संत तुकाराम माहिती मराठी | Sant Tukaram Information in Marathi

google-news-icon
संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले
जन्म २१ जानेवारी १६०८
जन्मगाव देहू
वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले
आईचे नाव कनकाई अंबिले
पत्नीचे नाव रखुमाबाई, जिजाबाई
अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
रचना तुकारामांचे अभंग-सुमारे पाच हजार अभंग

संतांच्या सर्व लक्षणांनी युक्त

संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्याचा झगमगता कळस म्हणजे संत तुकाराम होत. संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून जागोजागी संतांच्या लक्षणांचे विवेचन केले आहे. जसे-

"जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले || 
तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा || "

किंवा

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । 
देह कष्टविती उपकारें ।। 
भूतांची दया हे भांडवल संतां । 
आपली ममता नाहीं देहीं ।'

किंवा

"संताचिया गावीं प्रेमाचा सुकाळ । 
नाहीं तळमळ दुःख लेश ||"

संतांची वरील सर्व लक्षणे स्वतः तुकारामांनाच सर्वार्थाने लागू पडतात. त्यांनीच आणखी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे ‘तुका म्हणे देही। संत जाहले विदेही ।’ देही राहून विदेही होण्याची किमया त्यांना साधली होती; म्हणूनच अवघ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात संत तुकारामांना अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.

संत तुकाराम यांचा परिचय

संत तुकारामांचा जन्म शके १५२० मध्ये (इ. स. १५९८) देहू या गावी झाला. (काही- जण त्यांचा जन्म शके १५३० मध्ये झाला असे मानतात.) तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते. त्यांची कुळी मोऱ्यांची असून आडनाव अंबिले असे होते. तुकारामांचे घराणे हे मराठा जातीचे होते. म्हणजे एका अर्थाने ते क्षत्रियच होते. तथापि, स्वतः तुकारामांनी आपल्या जातीचा उल्लेख कुणबी असा केला आहे आणि आपण शूद्र वर्णाचे आहोत, असे म्हटले आहे.

तुकारामांचे वाडवडील देहू गावचे महाजन होते. त्यांचा व्यवसाय वैश्याचा म्हणजे व्यापार-उदिमाचा होता. या घराण्यात विठ्ठलभक्ती पूर्वापार चालत आलेली होती. तुकारामांचे बालपण आई-वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली मोठ्या सुखात व्यतीत झाले. बालवयातच त्यांच्या ठायी बहुश्रुतपणा आला असल्याचे पाहावयास मिळते. तथापि, पुढील काळात मात्र त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्यावरील माता-पित्याचे छत्र हरपले.

त्यापाठोपाठ मोठा भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थयात्रेस निघून गेला; त्यामुळे संसाराचा सर्व भार त्यांच्यावरच पडला. तशातच त्यांना व्यापारात तोटा होऊ लागला. दुकानाचे दिवाळे निघण्याची पाळी आली. पुढे दुष्काळात गुरेढोरे गेली, धनद्रव्यही गेले. अशा प्रकारे संसारी जीवनात त्यांना अनेकविध आपत्तींशी मुकाबला करावा लागला. परिणामी, तुकोबा विरक्तीकडे झुकले आणि संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. त्यांना अध्यात्माची व एकांतवासाची ओढ लागली. आता ईश्वरचिंतनातच ते रममाण झाले.

शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले.

संत तुकारामांची अभंगरचना

संत तुकारामांनी खूप मोठ्या संख्येने अभंगरचना केली असून हे अभंग त्यांच्या गाथेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्या अभंगांची संख्या सुमारे पाच हजार इतकी भरते. तुकोबांचे अभंग म्हणजे मराठी काव्याचे शाश्वत भूषणच होय. त्यांचे अनुभवविश्व अतिशय मोठे होते आणि त्यांना असामान्य प्रतिभेची देणगी लाभली होती. त्याचे प्रत्यंतर आपणास त्यांच्या अभंगांद्वारे येते.

त्यांची अभंगवाणी आजही प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत जाऊन भिडते; कारण ती त्यांच्या सर्वस्पर्शी अशा जीवन अनुभवांतून जन्माला आली आहे. मोठमोठ्या विद्वानांपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनास भुरळ पडावी अशा सुभाषितवजा पंक्ती त्यांच्या अभंगांत जागोजागी विखुरलेल्या आहेत. उदाहरणादाखल पुढील काही अभंगपंक्तीचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो.

पराविद्या नारी माऊली समान । परधनी वाटो नेदी मन।
भिक्षापात्र अवलंबिणें । जळो जिणे लाजिरवाणें ।
आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भार घालोनियां ।
महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ।
तुश म्हणे तोचि संत । सोशी जगाचे आघात ।
सुख पाहतां जवापाडे । दुःख पर्वताएवढे । 
निश्वयाचे वळ । तुका म्हणे तेंचि फळ ।
ऐसी कळवळ्याची जाति । करी लाभाविण प्रीति । 
साधुसंत येती घरां । तोचि दिवाळी दसरा ।
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसती ।
शुद्ध बीजापोटीं । फळे रसाळ गोमटी ।

संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून शुद्ध-परमार्थ धर्माची शिकवण दिली. त्यांनी स्वतः भक्तिमार्गाची कास धरली आणि नामस्मरण व सत्संग या दोन साधनांवर विशेष भर दिला. सगुण-निर्गुण हे एकाच आध्यात्मिक साक्षात्काराचे पैलू आहेत; वासना संपूर्ण विलीन होऊन पूर्ण व अविचल स्थिती अनुभवणे हे त्या साक्षात्काराचे फलित होय, असे त्यांचे सांगणे होते.

सामाजिक दांभिकतेवर कोरडे

तुकारामांच्या विचारांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सामाजिक अधिष्ठान लाभले होते. धर्माचे पालन करून पाखंड खंडन करणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले. कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता ते सामाजिक दांभिकतेवर त्वेषाने तुटून पडतात. अशा वेळी त्यांच्या वाणीला एक वेगळीच धार चढल्याचे आपणास पाहावयास मिळते. पढीक पंडित, ढोंगी साधू, लोभी भिक्षेकरी इत्यादी सर्वांचा त्यांनी आपल्या वाङ्मयातून कडक समाचार घेतला आहे. तथापि, त्यांच्या टीकेचा मुख्य रोख दंभ व भक्तिहीन पांडित्य यावर आहे.

‘तुका झालासे कळस ।’

संत तुकारामांनी सर्व प्रकारच्या सामाजिक भेदभावांना विरोध केला आहे. सामाजिक विषमतेचे शल्य या ना त्या रूपाने त्यांच्या वाङ्मयात प्रगट झाल्यावाचून राहत नाही. त्यांनी जातपात व उच्चनीच भेदभाव नाकारले आणि त्यांस पोटतिडिकेने विरोध केला. “दया करणें जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।” अशा व्यापक मानवतावादी भूमिकेचा पुरस्कार करणारे संत तुकाराम खऱ्या अर्थाने संतपदी पोहोचले होते, असे म्हणावे लागते.

बहुजन समाजातील सर्वसामान्य व्यक्तींचे रागद्वेष आणि आशा-आकांक्षा त्यांनी आत्मीयतेने बोलून दाखविल्या. रूढ संस्कार व स्वतंत्र प्रेरणा यांच्यामधील झगडा संत तुकारामांच्या मनात सतत चालू होता. त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश हा या झगड्याचाच परिपाक होय.

प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या भागवत धर्माचा ज्ञानेश्वरांनी पाया रचला त्याचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांना लाभले; म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात-

'संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥  
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया || 
नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार || 
जनार्दन एकनाथ | ध्वज उभारिला भागवत ॥ 
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।"

संत तुकारामांचे अभंग

मुखें संगे ब्रम्हज्ञान | जन लोकची कापितो मान ||१||
ज्ञान सांगतो जनासी | नाही अनुभव आपणासी ||२||
कथा करितो देवाची | अंतरी आशा बहू लोभाची ||३||
तुका म्हणे तोचि | त्याचे हाणूनि थोबाड फोडा ||४||
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें | पक्षीही सुस्वरे आळविती ||१||
येणें सुख रुचे एकांताचा वास | नाहीं गुण दोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथ्वीची आसन | रमे तेथें मन क्रीडा करी ||३||
कुंथाकुमंडल देह ऊपचारा | जाणवितो वारा अवसरू ||४||
हरीकथा भोजन परवडी विस्तार | करोनि प्रकार सेवूं रुचि ||५||
तुका म्हणे होय मानसी संवाद | आपुलाचि वाद आपणांस ||६||
लांबवूनि जटा नेसोनि कासोटा | अभिमान मोटा करिताति  ||१||
सर्वांगा करीती विभूतिलेपन | पाहाती मिष्टान्न भक्षावया ||२||
तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म | न कळतां वर्म मिथ्यावाद ||३||
होउनि संन्यासी भगवीं लुगडी | वासना न सोंडी विषयांची  ||१||
निंदिती कदान्न इच्छितो देवान्न | पाहाताती मान आदराचा ||२||
तुका म्हणे ऐसें दांभिक भजन | तया जनार्दन भेटे केवीं ||३||
कान फाडूनियां मुद्रा ते घालिती | नाथ म्हणविती जगामाजी  ||१||
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी | परी शंकरासी नोळखती ||२||
पोट भरावया शिकती उपाय | तुका म्हणे जाय नरकलोका ||३||
कौडीकौडीसाटीं फोडीताती शिर | काढूनि रुधिर मलंग ते  ||१||
पांघरति चर्म लोहाची सांकळी | मारिती आरोळी धैर्यबळें ||२||
तुका म्हणे त्यांचा नव्हेचि स्वधर्म | न कळेचि वर्म गोविंदाचे ||३||
दाढी डोई मुंडीनियां सर्व | पांघुरती बरवें वस्त्र कळें ||१||
उफारटी काठी घेउनियां हातीं | उपदेश देती सर्वत्रांसी ||२||
चाळवुनि रांडा देऊनियां भेष | तुका म्हणे त्यास यम दंडि ||३||
होउनि जंगम विभूति लाविती | शंख वाजविती घरोघरी ||१||
शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती | घंटा वाजविती पोटासाठी ||२||
तुका म्हणे त्यांसी नाही शिवभक्ती | व्यापार करीती संसाराचा ||३||
लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठी | हिंडे पोटासाठी देशोदेशीं ||१||
नेसोनि कौपीन शुभवर्ण जाण | पाहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ||२||
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद | त्यांपाशी गोविंद नाहीं नाहीं ||३||
ऐसे नाना भेष होऊनि हिंडती | पोटासाटीं घेती प्रतिग्रह ||१||
परमर्थासी कोण त्यजी संवसार | सांग पां साचार नांव त्याचें ||२||
जन्मता संवसार त्यजियेला शुकें | तोची निष्कळंक तुका म्हणे ||३||
स्त्रिया पुत्र कळत्र हे तंव मायावंत | शेवटींचा अंत नाहीं कोणी ||१||
यमाचिये हातीं बंधोनियां देती | भूषणेंही घेती काढूनियां ||२||
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास | धरिली तुझी कास तुका म्हणे ||३||
कास = पांडुरंगा
तन मन धन दिलें पंढरियया | आतां सांगवाया उरलें नाहीं ||१||
अर्थचाड चिंता नाहीं मनी आशा | तोडियेला फांसा उपाधीचा ||२||
तुका म्हणे एक विठोबाचे नाम | आहे जावळी दाम नाहीं रुका ||३||
अर्थचाड = आर्त
आलिया संसारा उठा वेग करा | शरण जा उदारा पांडुरंगा ||१||
देह हे देवांचे धन कुबेरांचे | तेथें मनुष्यांचे काय आहें ||२||
देता देवविता नेता नेववित | येथें याची सत्ता काय आहे ||३||
निमित्याचा धनी केला असे प्राणी | माझेंमाझें म्हणोनि व्यर्थ गेला ||४||
तुका म्हणे कां रे नाथवंतासाटीं | देवासवें आटी पाडीतोसी ||५||
देवाचे = कुबेराचे
संतचिन्हें लेउनि अंगीं | भूषण मिरविती जगीं ||१||
पडिले दु:खाचे सागरीं | वहावले ते भवपुरीं ||२||
कामक्रोधलोभ चित्तीं | वरिवरि दविती विरक्ती ||३||
आशा पाशीं बंधोनि चित्त | म्हणती जालों आम्ही मुक्त ||४||
त्यांचे लागले संगती | आली त्यांची तेचि गति ||५||
तुका म्हणे शब्दज्ञानें | जग नाडीयेलें तेणे ||६||
वरिवरि = वरि दविती
भगवें तरीं श्वान सहज वेष त्याचा | तेथे अनुभवाचा काय पंथ ||१||
वाढवुनि जटा फिरे दाही दिशा | तरी जंबु वेषा सहज स्थिति ||२||
कोरोनियां भूमी करीती मधीं वास | तरी उंदरास काय वाणी ||३||
तुका म्हणे ऐसें कासया करावें | देहासी दंडावें वाउगेंचि ||४||
लांब लांब जटा काय वाढवूनि | पावडें घेऊनि क्रोधें चाले ||१||
खायचा वेळसा शिव्या दे जनाला | ऐशा तापशाला बोध कैंचा ||२||
सेवी भांग अफू तंबाखू उदंड | परी तो अखंड भ्रांतीमाजी ||३||
तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला | त्यासी अंतरला पांडुरंग ||४||
नव्हे जाखाई जोखाई | मायराणी मेसाबाई ||१||
बळिया माझा पंढरिराव | जो या देवांचाही देव ||२||
रंडी चंडी शक्ति | मद्य मांसाते भक्षिती||३||
बहिरव खंडेराव | रोटी सुटीसाटी देव ||४||
गणोबा विक्राळा | लाडू मोदकांचा काळ ||५||
मुंजा म्हैसासुरें | तों कोण लेखीं पोरें ||६||
वेताळें फेताळें | जळो त्यांचें तोंड काळें ||७||
तुका म्हणें चित्ती | घरा रखुमाईचा पती ||४||
बहिरव = भैरव
तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी ||१||
मिळालिया संतसंग | समर्पितां भलें अंग  ||२||
तीर्थी भाव फळे | येथें आनाड तें वळे||३||
तुका म्हणे पाप | गेलें गेल्या कळे ताप ||४||

संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय?

त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले हे आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

Happy Diwali Images 2023 | Happy Diwali Wishes 2023 Nasa New Streaming App: मोबाईलमध्ये पहा मोफत सिरीज! सॅम बहादूर यांची थोडक्यात माहिती AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार