सूर्यमालेची निर्मिती कशी झाली | Birth of Solar System in Marathi

google-news-icon

पाच अब्ज वर्षांपूर्वीची गोष्ट! आपल्या आकाशगंगेच्या असंख्य तारकांमध्ये धुलिकण आणि वायू यांचा एक विशाल कृष्णवर्णी मेघ तरंगत होता. सर्व दिशांना पसरलेला तो मेघ निराकार आणि निर्विकार होता. त्याच्या प्रवासाला काही दिशाच नव्हती. उगाचाच निरुद्देश भ्रमंती हेच जणू त्याच्या जिवणाचे सार होते.

सूर्यमालेची निर्मिती

नेमके केव्हा आणि काय कारण घडले ते आज निश्चित सांगता येणार नाही.एकाएकी त्या विशाल मेघाच्या आकुंचनाला प्रारंभ झाला. कदाचित दूर अंतरावरील एखाद्या ताऱ्याच्या स्फोटामध्ये उत्पन्न झालेला प्रघाती तरंग त्या मेघाला येऊन थडकला असेल; किंवा आकाशगंगेच्या सर्पिल बाहूंच्या झपाट्यात आवळला असेल. कारण काहीही असो; त्या मेघाच्या आकुंचनाला चालना मिळाली हे निश्चित! आकुंचनाबरोबरच त्या मेघातील अतिसूक्ष्म कण परस्परांच्या जवळ येऊ लागले, त्यांची गतीक्षणाक्षणाला वाढू लागली, आणि तो विशाल मेघ आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे अक्षरशः कोलमडू लागला.

सुरुवातीलाही क्रिया अती संथ गतीने चालू होती; परंतु नंतर तिने चांगलाच वेग घेतला. कणांमधील अंतर झपाटयाने कमी होत गेले आणि त्याच्यामधील गुरुत्वाकर्षण वाढू लागले. त्याचा परिणाम म्हणून मेघाच्या कोलमडण्याची प्रक्रियाही जलद गतीने होऊ लागली. हे चक्र निरंतर लक्षावधी वर्षे चालू होते. सरतेशेवटी मेघाच्या केंद्रभागी अतिघन असा गाभा निर्माण झाला आणि तेथील गुरुत्वाकर्षण अतिउच्च झाले. या आकुंचनाच्या काळात तो मेघ आपल्याजवळील उष्णता बाहेर प्रक्षेपित करीत होता.

सूर्यमालेची निर्मिती

मूळ निराकार असलेल्या मेघाचा बाह्य भागही हळूहळू आकार घेऊ लागला. सुरुवातीला अतिसूक्ष्म अवस्थेत असलेले परिभ्रमण आकुंचनाबरोबरच वाढीला लागले आणि आतिमंद गतीने त्या मेघाला प्रथम दीर्घ वर्तुळाकार व नंतर बैलगाडीच्या चाकासारखा आकार प्राप्त झाला. या चाकाच्या केंद्रभागी गुरुत्वाकर्षण, घनता आणि तापमान यांचे प्रमाण सर्वांत जास्त होते. मेघाच्या परिभ्रमणामुळे बाह्य भागापाशी असलेली धूळ आणि वायू अंतर्भागात मात्र जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या चाकाच्या निरनिराळ्या भागातच त्यांचे छोटेमोठे पुंजके बनू लागले. हे पुंजके स्वतःभोवती भ्रमण करीत असतानाच त्याच दिशेत केंद्राभोवतीही भ्रमण करू लागले. नवग्रहांच्या प्रसव वेदनांचीच ती सुरुवात होती.

अतिशय वेगाने एकत्र येणाऱ्या वायू आणि धूलिकणांच्या परस्पर आघाताने केंद्रभागी असलेल्या मुख्य मेघाच्या अंतर्भागात प्रखर उष्णता निर्माण झाली. थोड्याच काळात धूलिकणांचे वाफेत रुपांतर झाले. जसजसे तापमान वाढू लागले तसतसे केंद्रभागी असणाऱ्या वायूचा बाह्यवर्ती दाब वाढू लागला. सरतेशेवटी हा दाब इतका वाढला की, गुरुत्वाकर्षणामुळे चालू असलेली मेघाच्या आकुंचनाची प्रक्रिया खूपच मंदावली. मूळ विशाल मेघाच्या सुरुवात झाल्यापासून केवळ काही सहस्त्र वर्षात गुरुत्वाकर्षणाचा अंतवर्ती दाब आणि तप्त वायूंचा बाह्यवर्ती दाब बराचसा समसमान झाला. मेघाच्या आकुंचनाच्या क्रियेला चांगलाच पायबंद बसला. याच शुभ वेळी आपल्या आदि- सूर्याने या अफाट विश्वात पदार्पण केले.

आश्चर्यांची गोष्ट अशी की, उष्णतेच्या उत्सर्जनामुळे आदि- सूर्याचे तापमान कमी झाले नाही. अंतर्भागात असलेल्या अतिरिक्त दाब फक्त कमी झाला. नंतरच्या काळात अतिशय संथ गतीने आदि- सूर्याचे आकुंचन होत राहिले आणि त्याच गतीने त्याचे तापमानही वाढत राहिले. गुरुत्वाकर्षणाला प्रतिरोध करू शकेल इतकीच त्याच्या तापमान वाढीची गती होती. अशा प्रकारे आणखी काही लक्ष वर्षांचा काळ लोटला आणि आदि- सूर्याच्या अंतर्भागातील तापमान दीड कोटी अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊन पोहोचले.

गुरुत्वाकर्षण, आकुंचन आणि त्याचा परिणाम म्हणून उष्णता वाढ, हे चक्र अव्याहत चालूच होते, या प्रक्रियेची गती कमी होती इतकेच! अशाच एका शुभमुहूर्तावर, अंतर्गत उष्णतेने एक विशिष्ट कमाल मर्यादा अचानक ओलांडली आणि त्याच क्षणी अंतर्भागात आण्विक ऊर्जा प्रकट झाली अणू इंधनाचे यज्ञकुंड प्रज्वलित झाले. हायड्रोजनच्या अणूंचा ज्वलन होऊन हिलीयमच्या निर्मितीला प्रारंभ झाला.

आपल्या देदीप्यमान सूर्यनारायणाचा जन्मक्षण तो हाच! गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आकुंचन आणि त्यामुळे उष्णता वाढ, हे चक्रही त्याच क्षणी समाप्त झाले. अमर्याद आण्विक इंधनाच्या साह्याने सूर्याच्या अंतर्भागातील अग्निकुंड धगधगू लागले. सूर्याच्या पृष्ठभागातून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेची तूट आण्विक प्रक्रियेमुळे निर्माण होणारी उष्णता भरून काढू लागली. गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या आकुंचनात ती भरून काढण्याची आवश्यकता राहिली नाही. सूर्यसंभवानंतर आजतागायत त्या आण्विक अग्निकुंडाने सूर्याला समतोल अवस्थेत ठेवले आहे.

त्याच सुमाराला सूर्याच्या सभोवार असलेला मेघाचा कोष पारदर्शक होऊन त्यामधून सूर्याचे किरण झिरपू लागले. कोषातील बहुतांश वस्तू सूर्यानेच आत्मसात केली. शिल्लक राहिलेल्या कणांचे प्रथमतः अगदी लहान लहान गोल तयार झाले. ते गोल सातत्याने परस्परांशी टक्कर घेत, त्यांचे तुकडे उडत पण ते पुन्हा पुन्हा एकत्र येत आणि त्यांचे पूर्वीपेक्षा मोठया गोलांत रूपांतर होई. ही क्रिया लक्षावधी वर्षे चालू होती.

त्यातूनच लहान मोठया ग्रहांनी आकार घेतला. ग्रहांच्या निर्मितीवर सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेचा बराच प्रभाव पडला, बुध, शुक्र, पृथ्वी यांचे वस्तुमान मुख्यतः खडक आणि धातू यांनीच बनले कारण जड मूलद्रव्ये आपल्या जवळ खेचून घेतली. याउलट गुरु आणि त्याच्या पलिकडील ग्रहांवर सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव पडू शकला नाही. त्यांच्यावरील वायूंचे बर्फात रुपांतर झाले. त्याचप्रमाणे इतर मूलद्रव्ये सूर्यापासून दूर गेली.

हलकी मूलद्रव्ये सूर्यापासून दूर जात असताना त्याच्या वाटेत टपून बसलेल्या गुरु आणि शनी यांचा जास्त फायदा झाला. त्यांनीच या वायूंचा मोठा हिस्सा आपल्याकडे खेचून घेतला गुरूचे स्थान शनीच्या तुलनेत सर्याला जवळ असल्यानने वायूंच्या बऱ्याच मोठया भागावर त्यानेच आपला हक्क गाजविला. अर्थातच अगदी थोड्या काळात गुरू चांगलाच गुबगुबीत झाला. त्याच्या खालोखाल शनीने बऱ्यापैकी बाळसे धरले.

या दोन ग्रहांच्या अवाढव्य आकारामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षणही चांगलेच जबरदस्त होते. त्यांनी सूर्यमालेत बरीच शिस्त आणली. प्रारंभीच्या सूर्यमालेत वेळोवेळी पुष्कळ बदल झाले. इतस्ततः पसरलेल्या वस्तूंवर नजिकच्या ग्रहांनी हक्क बजावला. तसेच अवकाशात मृत्यूपथाला लागलेल्या इतर ताऱ्यांकडून या नवजात सूर्यमालेवर धूलिकणांचा वर्षाव होत राहिला. या धूलिकणांच्या अन्नावर ग्रह पोसले गेले आणि त्यांच्या वस्तुमानात आणखी भर पडली.

अशाप्रकारे आपल्या सूर्यमालेची निर्मिती निर्मिती सह इतर ग्रह पण तयार झाले.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment