केशवचंद्र सेन माहिती मराठी | Keshav Chandra Sen Information in Marathi

google-news-icon

केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत. समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून ते ओळखले जातात. एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणेची चळवळ गतिमान बनविण्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता, ब्राह्मो समाजाला लोकप्रियता मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

केशवचंद्र सेन परिचय

केशवचंद्र सेन यांचा जन्म १८३८ मध्ये झाला. सन १८५७ मध्ये वयाच्या ऐन विशीतच त्यांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला. एक बुद्धिवादी आणि पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, अशी त्यांची ख्याती होती. केशवचंद्रांनी ब्राह्मो समाजात प्रवेश केला तेव्हा त्या समाजाचे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे होते. केशवचंद्र सेन यांची बुद्धिमत्ता, अमाप उत्साह व वक्तृत्व या गुणांची छाप देवेंद्रनाथांवर पडली; त्यामुळे त्यांनी केशवचंद्रांना भरपूर प्रोत्साहन दिले.

देवेंद्रनाथांनीच ब्राह्मो समाजाच्या आचार्यपदी केशवचंद्रांची नियुक्ती केली. ब्राह्मो समाजाच्या प्रसारासाठी केशवचंद्र सेन यांनी अतिशय मेहनत घेतली. त्यांचा कामाचा उत्साह व झपाटा फार मोठा होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाच्या पन्नासच्या वर शाखा स्थापन झाल्या. ब्राह्मो समाजाचा बंगाल प्रांताबाहेर प्रसार करण्यासाठीही त्यांनी परिश्रम घेतले. त्यातून पंजाब, संयुक्त प्रांत, मद्रास (आताचे चेन्नई) इत्यादी प्रांतांमध्येही ब्राह्मो समाजाच्या शाखा उघडल्या गेल्या. केशवचंद्रांनी सर्व हिंदुस्थानभर प्रवास करून आपले विचार लोकांना समजावून सांगितले.

देवेंद्रनाथांशी मतभेद

यानंतरच्या काळात मात्र देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात मतभेदांना सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस ते वाढतच गेले. केशवचंद्र सेन यांचा प्रखर बुद्धिवाद व पुरोगामी दृष्टिकोन देवेंद्रनाथांना फारसा मानवला नाही. ब्राह्मो समाजाने आपले कार्यक्षेत्र धर्मसुधारणेपुरतेच मर्यादित ठेवावे, असे देवेंद्रनाथ टागोरांचे म्हणणे होते. त्यांचा वेद- प्रामाण्यावर विश्वास होता आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या आधारेच धर्मसुधारणा करावी, या मताचा पुरस्कार त्यांनी केला होता; परंतु पुरोगामी विचारांच्या केशवचंद्रांना ब्राह्मो समाजाचे कार्य धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित ठेवणे मान्य नव्हते.

ब्राह्मो समाजाने समाज- सुधारणेच्या कार्याकडे लक्ष वळविणे गरजेचे आहे; कारण केवळ धर्मसुधारणेमुळे आपल्या समाजाची प्रगती होणार नाही; त्याकरिता समाजसुधारणेची व्यापक मोहीमच हाती घेतली पाहिजे, असे केशवचंद्रांचे मत होते. त्यांच्या या प्रागतिक विचारांमुळे ब्राह्मो समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना मिळू लागला. देवेंद्रनाथ टागोरांनी मात्र केशवचंद्रांना विरोध सुरू केला, केशवचंद्रांचा समाजसुधारणेचा आग्रह त्यांनी अमान्य केला.

अखेरीस १८६५ मध्ये देवेंद्रनाथांनी केशवचंद्रांना ब्राह्मो समाजाच्या आचार्यपदावरून काढून टाकले; त्यामुळे ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी मूळ ब्राह्मो समाजातून बाहेर पडून आपला वेगळा असा ‘भारतीय ब्राह्मो समाज’ (११ नोव्हेंबर, १८६६) स्थापन केला. देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखालील संघटना ‘आदि ब्राह्मो समाज’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

ब्राह्मो समाजाच्या या दोन गटांपैकी केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजाला लोकांचा वाढता पाठिंबा मिळू लागला. केशवचंद्रांनी सामाजिक सुधारणेचा जोरदार पुरस्कार चालविल्यामुळे तरुणवर्गात त्यांना लोकप्रियता मिळू लागली; त्यामुळे भारतीय ब्राह्मो समाजाचा प्रभाव वाढत गेला. केशवचंद्र सेन यांनी समाजातील सर्व प्रकारच्या अनिष्ट रूढी व प्रथा यांवर जोरदार हल्ले चढविले. हिंदू धर्म व त्याचे तत्त्वज्ञान खूपच संकुचित असल्याचा विचार ते मांडू लागले. त्यांनी ख्रिस्ती धर्म व वैष्णव पंथ यांच्या शिकवणुकीवर विशेष भर दिला. या दोन्ही प्रवाहांचा समन्वय साधला जावा, असे त्यांचे मत होते.

केशवचंद्र सेन यांनी समाजसुधारणेची मोहीमही मोठ्या उत्साहाने चालू ठेवली. त्यांनी समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारावी, असा आग्रह धरला. त्या दृष्टीने बालविवाह, बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथांना विरोध केला; तसेच विधवाविवाह, आंतरजातीय विवाह, स्त्री-शिक्षण यांचा पुरस्कार केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षणसंस्था स्थापन केल्या. समाजातील या अनिष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घालावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सरकारने १८७२ मध्ये ‘द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज अॅक्ट’ संमत केला.

केशवचंद्र सेन यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभली होती. १८६४ मध्ये त्यांनी मुंबई शहरास भेट दिली तेव्हा त्यांचे नवे धर्मविचार, समाजसुधारणेची तळमळ आणि अभिनव वक्तृत्वशैली यांची विलक्षण छाप येथील नवशिक्षित वर्गावर पडली. ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानाने हा वर्ग भारावून गेला. अर्थात, केशवचंद्रांच्या विचारांनी महाराष्ट्रात लगेच मूळ धरले नाही; परंतु त्यानंतर थोड्याच अवधीत ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानापासून प्रेग्णा घेऊन महाराष्ट्रातील काही थोर विचारवंत व समाजसुधारक यांनी या ठिकाणी ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली.

कृती आणि उक्तीत विसंगती

भारतीय ब्राह्मो समाजात पुढे पुढे केशवचंद्र सेन यांचे व्यक्तिस्तोम माजविले जाऊ लागले; ही गोष्ट त्या समाजातील बुद्धिवादी तरुणांना आवडली नाही. पुढे १८७८ मध्ये केशवचंद्रांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह कुचबिहारच्या महाराजांबरोबर लावून दिला. त्यांची उक्ती व कृती यांमधील या विसंगतीमुळे तर ब्राह्मो समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांत त्यांच्याविषयी खूपच नाराजी पसरली. त्यांनी केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला ‘साधारण ब्राह्मो समाज’ असे नाव देण्यात आले. या नव्या गटाचे नेतृत्व आनंदमोहन बोस, शिवचंद्र देव, उमेशचंद्र दत्त, शिवनाथ शास्त्री इत्यादी कार्यकर्त्यांकडे होते.

ब्राह्मो समाजातील या दुसऱ्या फुटीनंतर केशवचंद्र सेन यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. त्यांच्या गटातील बहुसंख्य कार्यकर्ते ‘साधारण ब्राह्मो समाजा’ बरोबर गेले. लोकांनाही प्रागतिक विचारांचा मनापासून पाठपुरावा करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांविषयी अधिक आकर्षण वाटू लागले; त्यामुळे केशवचंद्रांचा भारतीय ब्राह्मो समाज निष्प्रभ होत गेला. केशवचंद्र सेन यांनी पुढे १८८० मध्ये ‘नवविधान समाज’ या नावाची आपली नवी संघटना स्थापन केली; परंतु लोकमानसात पूर्वीसारखे मानाचे व आदराचे स्थान पुन्हा प्राप्त करणे त्यांना शक्य झाले नाही.

मृत्यू – ८ जानेवारी, १८८४.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment