कुसुमाग्रज माहिती मराठी | Kusumagraj Information in Marathi

google-news-icon

कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर ) हे मराठीतील अग्रेसर कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मराठी साहित्यात त्यांना अतिशय मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘तात्यासाहेब‘ या आदरार्थी नावाने ते सर्वपरिचित आहेत.

परिचय

कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे, त्यांचे मूळ नाव खरे तर, गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते; परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नामकरण विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी, १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. कुसुमाग्रजांनी बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर काही काळ चित्रपटव्यवसायात काढला, त्यानंतर निरनिराळ्या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

कुसुमाग्रजांचे साहित्य

वि. वा. शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज‘ या नावाने काव्यलेखन केले आहे. कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले आहे. सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांनी कठोर प्रहार केले आहेत. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचे ते पुरस्कर्ते असून त्यांच्या ठिकाणी त्यासंबंधीची असलेली जाणीव त्यांच्या काव्यातून जागोजागी प्रकट होते. समाजपरिवर्तनाच्या दिशेने केशवसुतांची कविता जेथवर जाऊन पोहोचली त्यापुढील वाटचाल केली कुसुमाग्रजांच्या कवितेने.

केशवसुतांच्या ‘तुतारी’ने पेटविलेली परिवर्तनाची मशाल कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीच्या जयजयकाराने’ ज्वालामुखीचे रूप झाली. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांच्या काव्यासंबंधी वि. स. खांडेकर म्हणतात, “टिळक जसे फुलामुलांचे कवी होते किंवा गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य प्रणयाचे कवी होते, तसे कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत. आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितांमधून इतर काव्याप्रमाणे नुसता धुमसत नाही, तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.”

क्रांतिप्रवण मनोवृत्ती, ध्येयवाद, संपन्न शब्दकळा आणि भव्योदात्त कल्पनाचित्रे ही कुसुमाग्रजांच्या काव्याची आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांची क्रांतिप्रवण मनोवृत्ती व ध्येयवाद यांचा स्फूर्तिदायक आविष्कार त्यांच्या अनेक कवितांमधून होतो. आपल्या ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितेत क्रांतिकारकांचा ध्येयवाद व त्यासंबंधीची त्यांची मनोधारणा व्यक्त करताना कुसुमाग्रज म्हणतात –

“पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे व कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार. “

किंवा ‘कोलंबसाचे गर्वगीत’ मधील खवळलेल्या सागरालाही तुच्छ लेखून त्याच्यावर मात करण्याची जिद्द बाळगणाऱ्या कोलंबसाच्या तोंडी कुसुमाग्रजांनी घातलेले हे शब्द पाहा-

“मार्ग आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकूनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गवनि वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!”

कुसुमाग्रजांचा ‘जीवनलहरी’ हा पहिला काव्यसंग्रह सन १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर जाईचा कुंज, विशाखा, समिधा, किनारा, मेघदूत, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, छंदोमयी यांसारखे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह त्यांनी मराठी सारस्वतास अर्पण केले. त्यांच्या मराठी माती, स्वगत, हिमरेषा या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले आहेत.

शिरवाडकरांनी नाटककार म्हणूनही प्रचंड यश मिळविले आहे. दूरचे दिवे, वैजयंती, दुसरा पेशवा, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, बेकेट, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटके होत. यांपैकी ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘नटसम्राट’ हे शिरवाडकरांचे अत्यंत गाजलेले व सर्वांत यशस्वी नाटक होय. या नाटकात त्यांनी काव्यात्मकतेची आणि नाट्यात्मकतेची अत्युच्च पातळी गाठली आहे.

गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’ नंतरची मराठी रंगभूमीवरील सर्वश्रेष्ठ शोकांतिका, अशा शब्दांत ‘नटसम्राट’ चा गौरव केला जातो. या नाटकाला १९७४ चा साहित्य अकादमी पुरस्कारही लाभला होता. याच नाटकावर आधारित नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला नटसम्राट याच नावाने एक चित्रपट पण आला होता. तो खूप गाजला पण होता. जवळपास ४० कोटीची कमाई त्या चित्रपटाने केली होती.

वि. वा. शिरवाडकरांनी वैष्णव, जान्हवी व कल्पनेच्या तीरावर या तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्या, त्यांतील विषय व मांडणी यांच्या वेगळेपणामुळे उल्लेखनीय ठरल्या आहेत. याशिवाय शिरवाडकरांनी काही लघुकथा, लघुनिबंध, एकांकिका असे लेखनही केले आहे. कालिदासाच्या ‘मेघदूता’चा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

१० मार्च, १९९९ रोजी या कविश्रेष्ठाचे नाशिक येथे निधन झाले.

कुसुमाग्रजांचा मान-सन्मान

कुसुमाग्रजांना आतापर्यंत अनेक मानसन्मान मिळाले आहेत. १९६४ मध्ये मडगाव गोवा येथे भरलेल्या पंचेचाळिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७० मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनीच भूषविले होते. ‘गडकरी पारितोषिका’चे ते पहिले मानकरी होत. त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरीचा गौरव म्हणून १९८७ चा म्हणजे तेविसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनाच प्रदान केला गेला.

१९८९ मध्ये मुंबई येथे भरलेली पहिली जागतिक मराठी परिषद त्यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पुणे विद्यापीठानेही डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करून त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ ही ते मानकरी ठरले आहेत.

कविवर्यांच्या साहित्य सेवेप्रती आदरभाव – कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून केंद्र सरकारद्वारा १४ मार्च, २००३ रोजी कविवर्य कुसुमाग्रज स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन केले गेले. अशा प्रकारे पोस्ट-तिकीट प्रकाशित केले गेलेले ते पहिलेच महाराष्ट्रीय कविश्रेष्ठ होत.

‘२७ फेब्रुवारी’ हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जागतिक मराठी अकादमीने ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून घोषित करून त्यांच्या साहित्यिक कार्याचा यथोचित गौरव तर केला आहेच पण त्यांची स्मृतीही जतन केली आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment