डॉ. जयंत नारळीकर माहिती मराठी | Jayant Naralikar Information in Marathi

google-news-icon

डॉ. जयंत नारळीकर खगोलीय भौतिकीविज्ञ व गणितज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले ते थोर भारतीय वैज्ञानिक होत.

डॉ. जयंत नारळीकर परिचय

डॉ. जयंत नारळीकर यांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर असे आहे. त्यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे रँग्लर होते. ते बनारस हिंदू विद्यापीठ व पुणे विद्यापीठ या ठिकाणी गणित विषयाचे प्राध्यापक होते. अशा प्रकारे जयंत नारळीकरांना गणिताच्या अध्ययनाचा वारसा वडिलांकडूनच लाभला होता.

जयंत नारळीकरांनी सन १९५७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची बी. एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. त्या ठिकाणी केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील ‘ट्रायपास’ परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि ‘रँग्लर’ ही पदवी मिळविली. याशिवाय इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्याही संपादन केल्या.

डॉ. जयंत नारळीकर हे सन १९६३ पासून रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी यांचे फेलो आहेत. तसेच केंब्रिज विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे व संशोधनाचे कार्यही केले आहे.
डॉ. जयंत नारळीकर १९७२ पासून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत खगोलीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत. सन १९७४ मध्ये ते इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो बनले, तर १९७६ मध्ये त्यांना इंडियन नॅशनल सायन्सेस अकॅडमीची फेलोशिप मिळाली.

गुरुत्वाकर्षणाविषयी नवा सिद्धान्त

फ्रेड हॉईल या वैज्ञानिकासमवेत नारळीकरांनी खगोलशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधनकार्य केले आहे. फ्रेड हॉईल व डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या संशोधनाद्वारे गुरुत्वाकर्षणा- विषयीचा नवा सिद्धान्त मांडला. त्यामध्ये त्यांनी अर्न्स्ट मारव यांच्या तत्त्वाला गणितीय रूप देऊन आइनस्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धान्तांशी त्याची सांगड घातली. त्याचप्रमाणे त्यांनी विश्वातील द्रव्याच्या निर्मितीसंबंधी गणितीय विवरण केले.

जडत्व हा वस्तूचा मौलिक गुणधर्म नसून त्याचा विश्वरचनेशी संबंध आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. जयंत नारळीकर व त्यांचे एक सहकारी के. एम. व्ही. अप्पाराव यांनी असे मत मांडले आहे, की विश्वात कृष्ण विवरांप्रमाणेच श्वेत विवरेही अस्तित्वात आहेत आणि ती प्रत्यक्षात विवरे नसून द्रव्य व ऊर्जा यांची उगमस्थाने आहेत. डॉ. नारळीकरांनी विश्वोत्पत्तिशास्त्रातील स्थिर अवस्था उत्पत्तीच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

विविध पारितोषिकांनी सन्मानित

डॉ. जयंत नारळीकर यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पारितोषिके मिळाली आहेत. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना टायसन पदक (सन १९६०), स्मिथ पारितोषिक (सन १९६२) व अॅडम्स पारितोषिक (सन १९६७) देऊन त्यांचा सन्मान केला आहे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने त्यांना सुवर्णपदक बहाल केले आहे.

‘सोसायटी अॅस्ट्रॉनॉमी डे फ्रान्स’ या फ्रान्समधील खगोल शास्त्रविषयक संशोधन संस्थेने सन २००४ चा ‘प्रिन्स-जान्सेन पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला आहे. भारत सरकारने सन १९६५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ तर सन २००४ मध्ये ‘पद्मविभूषण’ हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. डॉ. जयंत नारळीकर हे केवळ संशोधक-शास्त्रज्ञ नाहीत तर अखिल भारतीय समाजाचाच दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ व्हावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे द्रष्टे विचारवंतही आहेत. महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान असणारा हा शास्त्रज्ञ सातत्याने मराठीत लेखन करीत आला आहे आणि मराठी वाचकांना ते भावत आले आहे.

आजही नारळीकरांचे संशोधनकार्य अविरत सुरू आहे. नारळीकरांनी पाया घातलेल्या पुण्यातील ‘आयुका‘ या विज्ञान संस्थेच्या माध्यमातून आज देशातील भावी संशोधक-शास्त्रज्ञांची जडणघडण होत आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहिलेले पुस्तकं

जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये ‘स्ट्रक्चर ऑफ दि युनिव्हर्स’; डेव्हिडसन, टेलर व रुडरमन यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘अॅस्ट्रोफिजिक्स, फ्रेड हॉईल यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘अॅक्शन अॅट ए डिस्टन्स इन फिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी’ हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. खगोलीय भौतिकी, गुरुत्वाकर्षण व विश्वोत्पत्तिशास्त्र या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. महाराष्ट्रीय अभ्यासू-जिज्ञासूंना विश्वाचा परिचय करून देणारा ‘आकाशाशी जडले नाते’ हा त्यांचा अलीकडील ग्रंथ विशेष प्रसिद्धी पावला आहे.

Preshit
हे पुस्तक तुम्ही amazon वरून खरेदी करू शकता त्यासाठी इथे क्लिक करा.

त्यांनी खगोल विषयावर खूप पुस्तके लिहिली आहेत. पण त्यांनी काही सायन्स फिक्शन कथा पण लिहिल्या आहेत. प्रेषित, व्हायरस आणि वामन परत न आला ही त्यांची नावे आहेत. मी ही तिन्ही पुस्तके वाचली आहेत आणि मला प्रेषितआणि वामन परत न आला ही दोन पुस्तके खूप आवडली तुम्हाला जर ही मिळाली तर नक्की वाचा.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment