संत ज्ञानेश्वर माहिती मराठी | Sant Dnyaneshwar Information in Marathi

google-news-icon
नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म श्रावण कृ.अष्टमी, शा.शके ११९७ इ स १२७५
जन्मगाव आपेगाव
वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी
आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी
भाऊबहीण निवृत्तिनाथ
सोपानदेव
मुक्ताबाई
गुरु संत निवृत्तीनाथ
ग्रंथ भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी
अमृतानुभव
समाधी इसवी सन १२१८ आळंदी येथे

‘आता विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञे तोषावें । तोषोनी मज द्यावें । पसायदान हें ॥ “

किंवा

“हे विश्वची माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाला ॥’

संत ज्ञानेश्वर यांचा परिचय

“या साध्या सोप्या शब्दांत ‘कोऽअहम् ..सोऽअहम्’ किंवा ‘अहम् ब्रह्मास्मि’ अथवा ‘तत् त्वम् असि” या वेदवाक्यांचा भावार्थ सांगून अद्वैताचा सिद्धान्त सामान्य जनांपर्यंत पोहोचवून वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारा महान संत, ” या शब्दांत संत ज्ञानेश्वर यांचे वर्णन करता येईल. अशा या संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके ११९७ (इ. स. १२७५) मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

विठ्ठलपंतांचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. त्यांना निवृत्तिनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई अशी आणखी तीन मुले होती. विठ्ठलपंतांनी ऐन तारुण्यातच संन्यास घेतला होता. तथापि, आपल्या गुरूच्या उपदेशावरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या चारही अपत्यांचा जन्म झाला; त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांनी या कुटुंबाला वाळीत टाकले. परिणामी, ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांना अत्यंत कष्टप्रद व उपेक्षेचे जीवन जगावे लागले. त्यांना मोठ्या प्रमाणावर अवहेलना सहन करावी लागली.

संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले ग्रंथ

संत ज्ञानेश्वर यांनी शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवद्गीतेवरील टीका लिहिली. याखेरीज अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगांची गाथा अशी ग्रंथरचनाही केली आहे.

ज्ञानेश्वरी- गीतेवरील श्रेष्ठ टीका

ज्ञानेश्वरी‘ किंवा ‘भावार्थदीपिका‘ हा मराठी साहित्यातील अजोड ग्रंथ होय. मराठी साहित्याचे ते अजरामर लेणे ठरले आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील अठरा अध्याय व त्यांतील सातशे श्लोक यांवर त्यांचा क्रम कायम ठेवून नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली. रा. द. रानडे यांनी या ग्रंथाविषयी असे म्हटले आहे की, ‘भगवद्गीतेवर आजपर्यंत झालेल्या सर्व टीकांमध्ये ज्ञानेश्वरी ही सर्वश्रेष्ठ टीका होय’.

संत ज्ञानेश्वर हे गीतेवरील श्रेष्ठ भाष्यकार होते. त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम झाला होता. त्यांनी गीतेला मराठी भाषेचे सुंदर लेणे चढवून मराठी भाषिकांना तत्त्वज्ञानाचा एक महान ग्रंथ उपलब्ध करून दिला. आतापर्यंत संस्कृत अवगुंठित असलेले अध्यात्मज्ञान मराठीत आणून संत ज्ञानेश्वरांनी मोक्षांची द्वारे सर्वसामान्य जनतेलाही खुली केली. हे त्यांचे महान कार्य होय.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीबद्ध टीकेत गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यांचे विस्तृत विवेचन केले आहे. गीतेत या सर्वांचा सुरेख मेळ घातला गेला आहे. ज्ञानेश्वरांनी समन्वयाची भूमिका स्वीकारून ज्ञानेश्वरीत या सर्वांचे गुणग्राही विवेचन केले आहे. त्यांनी ‘सर्वांभूती समानता’ व ‘ज्ञानयुक्त भक्ती’ यांची शिकवण दिली. सगुण भक्तीला ‘अद्वैत’ तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून देताना आणि ‘अहम् ब्रह्मास्मि’ किंवा ‘तत् त्वम् असि’ या वेदवाक्यांचा भावार्थ सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात,

“हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाला || “

त्यांची अंतिम निष्ठा ज्ञानरूप भक्ती ही आहे. अद्वैतानुभूतीतही भक्ती व कर्म यांना स्थान आहे, असे त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर यांची वाङ्मयसंपदा

ग. श्री. हुपरीकर यांनी ज्ञानेश्वरीविषयी असे म्हटले आहे की, “ज्ञानेश्वरी हे तत्त्वज्ञान व काव्य या दोन भिन्न रंगांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी विणलेले व दोन भिन्न रंगांची मधूनमधून झाक दाखविणारे भरजरी वस्त्र आहे.”

संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे महत्त्व स्पष्ट करताना शं. दा. पेंडसे म्हणतात, “ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे महत्त्व नैमित्तिक नाही. ते राजकारणनिरपेक्ष असे स्वतंत्र वि सनातन महत्त्व आहे. भक्तीच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील धार्मिक व सामाजिक विषमता नष्ट व्हावी, ‘याचि देही याचि डोळा’ नराचा नारायण होण्याचा आपणास अधिकार आहे हे सर्वांना कळावे, त्याकरिता अध्यात्माचे आणि मोक्षाचे ज्ञान सर्व मुमुक्षूंना त्यांच्या मराठी भाषेत घेता यावे, त्यांच्या चित्ताला शांती, आनंद प्राप्त व्हावा आणि आपली सर्व कर्तव्यकर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हीच खरी भक्ती व खरा यज्ञ आहे हे त्यांस सांगावे, हेच ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयसंपदेचे प्रधान प्रयोजन आहे.’

भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना

संत ज्ञानेश्वरांनी सांप्रदायिकतेचा स्वीकार न करता अद्वैत आणि भक्ती, वैराग्य आणि प्रापंचिकता, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा संगम घडवून आणला, त्यायोगे त्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनात एक अपूर्व क्रांतीच घडवून आणली. द्वैतमूलक भक्तीला त्यांनी अद्वैताची बैठक दिली; वैदिक कर्मकांडातील विषमता आणि संन्यासवादातील समता यांचा सुवर्णमध्य साधला. भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र आणले.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना संत ज्ञानेश्वरांनी केली आणि त्या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची एक भरभक्कम बैठक मिळवून दिली. ज्ञानयुक्त भक्तीचा महिमा वर्णन करताना भक्तिप्रेमामुळे आपली परमेश्वरविषयक आपुलकी तर वाढतेच; शिवाय मनुष्यमात्रात परस्परप्रेमाची बांधिलकीही निर्माण होते, असे सांगून संत ज्ञानेश्वरांनी मानवतावादाचा महान संदेश सामान्य जनांकरिता दिला आहे.

आपल्या तत्त्वज्ञानपर ग्रंथांनी त्यांनी आध्यात्मिक समतेचा पुरस्कार करून मराठी संस्कृती व सामान्य जन यांना उच्च आध्यात्मिक पातळीवर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले; म्हणून प्रा. गं. बा. सरदार यांनी असे म्हटले आहे की, “संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संतचळवळीचे, धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होत.” संत ज्ञानेश्वरांनी सामान्य जनांच्या मनात भागवत धर्माविषयी आस्था व आपुलकी निर्माण केली. समाजातील दुःखी व उपेक्षित लोकांविषयी कळवळा त्यांच्या लिखाणात ठिकठिकाणी पाहावयास मिळतो.

ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी मागितलेल्या-
“दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥”
या पसायदानात अवघ्या मानवजातीच्या कल्याणाविषयीच्या त्यांच्या विशाल दृष्टीचे प्रत्यंतर आपणास येते.

संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी शके १२१८ (इ. स. १२९६) मध्ये आळंदी येथे समाधी घेतली.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

केरळ साखळी बॉम्ब स्फोट | Kerala Chain Bomb Blast इस्रो ने शेअर केली आदित्य एल १ कडून आलेली पहिली माहिती आयफोन आणि इस्रोची या माध्यमातून झाली युती! Hottest Exoplanet Ever Found Could Reveal Secrets of Planetary Atmospheres