वसंतदादा पाटील माहिती मराठी | Vasantdada Patil Information In Marathi

google-news-icon
जन्म १३ नोव्हेंबर, १९१७
जन्मगाव कोल्हापूर
वडिलांचे नाव बंडूजी पाटील
आईचे नाव रुक्मिणीबाई बंडूजी पाटील
पत्नीचे नाव मालतीबाई पाटील
शालिनीताई पाटील
अपत्ये प्रकाशबाबू पाटील
मृत्यू १ मार्च, १९८९

वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) हे स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी, उत्कृष्ट संघटक आणि शेतकऱ्यांचे नेते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्राला परिचित आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी दीर्घ काळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

वसंतदादा पाटील यांचा परिचय

वसंतदादांचे संपूर्ण नाव वसंतराव बंडूजी पाटील असे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे १३ नोव्हेंबर, १९१७ रोजी झाला. सांगली जिल्ह्यातील पद्माळे हे त्यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात ते जन्माला आले. तो काळ ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नव्हता; त्यामुळे वसंतदादांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंतच होऊ शकले.

वसंतदादा पाटील यांचे कार्य

समाज कार्यकर्त्याचा पिंड

वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांना औपचारिक शिक्षणाचा फारसा लाभ मिळाला नसला तरी त्यावाचून त्यांचे विशेष काही अडले नाही; कारण त्यांचा मूळचा पिंडच खऱ्या कार्यकर्त्याचा होता. त्यांना प्रथमपासूनच सार्वजनिक कार्याची आवड होती. त्यातही विधायक कार्यक्रमांवर त्यांचा अधिक भर असे. राजकारणात उतरण्यापूर्वीही त्यांनी आपल्या पद्माळे या गावात अनेक लोकोपयोगी कामे केली होती. सामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.

स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग

वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांचे ऐन तारुण्यातच स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात सांगली परिसरात काँग्रेसचा प्रचार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले होते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सन १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षाही झाली होती.

लढवय्या स्वातंत्र्यसेनानी

सन १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलन सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात जी भूमिगत चळवळ उभी राहिली त्या चळवळीत वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांचा महत्त्वाचा सहभाग होता. क्रांतिसिंह नाना पाटील, स्वामी रामानंद भारती यांच्या बरोबरीने ग्रामीण भागात भूमिगत चळवळीचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी वाटा उचलला होता. स्वतः भूमिगत राहून या चळवळीचे सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले होते. या वेळी त्यांना पकडून देणाऱ्यास इंग्रज सरकारने दहा हजार रुपयांचे बक्षीस लावले होते.

तथापि, थोड्याच दिवसांत ते पकडले गेले आणि त्यांना सांगलीच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. परंतु वसंतदादा पाटील व त्यांचे काही सहकारी यांनी भरदिवसा तुरुंग फोडून अत्यंत धाडसाने तुरुंगातून पलायन केले. ही बातमी पोलिसांना समजताच त्यांनी पळालेल्या कैद्यांचा पाठलाग सुरू केला. या वेळी झालेल्या गोळीबारात वसंतदादांचे दोन सहकारी मारले गेले. स्वतः दादा पोलिसांची गोळी लागून जखमी झाले; त्यामुळे ते परत पोलिसांच्या हाती लागले. या कृत्याबद्दल त्यांना तेरा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनविण्यात आली. तथापि, १९४६ मध्ये त्यांची तुरुंगवासातून सुटका झाली.

सहकारातून विकास

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वसंतदादा पाटील यांनी आपले लक्ष विधायक कार्याकडे वळविले. सामान्य शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा व्हावी आणि आर्थिक विकासाची फळे त्यांच्या पदरात पडावीत, अशी तळमळ त्यांना लागून राहिली होती. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधणे शक्य होईल, असे त्यांचे मत बनले; त्यामुळे त्यांनी सहकारी चळवळीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांमध्ये सहकाराची जाणीव निर्माण करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न चालविले. सन १९५८ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून सांगली येथे ‘शेतकरी सहकारी साखर कारखान्या‘ची उभारणी केली. देशातील सर्वाधिक गाळपक्षमता असलेला हा साखर कारखाना होय. पुढील काळात वसंतदादांनी सहकारी संस्थांचे विशाल जाळेच निर्माण केले. त्यामध्ये सूत गिरण्या, तेल गिरण्या, पतसंस्था, बँका, गृहनिर्माण संस्था इत्यादी सहकारी संस्थांचा अंतर्भाव होतो.

संघटनकौशल्य

वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांची स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय क्षेत्रातील कामगिरीही अशीच उल्लेखनीय आहे. संघटनकौशल्याबद्दल त्यांची विशेष ख्याती होती. काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. वसंतदादांनी आपल्या संघटनकौशल्याचा उपयोग महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत बनविण्यासाठी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व अध्यक्ष म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. आपल्या अधिकारपदाच्या कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या सर्व विभागांत भक्कम आधार मिळवून दिला. महाराष्ट्राला काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.

राजकीय प्रवास

महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांवर त्यांची अनेक वेळा निवड झाली होती. सन १९८० मध्ये ते लोकसभेतही निवडून गेले होते. १९७२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वसंतदादा पाटबंधारे मंत्री म्हणून सहभागी झाले; पण पुढे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. काही काळ राजकारणापासून अलिप्त राहून विधायक कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

परंतु सन १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने पक्षहिताचा विचार करून ते परत राजकारणाकडे वळले व त्याच वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी त्यांची निवड झाली; पण १९७८ मध्ये त्यांचे मंत्रिमंडळ अल्पमतात गेल्याने त्यांना अधिकारत्याग करावा लागला. तथापि, १९८२ मध्ये परत एकदा ते मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. राजस्थानचे राज्यपाल आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते.

वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, साखर निर्यात मंडळ, राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था इत्यादी अनेक संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. भारत सरकारने ‘पद्मभूषण‘ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता.

मृत्यू – १ मार्च, १९८९.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

पुढील १ ते २ वर्षात टाटाच्या या इलेक्ट्रिक गाड्या लॉंच होणार आहेत. सॅम बहादूर यांची थोडक्यात माहिती AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार vivo v29 specifications marathi