राजा राममोहन रॉय माहिती मराठी | Raja Rammohan Roy Information in Marathi

google-news-icon
नाव राजा राममोहन रॉय
जन्म २२ मे, १७७२
जन्मगाव राधानगर हूगळी जिल्हा पश्चिम बंगाल
वडिलांचे नाव रमाकांत रॉय
आईचे नाव तरिणीदेवी
पत्नी उमा
अपत्ये राधाप्रसाद, रामप्रसाद
मृत्यू २७ सप्टेंबर १८३३

राजा राममोहन रॉय यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात सर्वप्रथम धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या कार्याचा पाया घातला. ‘आधुनिक भारताचा निर्माता‘ या उपाधीने त्यांना गौरविले जाते. भारतातील धर्मसुधारणेचे व समाजसुधारणेचे ते आद्यप्रवर्तक होत; म्हणूनच आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अधोगतीकडे वाटचाल करू लागलेल्या भारतीय समाजाला नवविचारांचा मंत्र देऊन त्याची अधोगती रोखण्याचे कार्य त्यांनी केले.

राजा राममोहन रॉय यांचा परिचय

राजा राममोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर या गावी २२ मे, १७७२ रोजी झाला. त्यांचे वडील रमाकांत रॉय हे एक सघन व प्रतिष्ठित जमीनदार होते. ते मुर्शिदाबादच्या नवाबाच्या दरबारात काही काळ कामास होते. मुस्लिम दरबारात फारसी व अरबी भाषांना महत्त्व असल्याने त्यांनी राममोहन रॉय यांना लहानपणीच या भाषा शिकविण्याची व्यवस्था केली. पुढे राममोहन रॉय यांना शिक्षणासाठी पाटणा येथे पाठविण्यात आले.

तेथे त्यांनी इस्लामी धर्म, इतिहास व तत्त्वज्ञान यांचे अध्ययन केले. त्यानंतर बनारसला (आताचे वाराणसी) जाऊन त्यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन करून त्या भाषेवर प्रभुत्व मिळविले. याशिवाय इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. अशा प्रकारे त्यांना अनेक भाषा अवगत झाल्यामुळे निरनिराळ्या धर्मग्रंथांचा मुळातूनच अभ्यास करणे आणि त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे त्यांना सहज शक्य झाले.

राजा राममोहन रॉय यांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच हिंदू धर्मातील मूर्तिपूजेवर टीका करणारी एक पुस्तिका बंगाली भाषेत लिहिली. मूर्तिपूजेला वेदांचा आधार नाही असे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले; पण ते एका सनातनी ब्राह्मण कुटुंबातून आले होते. साहजिकच, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचे हे बंडखोर विचार रुचले नाहीत. या प्रश्नावर कुटुंबीयांशी मतभेद झाल्यामुळे राजा राममोहन रॉय यांना घर सोडावे लागले. तथापि, ही घटना एक प्रकारे त्यांच्या पथ्यावरच पडली. या निमित्ताने त्यांना पुष्कळ प्रवास करण्याची संधी मिळाली; त्यामुळे त्यांच्या अनुभवांत पुष्कळच भर पडली.

सन १८०३ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राजा राममोहन रॉय मुर्शिदाबादला गेले. सन १८०५ मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत दिवाण म्हणून नोकरी धरली. पुढे १८०९ मध्ये त्यांची शिरस्तेदार म्हणून नियुक्ती झाली. परंतु १८१४ मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्याच्या पुढील वर्षी ते कोलकाता येथे वास्तव्यास आले. त्या ठिकाणी ते युनिटेरियन पंथाच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासात आले; त्यामुळे त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी आणखी अध्ययन करण्याची संधी मिळाली.

सतीच्या प्रथेस यशस्वी विरोध

राजा राममोहन रॉय यांनी १८१५ मध्ये ‘आत्मीय सभे‘ची स्थापना केली. १८१८ पासून त्यांनी सतीच्या अनिष्ट व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली. सतीच्या प्रथेचे वर्णन ते ‘शास्त्राच्या संमतीने केलेला खून’ याच शब्दांत करतात. धर्म व तथाकथित शास्त्रांवरील लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन सतीच्या प्रथेला धार्मिक अधिष्ठान नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले. ही प्रथा कायद्याने बंद करावी म्हणून इंग्रज सरकारचे मन वळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. या संदर्भात राजा राममोहन रॉय यांनी लोकजागृतीचे जे कार्य केले, त्यामुळेच तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने ४ डिसेंबर, १८२९ रोजी सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला.

