परग्रह म्हणजे काय? |What is Exoplanet in Marathi

google-news-icon

परग्रह म्हणजे काय?

परग्रह म्हणजे आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रह जे दुसऱ्याच ताऱ्याभोवती फिरतात त्यांना परग्रह असे म्हणतात. याला इंग्रजीत exoplanet असेही म्हणतात.

असेही काही परग्रह असतात जे कोणत्याही ताऱ्याभोवती फिरत नाहीत. ते आकाशगंगेच्या केंद्रबिंदू भोवती फेऱ्या मारत असतात.

परग्रह सापडणे ही खूप अवघड बाब आहे. कारण जर आपली सूर्यमाला पहिली तर एकटा सूर्याचं ९९.८६ टक्के वस्तुमान स्वतः खाऊन बसला आहे. उरलेल्या ग्रहांकडे फक्त ०.१४ टक्के एवढेच वस्तुमान आहे. त्यामुळे एखादी सूर्यमाला किंवा परग्रह सापडणे खूप अवघड आहे.

हे परग्रह सापडणे जरी अवघड असेल तरी त्यांची संख्या ही आकाशगंगेतील ताऱ्यांपेक्षा जास्त आहे. आपलीच सूर्यमाला पाहिली तर यात आठ ग्रह आहेत तसेच असे कित्येक सूर्यमाला असतील ज्यात या पेक्षाही जास्त ग्रह असतील.

तसं तर १९९२ पर्यंत तर आपल्याला परग्रहाचा कसलाच सुगावा नव्हता. १९९२ साली पहिला परग्रह आपल्याला सापडला. नासाच्या केप्लर दुर्बिणीचा यात खूप मोठा हातभार आहे. या दुर्बिणीने दोन हजारपेक्षा जास्त परग्रह शोधले आहेत.

परग्रहांचे प्रकार

जरा आपल्या सूर्यमालेतील ग्रह आठवा. एक पृथ्वी जी की राहण्यासाठी योग्य आहे, शुक्र ज्याच्यावर सल्फ्युरीक ॲसिडचा पाऊस पडतो, बुध ज्याच्यावर एक दिवस हा ५५ पृथ्वीवरील दिवसांचा असतो, मंगळ ज्याला चुंबकीय क्षेत्र नाही ज्यामुळे त्याच्यावर सौर वादळे धडकू शकतात, बाकीचे ग्रह तर फक्त वायूने फुगलेले आहेत.

जर परग्रहांच बोलायचं झालं तर असे काही ग्रह सापडले आहेत जे फक्त बर्फाचे आहेत, ज्यांच्यावर लाव्हारसाचे समुद्र आहेत, ज्यांच्यावर धातूंचा पाऊस पडतो. तर असेही काही ग्रह आहेत दिसण्यात पृथ्वीसारखेच आहेत. ज्यांच्यावर मानवी वस्ती होऊ शकते.

पण हे ग्रह खूप दूर असतात. आपल्या सर्वात जवळचा तारा मित्र जो ४.२५ प्रकाशवर्षे दूर आहे त्याला ग्रह नाही. जे सापडतात ते यापेक्षाही खूप दूर आहेत.

परग्रह कसा शोधतात?

अधिक्रमण

अधिक्रमण म्हणजे एखाद्या ग्रहाचा त्याच्या ताऱ्याच्या बिंबावरून होणारा प्रवास. उदा. पृथ्वीवरून आपल्याला बुध व शुक्र सूर्यबिंबावरून होणारे अधिक्रमण दिसू शकते. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये एका रेषेत बुध किंवा शुक्र हे ग्रह आले तर सूर्यबिंबावरून बुध वा शुक्राचा काळा ठिपका सरकत जाताना दिसतो. त्यालाच अधिक्रमण असे म्हणतात.

credit: Nasa

याच्या निरीक्षणातून त्याग्रहाचा, सूर्याचा व्यास, त्याचा वेग इ. गोष्टी समजू शकतात. वेग समजला की सूर्यापासूनचे त्या ग्रहाचे अंतर समजू शकते. परग्रहाच्या बाबतीत हेच तत्व वापरले जाते. एखादा परग्रह अधिक्रमणच्या दरम्यान त्याच्या त्याऱ्याच्या बिंबावरून सरकताना त्या ताऱ्याचे तेज थोडे कमी होते. ताऱ्याच्या तेजामध्ये किती घट होणार ते त्या ग्रह आणि ताऱ्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. साधारणपणे ताऱ्याचे तेज 1% ने कमी होते. हे इतके सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी फोटोमीटर सारखे साधन आवश्यक असते. या निरीक्षणावरून त्या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरतो आहे हे सिद्ध करता येते. या पद्धतीने आजपर्यंत सापडलेले ग्रह गुरुपेक्षा मोठे आहेत.

ताऱ्याचे वॉबल अथवा आंदोलन

दूरच्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह जर फार मोठा असेल तर तो तारा आणि ग्रह यांचे वस्तुकेंद्र ( सेंटर ऑफ मास ) दोघांच्या मधे कुठेतरी असते. तारा आणि तो ग्रह या वस्तुकेंद्राभोवती फिरतात. ताऱ्याचे वस्तुमान ग्रहापेक्षा कितीतरी जास्त असल्याने त्याचे वस्तुकेंद्र ताऱ्याच्या केंद्रापासून जवळ असते. आणि ग्रहाच्या केंद्रापासून तुलनेने दूर असते. त्यामुळे तारा ग्रहापेक्षा कमी वेळात वस्तुकेंद्राभोवती फिरतो, ताऱ्याची वस्तुकेंद्राभोवतीची प्रदक्षिणा आपल्याला ताऱ्याच्या पुढे मागे होणाऱ्या आंदोलनाच्या स्वरुपात दिसते. त्याला वॉबल म्हणतात.

ताऱ्याच्या या वॉबल ( आंदोलन ) वरून त्याच्याभोवती एखादा ग्रह फिरतो हे सिद्ध करता येते. या पद्धतीने ताऱ्याभोवती ग्रह अथवा ग्रहमाला आहे किंवा कसे हे सिद्ध करता येऊ शकते. मात्र या पद्धतीने पृथ्वीच्या दहापट वस्तुमानापेक्षा कमी वस्तुमान असलेला ग्रह शोधता येत नाही.

डॉप्लर पद्धत

एखाद्या हलणाऱ्या प्रकाश स्रोतापासून निघालेला प्रकाश, तो प्रकाशस्रोत बघणाऱ्यापासून लांब जात असतो तेव्हा लाल दिसतो. डॉप्लर परिणामाचा उपयोग करूनही परग्रहाचा शोध घेता येतो. 51 पेगॅसी – बी हा ग्रह या पद्धतीनेच शोधण्यात आला आहे.

ग्रॅव्हिटॅशनल मायक्रोलेंसिंग

एखाद्या ताऱ्याचे गुरुत्वीय क्षेत्र एखाद्या लेन्ससारखे म्हणजे भिंगासारखे कार्य करते. ज्या ताऱ्याचे गुरुत्वीय क्षेत्र भिंगासारखे कार्य करते त्या ताऱ्याभोवती एखादा परग्रह फिरतोय की कसे हे शोधता येते. ताऱ्याच्या भिंगामुळे त्याच्या पाठीमागे अतिदूर अंतरावर असणाऱ्या एखाद्या ताऱ्याचे तेज मॅग्निफाय होते.

यामध्ये अलीकडच्या ताऱ्याभोवती जर एखादा ग्रह फिरत असेल तर त्या ग्रहाच्या स्वतःच्या गुरुत्वीय क्षेत्राचा प्रभाव ताऱ्याच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावात भर घालतो. त्यामुळे पार्श्वभूमीवर असणाऱ्या ताऱ्याचे तेज – जे मॅग्निफाय झाले आहे त्याच्यातही भर पडते आणि त्याचे तेज अजून जास्त मॅग्निफाय होते – हे झाले तर अलीकडच्या ताऱ्याभोवती एखादा ग्रह फिरतो हे सिद्ध करता येते.

ताऱ्याभोवतीचे धुलीकणांचे कडे

काही ताऱ्यांभोवती धुलीकणांचे कडे तयार झालेले असते. या धूलीकणांमुळे तयार झालेल्या कड्याच्या स्वरुपावरून तिथे एखाद्या ग्रहाचे अस्तित्व आहे किंवा कसे हे सिद्ध करता येते.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment