डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी | Dr. Panjabrao Deshmukh Information in Marathi

google-news-icon

dr panjabrao deshmukh information, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन व कार्य, डॉ पंजाबराव देशमुख माहिती

जन्म २७ डिसेंबर, १८९८
जन्मगाव पापळ जि अमरावती
वडिलांचे नाव श्यामराव देशमुख
आईचे नाव राधाबाई देशमुख
पत्नीचे नाव विमलाबाई देशमुख
शिक्षण एम. ए. एडिंबरो विद्यापीठ
डी.लिट ऑक्सफर्ड विद्यापीठ
कार्य अस्पृश्य, शेतकरी आणि दुर्बल घटकांसाठी काम केले
मृत्यू १० एप्रिल १९६५

डॉ. पंजाबराव देशमुख परिचय

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर, १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव व आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांचे घराणे वतनदार देशमुखांचे होते. त्यांचे मूळ आडनाव कदम असे होते; पण त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुख आडनाव प्राप्त झाले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी पापळ येथेच झाले. परंतु त्या ठिकाणी पुढील शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना आपल्या शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकंती करावी लागली. अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून सन १९१८ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

मॅट्रिक झाल्यावर डॉ. पंजाबराव देशमुख उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले. तेथे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला; पण पदवी संपादन करण्यापूर्वीच त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम. ए. व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी.लिट या पदव्या मिळविल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आली. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी बार-ॲट-लॉ ची पदवीही संपादन केली. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर ते जुलै, १९२६ मध्ये भारतात परतले.

भारतात आल्यावर पंजाबरावांनी प्रथम अमरावती येथे वकिलीस प्रारंभ केला; परंतु लवकरच त्यांनी. सार्वजनिक जीवनातही प्रवेश केला. ते पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी त्या काळातही मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई नावाच्या मुलीशी विवाह केला. या आंतरजातीय विवाहाने विदर्भातील मराठी समाजात मोठीच खळबळ माजविली; पण पंजाबरावांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. पुढील काळात डॉ. पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात विमलाबाईंची अत्यंत मोलाची साथ मिळाली.

डॉ. पंजाबराव देशमुखांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वाची व सन्मानाची पदे भूषविली होती. सन १९२८ मध्ये अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले, तर १९३० मध्ये प्रांतिक कायदेमंडळावर त्यांची निवड झाली. याच वेळी ते प्रांताच्या मंत्रिमंडळात शिक्षण, कृषी व सहकार खात्याचे मंत्री बनले. तथापि, १९३३ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे ते अमरावती मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. काही काळ त्यांनी देवास संस्थानात राजकीय मंत्री म्हणूनही काम पाहिले.

१९४६ मध्ये भारताची घटना समिती अस्तित्वात आली. या घटना समितीचे सभासद म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी काम केले. भारताच्या लोकसभेवर त्यांची १९५२ मध्ये, १९५७ मध्ये व पुढे १९६२ मध्ये अशी तीन वेळा निवड झाली. १९५२ ते १९६२ या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. मंत्रिपदावर असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर काम केले होते. जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. आपल्या देशाची व समाजाची सेवा करण्यासाठीच त्यांनी या पदांचा वापर केला. १० एप्रिल, १९६५ रोजी त्यांचे निधन झाले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख हे प्रामुख्याने राजकीय नेते म्हणून ओळखले तरी त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली होती. जात असले समाजातील अनिष्ट चालीरीती व रूढी नष्ट करण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला होता. हिंदू धर्मातील जातिभेदाला त्यांनी विरोध केला होता.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध विशेषतः अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेविरुद्ध आवाज उठविला. नोव्हेंबर, १९२७ च्या १३ व १४ या तारखांना त्यांच्याच प्रयत्नांतून अमरावतीतील ‘इंद्रभुवन थिएटर’ मध्ये ‘वऱ्हाड अस्पृश्य परिषद’ भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविले होते. सन १९२८ मध्ये अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या होत्या.

त्या वर्षीच त्यांनी अमरावतीचे अंबाबाई मंदिर अस्पृश्यांना खुले करावे म्हणून सत्याग्रह केला होता. महाराष्ट्रात गांधीवादी कार्यकर्त्यांनी मंदिरप्रवेशाची चळवळ हाती घेण्याच्या अगोदरच डॉ. पंजाबराव देशमुख यांनी या कार्याला प्रारंभ केला होता. यावरून त्यांना अस्पृश्यांच्या प्रश्नांविषयी वाटत असलेली तळमळ स्पष्ट होते. अमरावती येथे त्यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले होते. या छात्रालयात सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असे. याशिवाय मागासलेल्या जातिजमातींच्या उन्नतीसाठी त्यांनी ‘अखिल भारतीय मागास जातिसंघा’ची स्थापना केली होती.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक कार्य

कर्मवीर भाऊराव पाटलांनी शैक्षणिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे कार्य केले तसेच कार्य डॉ पंजाबराव देशमुखांनी विदर्भात केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची आवश्यकता ध्यानात घेऊन पंजाबरावांनी त्या कार्यावर आपले लक्ष केंद्रित केले. सन १९२६ मध्ये त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय सुरू करून त्या ठिकाणी सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली.

डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले. तसेच जादा कर बसवून त्या मार्गाने गोळा होणारा पैसा शिक्षणासाठी खर्च करण्याची योजना आखली. १९३० मध्ये प्रांतिक सरकारात शिक्षणमंत्री म्हणून कार्य करताना, ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता त्यांनी अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या.

पंजाबरावांनी १९३२ मध्ये अमरावती येथे ‘श्रीशिवाजी शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. या शिक्षणसंस्थेच्या वतीने विदर्भात अनेक शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे सुरू करण्यात आली. त्यामुळे बहुजन समाजात मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार होऊ शकला. शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या हिताचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे, हे पंजाबरावांनी ओळखले होते. त्या जाणिवेतूनच त्यांनी ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ’ या संघटनेची स्थापना केली आणि तिच्यामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख हे शेतकरी कुटुंबातून आले होते. साहजिकच, शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दैन्य, कर्जबाजारीपणा, मागासलेपणा इत्यादी गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. म्हणून शेतकरीवर्गाची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय त्यांनी केला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंजाबरावांनी १९२७ मध्ये ‘शेतकरी संघा’ची स्थापना केली.

या संघाच्या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्रकेसरी’ हे वृत्तपत्र चालविले. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले. शेतकऱ्यांचे अज्ञान, दारिद्र्य व मागासलेपण दूर व्हावे, त्यांच्यावर वर्षानुवर्षे होत आलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे, सावकार, व्यापारी व दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी आणि त्यांच्या उत्पादनाला वाजवी भाव मिळावा यासाठी पंजाबराव नेहमीच प्रयत्नशील राहिले.

कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ पंजाबराव देशमुखांचा १९५२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांच्यावर कृषिखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या पदावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आखल्या व त्या यशस्वीरीत्या राबविल्या. शेतीव्यवसायात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. भारतीय शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा म्हणून त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले.

त्या दृष्टीने परदेशांतील शेतीव्यवसायाचा अभ्यास करण्याची आणि त्यातील चांगल्या प्रयोगांचे या ठिकाणी अनुकरण करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. या काळात भारतातील शेतकऱ्यांनी जपानी भातशेतीच्या प्रयोगाचा अवलंब करून आपले उत्पादन वाढवावे यासाठी त्यांनी देशव्यापी मोहीम उघडली. शेतीव्यवसायाची भरभराट होऊन आपल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, असा ध्यास त्यांनी घेतला होता.

भारत कृषक समाज

शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी आणि त्यांना निरनिराळ्या बाबतत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पंजाबराव देशमुखांनी १९५५ मध्ये ‘भारत कृषक समाजा’ची स्थापना केली. त्याच्या विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघा’ची स्थापना झाली; याशिवाय भारत कृषक समाजाने आणखीही काही संस्था स्थापन करून येथील शेतीव्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्त करून देण्याचे व शेतकऱ्यांच्या अडीअडचणींचे निवारण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. महाराष्ट्रातील एकूण सहकारी चळवळीच्या विकासातील व त्यातही शेतीक्षेत्रातील सहकारी चळवळीच्या विकासातील पंजाबरावांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख हे विदर्भातील बहुजन समाजाचे एक प्रमुख नेते होते. त्यांनी बहुजन समाजाच्या व शेतकरीवर्गाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य केले. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर खटपट केली. विदर्भातील बहुजन समाजाच्या जागृतीचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. महाराष्ट्रात महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या समाजसुधारकांनी बहुजन समाजास जागृत करून त्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे जे बहुमोल कार्य केले तोच वारसा डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढे चालविला. म्हणून महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश केला जातो.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment