भाई माधवराव बागल यांचा परिचय
भाई माधवराव बागल यांचा जन्म २८ मे, १८९६ रोजी झाला, त्यांचे वडील खंडेराव बागल सत्यशोधक चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते होते; त्यामुळे भाई बागल हेदेखील सत्यशोधक चळवळीकडे आकृष्ट झाले. सत्यशोधक समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून ते मान्यता पावले.
सत्यशोधक चळवळीत सहभाग
माधवराव बागल यांच्यावर महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रत्यक्ष सहवासात राहण्याची संधीही त्यांना मिळाली होती. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जागृत करून त्याला संघटित बनविण्यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळीत भाग घेतला. सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य त्यांनी अनेक वर्षे केले. सत्यशोधक कार्यकर्ते या नात्याने त्यांनी धार्मिक कर्मकांडाला विरोध केला आणि पुरोहितवर्गाचा समाजातील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
जातिभेदास विरोध
भाई बागल हे पुरोगामी विचारांचे नेते होते. त्यांनी अस्पृश्यता व जातिभेद यांना विरोध केला. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. ते स्वतः नास्तिक होते; परंतु अस्पृश्यांना समाजातील इतर वर्गांच्या बरोबरीचे हक्क मिळाले पाहिजेत, या तात्त्विक भूमिकेतून त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला होता.
आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार
समाजातील जातिभेद दूर व्हावेत आणि उच्चवर्णीयांना लाभलेले विशेषाधिकार नष्ट व्हावेत यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. हिंदू धर्मातील जातिभेदामुळे त्यांनी हिंदू धर्मावर कठोर शब्दांत प्रहार केले होते. हिंदू धर्मासारखा अन्यायकारक आणि बुरसटलेल्या विचारसरणीचा दुसरा कोणताही धर्म नाही, असे त्यांचे मत होते. हिंदू धमपिक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे, कारण बौद्ध धर्म समता व मानवतावादावर आधारित आहे; म्हणून अस्पृश्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा, असे त्यांनी म्हटले होते. जन्माधिष्ठित भेदभावांना मुळीच स्थान असता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. हे भेदभाव दूर करण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता. असे विवाह घडवून आणण्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता.
प्रजा-परिषदेची स्थापना
भाई बागलांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानी प्रजेवर होत असलेल्या अन्याय व जुलूमजबरदस्तीविरुद्ध त्यांनी आवाज उठविला होता. या अन्यायाचा सामूहिक प्रतिकार करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्रजा-परिषदेची स्थापना केली होती. प्रजा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संस्थानाच्या अन्यायी व जुलमी कायदेकानूंविरुद्ध संघर्ष केला होता. या संघर्षाची त्यांना स्वतःला बरीच झळ पोहोचली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलाही भरण्यात आला होता. कोल्हापूर संस्थानचे विलीनीकरण झाल्यावर तेथे स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर माधवराव बागलांनी काही काळ शेतकरी कामगार पक्षाचे कार्य केले. त्या पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते. पण पुढील काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्राला व बहुजन समाजाला एक प्रभावी नेतृत्व लाभले आहे. म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत वागलांनी व्यक्त केले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव, निपाणी, कारवार या मराठी भाषिक प्रदेशाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून जो सीमालढा उभारण्यात आला होता त्या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्याबद्दल त्यांनी कारावासही भोगला होता.
प्रतिभासंपन्न पण परखड नेतृत्व
भाई माधवराव बागल यांच्यावर काही प्रमाणात मार्क्सवादाचाही प्रभाव होता. कामगार व समाजातील इतर दुर्बल घटक यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला होता. कोल्हापुरातील शाहू मिलच्या कामगार संघाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. एक सिद्धहस्त लेखक, झुंजार पत्रकार व प्रतिभासंपन्न चिश्नकार म्हणूनही ते प्रख्यात होते. ‘हंटर’ व ‘अखंड भारत’ या नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांची लेखणी अतिशय परखड होती.
समाजातील अंधश्रद्धा व देवभोळ्या समजुती यांवर त्यांनी आपल्या लिखाणातून जोरदार हल्ले चढविले होते. आपल्या टीकाकारांना त्यांनी “होय, मी हिंदू धर्माचा द्वेष्टा आहे. मी सत्यशोधक आहे म्हणून मी नास्तिकही आहे. मी कोणत्याही देवाला मानत नाही,” असे उत्तर दिले होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
भाई बागलांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याच्या गौरवार्थ भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. शिवाजी विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र’ ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
मृत्यू – ६ मार्च, १९८६.
ग्रंथसंपदा
स्वराज्याचा शत्रू, बहुजन समाजाचे शिल्पकार, बेकारी व तीवर उपाय, समाजसत्ता की भांडवलशाही, मार्क्सवाद, सुलभ समाजवाद, कला आणि कलावंत, शाहू महाराजांच्या आठवणी, नव्या पिढीचे राजकारण, जीवनप्रवाह इत्यादी.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!