स्वामी विवेकानंद माहिती मराठी | Swami Vivekanand Information Marathi

google-news-icon

स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या महान संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगाला परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. हिंदू धर्माकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्चात्त्य जगातील लोकांना विवेकानंदांनी या धर्माची महती पटवून दिली आणि त्याद्वारे हिंदू धर्माची पताका जगाच्या वेशीवर फडकवत ठेवली. त्याचबरोबर विश्वबंधुत्वाचा संदेशही त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरविला.

नाव स्वामी विवेकानंद
जन्म तारीख १२ जानेवारी १८६३
जन्मठिकाण कोलकाता
वडिलांचे नाव विश्वनाथ
आईचे नाव भुवनेश्वरी
गुरूचे नाव रामकृष्ण परमहंस
शिक्षण बी ए
मृत्यू ४ जुलै १९०२

स्वामी विवेकानंद यांचा परिचय

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ व आईचे नाव भुवनेश्वरी असे होते. विश्वनाथ दत्त हे पेशाने वकील होते. नरेंद्रनाथांचे शिक्षण कोलकाता येथे झाले. १८८४ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आपल्या मुलाने वकील व्हावे अशी नरेंद्रच्या आई-वडिलांची इच्छा होती; परंतु नियतीची योजना मात्र काही वेगळीच होती.

शालेय जीवनात स्वामी विवेकानंद यांच्यावर पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव होता. कॉलेजात शिक्षण घेत असतानाच ते ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाले होते. ब्राह्मो समाजाचे एक प्रख्यात नेते केशवचंद्र सेन यांच्या सुधारणावादी विचारांची छाप त्यांच्यावर पडली होती; त्यामुळे मूर्तिपूजा व बहुदेवतावाद यांवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. परंतु पुढे नोव्हेंबर, १८८१ मध्ये सुरेंद्रनाथ मित्र यांच्या ‘कोलकाता’ येथील निवासस्थानी त्यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली.

ही घटना विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. रामकृष्ण परमहंस हे कालिमातेचे उपासक होते. ते साक्षात्कारी पुरुष म्हणून ख्याती पावले होते. योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते, असा रामकृष्ण परमहंसांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला आणि ते रामकृष्णांचे पट्टशिष्य बनले. रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात राहिल्याने विवेकानंदांच्या पूर्वीच्या विचारांमध्ये बदल घडून आला आणि ते सनातन हिंदू धर्म व त्याचे अद्वैत तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले.

रामकृष्ण मठा’ ची स्थापना

१५ ऑगस्ट, १८८६ रोजी रामकृष्ण परमहंस यांचे देहावसान झाले. तदनंतर अगदी अल्पावधीतच सप्टेंबर, १८८६ च्या अखेरीस स्वामी विवेकानंदांनी कोलकात्यातील वराहनगर येथे म्हणजेच रामकृष्ण परमहंसांच्या आपल्या गुरूच्या नावाने ‘रामकृष्ण मठा‘ची स्थापना केली. पुढे त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर प्रवास केला आणि आपल्या देशाची आणि देशबांधवांची एकंदर स्थिती समजावून घेतली. काही काळ त्यांनी हिमालयात जाऊन योगसाधनाही केली.

सर्वधर्म परिषद

सप्टेंबर, १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरात जागतिक सर्वधर्मपरिषद भरली होती. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. संपूर्ण जगातून सर्व धर्माचे मान्यवर पंडित उपस्थित राहिलेल्या या परिषदेत बोलण्याची संधी विवेकानंदांना ११ सप्टेंबर, १८९३ रोजी मिळाली. विवेकानंदांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. आपल्या भाषणाची सुरुवात ‘प्रिय बंधुभगिनींनो’ अशी करून त्यांनी तेथील उपस्थित श्रोत्यांच्या हृदयास हात घातला आणि आपल्या विद्वत्तेच्या तेजाने सर्वांना दीपवून टाकले. हिंदू धर्माच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या आधारेच जगाला विश्वधर्माची प्राप्ती करून घेता येईल, असे सांगत आपल्या ओघवत्या शैलीत हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदात्तता त्यांनी सर्वांना पटवून दिली.

अमेरिका व युरोपात अनुयायी

स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या भजनी लागले- त्यांचे अनुयायी बनले. त्यांच्या चाहत्यांनी अमेरिकेत ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने घडवून आणली. विवेकानंदांनी अमेरिकेत दोन वर्षे वास्तव्य केले. या वास्तव्याच्या काळात त्यांनी हिंदू धर्माचा विश्वबंधुत्वाचा महान संदेश तेथील असंख्य लोकांपर्यंत पोहोचविला.

पाश्चात्त्य देशांतील कार्य

ऑगस्ट, १८९५ मध्ये स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले. तेथेही त्यांनी आपले विचार व व्यक्तिमत्त्व यांनी लोकांना प्रभावित केले. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी मिळाले. तेथील कु. मागरिट नोबेल या स्वामीजींच्या शिष्या बनल्या. पुढे कु. नोबेल यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या. स्वामी विवेकानंदांनी त्यानंतर इतर अनेक पाश्चात्त्य देशांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्माच्या अद्वैत तत्त्वज्ञानाची महती लोकांना पटवून दिली आणि या धर्माचे खरे स्वरूप त्यांना समजावून सांगितले. डिसेंबर, १८९५ मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेत परतले. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे फेब्रुवारी, १८९६ च्या दरम्यान त्यांनी ‘वेदान्त समिती‘ची स्थापना केली.

स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्त्य देशांतील भौतिकवादाचा हिंदुस्थानातील अध्यात्म- चादाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. केवळ भौतिक सुखाच्या प्राप्तीमुळे कोणताही समाज खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही. खऱ्याखुऱ्या सुखप्राप्तीसाठी भौतिक-वादाला अध्यात्माची जोड मिळणे आवश्यक आहे. जगाला अध्यात्माची शिकवण केवळ भारतच देऊ शकतो, असे त्यांनी पाश्चात्यांना सांगितले. अर्थात, त्याच वेळी स्वामी विवेकानंदांनी भारतीयांनाही अशी जाणीव करून दिली की, ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवून आपण आपली प्रगती साधता येणार नाही, आपल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य दूर करणे अतिशय गरजेचे आहे; कारण आपल्या समाजाच्या मागासलेपणाची तीच खरी कारणे आहेत. त्यांवर मात करण्यासाठी भौतिकवादाचा स्वीकार करणे आपणासाठी गरजेचे आहे.

रामकृष्ण मिशनची स्थापना

स्वामी विवेकानंदांनी १ मे, १८९७ रोजी ‘रामकृष्ण मिशन‘ ची स्थापना केली. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांचा संदेश सर्वत्र पोहोचविणे, समाजातील उपेक्षित घटकांची सेवा करणे आणि समाजसुधारणेच्या कार्याला चालना देणे, हे या संस्थेच्चा स्थापनेमागील त्यांचे प्रमुख उद्देश होते. जगातील सर्वच धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आत्मसाक्षात्कार अनेक पद्धतींनी घडू शकतो. तथापि आत्मसाक्षात्कार घडवून आणण्यास मूर्तिपूजाही साहाय्यभूत ठरते, अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती. स्वामी विवेकानंदांनी जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. सनातन हिंदू धर्माच्या आधारे व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देणे, हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून देणे, हिंदू धर्माच्या खऱ्या तत्त्वज्ञानाची त्यांना ओळख करून देणे इत्यादी कामे रामकृष्ण मिशनने केली.

अर्थात, स्वामी विवेकानंदांनी केवळ धार्मिक स्वरूपाच्या कार्यासाठीच रामकृष्ण मिशनची स्थापना केली नव्हती. त्यांनी धार्मिक बाबीइतकेच दलित व पीडित वर्गाच्या उद्धाराला प्राधान्य दिले होते. या वर्गातील लोकांच्या उद्धाराची तळमळ त्यांना लागून राहिली होती. ज्या लोकांना पोटभर अन्न मिळत नाही त्यांना धर्म सांगणे हा निव्वळ मूर्खपणा होय, असे त्यांनी म्हटले होते; म्हणूनच त्यांनी रामकृष्ण मिशनच्या वतीने समाजसेवेचे व्रत अंगीकारले होते.

दलितांची व पीडितांची सेवा ही त्यांच्या दृष्टीने केवळ भूतदया नव्हती, तर तो पवित्र अशा धार्मिक कार्याचा एक आवश्यक भाग होता. त्यांच्या या दृष्टिकोनामुळेच रामकृष्ण मिशनच्या वतीने ठिकठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालय, वसतिगृहे यांची स्थापना करण्यात आली. दुष्काळ, महापूर, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही रामकृष्ण मिशनने पुढाकार घेतला होता.

समाजसुधारणेच्या कार्याला प्राधान्य

स्वामी विवेकानंदांनी समाजसुधारणेच्या कार्यालाही प्राधान्य दिले होते. पाश्चात्त्य देशांतील भौतिक प्रगतीच्या तुलनेत आपल्या देशाचे मागासलेपण पाहून त्यांचे मन खूपच व्यतीत झाले. आपल्या समाजात धर्माच्या नावाखाली जोपासल्या गेलेल्या अंधश्रद्धा झुगारून दिल्या पाहिजेत, दुष्ट चालीरीती-रुढींचे निर्मूलन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला मुळीच थारा देऊ नका, असे त्यांचे सांगणे होते. समाजातील अनिष्ट चालीरीती व रूढींवर त्यांनी प्रखर टीका केली होती.

स्वामी विवेकानंदांनी भारतीय जनतेला राष्ट्रभक्ती व स्वदेशाभिमान यांचीही शिकवण दिली. आपले राष्ट्र सामर्थ्यवान बनावे, ही त्यांची इच्छा होती; म्हणून त्यांनी आपल्या देशबांधवांना आपापसांतील भेदाभेद विसरण्याचा, बुद्धिवादाचा स्वीकार करण्याचा आणि कार्यप्रवण बनण्याचा उपदेश केला होता. अर्थात, सामर्थ्याला सत्याची जोड असली पाहिजे, असेही त्यांचे सांगणे होते. भारतीयांनी आपल्या दुबळेपणाचा त्याग करून शौर्याची उपासना करावी, असे त्यांनी म्हटले होते.

४ जुलै, १९०२ रोजी महानिर्वाण

विवेकानंद यांचे गुरु कोण होते?

रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते.

स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी झाला?

विवेकानंद यांचा मृत्यू ४ जुलै १९०२ रोजी झाला.

स्वामी विवेकानंदांना किती भाऊ आणि बहिणी आहेत?

त्यांना एकूण आठ भावंडे होती.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

पुढील १ ते २ वर्षात टाटाच्या या इलेक्ट्रिक गाड्या लॉंच होणार आहेत. AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार भारतीय वापरत आहेत पाकिस्तानी हॅकर्स ने बनवलेल्या apps Google Photos चे तीन नवीन फीचर्स येत आहेत