स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी | Swami Dayanand Saraswati Information in Marathi

google-news-icon

स्वामी दयानंद सरस्वती यांचे भारतातील धर्मसुधारणेच्या चळवळीत मोलाचे योगदान आहे. तथापि, धर्मसुधारणेच्या बाबतीत त्यांनी आपला वेगळा मार्ग चोखाळला होता. त्यांच्या या वेगळेपणामुळेच त्यांच्या विचारांना आणि कार्याला वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे.

नाव मूळशंकर करसनदास तिवारी
जन्म १२ फेब्रुवारी १८२४
जन्मगावटंकारा (गुजरात)
वडिलांचे नावकरसनदास
संस्थांची स्थापना आर्य समाज
मृत्यू ३० ऑक्टोबर १८८३

स्वामी दयानंद सरस्वती यांचा परिचय

स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म २० सप्टेंबर, १८२४ रोजी काठेवाड (गुजरात) मधील मोर्वी संस्थानातील टंकारा या गावी एका सामवेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मूळशंकर करसनदास तिवारी असे होते. त्यांचे वडील करसनदास हे सनातनी विचारांचे व धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते. साहजिकच, स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरही बालपणी धार्मिक विचारांचे संस्कार झाले होते.

स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनातील बालपणीच्या एका प्रसंगाने त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य केले. एका महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची उपासना करण्यासाठी ते आपल्या वडिलांसमवेत रात्रीच्या वेळी देवळात गेले असता तेथे महादेवाच्या पिंडीवर उंदीर फिरत असल्याचे व देवापुढे ठेवलेला नैवेद्य उंदीर खात असल्याचे दृश्य त्यांना पाहावयास मिळाले.

हे दृश्य पाहून मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते, तेव्हा मूर्तिपूजेलाही काही अर्थ नाही, असे त्यांना वाटू लागले. त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. धर्माचा खरा अर्थ आणि परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली आणि त्या दृष्टीने ते विचार करू लागले.

स्वामी दयानंद सरस्वती यांनी ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच आपले घरदार सोडले. त्यांच्या घरातील वडिलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाचा चालविलेला विचार, हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते; पण खरे तर, दयानंदांच्या मनाचा कलच भौतिक सुखांना दुय्यम लेखण्याकडे होता. भौतिक सुखांचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

साधारणतः १८४५ पासून ते १८६० सालापर्यंत म्हणजे सुमारे पंधरा वर्षे त्यांनी हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत मुक्त संचार केला. येथील पर्वतराजी पायाखाली घातल्या, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वास्तव्य केले. या कालावधीत धर्मासंबंधी खरे ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. याच दरम्यान पूर्णानंद सरस्वती या महाराष्ट्रीय संन्याशाकडून त्यांनी सरस्वती संप्रदायाची दिक्षा घेतली व संन्यास स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

वरीलप्रमाणे पंधरा वर्षांपर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्यावर स्वामी दयानंद मथुरेस येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी दंडी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करले, स्वामी विरजानंद यांच्याजवळ मथुरा येथे त्यांनी सुमारे अडीच वर्षे वास्तव्य केले आणि वेद व इतर हिंदू धर्मग्रंथ यांचे अध्ययन केले. त्यानंतर साधारणतः १८६४ पासून त्यांनी प्रवचने करीत देशभर दौरे सुरू केले. आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यासाठी स्वामीजींनी ब्रह्मचर्य व्रताचा अंगीकार केला होता. सन १८६९ मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडितांशी शास्त्रार्थावर वादविवाद केला; त्यामुळे त्यांचे नाव सर्वदूर पसरले.

आर्य समाजाची स्थापना

स्वामी दयानंद सरस्वतींनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा ब्राह्मो समाजाकडून घेतली होती. प्रारंभीच्या काळात ते ब्राह्मो समाज व त्याच्या जागोजागच्या शाखा यांच्या सहकार्यानेच धर्मप्रचारांचे व धर्मसुधारणेचे कार्य करीत असत. तथापि, पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी काकडवाडी, मुंबई येथे ७ एप्रिल, १८७५ रोजी गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून ‘आर्य समाजा‘ची स्थापना केली. २४ जुलै, १८७७ रोजी लाहोर येथे आर्य समाजाच्या घटनेला अंतिम रूप देण्यात आले.

आर्य समाजाची तत्त्वे

आर्य समाजाची प्रमुख तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील-

  1. सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम परमेश्वर असून सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात ज्ञात आहेत.
  2. परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादि, अनंत, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. परमेश्वर हा सर्व विश्वाचा निर्माता व पालक आहे.
  3. वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले असून त्यांत सर्व ज्ञानाचा उगम आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदांमध्ये आहे; म्हणून वेदांचे अध्ययन करणे व त्यांतील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे पवित्र कर्तव्य आहे.
  4. प्रत्येक व्यक्तीने सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.
  5. प्रत्येक व्यक्तीने नीतिनियमांना अनुसरून आणि चांगल्या-वाईटाचा विचार करून सद्गुणांचे संगोपन व संवर्धन होईल अशा प्रकारची कृती करावी.
  6. मानवजातीची भौतिक, सामाजिक व आध्यात्मिक उन्नती करून मानव-जातीच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार प्रधान मानावा.
  7. प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यांवर आधारित वर्तणूक ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होय.
  8. प्रत्येक व्यक्तीने केवळ स्वतःच्या कल्याणात धन्यता न मानता दुसऱ्याच्या उत्कर्षातच आपलाही उत्कर्ष आहे असे समजून वागावे.

स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली असली तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात झाला. आर्य समाजाला उत्तर भारतात, विशेषतः पंजाबात लाला हंसराज, लाला लजपतराय, लाला हरदयाळ, स्वामी श्रद्धानंद यांसारखे अनुयायी मिळाले; त्यामुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

वेदप्रामाण्य

आर्य समाजाच्या तत्त्वांवरून हे स्पष्ट होते, की स्वामी दयानंद सरस्वती हे वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पुराणे आणि त्यांत उपदेशिलेली मूर्तिपूजा व उपासनेचे इतर प्रकार यांचा त्याग करून ‘वेदांकडे वळा; वेदांमध्ये प्रतिपादिलेल्या धर्माचे अनुसरण करा,’ असे त्यांचे सांगणे होते. वेदांमध्ये हिंदू धर्माची मूळ तत्त्वे शुद्ध स्वरूपात आढळतात, वैदिक काळात मानवी संस्कृती परमोच्च अवस्थेला पोहोचली होती; म्हणून वेदांतील धर्मतत्त्वांचे अनुसरण केल्यास भारतीय समाजाला पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होऊ शकेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. भारतीय समाजाच्या आणि हिंदू धर्माच्या अवनतीस पुराणे कारणीभूत झाली आहेत, असे त्यांचे मत होते.

पुराणांतील परस्परविरोधी मतांच्या प्रतिपादनाने आणि त्यातील कपोलकल्पित कथांनी वेदांतील मूळ धर्मतत्त्वांना विकृत स्वरूप प्राप्त करून दिले. धर्माच्या नावावर कर्मकांडं, वेडगळ कल्पना यांचे अवडंबर माजविले. परिणामी, वेदांतील मूळ आर्य धर्माचे स्वरूप मलिन होऊन त्याचे तेज लुप्त झाले. तेव्हा वेदकालीन आर्य धर्माच्या पुरातन वृक्षावर वाढलेली विकृत विचारांची बांडगुळे नष्ट केल्यासच मूळ धर्मतत्त्वांचे तेज पुन्हा प्रकट होईल आणि आपल्या पुरातन पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले होते.

वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन

स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांनी स्थापन केलेला आर्य समाज यांनी धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला असला तरी अशा सुधारणांसाठी आपल्या पुरातन संस्कृतीचा त्याग करण्याची किंवा अन्य धर्मांकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. याबाबतीत ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांसारख्या संघटन व आर्य समाज यांच्यातील वेगळेपण स्पष्ट होते.

बाकीच्या संघटनांनी ख्रिस्ती धर्मतत्त्वांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला होता. किमानपक्षी; येथील बहुसंख्य लोकांचा तरी तसा ग्रह झाला होता. पण स्वामी दयानंदांनी पुरातन वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गाने धर्मसुधारणेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, असे ठामपणाने सांगितले. त्यांच्या या आग्रही प्रतिपादनामुळे येथील हिंदूंच्या मनात स्वधर्माविषयी निर्माण होऊ लागलेली न्यूनगंडाची भावना दूर होण्यास मोठीच मदत झाली. भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा त्यांचा दावा हिंदी जनतेला नवी प्रेरणा देण्यास उपकारक ठरला.

धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरांना विरोध

स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरीलप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती व वैदिक धर्म यांचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले असले तरी हिंदू धर्मात पुढील काळात जे दोष शिरले त्यांचे निर्मूलन करण्याची आवश्यकताही बोलून दाखविली. या दोषांमुळेच हिंदू धर्माची अवनती झाली, असे त्यांचे मत असल्याने त्याविरुद्ध त्यांनी जोरदार आवाज उठविला.

हिंदू धर्मातील जातिव्यवस्था, उच्च-नीच भेदभाव, मूर्तिपूजा, तसेच त्यातील अनिष्ट प्रथा व परंपरा यांवर त्यांनी कडक टीका केली. त्याचबरोबर त्यांनी विधवाविवाह, आंतरजातीय विवाह, स्त्री-शिक्षण या गोष्टींचा पुरस्कार केला. थोडक्यात, हिंदू धर्मातील विकृती व दोष दूर करून त्यास शुद्ध स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न स्वामी दयानंद सरस्वतींनी केला. या प्रयत्नांना संघटित स्वरूप आणण्याच्या उद्देशानेच त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ‘सत्यार्थ प्रकाश‘ नावाचा ग्रंथही लिहिला.

शिक्षणप्रसाराचे कार्य

आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांबरोबरच अन्य काही क्षेत्रांतही मोलाची कामगिरी बजावली होती. उत्तर भारतातील त्याने चालविलेले शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. आर्य समाजाने लाहोर येथे ‘दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज‘ सुरू केले. तसेच ‘गुरुकुल संस्थे‘ची स्थापना करून देशाच्या विविध भागांत शाळा व महाविद्यालये उघडली. आपल्या विधायक व सुधारणावादी कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केला.

शुद्धीकरण मोहीम

आर्य समाजाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणून त्याच्या शुद्धीकरणाच्या मोहिमेचा उल्लेख करावा लागेल. हिंदू धर्मीयांना निरनिराळ्या मार्गांनी धर्मांतर करावयास लावून आपल्या धर्मात ओढण्याचा प्रयत्न येथील काही अन्य धर्मीयांनी चालविला होता. त्यामध्ये काही प्रमाणात सक्तीचाही भाग होता. अशा प्रकारे परधर्मात प्रवेश केलेल्या हिंदूंना शुद्ध करून घेऊन हिंदू धर्मात परत येण्याची त्यांची वाट आर्य समाजाने मोकळी करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे अन्य धर्मीयांनी हिंदू धर्मावर चालविलेले अतिक्रमण थांबण्यास मोठीच मदत झाली.

मृत्यू – ३० ऑक्टोबर, १८८३ रोजी अजमेर येथे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment