल्या. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ ही मोहीम राबविण्यासाठी नाला बंडिंग, पाझर तलाव यांसारखी कामे केली; त्यामुळे गावातील शेतजमिनी ओलिताखाली आल्या.

सामूहिक वनीकरणावर भर देऊन त्यांनी वृक्षसंगोपन केले. गावात आरोग्य केंद्र सुरू केले. कुटुंबनियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. इंधनासाठी पवनचक्की, सूर्यशक्तीचा वापर करणारा सोलर हिटर, गोबरगॅस प्लँट या सोयी केल्या. त्यातून इंधनाची समस्या सुटण्यास मदत झाली. या सर्व उपक्रमांतून गावात आर्थिक सुबत्ताही आली. अण्णांच्या परिसस्पर्शामुळे पूर्वीचे ‘राळेगण शिंदी’ आता ‘राळेगण सिद्धी’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

गावात अनेक विधायक कार्य

याशिवाय धान्य बँक, शेतीमाल विक्रीची व्यवस्था, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण यांसारखी अनेक विधायक कामे अण्णांनी आपल्या गावात केली आहेत. आज त्यांनी आपले संपूर्ण जीवन गावाच्या विकासाला आणि समाजसेवेला वाहिले आहे. सामूहिक प्रयत्नांद्वारे विधायक मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास कसा केला जाऊ शकतो, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी आपल्या कार्याद्वारे घालून दिला. पुढे ‘आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती’चे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या कार्याला अधिक व्यापक अधिष्ठान लाभले.

अनेक सन्मान पुरस्कार

अण्णा हजारेंनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९८७ मध्ये ‘प्रियदर्शिनी इंदिरा गांधी वृक्षमित्र’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाने ‘कृषिभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. याशिवाय भारत सरकारने ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ या सन्मानांनी त्यांना अलंकृत केले आहे.

अन् आता लढा भ्रष्टाचाराविरुद्ध

अलीकडे अण्णांनी शासकीय भ्रष्टाचाराविरुद्ध आपला लढा सुरू केला आहे. शासनातील भ्रष्टाचार दूर झाल्याशिवाय सामान्य जनतेला विकासकार्याचा लाभ मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे; म्हणून, त्यांनी शासनातील भ्रष्टाचारी अधिकारी / पदाधिकारी यांच्याविरुद्ध मोहीम उघडली आहे. भ्रष्टाचारी अधिकारी वा पदाधिकारी यांना शासन करण्यात महाराष्ट्र सरकारने चालविलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ त्यांनी आपला ‘पद्मश्री’ किताब शासनास परत केला.

तसेच याच कारणासाठी अनेकवार उपोषणेही केली आहेत. अण्णा हजारे यांच्यासारख्या निःस्पृह व त्यागी समाजसुधारकाने या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे वेधले गेले असून भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला धार चढली आहे. आपल्या नैतिक सामर्थ्याच्या बळावर हा प्रश्न घसाला लावण्यात अण्णांनी यश मिळविले आहे.

कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाण्याचा मूळ दुखणे काय आहे याचा शोध घेण्याचा- अण्णांचा स्वभाव आहे. शासकीय कामकाजात पारदर्शीता नसणे, जनतेला शासन कारभाराची माहिती नसणे व तशी ती करूनही दिली न जाणे यांतच शासकीय स्तरावरील भ्रष्टाचाराची मुळे दडलेली असतात. सुशिक्षित आणि साक्षर जनतेलाही शासकीय कामकाजासंदर्भात अडाणी ठेवले जाते.

जनतेच्या या अज्ञानाचा फायदा घेऊनच भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे अधिकारी वा पदाधिकारी भ्रष्टाचार करतात. शासनाच्या व प्रशासनाच्या संदर्भातील जनतेच्या अज्ञानातूनच त्यांच्या भ्रष्टाचारास वाव मिळतो, हे लक्षात घेऊन अण्णांनी मुळावरच घाव घातला आहे. माहितीच्या अधिकाराची- हा अधिकार केवळ कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षातही मिळण्याची मागणी अण्णांनी केली आहे- धसास लावली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्नरत असलेल्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांचे ‘अण्णा’ हे आज एक ‘आशास्थान’ ठरले आहे.

लेखनसंपदा

‘माझे गांव, माझे तीर्थ’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखन. अण्णांचे हे आत्मचरित्र ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात आणि एकूणच सामाजिक कार्यात रूची असणाऱ्यांना मार्गदर्शक ठरावे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment