न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे थोर विचारवंत, राजकीय नेते, सनदशीर राजकारणाचे आग्रही पुरस्कर्ते, समाजकार्यकर्ते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात- देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.
नाव | महादेव गोविंद रानडे |
उपाधी | न्यायमूर्ती |
जन्म | १८ जानेवारी, १८४२ |
जन्मगाव | निफाड, नाशिक जिल्हा |
वडील | गोविंद रानडे |
पत्नी | रमाबाई रानडे |
मृत्यू | १६ जानेवारी १९०१ |
मुद्दे
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा परिचय
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी, १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईच्याच एल्फिन्स्टन कॉलेजात आपले नाव दाखल केले. सन १८६२ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८६४ मध्ये इतिहास हा विषय घेऊन एम. ए. ची पदवी त्यांनी संपादन केली. या परीक्षेतही त्यांनी प्रथम वर्ग मिळविला. १८६६ मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले.
मुंबई विद्यापीठाचे ‘पहिले भारतीय फेलो‘ म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची निवड झाली होती. त्यानंतर काही दिवस त्यांनी अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी आणि कोल्हापूर संस्थानचे दिवाण म्हणून काम पाहिले. १८६८ मध्ये त्यांची मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात इंग्रजी व इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे मुंबई सरकारने १८७१ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. मुंबई इलाख्याचा गर्व्हनर लॉर्ड रे याने १८८५ मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. १८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ सरकारी नोकरी करण्यात घालविला. तथापि, सरकारी नोकरीत असतानाही त्यांनी अनेक सार्वजनिक संस्थांशी संबंध ठेवला होता. न्या. रानडे हिंदू लोकांच्या बुद्धिमत्तेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सन १८८५ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही रानडे यांचा उल्लेख केला जातो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या कालखंडातील त्या संघटनेचे एक प्रमुख नेते म्हणून ते मान्यता पावले होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे राजकीय विचार
राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी यांच्याप्रमाणे रानडे यांचीही अशी धारणा होती की, भारतात इंग्रजी सत्तेची झालेली स्थापना हा ईश्वरनियोजनाचाच एक भाग आहे. इंग्रजी सत्ता म्हणजे भारताला लाभलेले ईश्वरी वरदानच होय, असे ते समजत असत. इंग्रजांनी भारतात नव्या शिक्षणपद्धतीचा पाया घातला; त्यांनी अनेक नव्या व आधुनिक संकल्पना भारतात आणल्या; भारतीय जनतेला आधुनिक ज्ञान व विज्ञान यांचा परिचय इंग्रजांनीच करून दिला. इंग्रजी सत्तेच्या या योगदानामुळे भारतीय समाजात आधुनिकतेचे वारे वाहू लागले आणि भारतात प्रबोधनाचे नवे युग सुरू झाले, असे त्यांनी म्हटले होते.
रानडे यांचा इंग्रज राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर व प्रामाणिकपणावर विश्वास होता. इंग्रजांनी भारतीय लोकांना आत्मविकासाच्या संधी विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. यापुढेही भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. तेव्हा इंग्रजी सत्तेच्या अमलाखाली भारतीय जनतेचा फायदाच होईल, असे त्यांचे मत होते.
भारतात सनदशीर राजकारणाचा पाया
न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यांच्या सनदशीर राजकारणाचा आधार, त्यांचा ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर व प्रामाणिकपणावर असलेला विश्वास हा होता. ब्रिटिश साम्राज्यात राहूनच भारतीय लोकांना आपली उन्नती साधता येईल. त्याकरिता सनदशीर व घटनात्मक मार्गांनी आपण आपल्या अडीअडचणी राज्यकर्त्यांच्या कानावर घालण्याचे प्रयत्न करावेत. इंग्रज राज्यकर्ते आपल्या न्याय्य मागण्यांची निश्चितच दखल घेतील, असे त्यांना वाटत होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर उदारमतवादाचा प्रभाव असल्यामुळेही त्यांनी घटनात्मक व सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला होता.
हिंदी अर्थकारणाचा पाया
हिंदी अर्थकारणाचा व हिंदी औद्योगिक उन्नतीच्या चळवळीचा पाया घालण्याचे श्रेयही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनाच दिले जाते. त्यांनी हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली; स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले आणि सार्वजनिक काकांच्या मदतीने स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रयत्न केले.
रानडे यांनी भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याची कारणे आणि ते दूर करण्याचे उपाय यांसंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले. भारतात शेतीव्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रचंड प्रमाण, त्यामुळे शेतीव्यवसायावर पडलेला अतिरिक्त ताण, निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेली शेती, देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास, शेती व नवे उद्योगधंदे यांत गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा अभाव, लोकसंख्येत होत असलेली प्रचंड वाढ, भारतीयांमधील उपक्रमशीलतेचा अभाव, ही भारताच्या आर्थिक दुरवस्थेची आणि येथील दारिद्र्याची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. भारतीय अर्थव्यवहाराला चालना देण्यासाठी आणि त्यास योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी राज्यानेच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.
- स्वामी विवेकानंद माहिती मराठी | Swami Vivekanand Information Marathi
- राजा राममोहन रॉय माहिती मराठी | Raja Rammohan Roy Information in Marathi
- संत तुकाराम माहिती मराठी | Sant Tukaram Information in Marathi
- संत ज्ञानेश्वर माहिती मराठी | Sant Dnyaneshwar Information in Marathi
रानडे यांचे समाजसुधारणेबाबतचे विचार
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी भरीव स्वरूपाची कामगिरी बजाविली आहे. समाजसुधारणेच्या चळवळीसंबंधात रानडे यांनी अव्वल इंग्रजी अमदानीतील दुसऱ्या पिढीचे नेतृत्व केले होते. त्यांचे या संबंधातील महत्त्वाचे कार्य असे की, त्यांनी समाज- सुधारणेचे निश्चित असे तत्त्वज्ञान उभे केले आणि लेख लिहून, व्याख्याने देऊन, चर्चा करून व विविध संस्था उभारून समाजसुधारणेच्या चळवळीला संघटित व प्रतिष्ठित रूप प्राप्त करून दिले.
मानवाची प्रतिष्ठा उंचावणे गरजेचे
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटले होते की, मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजसुधारणेची सुरुवात होय. तथापि, तेच या चळवळीचे अंतिम उद्दिष्टही असले पाहिजे. मानवी शक्तीचे उज्जीवन करून मानवाला पूर्णत्व प्राप्त करून देणे, हेच आमच्या या कार्याचे अंतिम उद्दिष्ट आहे. आपल्या समाजात संकुचित वृत्ती, जातिभेद, उच्चनीचता, ऐहिक जीवनाविषयीची उदासीनता यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणावर अवनती झाली आहे. तेव्हा हे दोष प्रयत्नपूर्वक दूर करूनच आपल्या समाजाची उन्नती घडवून आणता येईल.
समाजजीवनाचा साकल्याने विचार
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी समाजसुधारणेच्या बाबतीत महाराष्ट्राला एक महत्त्वाचा विचार शिकविला तो असा की, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण व समाजकारण ही समाजाची भिन्न भिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध अशी आहेत. यांपैकी कोणत्याही एका अंगाचा स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही किंवा त्यास इतर अंगांपासून वेगळे करून त्याचा एकट्याचा विकास घडवून आणता येणार नाही; म्हणून समाजजीवनाचा साकल्याने विचार केला पाहिजे. राजकारणाला समाजसुधारणेपासून वेगळे करणे पूर्णपणे अशक्य आहे. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणावयाची असेल तर सामाजिक सुधारणेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
शुद्ध बुद्धिप्रामाण्य
समाजसुधारणेबाबतचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे विचार शुद्ध बुद्धिप्रामाण्यावर आधारित होते, असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांत बुद्धिप्रामाण्याऐवजी दया, न्याय, परोपकार इत्यादी भावना प्रधान होत्या. त्यांच्या मनावर जुन्या परंपरांचाही मोठा पगडा होता. तसेच भारताच्या प्राचीन इतिहासाचा त्यांना अभिमान होता. हिंदू धर्मातील चांगल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करून समाजसुधारणा घडवून आणता येईल; कारण हिंदू धर्मात शिरलेले दोष किंवा निर्माण झालेल्या अनिष्ट प्रथा नंतरच्या काळातील आहेत. त्यांना कोणत्याही धर्मग्रंथांचा आधार नाही, असे त्यांचे मत होते. म्हणूनच आपल्या सुधारणांविषयीच्या विचारांसाठी ते अनुकूल शास्त्रवचनांचे प्रमाण नेहमी देत असत.
संस्थात्मक जीवनाचा पाया
समाजसुधारणेच्या क्षेत्रात रानडे यांनी बजावलेली आणखी एक महत्त्वाची कामगिरी अशी की, त्यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. महाराष्ट्राच्या संस्थात्मक जीवनाची उत्कृष्ट गुंफण करण्याचे श्रेय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनाच दिले जाते. समाजसुधारणेचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक सामाजिक संस्था स्थापन केल्या. या संस्थांद्वारे सामान्य जनतेचे प्रबोधन करण्याचे आणि समाजसुधारणेच्या कार्याला पोषक वातावरण तयार करण्याचे कार्य त्यांनी दीर्घकाळ केले. यांपैकी काही महत्त्वाच्या संस्था पुढीलप्रमाणे होत-
प्रार्थना समाज
३१ मार्च, १८६७ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, डॉ. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. हा समाज सुरुवातीस ‘एकेश्वर उपासक मंडळी’ या नावाने ओळखला जात असे.
या समाजाची प्रमुख तत्त्वे पुढीलप्रमाणे होती-
- ईश्वर एकच आहे; तो निराकार आहे व तोच या विश्वाचा निर्माता आहे.
- सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे मार्ग होत.
- प्रार्थनेच्या मार्गाने ईश्वराची उपासना करता येते; पण प्रार्थनेने भौतिक फलाची प्राप्ती होत नाही. प्रार्थना ही फक्त आत्मिक उन्नतीसाठीच करावयाची आहे.
- मूर्तिपूजा हा परमेश्वराच्या उपासनेचा त्याज्य मार्ग होय.
- सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत; म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र यावे; इत्यादी.
हिंदू धर्मातील दोषांवर प्रार्थना समाजाच्या अनुयायांनी टीका केली असली तरी हिंदू धर्मापासून बाजूला होणे मात्र त्यांना मान्य नव्हते. हिंदू धर्मात राहूनच त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करणे, या उद्देशाने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती.
सार्वजनिक सभा
सार्वजनिक सभेची स्थापना २ एप्रिल, १८७० रोजी पुणे येथे झाली. तथापि, न्या. रानडे यांचा या संस्थेशी संबंध आल्यापासूनच म्हणजे १८७१ पासून तिला खरे महत्त्व प्राप्त झाले. रानडे यांनी सार्वजनिक काकांच्या मदतीने सार्वजनिक सभेला राजकीय संस्थेचे स्वरूप प्राप्त करून दिले आणि तिच्यामार्फत लोकहिताची अनेक कामे पार पाडली.
भारतीय सामाजिक परिषद
सामाजिक प्रश्नांना अग्रक्रम देऊन समाजसुधारणेचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदे‘ची स्थापना केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १८८७ च्या तिसऱ्या अधिवेशनात सामाजिक परिषद पहिल्यांदा भरविण्यात आली. काँग्रेस अधिवेशनाच्या मंडपातच तिचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसने राजकीय प्रश्नांबरोबरच सामाजिक प्रश्नांतही लक्ष घालावे, असा विचार तिच्या अध्वर्यूनी मांडला होता. सुरुवातीची काही वर्षे काँग्रेसच्या अधिवेशनाच्या मंडपातच सामाजिक परिषदा भरविल्या जात होत्या; परंतु १८९५ च्या काँग्रेसच्या पुणे अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद भरविण्यास काही मंडळींनी जोरदार विरोध केला. त्या वेळेपासून सामाजिक परिषदेचे वेगळे आयोजन केले जाऊ लागले. सामाजिक परिषदांच्या आयोजनात रानडे यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.
अनेक संस्थांशी निगडित
याखेरीज रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा, नेटिव्ह जनरल लायब्ररी, फिमेल हायस्कूल, वसंत व्याख्यानमाला इत्यादी अनेक संस्थांच्या स्थापनेत भाग घेतला होता. ‘इंडस्ट्रिअल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ च्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. या संघटनेच्या वतीने हिंदुस्थानच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदा भरविण्यात आल्या होत्या.
संमतिवय विधेयकास पाठिंबा
रानडे यांनी अनेक सामाजिक सुधारणांना उघड पाठिंबा दिला होता. ते विधवा- विवाहाचे पुरस्कर्ते होते. मुंबईत १८६५ मध्ये स्थापन झालेल्या ‘विधवाविवाह उत्तेजक मंडळा‘चे ते एक प्रमुख सभासद होते. संमती वय विधेयकालाही त्यांनी पाठिंबा दर्शविला होता.
न्या. रानडे यांचा इतिहासाचाही मोठा व्यासंग होता. त्यांनी ‘मराठी सत्तेचा उदय‘ (Rise of the Maratha Power) हा ग्रंथ लिहून इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या विश्लेषणात्मक दृष्टीचा प्रत्यय आणून दिला होता.
मृत्यू – १६ जानेवारी, १९०१ रोजी मुंबई येथे.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कधी झाला?
१८ जानेवारी, १८४२ या दिवशी त्यांचा जन्म झाला.
रानडे यांनी कोणत्या प्रथेचे समर्थन केले?
त्यांनी विधवा पुनर्विवाह चा पुरस्कार केला.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!