मुद्दे
डॉ. आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९०२ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड असे होते; पण दादासाहेब गायकवाड या नावानेच ते विशेष प्रसिद्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्येष्ठ सहकारी आणि दलित समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत.
अनेक आंदोलनांत आंबेडकरांना साथ त्यांनी दिली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे स्वतः दलित समाजातून आले असल्याने दलितांच्या व्यथा व त्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातना या गोष्टींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. म्हणूनच दलित समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला.
त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होत. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
दलितांना संघटित करण्यात पुढाकार
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दलित समाजात जागृती घडवून आणण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले होते. दलितांनी संघटित होऊन संघर्ष केल्याखेरीज त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळू शकणार नाहीत, असे त्यांचे मत होते. त्यामुळे दलितांना संघटित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. दलित व शोषित जनतेच्या अनेक लढ्यांमध्ये ते अग्रभागी राहिले होते.
जबाबदारीच्या पदांवर कार्य कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी जबाबदारीच्या अनेक जागा व पदे भूषविली होती. नाशिकच्या ज्ञान-विज्ञान केंद्राचे ते अध्यक्ष होते. ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाच्या संपादक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईच्या ‘शेड्यूल्ड कास्ट इंप्रूव्हमेंट ट्रस्ट’ चे ते विश्वस्त व सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाचे ते एक प्रमुख नेते होते. सन १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी
- स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे माहिती मराठी
- स्वामी विवेकानंद माहिती मराठी
१९४२ ते १९४६ या काळात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सरकारी नोकरीत होते. १९४७ मध्ये जालंधर व कुरुक्षेत्र या ठिकाणी निर्वासितांसाठी खास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्रसमितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे भूमिहीन शेतमजुरांसाठी कार्य
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणून त्यांनी भूमिहीन शेतमजुरांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भूमिहीन शेतमजुरांची संख्या खूपच मोठी आहे. या शेतमजुरांमध्ये दलित समाजातील लोकांचाच प्रामुख्याने भरणा आहे. आपल्या समाजातील एक दुर्लक्षित व उपेक्षित घटक अशी त्यांची स्थिती होती. त्यांना काम व वेतन यांबाबतीत कोणत्याच प्रकारचे संरक्षण नव्हते.
जमीनदारवर्गाकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. साहजिकच, भूमिहीन शेतमजुरांना त्यांच्या कामाचा रास्त मोबदला मिळावा, त्यांचे शोषण थांबविण्यासाठी शासनाने कायदेशीर तरतुदी कराव्यात, तसेच सरकारने त्यांना स्वतःच्या मालकीची जमीन मिळवून द्यावी, अशा मागण्या दादासाहेब गायकवाडांनी केल्या आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सरकारविरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला. भूमिहीन शेतमजुरांच्या आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला होता.
रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व
भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर त्या पक्षाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. पुढे या पक्षाची फाटाफूट झाल्यावर त्याच्या एका प्रभावी गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. रिपब्लिकन पक्षात ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यामध्ये त्यांना यश आले नाही. तथापि, दलित समाजातील सर्वांत मोठ्या गटाने गायकवाडांच्या नेतृत्वालाच मान्यता दिली होती.
मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे ते काही काळ सदस्य होते. लोकसभेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना दुसरे सदस्य प्रकाशवीर शास्त्री यांनी धर्मांतराविरुद्ध विधेयक आणण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ त्यांनी लोकसभेत मनुस्मृती फाडून १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून केलेल्या प्रतीकात्मक निषेधाची आठवण करून दिली. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांच्या सार्वजनिक कार्याचा व समाजसेवेचा गौरव केला होता. मृत्यू – २९ डिसेंबर, १९७१.
सन २००१-०२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करून त्यांच्या कार्याची स्मृती जागवली.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!