महाराज सयाजीराव गायकवाड संपूर्ण माहिती मराठी | Maharaja Sayajirao Gaekwad Information in Marathi

google-news-icon

sayajirao gaekwad information in marathi, सयाजीराव गायकवाड यांचे कार्य, maharaja sayajirao gaekwad information in marathi,

नाव गोपाळराव गायकवाड (खरे नाव)
संस्थान बडोदा
जन्म ११ मार्च १८६३
जन्मगाव कवळाणे जि नाशिक महाराष्ट्र
वडील काशीराव गायकवाड
भाऊ आनंदराव, संपतराव
कार्य सर्व समाजघटकांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण
शिक्षणाचा प्रसार
बालविवाह बंदी
अस्पृश्यता निवारण
विधवाविवाह
हिंदू कायदा
घटस्फोट संबंधी कायदा
मृत्यू ६ फेब्रुवारी १९३९

महाराज सयाजीराव गायकवाड- परिचय

महाराजा सयाजीराव गायकवाड हे गुजरातमधील बडोदा या संस्थानचे राजे होते. तथापि, आपले अधिकार व सत्ता यांचा वापर राज्यातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करणारे जे काही मोजकेच संस्थानिक या देशात होऊन गेले. अशा संस्थानिकांमध्ये सयाजीराव गायकवाड यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

आपल्या लोककल्याणकारी भूमिकेद्वारे त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळीला मोठीच चालना दिली. त्यांच्या एकंदर कार्याचा महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीलाही बराच लाभ झाला होता. महाराष्ट्रात समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सयाजीराव गायकवाड यांनी सक्रिय मदत केली होती; म्हणून त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घेणे आवश्यक ठरते.

११ मार्च, १८६३ रोजी सयाजीरावांचा जन्म झाला. नाशिक जिल्ह्यातील कवळाणे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील काशीराव गायकवाड हे आपल्या कवळाणे या गावी शेतीचा व्यवसाय करीत होते. काशीरावांना आनंदराव, गोपाळराव व संपतराव असे तीन मुले होती. त्यांच्या घराण्याचा बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी दूरचा संबंध होता.

बडोदा संस्थानचे राजे खंडेराव गायकवाड यांचे १८७० मध्ये निधन झाले. त्यांना औरसपुत्र नसल्याने त्यांच्यामागून त्यांचे बंधू मल्हारराव गायकवाड हे बडोद्याच्या गादीवर आले. परंतु मल्हारराव व बडोद्याचे तत्कालीन रेसिडेंट कर्नल फ्रेयर यांच्यात बेबनाव उत्पन्न झाला. लवकरच इंग्रजांनी मल्हाररावांना दुर्वर्तनाच्या आरोपावरून गादीवरून काढून टाकले आणि बडोदा संस्थानचा कारभार काही काळासाठी आपल्या हाती घेतला.

पुढे खंडेराव गायकवाडांच्या विधवा पत्नी जमनाबाई यांनी हिंदुस्थानच्या सरकारकडून दत्तक घेण्याचा अधिकार मिळविला. त्यानुसार जमनाबाईंनी कवळाणेचे काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव यास २७ मे, १८७५ रोजी दत्तक घेतले आणि त्याचे नाव सवाजीराव असे ठेवले, अशा प्रकारे सवाजीराव बडोदा संस्थानचे राजे बनले.

सयाजीरावांचे सर्व बालपण खेडेगावात गेले होते. तेथील वातावरणामुळे आणि घरच्या गरिबीमुळे त्यांना लहान वयात शिक्षणाची संधी मिळाली नव्हती, तेव्हा बडोद्यात आल्यावर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. अल्पावधीतच त्यांनी मराठी, इंग्रजी, गुजराती व उर्दू भाषांचे शिक्षण पूर्ण केले. तसेच घोडेस्वारी, राजघराण्यातील रीतिरिवाज, राज्यकारभारातील बारकावे इत्यादी गोष्टीही त्यांनी आत्मसात केल्या. बडोदा संस्थानचे त्या वेळचे दिवाण राजा सर टी. माधवराव यांच्याकडून त्यांना राजकारणाचे शिक्षण मिळाले.

सयाजीराव गायकवाड यांचा राज्याभिषेक समारंभ २८ डिसेंबर, १८८१ रोजी झाला. त्यांनी एकंदर चौसष्ट वर्षे राज्य केले. पण आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर त्यांनी सदैव प्रजेच्या कल्याणासाठीच केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. अनेक लोकोपयोगी कामे केली. गरजू व लायक व्यक्तींना अनेक प्रकारे साहाय्य केले. आपल्या राज्यातील गोरगरीब प्रजेच्या हिताकडे लक्ष देऊन एक ‘प्रजाहितदक्ष राजा‘ असा लौकिक त्यांनी संपादन केला.

६ फेब्रुवारी, १९३९ रोजी मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.

महाराज सयाजीराव गायकवाड यांचे प्रशासकीय कार्य

बडोदा संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या मदतीने सयाजीराव गायकवाड यांनी प्रथम राज्ययंत्रणेत सुरळीतपणा आणला. त्याकरिता प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू केले. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून अनेक उपाययोजना केल्या. राज्याच्या न्यायव्यवस्थेतही त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. परंतु एवढ्यावरच संतुष्ट न होता सयाजीरावांनी लोककल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या व त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.

महाराज सयाजीराव गायकवाड यांचे शिक्षणविषयक कार्य

आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी सयाजीराव गायकवाड सतत प्रयत्नशील राहिले. विशेषतः बहुजन समाज व मागासलेले वर्ग यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्याकरिता १८९३ मध्ये त्यांनी बडोदा संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षण योजनेची सुरुवात केली आणि क्रमाक्रमाने या योजनेची व्याप्ती वाढवीत नेऊन १९०६ मध्ये संपूर्ण संस्थानात ती अमलात आणली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले राज्य होय. या एकाच गोष्टीवरून सयाजीराव गायकवाड यांच्या या कार्याचे महत्त्व व त्यांचे द्रष्टेपण स्पष्ट होते.

स्त्रिया व मागासवर्गीयांच्या शिक्षणाकडेही सयाजीरावांनी विशेष लक्ष पुरविले आणि त्यासाठी स्वतंत्र सोयी उपलब्ध करून दिल्या. मागासवर्गीयांसाठी त्यांनी खास शाळा सुरू केल्या. सन १८९० मध्ये त्यांनी ‘कलाभुवन‘ ही संस्था स्थापन करून तंत्रशिक्षणाला चालना दिली. राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी वसतिगृहे चालविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. याशिवाय संगीत, नृत्य, नाट्य यांसारख्या कलांचे शिक्षण देणारी शाळाही राज्यात उघडण्यात आली.

शैक्षणिक संस्था स्थापन करण्याबरोबरच लोकांमध्ये इतर मार्गांनीही ज्ञानाचा प्रसार व्हावा याची काळजी सयाजीरावांनी घेतली होती. त्याकरिता संस्थानात त्यांनी गावोगावी वाचनालये उघडली. त्याच्या जोडीला काही फिरती वाचनालयेही सुरू केली. ग्रंथप्रकाशनाच्या कार्याला चालना देण्यातही ते आघाडीवर राहिले. याशिवाय आपल्या राज्यातील, इतकेच काय पण राज्याबाहेरील देखील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या देण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या मान्यवर व्यक्तींचा समावेश होता.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक क्षेत्रातही काही क्रांतिकारक सुधारणा केल्या होत्या. ते समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी घटस्फोटाचा कायदा लागू केला. असा कायदा करणारे व तो अमलात आणणारे बडोदा संस्थान हे भारतातील पहिलेच राज्य ठरले. अस्पृश्यता निवारण, विधवाविवाह, मिश्रविवाह यांसंबंधीच्या कायद्यांची त्यांनी आपल्या संस्थानात अंमलबजावणी केली होती.

तसेच पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रय बंदी इत्यादी सुधारणा त्यांनी प्रत्यक्ष अमलात आणल्या होत्या. सयाजीराव महाराजांनी सामाजिक सुधारणेसंबंधी केलेले कायदे पाहिल्यावर त्या काळातदेखील त्यांचा दृष्टिकोन किती पुरोगामी स्वरूपाचा होता याची कल्पना येऊ शकते. या संदर्भात आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे की, ‘सुधारणेच्या शिखरावर आरूढ झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना ज्या गोष्टी भारतात इतरत्र करता आल्या नाहीत, त्या सर्व सुधारणा एकट्या सयाजीरावांनी आपल्या राज्यात करून त्यांना लाजेने माना खाली घालावयाला लावल्या. ‘

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजकीय सुधारणा

सयाजीरावांनी राज्य कारभाराच्या अन्य क्षेत्रांतही अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. आपल्या राज्यातील जमिनीची योग्य प्रतवारी करण्यासाठी त्यांनी ‘लैंड सर्व्हे सेटलमेंट’ हे खाते सुरू केले. सारावसुलीच्या पूर्वीच्या वेगवेगळ्या पद्धतीत सुधारणा करून सारावसुलीची समान पद्धत राज्यात लागू केली.

शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विहीर खोदाईच्या कामास उत्तेजन दिले. आपल्या राज्याच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी सन १९०५ मध्ये ‘हिंदू कायदा‘ तयार करून तो अमलात आणला. राज्यातील पंचायतींचे पुनरुज्जीवन घडवून आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतींची मुहूर्तमेढ भारतात प्रथम बडोदा संस्थानात रोवली गेली, ती सयाजीरावांच्याच कारकिर्दीत. ग्रामपंचायतींच्या जोडीला तालुका पंचायती व नगरपालिका यांचीही स्थापना करण्यात आली.

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं लोक-कल्याण

सयाजीराव गायकवाड महाराजांनी जगभर प्रवास केला. तथापि, या प्रवासातही आपल्या राज्याच्या हिताचा विचार डोळ्यांसमोर ठेवून जगातील निरनिराळ्या देशांत ज्या चांगल्या गोष्टी त्यांना आढळून आल्या त्यांचे अनुकरण आपल्या राज्यात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

राज्यातील व्यापार व उद्योगधंदे यांना उत्तेजन देण्याकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. त्यासाठी दळणवळणाच्या सोयी वाढविल्या. बडोदा संस्थानात सयाजीरावांनी अनेक सुंदर वास्तू उभ्या केल्या. लक्ष्मीविलास राजवाडा, मकरपुरा राजवाडा, नजरबाग राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलाभुवन, श्रीसयाजी रुग्णालय, खंडेराव मार्केट वगैरे इमारतींची उभारणी त्यांच्याच कारकिर्दीत झाली.

सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानचे अधिपती म्हणून आपल्या राज्यात केलेल्या वरील सुधारणा पाहिल्या तर ते एक कर्तृत्ववान, प्रजाहितदक्ष व पुरोगामी विचारांचे राजे होते याविषयी मुळीच शंका उरत नाही. राज्यकर्त्याच्या ठिकाणी आवश्यक असणारा दूरदर्शीपणा त्यांच्याकडे पुरेपूर होता. म्हणूनच समाजसुधारणेच्या क्षेत्रात त्यांच्या संस्थानाने आघाडी मारली होती.

अनेक सुधारणा देशात प्रथम अमलात आणण्याचा मान बडोदा संस्थानने मिळविला होता. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना १९०४ च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यालादेखील त्यांनी अप्रत्यक्षरीत्या साहाय्य केले होते. पंडित मदनमोहन मालवीय यांनी ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचा यथार्थ गौरव केला होता.

सयाजीराव गायकवाड यांचे खरे नाव काय होते?

गोपाळराव गायकवाड हे त्यांचे खरे नाव आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment