मुद्दे
संत गाडगेबाबांचा- परिचय
संत गाडगेबाबा हे समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारून त्यासाठी अविरत झटलेले आधुनिक काळातील महान संत होत. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे एका सामान्य परीट जातीच्या कुटुंबात झाला. डेबूजी हे त्यांचे मूळ नाव, आडनाव जाणोरकर. त्यांचे वडील झिंगराजी. झिंगराजींची घरची परिस्थिती मुळातच गरिबीची. तशातच ते दारूच्या आहारी गेलेले. या व्यसनापायी त्यांनी आपली सर्व शेतजमीन सावकाराच्या घशात घातली. पुढे लवकरच त्यांचा मृत्यू झाला.
संत गाडगेबाबांचं बालपण आणि संसार
वडिलांच्या मृत्युप्रसंगी डेबूजीचे वय अवघे पाच-सहा वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूमुळे निराधार झालेला डेबूजी आपली आई सखुबाई हिच्यासह आपल्या मामाच्या आश्रयाला आला. मामाच्या घरी डेबूजीला लहानपणापासूनच शारीरिक कष्टाची अनेक कामे करावी लागली होती. लहानपणी त्याला गुरे राखण्याचे काम करावे लागले. थोडा मोठा झाल्यावर मामाच्या शेतीचा व्याप सांभाळण्याची जबाबदारीही त्याच्यावरच पडली. अशा प्रकारे त्याचे बालपण अतिशय कष्टात गेले.
पुढे डेबूजीचा विवाह धनाजी खल्लारकर यांची मुलगी कुंताबाई हिच्याशी झाला. लग्नानंतर त्याच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली. रात्रंदिवस काबाडकष्ट करीत आपले कौटुंबिक व्याप तो सांभाळू लागला; परंतु हळूहळू त्याचे संसारातील लक्ष उडू लागले आणि तो विरक्तीच्या मार्गाकडे झुकू लागला. अखेरीस त्याने संसाराचा त्याग केला. त्यानंतर तीर्थयात्रा करीत तो सर्वत्र संचार करू लागला.
संत गाडगेबाबांची साधी जीवनशैली
पारमार्थिक मार्गाचा स्वीकार केल्यावर डेबूजीने अतिशय साधेपणाने जीवन जगण्यास प्रारंभ केला. त्याचा वेश म्हणजे अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात मातीचे एक फुटके गाडगे असा होता; त्यामुळे लोक त्याला गोधडेबुवा किंवा गाडगेबुवा या नावाने ओळखू लागले. अशा प्रकारे डेबूजीचे गाडगे महाराजांमध्ये परिवर्तन झाले. पुढे त्याच नावाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ओळखू लागली. चापरेबुवा, चिधेबुवा, लोटके महाराज अशीही नावे त्यांना मिळाली होती.
गाडगेबाबांनी संसाराचा त्याग केल्यावर खऱ्या अर्थाने विरक्ती स्वीकारली होती. कुठे कुणाच्या घरात राहावयाचे नाही; छपराखाली झोपायचे नाही; सतरंजीवर किंवा आसनावर बसायचे नाही; भीक मागून खापरातून भाकरतुकडा खायचा; त्यातूनच पाणी प्यायचे; ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडूने झाडून स्वच्छ करायचे अशा पद्धतीने ते राहू लागले. या काळात देशाच्या निरनिराळ्या भागांत त्यांनी मुक्त संचार केला. बहुजन समाजातील सामान्य लोकांची दुःस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांच्या जीवनातील दुःख व दैन्य कसे दूर करता येईल यासंबंधीचे चिंतन ते करू लागले.
