महात्मा गांधी माहिती मराठी | Mahatma Gandhi Information in Marathi

google-news-icon

महात्मा गांधी हे आधुनिक काळातील एक युगप्रवर्तक नेते होत. आधुनिक भारताच्या इतिहासावर महात्मा गांधींचा जितका प्रभाव आहे तितका अन्य कोणत्याही नेत्याचा नाही. भारतीय इतिहासातील सन १९२० पासून ते १९४७ पर्यंतचा कालखंड हा मुळी ‘गांधीयुग’ म्हणूनच ओळखला जातो. त्यावरून भारतीय जनमानसावर त्यांच्या पडलेल्या प्रभावाची कल्पना यावी.

नाव मोहनदास करमचंद गांधी
जन्म २ ऑक्टोबर १८६९
जन्मगाव पोरबंदर, गुजरात
उपाधी महात्मा
टोपण नाव बापू
वडिलांचं नाव करमचंद गांधी
आईचं नाव पुतलीबाई
पत्नीचे नाव कस्तुरबा
अपत्ये हरिलाल गांधी, मणिलाल गांधी, रामदास गांधी आणि देवदास गांधी
मृत्यू ३० जानेवारी १९४८

अल्प परिचय

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर, १८६९ रोजी झाला. त्यांचे वडील पोरबंदर व राजकोट येथे दिवाण होते. त्यांची आई धार्मिक प्रवृत्तीची होती. घरातील या धार्मिक वातावरणाचा फार मोठा प्रभाव गांधीजींच्या संपूर्ण जीवनावर पडला असल्याचे पाहावयास मिळते. १८८७ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. तेथे बॅरिस्टरची पदवी संपादन करून १८९१ मध्ये ते भारतात परतले.

भारतात परतल्यावर महात्मा गांधींनी प्रथम राजकोट येथे वकिली सुरू केली; पण पुढे लवकरच त्यांनी मुंबईला स्थलांतर केले. एप्रिल, १८९३ मध्ये एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला गेले.

दक्षिण आफ्रिकेतील कार्य

दक्षिण आफ्रिकेत अनेक भारतीय लोक कामधंद्यानिमित्त स्थायिक झाले होते; परंतु ते सर्वजण अतिशय कठीण अवस्थेत जीवन जगत होते. तेथील वर्णद्वेषी गोऱ्या राजवटीने भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अन्याय व जुलूम चालविला होता. भारतीय वंशाच्या लोकांना मूलभूत मानवी हक्क नाकारण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे जाचक निर्बंध लादण्यात आले होते. १९०६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या राजवटीने ‘एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट’ हा कायदा संमत करून तेथील आशियाई लोकांवर आपली नोंदणी करून घेण्याची व नोंदणीपत्रावर अंगठे उठविण्याची सक्ती केली होती.

आशियाई लोकांची अप्रतिष्ठा करणाऱ्या या काळ्या कायद्याविरुद्ध आवाज उठविण्यात महात्मा गांधींनी पुढाकार घेतला. सरकारी जुलूमशाहीविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी सत्याग्रहाचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. अशा प्रकारे सत्याग्रहाच्या तंत्राचा अवलंब गांधींजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेत यशस्वीपणे केला.

गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक भारतीय लोक सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला हा काळा कायदा मागे घ्यावा लागला. अहिंसक मार्गाच्या आंदोलनाच्या जोरावर जुलमी व अत्याचारी सत्तेलाही नमविता येते, हे या निमित्ताने गांधीजींनी सिद्ध करून दाखविले.

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेले पोरबंदर गाव

भारताच्या राजकीय क्षितिजावर

दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारचे यश संपादन करून ९ जानेवारी, १९१५ रोजी महात्मा गांधी भारतात परत आले. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील कामगिरीमुळे एक विलक्षण वलय त्यांच्याभोवती निर्माण झाले होते. सामान्य जनांना आपणाकडे खेचून घेण्याचे सामर्थ्यच जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले होते. “पराक्रमी, वीर पुरुष व हुतात्मा यांच्या मुशीत घडलेले व्यक्तिमत्त्व” या शब्दांमध्ये गोखले यांनी त्यांचे वर्णन केले होते. “आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनविण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे,” अशीही जाणीव गांधीजींच्या या राजकीय गुरूस झाली होती.

दांडी यात्रा

गांधीजी भारतात परतले त्या वेळी युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले होते. या युद्धात इंग्रज सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका गांधीजींनी घेतली; परंतु १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात युरोपियन मळेवाल्यांकडून निळीच्या मळ्यांत काम करणाऱ्या मजुरांची जी पिळवणूक चालली होती, त्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. १९१८ मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सत्याग्रह केला. या दोन सत्याग्रहांमुळे त्यांच्या नावाला देशभर प्रसिद्धी मिळाली.

राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व

महायुद्धाच्या समाप्तीनंतर इंग्रज सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे गांधींजींचा सरकारविषयी भ्रमनिरास झाला. रौलट कायदे, जालियनवाला बागेतील हत्याकांड, देशाच्या काही भागांत सरकारने चालविलेली दडपशाही, भारतीय जनतेच्या मागण्यांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष इत्यादी घटनांमुळे गांधींजींनी सरकारविरोधी पवित्रा घेऊन भारतीय जनतेत जागृती घडवून आणण्याचे आणि लोकमत संघटित करण्याचे कार्य हाती घेतले; त्यामुळे १९२० च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व आपोआप त्यांच्याकडे आले.

महात्मा गांधी फोटो

गांधीयुग

सन १९२० मध्ये महात्मा गांधींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकाराचे आंदोलन सुरू केले. त्या वेळेपासून राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी यांच्या नावाशीच जणू निगडित झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वश्रेष्ठ नेते म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. सन १९३० ची ‘सविनय कायदेभंगा‘ची चळवळ आणि १९४२ ची ‘चले जाव‘ ची चळवळ या स्वातंत्र्य आंदोलनातील दोन महान चळवळींचे नेतृत्व गांधीजींनीच केले होते.

सन १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा गांधीजींच्या नेतृत्वा- खालीच लढण्यात आला होता. या काळात महात्मा गांधी हे राष्ट्रीय चळवळीचे व राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक बनून राहिले होते. त्यांच्या शब्दासाठी हजारो देशभक्त देशाकरिता आपल्या प्राणांची आहुती देण्यास सिद्ध झाले होते; म्हणून स्वातंत्र्य-आंदोलनातील हा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो.

नेहरू आणि गांधी

महात्मा गांधींच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी स्वातंत्र्याचे आंदोलन ही देशातील सर्वसामान्य जनतेची चळवळ बनविली. गांधीजींनी सामान्य भारतीय जनतेचा विश्वास संपादन केला. तिला निःशस्त्र प्रतिकाराचा नवा मंत्र शिकविला आणि तिला स्वातंत्र्य-आंदोलनात सहभागी करून घेतले; म्हणूनच सामर्थ्यशाली ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याइतपत सामर्थ्य या आंदोलनाला प्राप्त होऊ शकले.

राजकीय तत्त्वज्ञान

महात्मा गांधींच्या राजकीय तत्त्वज्ञानात सत्य व अहिंसा या दोन तत्त्वांना महत्त्वाचे स्थान आहे. अर्थात, ही तत्त्वे भारतीयांना नवी नाहीत. महात्मा गांधींच्या अगोदरही भारतातील अनेक श्रेष्ठ पुरुषांनी व साधुसंतांनी सत्य व अहिंसेचा पुरस्कार केला होता. पण महात्मा गांधी हे असे पहिले विचारवंत होते की, ज्यांनी सार्वजनिक जीवनात व विशेषतः राजकारणातदेखील ही तत्त्वेचे प्रमाणभूत मानली जाऊ शकतात, याचा प्रत्यय आणून दिला.

सत्य म्हणजे काय? : महात्मा गांधींची अशी श्रद्धा होती की, सत्य हे मानवी जीवनाचे सर्वोच्च तत्त्व आहे. सत्य हेच अंतिम वास्तव आहे. ‘सत्य हाच परमेश्वर व परमेश्वर हेच सत्य’ असे ते समजत होते. सत्याचा शोध घेणे म्हणजे परमेश्वराचा शोध घेणे होय, असे त्यांनी म्हटले होते.

मिठाचा सत्याग्रह

गांधीजींनी सत्याला अंतरात्म्याचा आवाज मानले होते; परंतु या मार्गाने सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध व पवित्र असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.

महात्मा गांधींनी सत्याचे- (अ) सापेक्ष सत्य आणि (ब) निरपेक्ष सत्य असे दोन प्रकार सांगितले आहेत. यांपैकी ‘निरपेक्ष सत्य’ हेच शाश्वत किंवा अंतिम सत्य होय. ‘सापेक्ष सत्य’ हे पूर्ण सत्य नसते; पण त्या आधारे आपणास निरपेक्ष सत्याप्रत पोहोचता येते.

अहिंसा म्हणजे काय? : गांधीजींच्या मते सत्य हे जीवनाचे अंतिम ध्येय असून ते ध्येय साध्य करण्याचे साधन म्हणजे अहिंसा होय; परंतु या ठिकाणी साध्य व साधन हे परस्परांशी इतके एकरूप झाले आहेत की, त्यांपैकी एकाला दुसऱ्यापासून अलग करणे शक्य नाही. अहिंसा याचा अर्थ, ज्या कृतीमुळे इतरांना शारीरिक अथवा मानसिक क्लेश होतील अशा कृतीपासून अलिप्त राहणे होय. गांधीजींनी नकारात्मक अहिंसेपेक्षा विधायक अहिंसा श्रेष्ठ मानली होती. विधायक अहिंसा म्हणजे स्वतः क्लेश सहन करून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे होय.

अहिंसा हे अन्याय, अत्याचार व असत्य यांविरुद्ध लढण्याचे सर्वांत प्रभावी साधन असते. अहिंसेच्या मार्गाने शत्रूलाही प्रेमाने जिंकून घेता येते, असे गांधींजींनी म्हटले आहे.

गांधीजींना दुर्बलाची किंवा भित्र्या माणसाची नव्हे तर वीर पुरुषाची अहिंसा अभिप्रेत होती. वीर पुरुष अहिंसा तत्त्वावरील विश्वासातून अहिंसेचा स्वीकार करतो; म्हणून आत्मक्लेश सहन करण्याचीही त्याची तयारी असते. गांधींजींच्या मते, अहिंसा ही बाह्य शक्ती नसून आंतरिक शक्ती आहे.

महात्मा गांधींनी साधनशुचितेवर नेहमीच भर दिला होता. आपले साध्य तर उदात्त असलेच पाहिजे; परंतु ते साध्य गाठण्यासाठी ज्या साधनांचा अवलंब करावयाचा ती साधने नैतिक व उच्च प्रतीची असली पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते.

सत्याग्रह : सत्याग्रह ही गांधीजींनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे. त्यांनी सत्याग्रहाला नैतिक साधन मानले आहे. ‘अन्याय, दडपशाही व शोषण यांविरुद्ध केलेला शुद्ध आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सत्याग्रहात अहिंसेला व आत्मक्लेशाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. जुलमी व्यक्तीच्या ठिकाणीही सत्प्रवृत्ती वास करीत असते. ही सत्प्रवृत्ती सत्याग्रहाच्या मार्गाने जागृत केली जाऊ शकते, असा विश्वास त्यांना वाटत होता. ते म्हणतात की, “सत्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात मनोनिग्रह व आत्मबल यांच्या साहाय्याने मार्गातील अडथळ्यांशी केलेला मुकाबला म्हणजे सत्याग्रह होय.”

महात्मा गांधी लहानपणीचे
तरूनपणीचे महात्मा गांधी
खेडा येथील महात्मा गांधी

सत्याग्रहाची प्रमुख साधने, मार्ग किंवा प्रकार म्हणून महात्मा गांधींनी असहकार, उपोषण, हिजरत, सविनय कायदेभंग, हरताळ, निरोधन व संप यांचा उल्लेख केला आहे.

महात्मा गांधींचे धर्मविषयक विचार

महात्मा गांधींची परमेश्वरावर आत्यंतिक श्रद्धा होती. त्यांनी म्हटले आहे की, “मला तुमच्या व माझ्या अस्तित्वापेक्षाही परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी अधिक खात्री आहे. मी एक वेळ हवा व पाणी यांशिवाय जगू शकेन; पण परमेश्वरावरील श्रद्धेशिवाय मी जगू शकणार नाही. माझी परमेश्वरावरील श्रद्धा तुम्ही नाहीशी केलीत तर मी मृतवत होईन.”

परमेश्वरावरील या श्रद्धेतूनच गांधीजींनी धर्माला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानले होते. मानवी जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे कार्य धर्म करतो, असे त्यांचे मत होते. तथापि, त्यांची धर्मासंबंधीची कल्पना अतिशय व्यापक होती. पूजा, उपासना, कर्मकांड यांसारख्या धर्माच्या बाह्य आविष्कारांवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. विश्वाच्या नैतिक सुव्यवस्थेवरील श्रद्धा या दृष्टिकोनातून ते धर्माकडे पाहत होते. त्यांनी धर्माचा संबंध कर्तव्यपालनाशी जोडला आहे. सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाचे ते पुरस्कर्ते होते. निरनिराळे धर्म म्हणजे एकाच ध्येयाप्रत जाणारे विविध मार्ग होत. सर्वच धर्म प्रेम, मानवता, दया, शांती, विश्वबंधुत्व या तत्त्वांची शिकवण देतात, असे त्यांनी म्हटले होते.

धर्म व राजकारण यांची फारकत करणे गांधीजींना मान्य नव्हते. धर्माचा संबंध कर्तव्यपालनाशी असतो आणि राजकारण हेदेखील समाजाविषयीच्या कर्तव्यभावनेतून केलेले कार्य असते. तेव्हा राजकारणाला धर्मापासून वेगळे करता येणार नाही. त्यापेक्षा राजकारणाला धार्मिक व नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला होता

राज्यविषयक दृष्टिकोन

महात्मा गांधींचे राज्यविषयक विचार अराज्यवादाशी मिळतेजुळते आहेत. त्यांना शासनविरहित समाज अभिप्रेत होता. गांधीजींच्या मते, राज्याचा मुख्य आधार दंडशक्ती हा असतो; म्हणून राज्य हे हिंसेवर आधारित असते. राज्य हे आत्मा नसलेले यंत्र होय. त्याच्या ठिकाणी नैतिक शक्तीचा अभाव असतो. आधुनिक राज्याच्या केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो म्हणून, आदर्श समाजव्यवस्थेत राज्याला स्थान असणार नाही.

अर्थात, अशा प्रकारची आदर्श समाजव्यवस्था नजीकच्या भविष्यकाळात निर्माण होणे कठीण आहे; म्हणूनच प्राप्त परिस्थितीत राज्याचे अस्तित्व कायम ठेवून त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरिता हिंसात्मक राज्याची जागा अहिंसक राज्याने घ्यावी अशी व्यवस्था केली पाहिजे, असे गांधीजींनी म्हटले आहे. या राज्याला त्यांनी ‘रामराज्य’ असे नाव दिले आहे; म्हणजे ‘रामराज्य’ ही त्यांची आदर्श राज्याची कल्पना होती.

विकेंद्रीकरण व ग्रामराज्य

महात्मा गांधींच्या रामराज्याच्या संकल्पनेत राज्याच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचा विचार मध्यवर्ती आहे. त्यांच्या मते जे राज्य आपल्या अधिकारांचा कमीत कमी वापर करते ते चांगले राज्य होय; म्हणूनच त्यांनी राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाचा पुरस्कार केला आहे. त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, प्रत्येक खेडे स्वतंत्र, स्वयंपूर्ण व स्वंयशासित घटक बनले पाहिजे. त्यासाठी खेड्यांचा कारभार स्थानिक लोकांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतींच्या हाती सोपविण्यात आला पाहिजे.

महात्मा गांधींनी खेडे हा आर्थिकदृष्ट्याही स्वयंपूर्ण घटक असावा, असे म्हटले आहे. खेड्यातील लोकांच्या गरजांची पूर्तता स्थानिक पातळीवर केली जावी. त्यासाठी लघुउद्योग, कुटीरोद्योग यांना प्रोत्साहन द्यावे. खेड्यांतील लोकांना तेथेच रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे ते सांगतात. ग्रामराज्याच्या संकल्पनेचा त्यांनी पुरस्कार केला आहे; तसेच श्रमप्रतिष्ठेची महती त्यांनी गायिली आहे. गांधीजींचा आधुनिक औद्योगिक संस्कृतीला विरोध होता. या संस्कृतीने मानवाचे नैतिक अधःपतन घडवून आणले आहे, असे त्यांना वाटत होते.

विश्वस्त संकल्पना

शोषणविरहित आदर्श समाजाची निर्मिती, हे गांधींजींचे स्वप्न होते. त्यांचा आर्थिक विषमता व शोषण यांना विरोध होता; परंतु त्यांना वर्गसंघर्षाचा मार्ग मान्य नव्हता. गांधीजी अहिंसेचे उपासक होते. त्यांचा हृदयपरिवर्तनाच्या मार्गावर विश्वास होता. संघर्ष व हिंसा या मार्गांनी आदर्श राज्याची स्थापना करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

महात्मा गांधींच्या अहिंसा व हृदयपरिवर्तनाच्या मार्गावरील विश्वासातूनच त्यांनी ‘संपत्ती विश्वस्त संकल्पना’ मांडली होती. त्यांनी असे प्रतिपादन केले होते की, समाजातील ज्या लोकांकडे गरजेपेक्षा जास्त संपत्ती असेल ती त्यांच्याकडेच राहू द्यावी. परंतु या लोकांनी म्हणजे भांडवलदार, जमीनदार व श्रीमंत वर्गाच्या लोकांनी आपण आपल्या संपत्तीचे मालक आहोत असे न समजता, ही संपत्ती समाजाच्या मालकीची आहे आणि आपण त्या संपत्तीचे केवळ विश्वस्त आहोत, असे समजावे. त्यांनी आपल्याकडील संपत्तीचा विनियोग समाजाच्या हितासाठी व गोरगरीब, गरजू लोकांच्या कल्याणासाठी करावा.

महात्मा गांधींनी विश्वस्त संकल्पनेत भांडवलदारांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून त्यांना त्यांच्या नैतिक कर्तव्याची जाणीव करून देण्यावर भर दिला आहे; पण हा मार्ग कितपत यशस्वी ठरेल याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.

सामाजिक प्रश्नांचा विचार

महात्मा गांधी हे राजकीय नेते असले तरी त्यांनी सामाजिक प्रश्नांनाही महत्त्व दिले होते. आपल्या देशापुढील काही ज्वलंत सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले होते. देशातील सर्वसामान्य जनतेला या प्रश्नांचे महत्त्व समजावे या उद्देशाने त्यांनी जनतेपुढे अनेक विधायक कार्यक्रम ठेवले होते. विशेषतः असहकार व सविनय कायदेभंग या चळवळींच्या स्थगितीनंतर गांधीजींनी काही काळ सामाजिक प्रश्नांवरच आपले लक्ष केंद्रित केले होते.

महात्मा गांधींच्या विधायक कार्यक्रमांमध्ये खादी व ग्रामोद्योग यांचा प्रचार, अस्पृश्यतानिवारण, जातीय ऐक्य, स्त्री-शिक्षण, स्त्री-जागृती, प्रौढ शिक्षण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. अस्पृश्यतेच्या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला होता, अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे, असे त्यांनी म्हटले होते. अस्पृश्यता निवारणाचे कार्य करण्यासाठी १९३३ मध्ये त्यांनी ‘हरिजन सेवक संघा‘ची स्थापना केली. तसेच या प्रश्नावर लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी ‘हरिजन‘ नावाचे साप्ताहिकही सुरू केले.

त्यांच्या विचारांपासून व कार्यापासून प्रेरणा घेऊन काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला वाहून घेतले होते. महात्मा गांधींनी हिंदु-मुस्लिम ऐक्यावर भर दिला होता. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्त्रियांना सहभागी करून घेऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्नही गांधीजींनी केला. स्त्रियांवर होणारा सामाजिक अन्याय त्वरित थांबवून त्यांची समान हक्काची मागणी विनाशर्त मान्य केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. याशिवाय विधवाविवाह, दारूबंदी यांचा पुरस्कार केला, तर देवदासी प्रथेसारख्या अनिष्ट प्रथांना विरोध दर्शविला.

गांधीजींनी सामाजिक सुधारणा कार्यक्रम हा राष्ट्रीय चळवळीचाच एक भाग बनविला होता. त्याचा फायदा असा झाला की, सर्वसामान्य जनतेकडून सामाजिक सुधारणांना होणारा विरोध बोथट झाला. म्हणूनच स्त्री-उद्धार, अस्पृश्यतानिवारण यांचे कार्य करणाऱ्या इतर समाजसुधारकांना समाजाकडून जितका विरोध झाला होता तितका तो महात्मा गांधींना झाला नाही.

मृत्यू

३० जानेवारी, १९४८ रोजी नथुराम गोडसे या त्यांच्या मित्रानेच त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे?

मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं खरं नाव आहे.

महात्मा गांधींच्या आईचं नाव काय होतं?

पुतळीबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं.

गांधीजींच्या वडिलांचा व्यवसाय काय होता?

ते एका संस्थानात दिवाण या पदावर कार्यरत होते.

गांधीजींच्या पत्नीचे नाव काय?

कस्तुरबा हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.

गांधीजींची हत्या कुणी केली?

त्यांची हत्या त्यांचा मित्र नथुराम गोडसे यांनी केली.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment