मुद्दे
परिचय
रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म १४ जानेवारी, १८८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग जवळच्या मुरुड या गावी झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते थोरले चिरंजीव, रघुनाथरावांच्या आईचे नाव राधाबाई असे होते; पण त्यांना मातृसुख फार काळ लाभले नाही. ते नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.
रघुनाथ धोंडो कर्वे यांचे शिक्षण
रघुनाथरावांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुरुड, मुंबई व पुणे या गावी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई राज्यात सर्वप्रथम आले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. सन १९०३ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते गणित विषयात सर्वप्रथम आले. पुढे १९११ मध्ये गणित हा विषय घेऊन ते एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर रघुनाथरावांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. पुढे मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज, धारवाडचे कर्नाटक कॉलेज, पुण्याचे डेक्कन कॉलेज, अहमदाबादचे गुजरात कॉलेज, मुंबईचे विल्सन कॉलेज अशा निरनिराळ्या कॉलेजांत त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. गणित विषयाच्या अध्ययनासाठी ते काही काळ फ्रान्सच्या पॅरिस विश्वविद्यालयातही दाखल झाले होते.
संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक
रघुनाथ धोंडो कर्वे यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांसंबंधी बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचारप्रवर्तन केले आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यही केले. सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून वरील विषयाचा आग्रहाने पुरस्कार करणारे ते भारतातील पहिलेच विचारवंत होत. सन १९२१ मध्ये त्यांनी संततिनियमन(Birth Control) या विषयावर एक पुस्तक लिहिले. त्या काळात संततिनियमनासारख्या गोष्टीचा साधा उच्चार करणेही निषिद्ध मानले जात होते;
मग त्याची उघड चर्चा करणे तर बाजूलाच राहिले, पण रघुनाथ धोंडो कर्वे यांची अशी खात्री पटली होती की, संततिनियमनाशिवाय या अवाढव्य देशाला दुसरा तरणोपाय नाही, म्हणून या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यानुसार ते प्रत्यक्ष कामालाही लागले. पुढे १९२१ मध्ये संततिनियमनविषयक सांगोपांग माहिती देणारे ‘राईट एजन्सी’ हे केंद्र त्यांनी मुंबईतील भटवाडीमध्ये सुरू केले, संततिनियमनाची साधने परदेशातून आयात करून त्यांचा लोकांमध्ये प्रचार करण्याचे कार्यही त्यांनी हाती घेतले.
निर्धाराने विरोधाचा सामना
रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या या कार्याला विरोध करणारा एक मोठा वर्ग त्या वेळी समाजात अस्तित्वात होता. संततिनियमनाचा प्रचार करणे म्हणजे सामाजिक नीतिमत्तेला तिलांजली देणे होय. अशा गोष्टींमुळे समाजात अनैतिकता वाढीस लागेल, असे या वर्गाचे म्हणणे होते. त्यांपैकी काही लोकांनी तर विल्सन कॉलेजच्या व्यवस्थापनावर दबाव आणून “अशा माणसास आपण कॉलेजमध्ये कसे राहू देता?” अशी विचारणा केली.
त्यामुळे कॉलेज व्यवस्थापनाने रघुनाथ धोंडो कर्वे यांना “संततिनियमनाचा प्रचार बंद करा अन्यथा राजीनामा द्या” असे सांगितले. त्यावर रघुनाथरावांनी सन १९२५ मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि संततिनियमनाच्या प्रचारकार्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. या कामी त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी मालतीबाईंनी मनापासून साथ दिली.
- महर्षी धोंडो कर्वे यांची माहिती मराठी
- स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे माहिती मराठी
संततिनियमनाचे व्यापक उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्य हे आहे आणि ते निकोप स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित आहे, असे त्यांचे मत होते. लोकसंख्यावाढ राष्ट्रीय प्रगतीच्या मार्गातील फार मोठा अडसर आहे, हा विचार भारतात प्रथम त्यांनीच मांडला. आपली मते परखडपणे मांडण्यास त्यांनी कधीच मागे-पुढे पाहिले नाही.
किंबहुना समाजातील बहुसंख्य लोकांना आपले विचार व कार्य रुचणार नाही याची त्यांना पुरती जाणीव असतानादेखील त्यांनी लोकांच्या त्यासंबंधीच्या प्रतिक्रियांची फारशी पर्वा केली नाही. ‘ज्या गोष्टीची माहिती होणे समाजाच्या व व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे ती माहिती निर्धारपूर्वक पुढे आलीच पाहिजे’ असे त्यांना वाटत होते. ‘संततिनियमन व लैंगिक संबंध’ या विषयासंबंधीची माहितीही याच प्रकारची असल्याने ती लोकांपुढे येणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.
समाजस्वास्थ्य मासिक
‘संततिनियमन व लैंगिक संबंध’ या विषयांवर लोकांचे प्रबोधन करण्यासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सन १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ या नावाचे मासिक सुरू केले. १५ जुलै, १९२७ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यांच्या या मासिकाला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; त्यामुळे रघुनाथ धोंडो कर्वे यांना पदरमोड करूनच ते चालवावे लागत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत म्हणजे सुमारे सव्वीस वर्षे हे मासिक चालविले.
यावरून त्यांची आपल्या या कार्यावरील निष्ठा स्पष्ट होते. समाजस्वास्थ्य मासिक सुरू करण्यामागील आपला उद्देश स्पष्ट करताना त्या मासिकाच्या पहिल्याच अंकात कर्त्यांनी लिहिले होते की, ‘समाजाच्या व व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची आणि त्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करणे, हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात, असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळविण्यास सामान्य वाचकांस अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करता व्यवहारोपयोगी माहिती पण दिली जाईल.’
पुरोगामी व्यक्तिमत्त्व
रघुनाथ धोंडो कर्वे हे बुद्धिप्रामाण्यवादी व नास्तिक विचारांचे होते. त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक विषयांकडे वैज्ञानिक तसेच चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले आणि ती दृष्टी आपल्या समाजाला प्राप्त व्हावी याकरिता प्रयत्न केले. समाजाच्या हिताची माहिती पुढे आलीच पाहिजे आणि त्या दृष्टीने समाजातील विचारवंतांनी विशेष प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. स्त्री-मुक्ती, स्त्री-शिक्षण यांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी स्वरूपाचा होता.
मृत्यू – १४ ऑक्टोबर, १९५३.
रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लिहिलेली पुस्तके
रघुनाथ धोंडो कर्वे हे एक चांगले गद्यलेखकही होते. मराठीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे- संततिनियमन, गुप्त रोगांपासून बचाव, वेश्याव्यवसाय, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, त्वचेची निगा, संततिनियमन : विचार आणि आचार इत्यादी.
रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म कधी व कुठे झाला?
यांचा जन्म १४ जानेवारी, १८८२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग जवळच्या मुरुड या गावी झाला.
रघुनाथ धोंडो कर्वे यांचा मृत्यू कधी झाला?
१४ ऑक्टोबर १९५३ साली त्यांचा मृत्यू झाला.
रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणते मासिक सुरू केले?
यांनी सन १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ या नावाचे मासिक सुरू केले.
रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणते कार्य केले?
यांनी लैंगिक शिक्षण आणि संततिनियमन या विषयांवर कार्य केले?
रघुनाथ धोंडो कर्वे यांचे वडील कोण होते?
महर्षी धोंडो कर्वे हे त्यांचे वडील होते.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!