- हेही वाचा
- महाराज सयाजीराव गायकवाड यांची संपूर्ण माहिती मराठीत
- महर्षी धोंडो कर्वे यांची संपूर्ण माहिती मराठीत
- पंडित रमाबाई यांची संपूर्ण माहिती मराठीत
समाजसुधारक संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा प्रापंचिक जीवनातून विरक्त होऊन पामार्थिक मार्गाकडे वळलेले संतपुरुष होते; परंतु आपल्या समाजाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली नव्हती. स्वतःच्या संसारापेक्षा सर्व समाजाच्या संसाराची काळजी वाहणारे ते खरेखुरे संत होते; म्हणून आपल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर कोरडे ओढून ते दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ते खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. बहुजन समाजातील भोळ्याभाबड्या जनतेला शहाणे करून तिला योग्य मार्ग दाखविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.
संत गाडगेबाबांची कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती
आपले वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गाडगेबाबांनी गावोगावी फिरून आपल्या कीर्तनाद्वारे लोकजागृती करण्याचा मार्ग अवलंबिला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अनेक गावांतून त्यांनी संचार केला. त्यांनी यासाठी कीर्तनाच्या मार्गाचाच अवलंब करण्याचे कारण म्हणजे खेड्यापाड्यांतील देवभोळ्या जनतेला भजन- कीर्तनासारख्या गोष्टींचे विशेष आकर्षण वाटत असे; त्यामुळे या जनतेपर्यंत पोहोचण्याचा तोच प्रभावी मार्ग होय, असा विचार त्यांनी केला.
संत गाडगेबाबांचे कीर्तन हा एक लोकविलक्षण अनुभव असे. त्यांचे कीर्तन म्हणजे त्यांचा श्रोत्यांशी चाललेला एक प्रकारचा सुखसंवादच! संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनात श्रोत्यांनाच निरनिराळे प्रश्न विचारून त्यांना त्यांचे अज्ञान, दुर्गुण व दोष यांची जाणीव करून देत असत. त्यांची भाषा अतिशय साधी, सुबोध व श्रोत्यांच्या अंतःकरणाला थेट जाऊन भिडणारी अशी होती; त्यामुळे त्यांच्या कीर्तनाने सर्वसामान्य लोक अतिशय प्रभावीत होत असत. खरे तर, गाडगेबाबांना शिक्षणाचा गंधही नव्हता.
उभ्या आयुष्यात त्यांनी शाळेचे कधी तोंड पाहिले नव्हते; परंतु त्यांनी व्यावहारिक जगाचा उघड्या डोळ्यांनी अनुभव घेतला होता. त्यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षणशक्ती होती. तिच्या जोरावर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजातील निरनिराळे दोष व दुर्गुण यांचा अचूक वेध घेतला. आपल्या कीर्तनातून समाजातील हे दोष, दुर्गुण यांच्यावर ते जोरदार प्रहार करीत असत; त्यामुळे सामान्य जनतेत फार मोठी जागृती घडवून आणण्याचे कार्य त्यांच्या कीर्तनांद्वारे होऊ शकले.
आचार्य अत्रेंच्या शब्दांत….
“आचार्य अत्रे यांनी गाडगे महाराजांच्या कीर्तनाचे सामर्थ्य पुढील शब्दांत व्यक्त केले आहे. “सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तसे गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. हजारो माणसाच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघासारखे आभाळभर गडगडू लागतात आणि डोक्यावर साहित्याचा, सद्भावनेचा आणि सदविचारांचा असा काही जबरदस्त मारा सुरू होतो की, श्रोते अक्षरशः त्या कीर्तनाच्या सरोवरात देहभान विसरून तासन्तास डुंबत राहतात…. बाबांना वाचता येत नाही; लिहिता येत नाही; पण तुकोबांचे अभंग त्यांच्या जिभेवर नाचत होते.
त्यांचा कोणताही एक अभंग सबंध त्यांना येत नाही. कोणती ओळ कोणत्या अभंगात आहे, हे त्यांना सांगता येत नाही. पण निरूपणाच्या ओघात एखाद्या अभंगाचा चरण त्यांच्या तोंडून अशा काही प्रभावाने आणि दिमाखाने बाहेर पडतो की, सारे श्रोते त्याचा एकमुखाने उच्चार करतात. साहित्याचा आणि वक्तृत्वाचा बाबांनी कुठे अभ्यास केला आहे? पण मराठी भाषा त्यांच्याजवळ पाणी भरते आहे असे म्हटले तरी चालेल. अशी सोपी, बाळबोध, ओघवती आणि लाडकी भाषा ते बोलतात की, जन्मभर साहित्याशी कुस्त्या खेळत बसलेले आमच्यासारखे ‘भाषाप्रभू’ तोंड वासूनच त्यांच्याकडे पाहत राहतात. जनतेची भाषा बोलणारा असा प्रभावी आणि जबरदस्त दुसरा वक्ता महाराष्ट्रात नाही. सर्व रसांची तुडुंब मेजवानी त्यांच्या भाषेत भरलेली आहे आणि त्यांच्या रसवंतीच्या पायावर तर विनोदाची मधुर आणि मंजुळ घुंगरे एकसारखी ” खुळखुळत असतात.’
संत गाडगेबाबांचा जीवनाचरणाचा उपदेश
गाडगेबाबाचा उपदेशही अतिशय साधा, सोपा व अंत:करणाला स्पर्श करून जाणारा असे. चोरी करू नका; कर्ज काढून सावकाराच्या पाशात आपली मान अडकवू नका; व्यसनांच्या आधीन होऊ नका; देव-धर्म यांच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका; जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका; या गोष्टी ते आपल्या कीर्तनातून श्रोत्यांना सांगत असत. त्याचबरोबर माणसांनी एकमेकांशी प्रेमाने व बंधुभावाने व्यवहार करावा; अडल्यानडलेल्यांची, रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करावी; भूतदया म्हणजे परमेश्वराची पूजा होय; असा उपदेशही ते लोकांना करीत असत. माणसाला संसारात राहूनही देशभक्ती करता येते, असे त्यांचे प्रांजळ मत होते. नैतिक मूल्यांची जपणूक, मानवता आणि परोपकार यांचे धडे त्यांनी आपल्या कीर्तनातून जनतेला दिले.
आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे संत गाडगेबाबा हे ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ‘ होते. सर्वांच्या प्रेमावर आधारलेल्या समतावादी तत्त्वज्ञानाचा सोज्वळ प्रचार कसा करावा, याचा सात्त्विक आदर्श बाबांच्या कीर्तनामध्ये पाहावयास मिळे.
दैवतीकरणास विरोध
स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि भूतदया यांवर संत गाडगेबाबा यांचा विशेष भर होता. ते ज्या गावी कीर्तनासाठी जात तेथील सर्व परिसर स्वतः हातात झाडू घेऊन प्रथम स्वच्छ करीत असत. देवधर्माचे अवडंबर त्यांनी कधी माजविले नाही. देव दगडधोंड्यांत नसून तो माणसात आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आपली गादी किंवा मठ स्थापन केला नाही. इतकेच काय पण त्यांनी कोणाला आपल्या पायाही पडू दिले नाही. “संत तुकाराम महाराज हे माझे गुरू; माझा शिष्य कोणीही नाही” असे त्यांनी म्हटले होते.
समाजहितास सर्वस्व वाहणारा संत गाडगेबाबांनी गोरगरीब जनतेच्या व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पंढरपूर, देहू, नाशिक यांसारख्या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या; गोरगरीब जनतेसाठी रुग्णालये उभी केली; तीर्थक्षेत्री नद्यांकाठी घाट बांधले; अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रे घातली; कुष्ठरोग्यांची सेवा केली; रंजल्यागांजल्या जिवांना मायेची उब दिली. अशा प्रकारे समाजहिताचा ध्यास घेतलेले ते एक आगळेवेगळे संत होते.
मृत्यू – २० डिसेंबर, १९५६.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!