ब्राह्मो समाजाची स्थापना

राजा राममोहन रॉय यांनी १८२७ मध्ये ‘ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन’ची स्थापना केली. त्यानंतर २० ऑगस्ट १८२८ रोजी त्यांनी ‘ब्राह्मो समाज‘ या नावाची संघटना स्थापन केली. ‘ब्राह्मो समाज’ हा हिंदुस्थानातील नवीन धर्मसंस्था व धर्मसंप्रदाय यांची गंगोत्रीच ठरला. त्यांच्या शिकवणुकीपासून प्रेरणा घेऊन धर्मसुधारणेच्या कार्यासाठी अनेक भारतीय विचारवंत पुढे आले. हिंदुधर्मात सुधारणा होण्यास ब्राह्मो समाजाची स्थापना बऱ्याच अंशी कारणीभूत झाली होती.

सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष

१९ नोव्हेंबर, १८३० रोजी दिल्लीच्या मोगल बादशहाने आपल्या वार्षिक पेन्शनमध्ये वाढ करण्यासंबंधी ब्रिटिश सरकारला विनंती करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून राजा राममोहन रॉय यांना इंग्लंडला पाठविले. रॉय इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बादशहाने त्यांना ‘राजा’ हा किताब बहाल केला. इंग्लंडमध्ये त्यांनी दोन वर्षे वास्तव्य केले. या वास्तव्याच्या काळात राजा राममोहन रॉय यांनी अनेक मान्यवर इंग्रज व्यक्ती व उदारमतवादी विचारवंत यांच्याशी मैत्रीचे संबंध जोडले.

इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे त्यांची साक्ष झाली. या साक्षीत त्यांनी भारताच्या प्रशासनाच्या जवळजवळ प्रत्येक शाखेत महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या. या प्रश्नावर हाऊस ऑफ कॉमन्सशी सल्लामसलत करणारे ते पहिलेच भारतीय होते. सतीची चाल बंद करणारा कायदा रद्द करावा म्हणून भारतातील सनातनी मंडळींनी जो आग्रह धरला होता त्यास ब्रिटिश सरकारने दाद देऊ नये यासाठीही राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले. २७ सप्टेंबर, १८३३ रोजी त्यांचा ब्रिस्टॉल येथे मृत्यू झाला.

धर्मविषयक विचार

राजा राममोहन रॉय हे धर्मसुधारक व सत्याचे उपासक होते. त्यांनी विविध धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यावरून ते अशा निष्कर्षाप्रत आले होते की, जगातील सर्वच धर्म मानवतावादाचा पुरस्कार करीत असल्याने प्रत्येक धर्म आपापल्या परीने श्रेष्ठ आहे. साहजिकच, सर्व धर्मांबाबत त्यांची वृत्ती सहिष्णुतेची बनली होती. त्यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाने धार्मिक सहिष्णुतेचा पुरस्कार केला होता. व्यक्तीने कोणत्याच धर्माचा द्वेष करू नये, असे त्यांनी सांगितले होते. त्यांना स्वतःला सर्वच धर्मांविषयी आपलेपणा वाटत होता. विविध धर्म व धर्मपंथ यांच्या ऐक्यावर त्यांचा विश्वास होता. एका अर्थाने वैश्विक धर्माचाच पुरस्कार त्यांनी केला होता.

बहुदेवतावादास विरोध

राजा राममोहन रॉय यांचा हिंदू धर्मातील बहुदेवतावादाला विरोध होता. मुस्लिम धर्मातील एकेश्वरवाद आणि ख्रिस्ती धर्मातील नीतिविषयक तत्त्वे व मूल्ये यांनी ते प्रभावित झाले होते. विश्वाचा निर्माता, कर्ता-करविता असा एकच ईश्वर आहे, हे त्यांच्या धार्मिक विचारांचे मुख्य सूत्र होते. हिंदू धर्मातील अनेक देवदेवतांमुळे आपल्या समाजात निरनिराळे पंथ-उपपंथ निर्माण झाले, असे त्यांचे मत होते. तेव्हा एकेश्वरवादावरील विश्वास है। राजा राममोहन रॉय यांच्या धर्मविषयक विचारांचे प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल.

मूर्तिपूजा अमान्य

राजा राममोहन रॉय यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. वेद आणि उपनिषदे या हिंदूंच्या मूळ धर्मग्रंथांत मूर्तिपूजेला आधार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मूर्तिपूजेच्या ऐवजी निराकार ईश्वराची उपासना करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. आत्म्याच्या अमरत्वावर त्यांचा विश्वास होता.

राजकीय विचार

राजा राममोहन रॉय इंग्रजी सत्तेचे समर्थक होते. इंग्रजी सत्तेमुळे हिंदुस्थानात उदारमतवादाचा प्रसार होईल; तसेच इंग्रजी राज्यकर्त्यांच्या लोककल्याणकारी धोरणामुळे हिंदी जनतेची स्थिती सुधारण्यास मदत मिळेल, असे त्यांना वाटत होते. अर्थात, ही केवळ राजा राममोहन रॉय यांची एकट्याचीच नव्हे, तर अव्वल इंग्रजी अमदानीत होऊन गेलेल्या अनेक भारतीय विचारवंतांची भूमिका होती.

उदारमतवादाचा प्रभाव

राजा राममोहन रॉय यांच्यावर उदारमतवादी विचारसरणीचा प्रभाव होता. युरोपातील उदारमतवादी चळवळीविषयी त्यांच्या मनात विशेष आस्था होती. बेकन, बेंथम, ब्लॅकस्टोन, माँतेस्क्यू यांसारख्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली होती. हिंदुस्थानातही उदारमतवादाचा प्रसार व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही चालविले होते.

व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार

रॉय यांच्यावरील उदारमतवादाच्या प्रभावामुळे त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा हिरीरीने पुरस्कार केला होता. व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्यक्तिस्वातंत्र्यावरच अवलंबून असतो, असे त्यांचे ठाम मत होते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या या आग्रहातून त्यांनी धार्मिक व सामाजिक सुधारणांचा पुरस्कार चालविला होता. भारतीय समाजातील अनिष्ट सामाजिक व धार्मिक प्रथा-परंपरा व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत, असे त्यांचे प्रतिपादन होते.

वृत्तपत्रस्वातंत्र्याचा पुरस्कार

राजा राममोहन रॉय यांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याचाही पुरस्कार केला होता. व्यक्ति- स्वातंत्र्याच्या आणि व्यक्तीच्या हक्कांच्या रक्षणासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य आवश्यक असते, असे त्यांनी म्हटले होते. वृत्तपत्रस्वातंत्र्याचा लाभ जनतेप्रमाणेच सरकारलाही मिळतो; कारण वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यास जनतेच्या इच्छा-अपेक्षा समजू शकतात, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. स्वातंत्र्याप्रमाणेच समता व बंधुभाव या तत्त्वांबद्दल त्यांना आदर होता. मानवी हक्कांचे ते समर्थक होते.

शिक्षणक्षेत्रातील कार्य

राजा राममोहन रॉय यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्यही अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कोलकाता मध्ये ‘हिंदू कॉलेज‘ची स्थापना झाली. भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यावे, असा त्यांनी आग्रह धरला आणि त्याकरिता सरकारदरबारी प्रयत्न केले. इंग्रजी सत्ता ही भारतीय लोकांना मिळालेली दैवी देणगी आहे; कारण तिच्यामुळेच भारतीयांना आधुनिक ज्ञान व विज्ञान यांचा लाभ झाला, असे त्यांचे मत होते. भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्ययनातच गुरफटून न पडता गणित व भौतिक शास्त्रे यांचे शिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले होते.

आधुनिक बंगाली गद्याचा जनक

राजा राममोहन रॉय यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बंगालीत केलेल्या लिखाणामुळे ‘आधुनिक बंगाली गद्याचा जनक’ असा त्यांचा उल्लेख केला जातो. आपल्या या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘संवाद कौमुदी‘ (४ डिसेंबर, १८२१) नावाचे पाक्षिक चालविले होते. ‘मिरात-उल्-अखबार (१८२२) नावाचे फारसी भाषेतील साप्ताहिकही त्यांनी सुरू केले होते. अशा प्रकारे भारतीय लोकांना ज्ञानमंदिराची द्वारे खुली करण्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम घेतले.

सामाजिक विचार व कार्य

राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय समाजात अनेक अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा रूढ होत्या. आपल्या समाजाची अधोगती थांबविण्यासाठी या चालीरीती, प्रथा, परंपरांचे उच्चाटन झाले पाहिजे, या निष्कर्षाप्रत ते आले होते; म्हणून समाजातील अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा यांविरुद्ध त्यांनी प्रचाराची जोरदार मोहीम उघडली.

सतीच्या प्रथेसारखी दुष्ट प्रथा बंद पाडण्यासाठी तर त्यांनी खूपच प्रयत्न केले. याशिवाय बालविवाह, बालहत्या, केशवपन, बहुपत्नीकत्व यांसारख्या प्रथांनाही त्यांनी विरोध केला. येथील स्त्रीवर्गावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि समाजात विधवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. राजा राममोहन रॉय यांच्या समाजसुधारणेच्या कार्याची मुख्य प्रेरणा त्यांची मानवतावादी दृष्टी हीच होती; म्हणूनच त्यांना ‘मानवतावादी समाजसुधारक‘ असे म्हटले जाते. भारतीय समाजातील सर्व विकृती दूर करून त्याची निकोप व मानवतावादी पायावर पुनर्उभारणी करावी, हीच त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले.

ब्राह्मो समाजजाची तत्वे

राजा राममोहन रॉय यांनी धार्मिक व सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा करण्यासाठी २० ऑगस्ट, १८२८ रोजी ‘ब्राह्मो समाजा’ची स्थापना केली. या समाजाची प्रमुख तत्त्वे

पुढीलप्रमाणे होती-

  • ईश्वर एकच असून तो निराकार आहे; म्हणून सर्वांनी त्या निराकार ईश्वराची उपासना करावी.
  • ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. आपण सर्व मानव एकमेकांचे बंधू आहोत; म्हणून सर्वांनी परस्परांशी बंधुभावाच्या नात्याने वर्तन करावे.
  • जगातील सर्व धर्मांचे अंतरंग सारखेच आहे; म्हणून प्रत्येक व्यक्तीने सर्वच धर्मांचा वै धर्मापंथांचा आदर करावा.
  • मूर्तिपूजा हा ईश्वरभक्तीचा त्याज्य मार्ग होय; म्हणून कोणत्याही स्वरूपात मूर्तिपूजा करू नये. त्याऐवजी सामुदायिक ध्यानसाधनेच्या मार्गानि ईश्वराची अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी.
  • व्यक्तीने प्रपंचास परमार्थरूप मानून चालावे.
  • प्रेम, सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय, असे समजून सर्वांनी परस्परांशी व्यवहार करावा; इत्यादी.

ब्राह्मो समाजाचा मूर्तिपूजेला तर विरोध होताच; पण देवदेवतांना बळी देणे किंवा त्यांना नैवेद्य म्हणून वस्तू किंवा पदार्थ अर्पण करणे असल्या पूजाप्रकारांनाही त्याचा विरोध होता. राजा राममोहन रॉय यांनी तर म्हटले होते की, “वेदान्त परमात्म्याच्या स्वरूपाविषयी अतिशय शुद्ध व उदात्त असून वेदांनी मूर्तिपूजेला मुळीच मान्यता दिलेली नाही.” निर्गुण व निराकार ईश्वराची निरपेक्ष भावनेने प्रार्थना करण्यासाठी ब्राह्मो समाजाची ठिकठिकाणी मंदिरे उभारण्यात आली. या मंदिरांमध्ये सर्व धर्मांच्या व पंथांच्या लोकांना मुक्त प्रवेश होता.

ब्राह्मो समाजाने समाजसुधारणेच्या व धर्मसुधारणेच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजाविली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजात आधुनिक विचारांचे जे वारे वाहू लागले होते, त्यास ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान व कार्यच मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झाले होते. भारतीय समाजाला नवविचारांचा मंत्र देण्याचे आणि त्यास परिवर्तनाच्या मार्गावर आणून सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संघटित स्वरूपात प्रथम ब्राह्मो समाजानेच केले होते.

राजा राममोहन रॉय यांनी भारतात आधुनिक युगाची सुरुवात केली. ‘भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक‘ असा त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतात एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेची प्रचंड लाट उसळली आणि या लाटेने हिंदू धर्मात जे जे अपवित्र व अमंगल होते ते सर्व धुऊन टाकण्याची पराकाष्ठा केली. भारतातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे ‘आद्य प्रवर्तक‘ म्हणून राजा राममोहन रॉय यांचाच निर्देश करावा लागतो. भारतीय राजकारणात पुढील काळात उदारमतवादाची जी परंपरा निर्माण झाली तिचा प्रारंभही रॉय यांच्यापासूनच झाला.

ते उदारमतवादी परंपरेचे आद्य प्रणेते होते. या देशात बुद्धिवादाचा विकास व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या देशबांधवांनी बुद्धिवादाची कास धरावी यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले होते. बुद्धिवादाच्या प्रभावामुळे पाश्चात्त्य जगतात घडून आलेले महान परिवर्तन त्यांच्या नजरेसमोर होते. भारतातदेखील बुद्धिवादाच्या आधारेच अशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणता येईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. राजा राममोहन रॉय यांनी विविध क्षेत्रांत केलेली ही कामगिरी विचारात घेता ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असा त्यांचा जो गौरव केला जातो तो उचितच म्हटला पाहिजे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment