संत एकनाथ माहिती मराठी | Sant Eknath Information in Marathi

google-news-icon

अल्प परिचय

महाराष्ट्रात भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य इसवी सनाच्या सोळाव्या शतकात संत एकनाथ यांनी केले. त्यांच्या जन्मतिथीबद्दल विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. तथापि, त्यांचा जन्म शके १४२६ (इ. स. १५०४) मध्ये पैठण येथे झाला असे समजले जाते. (काही विद्वानांच्या मते संत एकनाथांचा जन्म शके १४५५ मध्ये झाला.) सुप्रसिद्ध संत भानुदास यांचे एकनाथ हे पणतू होत. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. परंतु एकनाथांच्या बालपणीच त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले; त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले.

एकनाथांच्या ठायी बालपणापासूनच हरिभक्तीची ओढ होती. त्याच्या परिणामी वयाच्या बाराव्या वर्षीच आजोबांची अनुज्ञाही न घेता ते देवगडास गेले आणि त्या ठिकाणी जनार्दनस्वामी यांच्या सेवेत राहिले. याप्रमाणे सुमारे सहा वर्षांचा काळ लोटल्यावर नाथांना गुरुकृपेने ‘सुलभ’ पर्वतावर सगुण साक्षात्कार झाला आणि ते अंतर्बाह्य दत्तमय होऊन गेले.

त्यानंतर जनार्दनस्वामी व एकनाथ ही गुरुशिष्यांची जोडी तीर्थयात्रेसाठी देवगडहून निघाली. या वेळी पंचवटीस संत एकनाथांनी जनार्दनस्वामींच्या आज्ञेवरून चतुःश्लोकी भागवतावर ओवीबद्ध टीका रचली. पुढे जनार्दनस्वामी देवगडास परतले आणि संत एकनाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा चालू ठेवली.

संत एकनाथांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर ते वयाच्या २५ व्या वर्षी पैठणला परत आले. त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. काही काळ त्यांचे काशीक्षेत्रीही वास्तव्य होते. शके १५२१ (इ. स. १५९९) मध्ये त्यांनी पैठण येथे देह ठेवला.

संत एकनाथांची ग्रंथरचना

संत एकनाथांनी चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणीस्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण यांसारख्या श्रेष्ठ ग्रंथांची मराठीत रचना केली. त्यांनी रचलेला ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या एकादशस्कंधावरील टीका असून त्याची ओवीसंख्या सुमारे एकोणीस हजार इतकी आहे. या ग्रंथाद्वारे भागवत धर्माचे तत्त्वज्ञान त्यांनी मराठीत आणले. त्यांचे ‘रुक्मिणीस्वयंवर’ हे श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या विवाहावरील आख्यानकाव्य तर खूपच लोकप्रिय ठरले. याशिवाय एकनाथांची भारूडे, त्यांच्या अभंगांची एकनाथी गाथा, पदे, गौळणी इत्यादी रचनादेखील विशेष प्रसिद्ध आहेत.

संत एकनाथांची भारूडे म्हणजे एक प्रकारची लोकगीतेच होत. सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच जीवनातील व नित्याच्या व्यवहारातील दाखले देऊन परमार्थाची शिकवण देण्यासाठी एकनाथांनी भारूडे लिहिली. भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता आणण्याचे कार्य त्यांनी केले. एकनाथांनी गेय पदरचनाही केली आहे; तसेच बहुजन समाजासाठी काही कथात्मक रचनाही केल्या आहेत.

एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे त्यांनी ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. आज ज्ञानेश्वरीची हीच प्रत वारकरी संप्रदायात सर्वमान्य ठरली आहे.

प्रपंच-परमार्थाचा समन्वय

एकनाथांनी प्रपंच व परमार्थ, अध्यात्म व समाजोद्धार यांची सांगड आपल्या जीवनात घातली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व समन्वयवादी होते. त्यांच्या विचारप्रणालीत परंपरा रक्षण आणि परमार्थातील भेदभावाचे निर्मूलन अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत. रा. द. रानडे म्हणतात, “प्रपंच व परमार्थ यांची विलक्षण सांगड घालून संसारामध्ये असतानाच परमार्थ कसा करावा, हे त्यांनी जसे आपल्या उदाहरणाने सर्व लोकांस शिकविले त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही संताने शिकविले नाही.’

आद्य समाजसुधारक संत एकनाथ

संत एकनाथांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य मोठ्या प्रमाणावर आढळते. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव आणि सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांनी जातिभेदावर कठोर प्रहार करून सामाजिक समतेचा पुरस्कार केला. आपल्या एका अभंगात ते म्हणतात,

‘जया म्हणती नीच वर्ण । स्त्री शूद्रादी हीन जन ॥ सर्वांभूती देव वसे । नीचा ठायी काय नसे? || “

एकनाथांचे जातिभेदविरोधी दृष्टिकोन स्पष्ट करणारे जोहारावरील अभंग मननीय आहेत. नाथांचे वाङ्मय वाचताना त्यांच्यातील समाजसुधारक आपणास ठायीठायी भेटल्यावाचून राहणार नाही. आपली भारूडे व गौळणींच्या माध्यमातून त्यांनी विनोद, उपहास, उपरोध यांच्या साहाय्याने समाजजीवनातील दोषांचे मार्मिक दिग्दर्शन केले आणि सामान्य जनांना उपयुक्त मार्गदर्शनही केले.

“मोडकेसें घर तुटकेसें छप्पर । देवाला देवघर नाहीं । मला दादला नलगे बाई ||” किंवा ‘सत्वर पावगे मला। भवानी आई रोडगा वाहीन तुला ।”

यांसारखी नाथांची भारूडे आजही जनसामान्यांना प्रिय आहेत.

भागवत धर्माचे पुनरुत्थान

ज्ञानेश्वर, नामदेवांनंतर काहीशा क्षीण झालेल्या भागवत धर्माचे पुनरुज्जीवन एकनाथांनी केले. आपल्या भागवती टीकेने त्यांनी भक्तिपंथाची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि त्या पंथाभोवती महाराष्ट्रातील बहुजन समाजाला संघटित केले. अशा प्रकारे एकनाथांनी भागवत धर्माला शास्त्र व समाज यांचे दुहेरी अधिष्ठान प्राप्त करून दिले आणि त्यास लोकाभिमुख बनविले; म्हणूनच एकनाथांविषयी असे म्हटले जाते की त्यांनी पारमार्थिक जीवनाचा विचार करताना सामाजिक परिस्थिती व सामाजिक आशय यांचेही भान सुटू दिले नाही.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment