सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती | Savitribai Phule Information in Marathi

google-news-icon
जन्म ३ जानेवारी १८३१
मृत्यू १० मार्च १८९७
जन्मस्थान नायगाव ता. खंडाळा, जि. सातारा
पती महात्मा जोतीबा फुले
संस्था सत्यशोधक समाज
कार्य स्त्री-शिक्षण
अस्पृश्यांसाठी शाळा
बालहत्या प्रतिबंध
अनाथ बालकांचे संगोपन

सावित्रीबाई फुले -अल्प परिचय

महात्मा जोतीबा फुले यांच्या पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले महाराष्ट्राला परिचित आहेतच. तथापि, त्यांचा परिचय तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. समाजसुधारणेच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी स्वकर्तृत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी झाला. त्या नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत. नेवसे- पाटील यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. साहजिकच सावित्रीबाईचे बालपण मोठ्या मजेत गेले. तथापि, त्या वेळच्या प्रथेप्रमाणे त्या लहान असतानाच घरच्या मंडळींनी त्यांच्यासाठी वरसंशोधनास प्रारंभ केला होता. सन १८४० मध्ये त्यांचे जोतीबा फुले यांच्याशी लग्न झाले त्या वेळी जोतीबा फुले यांचं वय तेरा वर्ष, तर सावित्रीबाई फुलेंचे वय नऊ वर्ष होते.

सावित्रीबाई फुलेंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यात त्यांना मनापासून साथ दिली. स्त्री- उद्धाराच्या कार्यात तर त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरीने वाटा उचलला. स्त्री-शिक्षण, अस्पृश्यांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन यांसारख्या कामांत त्यांनी जोतीबांना निष्ठेने साथ दिली. वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सहन केली.

सावित्रीबाई फुले -पहिल्या महिला शिक्षिका

महात्मा जोतीबा फुले यांनी १८४८ मध्ये पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या शाळेत अस्पृश्यांच्या मुलीही शिकत असत. स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा तत्कालीन समाजाच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा होता. त्यामुळे जोतीबांच्या कार्याला चोहोबाजूंनी फार मोठा विरोध झाला. पण कितीही संकटे कोसळली तरी आपल्या निश्चयापासून ढळायचे नाही, असा निर्धारच त्यांनी केला होता. त्यांच्या शाळेत स्वतः जोतीबा शिक्षक म्हणून काम करीत होते.

तथापि, अस्पृश्य मुली शिकत असलेल्या शाळेत काम करण्यासाठी त्यांना दुसरा शिक्षकही मिळेना तेव्हा जोतीबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वत: घरी लिहिण्या-वाचण्यास शिकविले व नंतर त्यांचीच शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली. त्यांना पहिल्या ‘भारतीय शिक्षिका’ म्हणता येईल.

समाजाकडून अवहेलना

जोतीबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करावी आणि आपल्या पत्नीस शिक्षिकेचे काम करावयास लावावे याचा पुण्यातील काही वेगळी विचारधारा असणाऱ्या लोकांना अतिशय संताप आला. त्यांनी सावित्रीबाईंना येनकेन प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली.

सावित्रीबाई शाळेत जात-येत, तेव्हा काही लोक रस्त्यात उभे राहून सावित्रीबाईंना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरत आणि त्यांची निंदानालस्ती करीत. काही जणांनी तर त्यांच्या अंगावर खडे मारण्यापर्यंत व चिखल-शेण फेकण्यापर्यंत मजल मारली. पण इतकी अवहेलना व विटंबना होऊनदेखील सावित्रीबाईंनी आपल्या अंगीकृत कार्यापासून माघार घेतली नाही. आपल्या पतीप्रमाणे त्यांनीही स्वतःचे कार्य निष्ठेने चालू ठेवले.

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुलेंचं सहकार्य

आपण देत असलेल्या उपद्रवाला जोतीबा व सावित्रीबाई मुळीच दाद देत नाहीत, पाहून काही सनातनी मंडळींनी एक निराळाच डाव टाकला. जोतीबांचे वडील असे गोविंदराव हे जुन्या वळणाचे गृहस्थ होते; याचा फायदा उठविण्याचे या मंडळींनी ठरविले. त्यांनी गोविंदरावांच्या मनात भरविले, की सुनेने शिक्षण घेणे आणि शाळेत शिकविण्याचे काम करणे हे धर्मविरोधी कृत्य होय. अशाने घराण्याची अब्रू तर जाईलच; पण आपल्या धर्मालाही काळिमा लागेल.

यावर गोविंदरावांनी आपल्या मुलाची व सुनेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण आपल्या प्रयत्नाला यश येत नाही असे दिसताच त्यांनी जोतीबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले. ही खरे तर सावित्रीबाईंच्या सत्त्वपरीक्षेची वेळ होती; पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही त्या मुळीच डगमगल्या नाहीत. आपल्या पतीचे कार्य हे एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे, असा त्यांचा विश्वास होता; त्यामुळे स्त्री-शिक्षणाच्या कार्यात त्यांनी जोतीबांना मनापासून साथ दिली.

सावित्रीबाई फुलेंचे अस्पृश्यतेसंदर्भातील विचार

स्त्री-शिक्षणाप्रमाणेच जोतीबांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यातही सावित्रीबाईचा सहभाग होता. अस्पृश्यतेच्या प्रथेबाबत त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे- “सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत, हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार-मांग नीच म्हणून स्पृश्य- अस्पृश्यता मानणे मूर्खपणाचे आहे.”

“जे लोक असे मानतात व तिचे देव्हारे माजवितात त्यांना ईश्वराचे सत्यस्वरूप कधीच ओळखता येणार नाही. उच्च जाती, नीच जाती ही ईश्वरकृत नाहीत. स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले हे पाखंडी तत्त्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवास अस्पृश्य मानणे हे मनुष्यत्वाचे लक्षण नाही. म्हणून अस्पृश्यतेचा प्रत्येक व्यक्तीने धिक्कार करणे यातच प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे किंवा कोणत्याही मानवी संस्कृतीचे परमकल्याण आहे.”

वरील उताऱ्यावरून सावित्रीबाईंचे विचार किती उदात्त व मानवतावादी होते याची कल्पना येते. विशेष म्हणजे ज्या वेळी अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन हा येथील समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनला होता आणि त्यामध्ये काहीतरी वावगे आहे असे फारसे कोणाला वाटतही नव्हते, त्या एकोणिसाव्या शतकात पारंपरिक वातावरणात वाढलेल्या एका स्त्रीने अशा प्रकारचे विचार व्यक्त करावेत यातच सावित्रीबाईंच्या मोठेपणाचे रहस्य आपणास सापडू शकेल.

सावित्रीबाई फुलेंनी अस्पृश्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. त्या म्हणतात, “अज्ञान, गतानुगतिकता, भ्रामक समजुती यांच्या विळख्यात गुरफटलेल्या शूद्रातिशूद्रांस शिक्षणानेच जाणीव होईल. म्हणून शिक्षण घेण्यास टाळाटाळी आपल्या हातून झाल्यास आपण भोगीत असलेली दुर्दशा पुढील पिढीस भोगणे क्रमप्राप्त ठरेल.

सावित्रीबाई फुले-बालहत्या प्रतिबंधगृहाचे कार्य

महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी कृती करण्याची गरज वाटू लागली. त्या काळी विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे एक प्रकारे नरकयातना भोगण्याची शिक्षा होती. समाजाकडून त्यांना अतिशय वाईट प्रकारची वागणूक दिली जात असे. विधवा स्त्रीचे दर्शनदेखील अशुभ मानले जात असे. त्यातून एखाद्या विधवा स्त्रीने तारुण्यसुलभ भावनेच्या आहारी जाऊन काही गैरकृत्य केले आणि त्यातून तिच्यावर अनवस्था प्रसंग ओढवला, तर अशा वेळी त्या दुर्दैवी स्त्रीपुढे आत्मघात किंवा भृणहत्या याशिवाय अन्य पर्याय उरत नसे.

अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार मिळवून देण्यासाठी महात्मा फुल्यांनी १८६३ मध्ये एक ‘बालहत्या प्रतिबंध गृह’ सुरू केले. त्यासंबंधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले होते की, ‘विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. तुमच्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल.’

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या बालहत्या प्रतिबंध गृहातील मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीबाई करीत. या अनाथ मुलांवर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्यांची सर्व प्रकारची सेवा करीत. त्यांना स्वतःला अपत्य नव्हते. पण या बालहत्या प्रतिबंध गृहातील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपलीच मुले मानले होते. पुढे अशाच एका अनाथ मुलाला त्यांनी दत्तक घेतले. पतीच्या निधनानंतरही कार्य

२८ नोव्हेंबर, १८९० रोजी जोतीबारावांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी पुढे चालवावयाचे, असा प्रश्न निर्माण झाला. पण या बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. १८९० ते १८९७ या काळात सत्यशोधक समाजाची सासवड येथे एक परिषद भरली होती. या परिषदेच्या अध्यक्षा सावित्रीबाईच होत्या. महात्मा फुले यांच्यानंतर त्यांची वैचारिक परंपरा खंडित होणार नाही, हे पाहण्याचे काम सावित्रीबाईंनी केले.

सावित्रीबाई फुले यांचे हे कार्यकर्तृत्व पाहता एकोणिसाव्या शतकात समाजातील दीनदुर्बल घटकांसाठी इतके महान कार्य करणारी दुसरी स्त्री झाली नाही असेच म्हणावे लागते. महाराष्ट्रातील स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या त्या खऱ्या अर्थाने अग्रणी होत्या.

ग्रंथसंपदा

सावित्रीबाई फुले या लेखिका व कवयित्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या. काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर, मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी इत्यादी साहित्यरचना त्यांच्या नावावर जमा आहे. यांपैकी ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

पहिली महिला शिक्षिका कोण होत्या?

सावित्रीबाई फुले या पहिली महिला शिक्षिका होत्या.


सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कुठे काढली?

पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू करण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले समाजसुधारक आहेत का?

हो. त्यांनी समाजातील अस्पृश्य आणि मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले आहे. समाजाची अवहेलना सहन करत त्यांनी ही कार्य केले आहे.

भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली?

भारतात पहिल्यांदा मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात केली होती.

सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक पात्रता काय आहे?

सावित्रीबाई फुले यांना त्यांचे पाती ज्योतिबा फुले यांनी लग्नानंतर शिकवले.

सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली?

त्यांनी पहिली शाळा पुण्यात भिडे यांच्या वाड्यात १८४८ साली सुरू केली.

सावित्रीबाईंचे लग्न कोणत्या वयात झाले?

त्यांचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी झाले.

Leave a Comment