गोपाळ हरी देशमुख माहिती मराठी | Gopal Hari Deshmukh Information in Marathi

google-news-icon

गोपाळ हरी देशमुख यांचा परिचय

महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांच्या पिढीतील एक अग्रेसर विचारवंत म्हणून लोकहितवादींचा उल्लेख केला जातो. लोकहितवार्दीचे संपूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचे मूळ आडनाव सिधये असे होते. देशमुख हे नाव त्यांना वतनावरून पडले.

लोकहितवादींचा जन्म १८ फेब्रुवारी, १८२३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. पेशवाई बुडाल्यावर ते ठराविक मुदतीत एल्फिन्स्टनला भेटले नाहीत म्हणून त्यांची जहागीर जप्त झाली होती; पण पेशव्यांच्या मध्यस्थीने ती त्यांना परत मिळाली. लोकहितवादी तेरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील मृत्यू पावले; त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठीच आपत्ती कोसळली.

कुटुंबाचा सर्व भार ते स्वतः व त्यांचे थोरले भाऊ चिंतामणराव यांच्यावर पडला. परंतु गोपाळरावांनी खासगी रीतीने अध्ययन चालूच ठेवले. पुढे वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय करून ते पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि तीन वर्षांतच तेथील अभ्यासक्रम पूर्ण केला.

शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गोपाळरावांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. सुरुवातीला ते दक्षिणेतील सरदारांच्या एजंटाच्या कचेरीत ट्रान्सलेटर म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांना शिरस्तेदार, मुन्सफ, सब-असिस्टंट इनाम कमिशनर अशा हुद्द्यांवर बढती मिळत गेली. पुढे प्रथम अहमदाबाद व नंतर अहमदनगर या ठिकाणी असिस्टंट जज्ज म्हणून त्यांनी काम केले. अहमदाबाद येथे अॅक्टिंग स्मॉल कॉज जज्ज आणि नाशिक येथे जॉइंट सेशन्स जज्ज म्हणूनही त्यांनी काम केले.

सन १८६१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘हिंदू धर्मशास्त्राचे सार’ तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली होती. सन १८७७ मध्ये दिल्ली दरबार प्रसंगी ब्रिटिश शासनाने ‘रावबहाद्दूर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानितही केले होते. १८७९ मध्ये ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. लोकहितवादी ची १८८० मध्ये मुंबई इलाख्याच्या सरकारने मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सभासद म्हणूनही त्यांनी काम केले. काही काळ रतलाम संस्थानाचे ते दिवाण होते. ‘आर्य समाजा’शी त्यांचा निकटचा संबंध होता.

गोपाळराव जात्याच कुशाग्र बुद्धीचे, करारी व कर्तबगार होते. ते जसे निरलस कार्यकर्ते होते, तसे श्रेष्ठ साहित्यिकही होते. ते विद्वान तर होतेच; पण विद्वत्तेच्या जोडीला समाजसुधारणेसंबंधीची तळमळदेखील त्यांच्याजवळ होती. साहजिकच, विविध विषयांवरील आपली मते त्यांनी निर्भीडपणे आपल्या लेखणीद्वारे व्यक्त केली होती.

लोकहितवादींचा लेखनविस्तार खूप मोठा आहे. १८४८ मध्ये त्यांनी भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात ‘लोकहितवादी’ या नावाने लेख लिहिण्यास प्रारंभ केला. १८४८ ते १८५० या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जी ‘शतपत्रे’ लिहिली त्यावरून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन, समाजहिताविषयीची कळकळ, विद्वत्ता इत्यादी गोष्टींची कल्पना येऊ शकते.

शतपत्रांमधील पहिले पत्र (किंवा पहिला लेख) १९ मार्च, १८४८ रोजी प्रकाशित केले गेले. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत त्यांची सर्व पत्रे किंवा लेख प्रसिद्ध झाले. पुढे त्यांनी स्वतःच १८८२ मध्ये ‘लोकहितवादी’ या नावाचे मासिक व १८८३ मध्ये त्याच नावाचे त्रैमासिक सुरू केले. याशिवाय त्यांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक ग्रंथही लिहिले.

मृत्यू – ९ ऑक्टोबर, १८९२.

गोपाळ हरी देशमुख यांचे सामाजिक विचार

लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्याबद्दल आग्रह धरला होता. ते समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले द्रष्टे विचारवंत होते. आपल्या समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार करावा, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा, असे त्यांनी म्हटले होते. अर्थात, त्यासाठी आपल्या समाजातील नानाविध दोष व विकृती यांवर त्यांना निर्दयतेने कोरडे ओढावे लागले होते.

भारतीय समाजातील जातिव्यवस्था या समाजाच्या अधोगतीस कारणीभूत झाली आहे, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी जातिव्यवस्था व वर्णभेद यांस विरोध केला होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचारविचारांचा अंगीकार करावा, असे त्यांनी सांगितले होते. याच दृष्टिकोनातून त्यांनी ब्राह्मणांमधील वर्णश्रेष्ठत्वाची भावना व अहंकारी वृत्ती यांवर जोरदार टीका केली होती. या संदर्भात एके ठिकाणी त्यांनी असे लिहिले आहे की-

‘मोठे शहरात पहाल तर तुम्हास असे वाटेल की, इतके भट येथे आहेत, यांस खावयास मिळते, त्याबद्दल ते कोणती चाकरी करितात? असे जर मनांत आणले तर तुम्ही काय म्हणाल? मला असा एक मनुष्य दाखवा की, भटांनी शाळा घालून कोणी तयार केले किवा कोणास विद्वान केले किंवा ग्रंथ केले किंवा ज्ञान सांगितले किंवा लोक सुधारले किवा मजुरी केली, असे काही तरी मला या भटांचे व भिक्षुकांचे खाण्याचे मोबदला त्यांचा उपयोग दाखवा. चांभाराचा उपयोग मी तुम्हांस सांगतो व दर एक मनुष्याचे पायात जोडे दाखवितो. तुम्ही आम्हांस भटांची निशाणी दाखवा.’

तेव्हा भिक्षुकवर्ग हा अनुत्पादक असल्याने सामान्य मजुरापेक्षाही सामाजिकदृष्ट्या निकृष्ट आहे. म्हणून ब्राह्मणांनी आपल्या जन्मजात मोठेपणाच्या खुळ्या कल्पना सोडून द्याव्यात, जातीचा अभिमान बाळगू नये, मनुष्यमात्राला सारखे लेखावे, अर्वाचीन विद्या व कला आत्मसात कराव्यात, असे प्रतिपादन लोकहितवादींनी केले होते.

भारतीय समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवरही लोकहितवादींनी जोरदार हल्ला चढविला होता. स्त्रियांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी पुरोगामी तत्त्वांचा आग्रह धरला आणि त्यांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे असे सांगितले. बालविवाहामुळे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व खुरटून जाते, अनेक स्त्रियांना वैधव्याचे दुःख भोगावे लागते. म्हणून बालविवाहाची प्रथा बंद करावी, स्त्रियांना शिक्षण व विवाह यांबाबतीत स्वातंत्र्य द्यावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार द्यावा, असे विचार त्यांनी मांडले होते.

गोपाळ हरी देशमुख यांचे धर्मविषयक विचार

लोकहितवादींनी भारतीय समाजातील जुन्या धर्मविषयक कल्पनांवरही प्रखर टीका केली होती. जुने धर्मग्रंच अभ्यासून आणि त्यांतील वचने प्रमाण मानून त्यानुसार आताच्या काळात वर्तन करणे मूर्खपणाचे आहे, असे त्यांचे मत होते. आजच्या काळात प्राचीन धर्मग्रंथ व पोथ्यापुराणे यांच्या अध्ययनापेक्षा आधुनिक ज्ञान संपादन करण्यातच आपणा सर्वांचे हित आहे, असे त्यांनी सांगितले होते. ते लिहितात, ‘भागवताची हजार पारायणे केली व रामायण नित्य वाचले तरी हिंदुस्थानात इंग्रज कसे आले हे समजणार नाही. तसे जन्मभर जुन्या गोष्टी सांगितल्या आणि सांप्रतचे विचार केले नाहीत तर त्यांचा काय उपयोग?’ हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती व रूढींवरही त्यांनी अशीच टीका केली होती.

आजच्या काळात धर्माला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्माच्या नावावर अनेक निद्य प्रकार घडत आहेत, आचारांचे फार स्तोम माजले आहे, असे या धर्मातील दोष दाखवून त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले आहे की, धर्मप्रकरणी सदसद्विवेकबुद्धीला प्राधान्य द्या. ईश्वरावर श्रद्धा असू द्या; पण परिस्थितीप्रमाणे शास्त्रे बदला, ज्ञान हीच शक्ती याची जाणीव ठेवून आधुनिक शास्त्रांचे ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा.

लोकहितवादींचा मूर्तिपूजेला विरोध होता. तसेच आपल्या लोकांच्या निष्क्रियतेवरही त्यांनी टीका केली होती. धर्माच्या नावाखाली निष्क्रिय बनून राहणे किंवा वैराग्य स्वीकारणे मूर्खपणाचे आहे. इंग्रजांच्या कृतिशीलतेमुळे व उद्योगीपणामुळे त्यांनी हिंदुस्थानवर आपले राज्य स्थापन केले आहे. तेव्हा त्यापासून बोध घेऊन आपणही कृतिशील बनले पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. धार्मिक बाबतीत प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे आचरण करण्याची आणि लिहिण्या-बोलण्याची मुभा असावी, असे त्यांचे मत होते.

गोपाळ हरी देशमुख यांचे राजकीय विचार

भारतातील इंग्रजी राजवटीविषयी लोकहितवादींनी अनुकूल मत व्यक्त केले होते. या देशात ईश्वराच्या प्रेरणेनेच इंग्रजांचे राज्य स्थापन झाले आहे, भारतीय समाजाची अधोगती थांबविण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी ईश्वरानेच इंग्रजी सत्तेची योजना केली आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. अर्थात, परकीय सत्तेविषयी त्यांना आत्मीयता वाटत होती, असे नाही.

पण ते आपल्या समाजाची वैगुण्ये ओळखून होते. इंग्रज या देशातून निघून गेले तरी येथील बहुजन समाजाच्या परिस्थितीत म्हणण्याजोगा बदल होणार नाही, याची त्यांना खात्री होती, त्यांनी असे लिहिले आहे की, ‘आमचे लोकांच्या रीती अगदी बदलल्याशिवाय या देशाचे हित होणार नाही व या लोकांस स्वतः राज्य चालविण्याचे सामर्थ्य असल्याखेरीज इंग्रज लोक या देशातून गेले तरी उपयोग होणार नाही.

पुन्हा गर्दी होईल व बेबंदी, अंदाधुंदी, भालेराई, होळकरी गर्दी व पेंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील आणि कोणाचा जीव व घरदारही निर्भय राहणार नाही. जो जबरदस्त त्याचे हाती सर्व जाईल व जो निर्बल असेल तो उपाशी मरेल. सर्व त्याचे हरण होईल.’ भारतात इंग्रजी सत्ता स्थापन होण्यापूर्वी येथील समाजाची जी स्थिती होती त्या अनुभवावरूनच लोकहितवादींनी वरील प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.

लोकहितवादींनी इंग्रजी राजवटीपासून मिळणाऱ्या फायद्याचे वर्णन आपल्या लिखाणातून केले असले तरी येथील बहुजन समाजाच्या हिताचा विचार करून राज्यकर्त्यांच्या अनेक दोषांवर त्यांनी कडक टीकाही केली होती. ‘दिवाळखोर सरदारांचा पूर्व कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवीत आहे.’ ‘अदलातीचे कर लुटारूसारखे आहेत’ अशा शब्दांत इंग्रजांच्या राज्यकारभाराची संभावना करून त्यांनी राज्यकर्त्यांना असा सल्ला दिला होता की, या देशावर गैरवाजवी खर्च घालू नये.

येथील लोकांची ममता संपादन करावी. स्थानिक लोकांना राज्यकारभारात संधी देऊन त्यांच्या सल्लामसलतीने कारभार करावा. हिंदुस्थान देश आपला आहे आणि विलायतचे व हिंदुस्थान देशाचे हित एकच आहे, असे समजून वहिवाट करावी, असे केल्यास ते दोन्ही देशांच्या फायद्याचे ठरेल, शतपत्रांतील एका लेखात लोकहितवादींनी इंग्लंडमधील राज्यकारभार कसा चालतो व तेथील पार्लमेंटच्या हाती किती सत्ता आहे, याचे वर्णन करून पुढे असे म्हटले होते की, ‘आपण सर्व एकत्रित होऊन विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे आणि आपल्या देशाला पार्लमेंट मागून घ्यावे.’ भारतीय जनतेत पराकोटीचे दारिद्रय असून तिची आर्थिक दुरवस्था दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा व आपल्या प्रजेचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

मूल्यमापन

लोकहितवादी यांच्या वरील विचारांवरून त्यांची संशोधक बुद्धी व विद्वत्ता यांचा आपणास प्रत्यय येतो. एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि आपल्या लोकांची वैगुण्ये यांवर त्यांनी अचूक बोट ठेवले होते. त्यांच्या लिखाणातून समाजहिताची तळमळ ओतप्रोत भरल्याचे दिसून येते. या तळमळीला त्यांच्या तर्कशुद्ध व वस्तुनिष्ठ विचारांची जोड मिळाली होती. म्हणून त्यांचे विचार येथील समाजाला अत्यंत मार्गदर्शक ठरले होते. गं. बा. सरदार यांनी त्यांच्यासंबंधी असे म्हटले आहे की, लोकहितवादीची पायाशुद्ध विचारप्रणाली पाहिली म्हणजे त्यांना ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक’ म्हणून संबोधावयास हरकत वाटत नाही.

लोकहितवादींच्या विचारांतील पुरोगामित्व व द्रष्टेपण याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही. परंतु उक्ती व कृती यांमधील तफावत ही त्यांची मुख्य मर्यादा होती. आपल्या विचाराप्रमाणे कृती करण्यात ते कमी पडले, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. अर्थात, या उणिवेमुळे त्यांच्या विचारांचे महत्त्व मात्र मुळीच कमी होत नाही. उलटपक्षी, विचारप्रबोधनाच्या युगाचा आद्यप्रवर्तक व सामाजिक पुनर्रचनेची मुहूर्तमेढ रोवण्यास महत्त्वपूर्ण ठरलेला आधारस्तंभ म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते.

लोकहितवादींसंबंधी श्री. के. क्षीरसागर म्हणतात “जो या लोकहितकर्त्याचे स्वरूप प्रत्यक्ष त्याच्या वाङ्मयसागरात पाहील त्यास लोकहितवादी ऊर्फ सरदार गोपाळ हरी देशमुख हे खानदानी घराण्यातील संभावित गृहस्थ, इंग्रजी, संस्कृत, फारसी वगैरे वाङ्मयाचा गाढा अभ्यास केलेले बहुश्रुत विद्वान, अत्यंत नेकीने वागणारे अधिकारी, दूरदृष्टीने विचार करणारे सामाजिक व राजकीय विचाराग्रणी आणि महाव्यासंगी व सामर्थ्यवान गद्यलेखक असेच दिसतील.

त्यांची मते दिवसेंदिवस अधिक हितावह व दूरदर्शित्वाची ठरत आहेत. त्यांचे ग्रंथ महाराष्ट्र सारस्वतास चिरकाल भूषण ठरतील. त्यांच्याइतकी विपुल, विविध व विचारप्रवर्तक रचना दुसऱ्या कोणत्याही मराठी साहित्यसेवकाचे हातून झालेली नाही. त्यांनी हाती घेतलेल्या कित्येक विषयांवर त्यांच्या पश्चात एक-एकही ग्रंथ होणे दुर्घट झालेले दिसून येते. काहींस तर त्यांच्या व्यतिरिक्त एकही व्यासंगी लाभला नाही. अशा असामान्य व्यासंगी व अष्टपैलू लेखकाचे ग्रंथ ज्ञानकोशाप्रमाणे भाषेत चिरकाल ज्ञानवर्धक ठरतील यात शंका नाही.’

ग्रंथसंपदा

लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे आणि त्याचा परिहार व व्यापाराविषयी विचार, स्थानिक स्वराज्यव्यवस्था, ग्रामरचना, हिंदुस्थानचा इतिहासपूर्वार्ध, जातिभेद, गीतातत्त्व, आगमप्रकाश (गुजराती), निगमप्रकाश (गुजराती), राजस्थानचा इतिहास, भरतखंड पर्व, भिक्षुक, पृथ्वीराज चव्हाण याचा इतिहास, लंकेचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, शतपत्रे, निबंधसंग्रह, ऐतिहासिक गोष्टी, कलियुग, स्वाध्याय, आश्वलायन गृह्यसूत्र, पानिपतची लढाई इत्यादी.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment