नाव | मुरलीधर देवीदास आमटे |
टोपण नाव | बाबा आमटे |
जन्मतारीख | २६ डिसेंबर, १९१४ |
जन्मगाव | हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र |
पत्नी | साधना आमटे |
अपत्ये | प्रकाश आमटे, विकास आमटे |
निवासस्थान | आनंदवन चंद्रपूर |
मृत्यू | ९ फेब्रुवारी २००८ |
मुद्दे
अल्प परिचय
बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव आहे- मुरलीधर देवीदास आमटे. २६ डिसेंबर, १९१४ हा बाबांचा जन्मदिनांक. एक थोर समाजसेवक म्हणून बाबा उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी त्यांनी चालविलेले कुष्ठरोग निर्मूलनाचे आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अद्वितीय असे आहे.
“जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।।”
संत तुकाराम यांचा एक अभंग
महारोग्यांची सेवा हेच जीवनव्रत
खरे तर, बाबा आमटे हे व्यवसायाने वकील होते; पण ऐन उमेदीत आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी व त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी महारोग्यांच्या सेवाकार्याला वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावाजवळ ‘आनंदवन’ या नावाने एक वसाहत स्थापन केली. या वसाहतीत महारोग्यांच्या पुनर्वसनाच्या कार्याला प्रारंभ केला. महारोग हा एक भयानक रोग समजला जातो. एखाद्याला या रोगाचा उपसर्ग झाला तर तो दुर्दैवी जीव माणसातूनच उठतो. समाजातील इतर लोकच नव्हे तर अगदी जवळचे नातेवाईकही त्या व्यक्तीला थारा देण्यास तयार नसतात. अशा दुर्दैवी जिवांना आश्रय देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मायेचा हात देण्यासाठी व त्यांच्या जीवनात नव्याने उभारी आणण्यासाठी बाबा आमटे यांनी ‘आनंदवना’ची स्थापना केली.
कुष्ठरोग्यांना मानसिक आधार
बाबा आमटे यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, कुष्ठरोग्यांवर केवळ उपचार करण्यापुरतीच आपल्या कार्याची व्याप्ती मर्यादित न ठेवता त्यांनी कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देण्याचे, त्यांच्यातील आत्मविश्वास जागविण्याचे, त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर बनविण्याचे आणि या मागनि त्यांचे पुनर्वसन घडवून आणण्याचे उद्दिष्ट मनाशी बाळगले आहे. बाबांनी आनंदवनात मूळच्या खडकाळ जमिनीवर शेतीचे विविध प्रयोग सुरू केले.
- राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी
- स्वामी दयानंद सरस्वती माहिती मराठी
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे माहिती मराठी
ही शेती पिकविण्याचे काम येथील कुष्ठरोगीच करतात. शेतीतील शारीरिक कष्टाची व अन्य स्वरूपाची सर्व कामे या वसाहतीमधील रहिवासी करताना दिसतात. त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला, फळे व अन्नधान्य यांचे उत्पन्न काढले जाते. शेतीच्या जोडीनेच इतर काही हस्तव्यवसायही तेथे चालविले जात आहेत. बाबा आमटे यांनी या कार्यासाठी कोणाकडूनही देणगी न घेता स्वावलंबनावरच सर्व भिस्त ठेवली आहे. ‘दान घेतले की कार्याचा नाश होतो’ असा त्यांचा सिध्दान्त आहे.
“देवही दिसला नि आत्माही मिळाला”
कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा व कुष्ठरोम्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त व्हावे, असाही बाबांचा प्रयत्न आहे. ते स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा म्हणजे ईश्वरसेवाच होय, या भावनेने कार्य करीत आले आहेत. बाबांची ही भावना त्यांच्या एका वचनातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. ते म्हणतात, “मी देवाच्या शोधात गेलो. देव मला सापडला नाही. मी आत्म्याच्या शोधात गेलो. आत्मा मला सापडला नाही. मग मी माझ्या भावांच्या सेवेला गेलो, तेथे मला देवही दिसला नि आत्माही मिळाला,”
आदिवासींसाठीही सेवाकार्य
बाबा आमटे यांनी ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन केली आहे. तिच्या वतीने आनंदवनाखेरीज अशोकवन-नागपूर, सोमनाथ-मूल, नागेपल्ली-हेमलकसा हे प्रकल्पही चालविले जातात. याच समितीच्या वतीने लोकबिरादरी-हेमलकसा येथे आदिवासींच्या विकासाचा प्रकल्पही चालविला जातो. त्यामार्फत आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते
बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने त्यांनी १९८५-८६ मध्ये शंभर दिवसांचे ‘भारत जोडो’ अभियान पार पाडले. हे अभियान म्हणजे देशातील जनतेला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी योजलेली भारत-यात्राच होती. पंजाबच्या प्रश्नाचा गुंता सोडविण्यासाठी तेथील शीख जनतेच्या भावनांवर फुंकर घालून तिच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे आणि त्यायोगे तिला परत राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. ही गोष्ट साध्य करता यावी म्हणून पंजाबात अशांत परिस्थिती असतानादेखील त्यांनी पंजाबला भेट दिली आणि शिखांच्या प्रमुख नेत्यांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला.
स्वतंत्र विदर्भ संकल्पना अमान्य
राष्ट्रीय एकात्मतेच्या या कट्टर पुरस्कर्त्याचा प्रांतवाद, भाषावाद व संकुचित प्रादेशिक दृष्टिकोनास तीव्र विरोध आहे. साहजिकच, अलीकडील काळात वारंवार पुढे येणाऱ्या ‘स्वतंत्र विदर्भा’ च्या मागणीसाठी त्यांचा विरोध आहे.
सामाजिक न्याय व पर्यावरण संरक्षण
सामाजिक न्याय व पर्यावरणरक्षण हे प्रश्नही बाबांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. नर्मदा नदीवर मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांत ‘नर्मदा सागर’ आणि ‘सरदार सरोवर’ ही दोन मोठी धरणे बांधण्याची योजना सरकारने आखली आहे. परंतु या प्रकल्पांमुळे तेथील गरीब आदिवासी जनता आणि सामान्य शेतकरी मोठ्या संख्येने विस्थापित होण्याचा धोका आहे. या विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करण्यासंबंधी मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सरकारांनी पुरेशी काळजी घेतलेली नाही.
तसेच वरील प्रकल्पांमुळे वरील राज्यांतील जंगलांचे फार मोठे क्षेत्र पाण्याखाली जाऊन नैसर्गिक पर्यावरणाचा तोल ढळण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘नर्मदा बचाव’ आंदोलन उभारले आहे. बाबा आमटे यांनीही या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ प्राप्त झाले आहे.
बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार
समाजातील उपेक्षित घटक व कुष्ठरोगी यांच्यासाठी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाले आहेत. सन १९८५ मध्ये त्यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पारितोषिक मिळाले. १९८६ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तथापि, नर्मदा बचाव आंदोलनाच्या दरम्यान मध्य प्रदेश व गुजरात शासनाने स्थानिक आदिवासींवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी तो १९९१ मध्ये शासनास परत केला.
पहिल्या ‘जे. डी. बिर्ला पुरस्कारा’चे ते मानकरी ठरले आहेत. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांना १९८८ चा ‘मानवी हक्क पुरस्कार’ मिळाला आहे. याच मानवतावादी कार्याबद्दल त्यांना १९९० चा ‘टैपल्टन पुरस्कार’ ही प्रदान केला गेला. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासमवेत ते १९९१ च्या ‘राईट लाइव्हलीहुड अॅवॉर्ड’ चेही मानकरी ठरले आहेत.
सन १९९९ मध्ये बाबांना केंद्र सरकारच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारा’ने सन्मानित केले गेले. त्याच वर्षी ‘आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारा’नेही त्यांना गौरविले गेले. सन २००२-०३ च्या ‘महाराष्ट्र-भूषण’ या राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारानेही बाबांना सन्मानित करण्यात आले आहे. खरे तर, बाबांना मिळालेल्या अन् मिळणाऱ्या सन्मानांची नोंद ठेवणे कठीण जावे, इतके सन्मान-पुरस्कार बाबांना मिळाले आहेत- मिळत आहेत; पण ते सर्व सन्मान पुरस्कार तोकडे पडावेत इतके बाबांचे कार्य व त्याग महान आहे.
बाबा आमटेंची ग्रंथसंपदा
एक संवेदनक्षम कवी व लेखक म्हणूनही बाबा आमटे ज्ञात आहेत. ‘ज्वाला आणि फुले’ व ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘माती जागवील त्याला मत’ हे त्यांचे आणखी एक प्रसिद्ध पुस्तक.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!