चिंतामणराव देशमुख माहिती मराठी | Chintamanrav Deshmukh Information in Marathi

google-news-icon

अल्प परिचय

चिंतामणराव देशमुख हे भारतातील एक ‘उत्कृष्ट प्रशासक’ आणि ‘अर्थनीतिज्ञ’ म्हणून ओळखले जातात. १४ जानेवारी, १८९६ रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी त्यांचा जन्म झाला. वडील द्वारकानाथ देशमुख हे व्यवसायाने वकील होते.

चिंतामणराव देशमुख हे प्रथमपासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. सन १९१२ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते प्रथम श्रेणीत प्रथम आले होते आणि त्यांना ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली होती.

प्रथम क्रमांकाने आय. सी. एस.

इंटर झाल्यावर चिंतामणराव देशमुख उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. तेथे केंब्रिजच्या जीझस् कॉलेजातून ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते आय. सी. एस. (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) च्या परीक्षेला बसले. या परीक्षेतही ते सर्वप्रथम आले. त्यांनी या परीक्षेत मिळविलेल्या गुणांइतके गुण पुढील काळात कोणाही भारतीय विद्यार्थ्याला मिळविता आले नाहीत.

चिंतामणराव देशमुखांचा पहिला विवाह इंग्लंडमध्येच रोझिना सिल्कॉक्स या आंग्ल युवतीशी १९२० मध्ये झाला. तिच्या निधनानंतर त्यांनी सुप्रसिद्ध समाजसेविका व सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला.

शासकीय सेवेत प्रवेश

इंग्लंडहून भारतात परतल्यानंतर चिंतामणरावांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. ब्रिटिश काळातील जुन्या सेंट्रल प्रॉव्हिन्स व बेरर या प्रांतात त्यांनी उपायुक्त, अप्पर सचिव व सचिव अशा विविध पदांवर काम केले. सचिव म्हणून काम करताना त्यांनी शासनाच्या विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. त्या वेळेपासूनच एक कार्यक्षम प्रशासक असा नावलौकिक त्यांनी मिळविला.

ब्रिटिश सरकारने आयोजित केलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला एक सचिव म्हणून ते उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्यांचा महात्मा गांधी, पंडित मदनमोहन मालवीय, लालबहादूर शास्त्री, तेजबहादूर सप्रू, बॅ. जयकर इत्यादी भारतीय नेत्यांशी संबंध आला. या नेत्यांवर त्यांच्या विद्वत्तेची छाप पडली होती.

जबाबदारीच्या विविध पदांचा कार्यभार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर म्हणून चिंतामणराव देशमुखांची नियुक्ती झाली होती. तसेच जागतिक मुद्रा परिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. युरोप व अमेरिकेत भारत सरकारचे वित्त प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.

केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री

सन १९५० मध्ये चिंतामणराव देशमुख यांची भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर त्यांनी १९५६ पर्यंत काम केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे त्या काळात पाहिले जात होते. सन १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची लोकसभेवर निवड झाली होती. याशिवाय १९५० ते १९५७ या काळात भारताच्या नियोजन मंडळाचे एक सभासद म्हणूनही त्यांनी काम केले होते.

चिंतामणरावांनी भारताच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली होती. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी केलेली महत्त्वाची कामे म्हणून इंपिरिअल बँकेचे राष्ट्रीयीकरण, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना व आयुर्विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. पुढे १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

जबाबदारीच्या पदांवर

अर्थमंत्रिपदावरून दूर झाल्यावरही चिंतामणरावांनी अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदे भूषविली होती. काही काळ त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. सन १९६० ते १९६३ या काळात त्यांची हैदराबाद येथील भारत सरकारच्या प्रशासकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. याशिवाय दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, भारत सरकारच्या केंद्रीय संस्कृत मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक विकास परिषदेचे अध्यक्ष, भारतीय आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष यांसारखी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती.

चिंतामणराव देशमुखांनी १९६९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतिपदासाठी झालेली निवडणूक लढविली होती. ही निवडणूक खूपच चुरशीची ठरली; पण चिंतामणरावांना तिथे पराभव पत्करावा लागला.

मान-सन्मान

चितामणरावांना जीवनात अनेक मानसन्मान लाभले. १९५९ मध्ये त्यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला होता. इंग्लंडमधील लेस्टर विद्यापीठ, अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठ, तसेच भारतातील म्हैसूर आणि उस्मानिया विद्यापीठ यांनी एलएल्. डी. ही पदवी त्यांना बहाल केली होती. याशिवाय पुणे, नागपूर, पंजाब व अलाहाबाद या विद्यापीठांनी त्यांना डी. लिट ही सन्माननीय पदवी दिली, तर कोलकाता विद्यापीठाने डी. एस्. सी. ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सन १९७५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान प्रदान करून त्यांच्या कार्याचा व देशसेवेचा गौरव केला.

मृत्यू – २ ऑक्टोबर, १९८२.

साहित्य संपदा

चिंतामणराव देशमुखांना साहित्याच्या क्षेत्रातही रस होता. संस्कृत साहित्याची त्यांना विशेष आवड होती. कालिदासाच्या ‘मेघदूत’ या संस्कृत काव्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. महात्मा गांधी यांच्या सुमारे शंभर वचनांचे त्यांनी संस्कृतमध्ये ‘सूक्तिमुक्तावली’ या नावाने श्लोकबद्ध रूपांतर केले. तसेच ‘द कोर्स ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्रही इंग्रजी भाषेत त्यांनी लिहिले होते.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment