नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती मराठी | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

google-news-icon
नाव सुभाषचंद्र बोस
जन्म२३ जानेवारी १८९७
जन्मस्थानकटक ओडिशा
वडिलांचे नावजानकीदास बोस
आईचे नावप्रभावती देवी
पत्नीचे नाव एमीली शेंकल
अपत्यअनिता बोस
मृत्यू १८ ऑगस्ट १९४५

भारतमातेचा सुपुत्र

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक होत. आझाद हिंद सेनेचे नेते या नात्याने त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात केलेल्या कामगिरीची इतिहासात सुवर्णाक्षरांनीच नोंद करावी लागेल. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस हे येथील युवकांच्या गळ्यातील ताईतच बनले होते. कोट्यवधी भारतीय आकांक्षांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा परिचय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी ओडिशातील कटक या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीदास व आईचे नाव प्रभावती असे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शालेय जीवनापासूनच देशभक्तीकडे ओढा होता. महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा देण्याची स्वप्ने ते पाहू लागले होते. कोलकाता विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर सुभाषबाबू वडिलांच्या इच्छेनुसार आय. सी. एस. होण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी आय. सी. एस. च्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविले. या परीक्षेचा अभ्यास करण्यास त्यांना अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळाला होता. तथापि, इतक्या थोड्या अवधीत तयारी करूनही ते या परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खरा फोटो अलौकिक मराठी

इंग्लंडहून भारतात परत आल्यावर सनदी अधिकारी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला; परंतु त्यानंतर थोड्याच दिवसांत महात्मा गांधींनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात असहकाराची चळवळ सुरू केली. या चळवळीतील एक कार्यक्रम सरकारी नोकरीचा त्याग करणे असा होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सुभाषचंद्र बोस यांनी २२ एप्रिल, १९२१ रोजी सरकारी नोकरीतील अत्यंत मानाच्या जागेचा त्याग करून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिलेच आय. सी. एस. अधिकारी होते.

काँग्रेसच्या कार्यात सहभागी

यापुढील काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला सर्वस्वी देशसेवेलाच वाहून घेतले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यात ते भाग घेऊ लागले. चित्तरंजन दास यांचे निकटचे सहकारी व अनुयायी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. चित्तरंजन दास यांनीही सुभाषबाबूंचे कर्तृत्व व देशभक्ती यांची दखल घेऊन त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. कोलकाता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सुभाषबाबू या पदावर असतानाच इंग्रज सरकारने क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्यांना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. कोलकाता महानगरपालिकेचे महापौर म्हणूनही त्यांची निवड झाली होती.

क्रांतिकारक विचारांचा प्रभाव

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे सन १९२६ नंतर राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून त्यांना मान्यता मिळू लागली. विशेषतः देशातील युवकवर्गात तर ते खूपच लोकप्रिय बनले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तरुण नेत्यांमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. सन १९२७ मध्ये सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू या दोघा युवा नेत्यांची काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. या निवडीने देशातील तरुणांमध्ये मोठेच चैतन्य संचारले. नेहरू अहवालात तसेच १९२८ च्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वरील मागणीला विरोध केला आणि वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी काँग्रेसने करावी, असा आग्रह धरला. अखेरीस महात्मा गांधींच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला की, वसाहतीच्या स्वराज्यासाठी इंग्रज सरकारला एका वर्षाची मुदत द्यावी. या अवधीत सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करावी. वरील पार्श्वभूमीवर डिसेंबर, १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. हा ठराव संमत होण्यास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झाले होते, हेच यावरून स्पष्ट होते.

काँग्रेसमधील डाव्या गटाचे नेतृत्व

सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील डाव्या गटाचे नेते म्हणून ओळखले जात होते. काँग्रेसने समाजवादी तत्त्वांचा अंगीकार करावा, असे त्यांचे मत होते. सुभाषबाबूंचे गांधीजींशी अनेक बाबतींत मतभेद होते. सन १९३७ च्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने सत्तेत सहभागी होऊ नये, असे त्यांचे म्हणणे होते. गांधीजींच्या तडजोडवादी भूमिकेला सुभाषचंद्रांनी अनेक वेळा उघडपणे विरोध केला होता.

कटक या गावी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे संग्रहालय पण आहे.

‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना

सन १९३८ मध्ये हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली. त्या वेळेपासून त्यांच्यातील व काँग्रेसच्या इतर नेत्यांतील मतभेद अधिकच वाढत गेले. १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध महात्मा गांधी व काँग्रेसचे इतर प्रमुख नेते यांच्या पाठिंब्यावर पट्टाभि सीतारामय्या हे उभे राहिले, परंतु गांधीजी व इतर नेते यांचा विरोध असतानादेखील सुभाषचंद्र बोस हे सीतारामय्यांचा पराभव करून काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. या वेळी दुर्दैवाने काँग्रेसच्या कार्यकारिणीने सुभाषबाबूंशी असहकार पुकारला; त्यामुळे त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ३ मे, १९३९ रोजी ‘फॉरवर्ड ब्लॉक‘ हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. ‘फॉरवर्ड ब्लॉक‘ चे पहिले अधिवेशन मुंबईत २२ जून, १९३९ रोजी भरले.

नजरकैदेत

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेसने इंग्रज सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू करावे, असा आग्रह नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी धरला. त्यांच्या या भूमिकेमुळे इंग्रज सरकारने त्यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक केली. पुढे त्यांची कैदेतून सुटका झाली; परंतु त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले.

सुभाषचंद्र बोस माहिती अलौकिक मराठी

जर्मनीला प्रयाण

या नजरकैदेतून नेताजींनी १७ जानेवारी, १९४१ रोजी अत्यंत शिताफीने व विस्मयकारकपणे स्वतःची सुटका करून घेतली. वेगवेगळी नावे धारण करून व वेशांतरे करून ते गुप्तपणे प्रथम अफगाणिस्तानात जाऊन पोहोचले आणि तेथून त्यांनी जर्मनीस प्रयाण केले. तेथे बर्लिन नभोवाणीवरून भारतीय जनतेला उद्देशून त्यांनी भाषणे केली आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले. नेताजींनी हिटलरसह काही प्रमुख जर्मन नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीत जर्मनीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. जर्मनीत त्यांनी ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग‘ या नावाची संघटना स्थापन केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि जर्मनीचा शासक एडोल्फ हिटलर यांच्या भेटीचा क्षण

subhash chandra bose and adolf hitler meeting
ऐतिहासिक घटनांच्या आधारे हा फोटो एआय च्या मदतीने तयार केला आहे.

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती

जर्मनीत राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी आपणास काही भरीव स्वरूपाची कृती करता येणार नाही, असे लक्षात येताच नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीहून एका पाणबुडीतून जपानला गेले. या वेळी रासबिहारी बोस यांनी युद्धात जपानच्या हाती सापडलेल्या भारतीय युद्धकैद्यांच्या मदतीने ‘आझाद हिंद सेने‘ ची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेचे दुसरे अधिवेशन सन १९४२ मध्ये बँकॉक येथे भरले, या अधिवेशनासाठी सुभाषबाबूंना निमंत्रण देण्यात आले होते. त्यावरून नेताजी या अधिवेशनास उपस्थित राहिले. त्या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी नेताजींना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. नेताजींनी ती मान्य केली आणि ४ जुलै, १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आझाद हिंद सेने’चे सरसेनापती बनले.

नेताजी सुभाषचंद बोस यांच्या नेतृत्वामुळे आझाद हिंद सेनेच्या जवानांमध्ये नवचैतन्य संचारले. नेताजींनी या सेनेची अनेक पथके उभारून त्यांना गांधी पथक, नेहरू पथक अशी नावे दिली. त्यांनी ‘झाशीची राणी‘ या नावाने स्त्री-सैनिकांचेही एक पथक उभारले आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्याकडे सोपविले. कॅप्टन स्वामिनाथन याच नंतरच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनीच डाव्या आघाडीच्या पुढाकाराने डॉ. अब्दुल कलाम यांच्या विरोधात सन २००२ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती; अर्थात, हे पद दोन महान व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीस मिळणे अपरिहार्य होते.

हिंदुस्थानचे हंगामी सरकार

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी २१ ऑक्टोबर, १९४३ रोजी सिंगापूर येथे हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले. या सरकारला जर्मनी, जपान, इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली. नेताजींनी आझाद हिंद सेनेला शस्त्रसज्ज बनविले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सैनिकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत चेतविली व त्यांना आपल्या मातृभूमीची परदास्यातून मुक्तता करण्यासाठी असीम त्याग करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर नेताजींनी आझाद हिंद सेनेला “चलो दिल्ली” असा आदेश दिला. सन १८५७ च्या उठावानंतर यावेळी प्रथमच ‘चलो दिल्ली’चा नारा आसमंतात दुमदुमला. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा।” अशी हाक त्यांनी आपल्या सैनिकांना दिली.

मातृभूमीकडे आगेकूच

देशभक्तीने प्रेरित झालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी मातृभूमीच्या दिशेने आग्रे चालविली. मेजर जनरल शाहनवाजखान, कॅप्टन सहगल, कर्नल धिल्लाँ, मेजर जग थराव भोसले, कर्नल हबीबूर रेहमान इत्यादींच्या कुशल नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने अनेक नेत्रदीपक विजय संपादन केले. तिने अंदमान व निकोबार बेटांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. पुढील काही दिवसांत तर तिने हिंदुस्थानच्या सरहद्दीपर्यंत घडक मारली. हिंदुस्थानातील माऊडॉक, कोहिमा इत्यादी ठाणी जिंकून ही सेना इंफाळपर्यंत येऊन पोहोचली; परंतु तिला इंफाळ मात्र जिंकता आले नाही.

विमान-अपघातात अंत

याच सुमारास महायुद्धाचे पारडे फिरण्यास सुरुवात झाली. जर्मनी, जपान यांची निरनिराळ्या आघाड्यांवर पीछेहाट होऊ लागली. त्याबरोबर आझाद हिंद सेनेलाही माघार घेणे भाग पडले. जपान सरकारच्या निवेदनानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस एका विमानाने टोकियोला जाण्यास निघाले असताना त्या विमानाला फोर्मोसा म्हणजेच ताईहोकू बेटावरील विमानतळावर अपघात झाला. या अपघातात १८ ऑगस्ट, १९४५ रोजी नेताजींचा दुर्दैवी अंत झाला.

असामान्य कार्य

आझाद हिंद सेनेच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव करून आपली मातृभूमी परदास्यातून मुक्त करण्याचे नेताजींचे स्वप्न साकार होऊ शकले नाही; परंतु त्यांचे कार्य, देशप्रेम, त्याग, ध्येयनिष्ठा व धडाडी यांच्या दर्शनाने असंख्य भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटून उठली आणि त्यांना देशसेवेची नवी प्रेरणा मिळाली. अशा प्रकारे नेताजींनी आपल्या बलिदानातून राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावून परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचा संदेश आपल्या देशबांधवांना दिला.

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक या गावी झाला.

सुभाषचंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय?

त्यांचं पूर्ण नाव हे सुभाषचंद्र जानकीदास बोस असे आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता नारा दिला होता?

त्यांनी “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दुंगा।” हा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता.

आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली?

आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment