क्रांतिसिंह नाना पाटील माहिती मराठी | Krantisinh Nana Patil Information in Marathi

google-news-icon
जन्म १५ ऑक्टोबर १९०२
जन्मगाव बहेबोरगाव जि सांगली
वडिलांचे नाव रामचंद्र पाटील
आईचे नाव गोजराबाई पाटील
कार्य शेतकऱ्यांसाठी विशेष कार्य
खेड्यातील लोकांचे शिक्षण
मृत्यू ६ डिसेंबर १९७६

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा परिचय

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट, १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव या गावी झाला. त्यांचे मूळ गाव याच जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र हे होय. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव गोजराबाई असे होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे घराणे वारकरी संप्रदायाचे होते; त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक विचारांचे संस्कार झाले होते. त्यांचे गाव एक लहानसे खेडे असल्याने तेथे शिक्षणाच्या सोयी जवळपास नव्हत्याच. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांना बऱ्याच ठिकाणी भटकंती करावी लागली होती. त्या काळात ग्रामीण भागातील एकंदर वातावरणही शिक्षणाला पोषक नव्हते. अशा परिस्थितीत नानांनी मराठी सातवीपर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही काळ तलाठ्याची नोकरी केली.

सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या शिकवणुकीचा प्रभाव होता. ते स्वतः सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने येथील शेतकऱ्यांचे दैन्य व दारिद्र्य यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. खेड्यापाड्यांतील बहुजन समाजाची दुःख, दैन्यावस्था त्यांनी जवळून पाहिली होती. याच सुमारास शाहू महाराजांच्या प्रेरणेने दक्षिण महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीला पुन्हा एकदा बहर आला होता. सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचार खेडोपाडी होऊ लागला होता. संवेदनशील मनाच्या नाना पाटलांवर या प्रचाराचा चांगलाच परिणाम झाला. सत्यशोधक समाजाच्या मार्गाने जाऊनच बहुजन समाजाचा उद्धार होऊ शकेल, अशी त्यांची खात्री पटली. त्यामुळे ते सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून ते कार्य करू लागले.

क्रांतिसिंह नाना पाटील- समाजसुधारणा

क्रांतिसिंह नाना पाटील हे राजकीय नेते म्हणून सुपरिचित असले तरी समाज- सुधारणेच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले होते. किंबहुना त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजसुधारणेच्या कार्यापासूनच झाली होती. सत्यशोधक समाजाचे कार्यकते या नात्याने बहुजन समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहण्याचा त्यांनी निश्चय केला होता. तथापि, ग्रामीण भागातील बहुजन समाजात असलेले दोष दूर करण्याची आवश्यकताही त्याच्या ध्यानात आली होती. म्हणून येथील समाजात आढळून येणाऱ्या अंधश्रद्धा, देवभोळ्या समजुती, जातिभेद, हुंडापद्धती यांसारख्या दोषांवर कठोर प्रहार करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी जनजागरणाची व्यापक मोहीमच हाती घेतली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व होते. ग्रामीण जनतेला समजेल, पटेल अशा भाषेत आपले विचार मांडण्याची कला त्यांना अवगत होती. त्याआधारे त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांविरुद्ध प्रचाराचे रान उठविले. देवदेवतांना नवस बोलणे, त्यांच्या जत्रा करणे, त्यांच्यापुढे प्राण्यांचा बळी देणे, पितरांचे श्राद्ध करणे, विवाह, सणसमारंभ यांसारख्या गोष्टींत नाहक उधळपट्टी करणे इत्यादी बाबींपासून लोकांनी दूर राहावे, असा उपदेश त्यांनी आपल्या भाषणांद्वारे केला. त्यांच्या या प्रचाराची तऱ्हा काहीशी गाडगे महाराज यांच्या कीर्तनासारखीच होती. गाडगे महाराजांच्या कीर्तनाप्रमाणेच नाना पाटलांच्या भाषणांनी ग्रामीण जनतेत विलक्षण परिणाम साधला जात असे. ग्रामीण समाजातील जातिभेद व अस्पृश्यतेची प्रथा यांवरही ते घणाघाती टीका करीत असत. याशिवाय ग्रामीण जनतेची व्यसनाधीनता, निष्क्रियता हेदेखील त्यांच्या टीकेचे एक प्रमुख लक्ष्य असे.

ग्रामीण जनतेत जागृती घडवून आणण्याबरोबरच तिचे शोषण करणाऱ्या भटभिक्षुक, सावकार व वतनदार या वर्गांनाही त्यांनी धारेवर धरले होते. या वर्गाचे लोक सामान्य जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिची कशी लुबाडणूक करीत आहेत हे त्यांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले. गोरगरिबांचा कैवार घेऊन त्यांनी सावकारशाहीविरुद्ध प्रचाराची आघाडी उघडली. सामान्य लोकांनी सावकारशाहीच्या पाशात अडकू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समाजातील भिक्षुकशाहीवरही त्यांनी प्रखर टीका केली. भट भिक्षुकांनी विविध प्रकारचे धार्मिक विधी केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच निर्माण केले असून त्यांच्या साहाय्याने ते गरीब जनतेची कशी लुबाडणूक करीत असतात, हे त्यांनी जनतेला पटवून दिले. अशा प्रकारे ग्रामीण समाजातील ऐतखाऊ वर्गाच्या कारवायांवर प्रकाश टाकून या वर्गाला सामान्य जनतेपासून अलग पाडण्याचे कार्य क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे राजकीय कार्य

महात्मा गांधींच्या राजकीय क्षितिजावरील उदयानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला मोठेच सामर्थ्य प्राप्त झाले. गांधीजींनी या चळवळीचे लोण सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले. सन १९२६ नंतर क्रांतीसिंह नाना पाटीलही स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाले. काँग्रेसमध्ये सामील होऊन परकीय सत्तेविरुद्धच्या संघर्षात भाग घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सरकारी नोकरीचा त्यांनी त्याग केला.

सन १९३० मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. या चळवळीचा एक भाग म्हणून जंगल सत्याग्रह करण्यात आले.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील बिळाशी व रेठरे धरण या ठिकाणी झालेल्या जंगल सत्याग्रहात भाग घेतला. तसेच ग्रामीण जनतेत चळवळीसंबंधी प्रचार करून तिला राजकीयदृष्ट्या जागृत बनविण्याचे कार्य हाती घेतले. या काळात त्यांनी सातारा जिल्ह्याचा ग्रामीण भाग आपल्या प्रचाराने ढवळून काढला. ग्रामीण जनतेला निर्भय बनण्याची शिकवण त्यांनी दिली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल नाना पाटलांना दोन वेळा सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा झाली.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रज सरकार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटले. महात्मा गांधींनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम उघडली. नाना पाटलांनी या मोहिमेत दोन वेळा सत्याग्रह केला व दोन्ही वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यानंतर कोल्हापूर संस्थानात अर्जुनवाड येथे भरलेल्या दुष्काळी परिषदेत बंदीहुकूम मोडून त्यांनी भाग घेतला. त्याबद्दलही त्यांना तुरुंगात जावे लागले.

प्रतिसरकारची स्थापना

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातील कार्य तर अतिशय महत्त्वाचे आहे. महात्मा गांधींनी १९४२ मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात ‘चले जाव’ आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला संपूर्ण देशातील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पण इंग्रज सरकारने प्रथम काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले आणि त्यानंतर देशभर सर्वत्र प्रचंड दडपशाही सुरू केली; त्यामुळे या आंदोलनाचा जोर लवकरच कमी झाला. तथापि, याच सुमारास देशाच्या निरनिराळ्या भागांतील भूमिगत कार्यकर्त्यांनी प्रतिकाराच्या मार्गाचा अवलंब करून हे आंदोलन जिवंत ठेवले. अशाच प्रकारची एक भूमिगत चळवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात उभी केली.

सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळ देशात विशेष गाजली. याचे कारण असे की, या भूमिगत चळवळीतूनच तेथे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात ‘प्रतिसरकार’ची स्थापना झाली. नाना पाटील हे साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रणेते होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल चव्वेचाळीस महिने भूमिगत राहून ब्रिटिश सत्तेशी झुंज दिली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर तर ग्रामीण भागात इंग्रज सरकारचे अस्तित्व नाममात्रच राहिले. नाना पाटलांनी युवकांची पोलादी संघटना निर्माण करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान उभे केले. प्रतिसरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना ‘क्रांतिसिंह‘ म्हणून ओळखले जाऊ लागले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली होती. त्याची विविध क्षेत्रांतील कामगिरी निश्चितच डोळ्यांत भरण्यासारखी होती. या प्रतिसरकारने समाजातील गुंड-पुंड, समाजकंटक, परकीय सरकारचे हस्तक यांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांचा पुरता बंदोबस्त केला. अशा लोकांना शासन करण्यासाठी पत्र्या मारण्याच्या अभिनव मार्गाचा अवलंब प्रतिसरकारच्या सैनिकांनी केला. त्यावरून ग्रामीण जनता या सरकारला ‘पत्री सरकार’ म्हणून ओळखू लागली.

प्रतिसरकारने ‘तुफान सेना’ नावाची स्वतःची सेना उभारली. आपली स्वतंत्र न्यायदानव्यवस्था निर्माण करून गोरगरीब जनतेला त्वरित व स्वस्तात न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली. गरीब शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेले सावकार व सरकारी नोकर यांना वठणीवर आणले आणि सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने दिलासा दिला. याशिवाय ग्रामसफाई, अस्पृश्यता निवारण, साक्षरता प्रसार, दारूबंदी, हुंडाबंदी, स्वदेशीचा पुरस्कार यांसारखी अनेक विधायक कामेही प्रतिसरकारने हाती घेतली होती.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी काँग्रेसचा त्याग करून नव्याने स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने भांडवलदार व जमीनदारवर्गाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे धोरण स्वीकारले असल्याने कामगार, शेतकरी, शेतमजूर यांसारख्या श्रमजीवी जनतेच्या हिताचे कार्य काँग्रेस सरकारकडून होण्याची शक्यता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. पुढे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी महाराष्ट्रात अनेक लढे उभारले.

यांमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांचे आंदोलन, खंडकरी शेतकऱ्यांचा लढा, धरणग्रस्त शेतकऱ्यांचा लढा यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी दर मिळावा, या मागणीसाठीही त्यांनी संघर्ष केला होता. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी नाना पाटलांनी खूप परिश्रम घेतले होते. शेतकरीवर्गासाठी त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन १९५५ मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. किसान सभेच्या वतीने सोव्हिएत युनियन व पूर्व युरोपीय राष्ट्रांच्या भेटीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा चळवळींना पाठिंबा

कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषदेने संस्थानी कारभाराविरुद्ध जी चळवळ उभारली होती, त्या चळवळीस क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. तसेच मराठवाड्यातील जनतेने चालविलेल्या रझाकारविरोधी चळवळीला त्यांनी सहकार्य व साहाय्य दिले होते. कर्नाटकात समाविष्ट करण्यात आलेल्या मराठी भाषिक प्रदेशाचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे म्हणून जो सीमालढा उभारण्यात आला होता, त्यामध्येही त्यांचा सहभाग होता.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. या आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांनी कारावास भोगला होता. त्यांचे वक्तृत्व अतिशय प्रभावी असल्याने ग्रामीण समाजात लोकजागृतीचे कार्य त्यांनी परिणामकारकपणे केले होते. अनेक जनआंदोलनांत त्यांनी भाग घेतला होता. भारताच्या लोकसभेवर त्यांची सन १९५७ व १९६७ मध्ये अशी दोन वेळा निवड झाली होती.

उभ्या महाराष्ट्राला ललामभूत ठरलेला हा पुरोगामी विचारवंत, क्रांतिकारक योद्धा, सत्शील राजकारणी आणि जनसामान्यांना आपल्यातील एक वाटणारा असामान्य सामान्य पुरुष ६ डिसेंबर, १९७६ रोजी दिवंगत झाला.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

AI म्हणजे काय?| What is Ai? MAYA OS info in marathi ताऱ्यांचे प्रकार १० तेजस्वी तारे