महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती | Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

google-news-icon
जन्म ११ एप्रिल १८२७
जन्मगाव कटगूण
वडील गोविंदराव फुले
आई चिमणाबाई फुले
पत्नी सावित्रीबाई फुले
अपत्ये यशवंत (दत्तक )
उपाधी महात्मा
संस्था सत्यशोधक समाज
मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०

मुद्दे

महात्मा ज्योतिबा फुले शोषितांचा आधारवड

भारतातील परंपरागत समाजव्यवस्थेविरुद्ध आणि या समाजव्यवस्थेतील परंपरांविरुद्ध विद्रोह करून उठणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा निर्देश करावा लागेल. ‘उक्ती आणि कृती’ यांमध्ये एकवाक्यता असलेल्या या समाजसुधारकावर ‘थॉमस पेन’ या पाश्चात्य विचारवंताचा आणि त्याच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा जबरदस्त प्रभाव होता. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील बहुजन समाज अज्ञानाच्या, अंधकारातच चाचपडत होता. त्याची चोहोबाजूंनी कोंडी झाली होती.

इंग्रजी सत्तेच्या स्थापनेनंतर या ठिकाणी परिवर्तनाला चालना मिळाली असली तरी त्याचा लाभ प्रामुख्याने समाजातील वरिष्ठ वर्गालाच झाला होता. येथील बहुजन समाजाची स्थिती पूर्वीप्रमाणेच दयनीय राहिली होती. अशा वेळी बहुजन समाजाला जागृत करून त्यास आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली, त्यांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान प्राप्त होऊ शकले. ‘महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा आणि पददलित जनतेचा उद्धारकर्ता’ म्हणूनच ज्योतिबांचा उल्लेख केला जातो.

महात्मा ज्योतिबा फुले-अल्प परिचय

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सन १८२७ मध्ये झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नसला तरी काही संशोधकांनी ‘११ एप्रिल’ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. सामान्यतः तीच त्यांची जन्मतारीख मानली जाते. त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. फुले यांचे पणजोबा त्या गावाचे चौगुले होते व ते जातीने क्षत्रिय-माळी होते. पण काही कारणामुळे त्यांना आपले गाव सोडावे लागले.

पुढे ते पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी येऊन राहिले. ज्योतीबांचे आजोबा उपळ्या स्वभावाचे असल्याने त्यांना आपली सर्व माला लागली; त्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागले. ते पुणे येथे येऊन राहिले आणि त्यांनी फुले विकण्याच्या व्यवसायात प्रवेश केला. त्यावरूनच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ‘गोऱ्हे’ या आडनावा ऐवजी ‘फुले’ असे आडनाव प्राप्त झाले. त्यांच्या तीन मुलांपैकी गोविंद याचे लग्न चिमणाबाई हिच्याशी झाले. याच दांपत्याच्या पोटी ज्योतीबांचा जन्म झाला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा इंग्रजी शाळेत प्रवेश

ज्योतिबा एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले; त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे वडील गोविंदराव यांच्यावर येऊन पडली. ज्योतीबांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे नाव शाळेत दाखल केले. परंतु त्या काळात बहुजन समाजातील लोकांचा शिक्षणाकडे मुळीच कल नव्हता. परिणामी, दोन-तीन वर्षांतच त्यांचे शिक्षण बंद पडले. त्यानंतर ज्योतिबा आपल्या वडिलांना शेती व्यवसायात मदत करू लागले.

तथापि, गोविंदरावांच्या शेजारी राहणारे गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट यांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि ज्योतिबांना परत शाळेत घालण्याविषयी त्यांचे मन वळविले. याचा परिणाम होऊन गोविंदरावांनी ज्योतिबांना पुन्हा एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातले. अशा रीतीने ज्योतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. दरम्यानच्या काळात त्यांचा सावित्रीबाई हिच्याशी विवाह झाला.

महात्मा ज्योतिबा फुले लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचे होते. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांच्या मनात आपल्या देशातील परकीय इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याचे विचार घोळू लागले होते. त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी लहुजीवस्ताद साळवे नावाच्या पहिलवानाकडून नेमबाजी, दांडपट्टा वगैरे बाबींचे शिक्षण घेतले होते. तथापि, लवकरच त्यांना आपल्या विचारांतील फोलपणा कळून चुकला. अशा प्रकारच्या फुटकळ प्रयत्नांनी इंग्रजी सत्ता नष्ट करता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाज कार्य

विद्यार्थिदशेतून बाहेर पडल्यावर आपण आपल्या समाजाच्या सेवेला वाहून घ्यावे, असे त्यांना वाटू लागले. त्याच वेळी त्यांना येथील सामाजिक विषमता, अन्याय व शोषण यांची प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे बारकाईने अवलोकन केल्यानंतर त्यांचे मन सामाजिक विषमता व अन्याय यांविरुद्ध पेटून उठले. आपल्या समाजात शूद्रातिशूद्रांना मिळत असलेली वागणूक, येथील स्त्रियांची दुःस्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी या सर्व गोष्टींचा ते अंतर्मुख होऊन विचार करू लागले, त्यावरून त्यांची अशी खात्री पटली, की या ठिकाणच्या सामाजिक व धार्मिक परिस्थितीत परिवर्तन घडवून आणल्याखेरीज या समाजातील दलित व शोषिता न्याय मिळणे शक्य नाही.

महात्मा ज्योतिबा फफुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा लाभलेल्या ताराबाई शिंदे यांनी सन १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ लिहून “जर बायकोला नवराच देव तर | नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणेच पाहिजे,’ “तुम्हाला जशी कुरूप, घाणेरडी, | गावंढळ बायको आवडत नाही तसा बायकोला तरी या मासल्याचा नवरा आवडेल का?” असे प्रश्न ठणकावून विचारले.
ताराबाई शिंदे

कृतिशील सुधारक

महात्मा ज्योतिबा फुले कृतिशील विचारवंत होते. एकदा विचारांची दिशा निश्चित झाल्यावर त्यांनी लगेच आपल्या कार्याला आरंभ केला. त्यापुढील काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच स्त्रिया व शूद्रातिशूद्र यांच्या उद्धारासाठी वाहिले, या कार्यात त्यांना नेहमी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. त्यांच्यावर अनेक प्रकारची संकटे कोसी तथापि, त्यांचा निर्धार पक्का होता. आपल्या अंगीकृत कार्यावर त्यांची पूर्ण निष्ठा होती म्हणूनच येथील दुर्बल समाजघटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याचे अत्यंत कठीण असे कार्य त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालू ठेवले.

ज्योतिबा फुलेंनी केलेले स्त्री- उद्धाराचे कार्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. आपल्या समाजाने स्त्रियांना सर्व प्रकारच्या बंधनांत पुरते जखडून ठेवले होते. त्यांना सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रथम स्त्री उद्धाराच्या कार्याकडे आपले लक्ष वळविले. स्त्रियांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले.

महात्मा-ज्योतिबा-फुले-शिकवताना
a person wearing dhoti and kurta teaching girls in maharashtra in old structre home illustration

भारतीय स्त्रीच्या उद्धारातील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे शिक्षणाचा अभाव, ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अचूक ओळखली होती. त्यांच्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तत्कालीन समाजाचा स्त्री-शिक्षणासंबंधीचा दृष्टिकोन अतिशय अनुदार होता. स्त्रिया शिक्षण घेऊन शहाण्या झाल्या तर त्या बिघडतील, असा सार्वत्रिक समज होता. समाजातील काही मंडळींची तर, स्त्रियांना शिक्षण देणे धर्मबाह्य आहे, अशी पक्की समजूत होती. पण स्त्रियांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांचा उद्धार शक्य नाही, असा ज्योतिबा फुले यांचा ठाम विश्वास होता; त्यामुळे त्यांनी स्त्री-शिक्षणाचे कार्य प्रथम हाती घेतले.

मुलींची शाळा आणि महिला शिक्षिका

ऑगस्ट, १८४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत स्वतः महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक म्हणून काम करीत असत. पण तत्कालीन परिस्थितीत मुलींच्या शाळेत काम करण्यासाठी दुसरा शिक्षक मिळविणेही त्यांना दुरापास्त बनले. तेव्हा ज्योतिबांनी आपली अशिक्षित पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम घरीच लिहिण्या-वाचण्यास शिकविले आणि त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

a women wearing saree teaching girls in maharashtra in old structre home illustration

खरे तर, आपल्या अशिक्षित पत्नीतून महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘पहिली भारतीय शिक्षिका घडविली, असेच म्हणता येईल. ही गोष्ट अर्थातच पुण्यातील काही लोकांना रुचली नाही. त्यांनी सावित्रीबाईंचा नाना प्रकारांनी छळ आरंभिला. सावित्रीबाईच्या अंगावर शेण- चिखल फेकण्यापर्यंतही काही नराधमांनी मजल मारली; पण त्या माऊलीने आपल्या पतीप्रमाणेच स्वतःचे कार्य निष्ठेने चालू ठेवले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची सरकारकडून दखल

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली ही शाळा आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद पडली. परंतु त्यामुळे नाउमेद न होता ३ जुलै, १८५१ रोजी त्यांनी पुण्यातच बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा उघडली. त्यानंतर १७ सप्टेंबर, १८५१ रोजी पुण्याच्या रास्ता पेठेत; तर १५ मार्च, १८५२ रोजी पुण्याच्या वेताळ पेठेत (आताची गुरुवार पेठ) अशा आणखी दोन मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या. अशा प्रकारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा फुल्यांनी स्त्री-शिक्षणाचे जे कार्य केले त्याबद्दल १६ नोव्हेंबर, १८५२ रोजी ब्रिटिश सरकारकडून ( शिक्षण खात्याकडून) पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला गेला.

ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सन १८२४ मध्येच स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी व्यक्तिगत पातळीवर स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरु करणारे महात्मा ज्योतिबा फुले हेच पहिले समाजसुधारक होत, हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.

महात्मा ज्योतिबा फुले- सामाजिक प्रथांना विरोध

भारतीय समाजात त्या काळात बालविवाहाची प्रथा सर्रास रूढ होती. जरठकुमारी विवाहदेखील बरेच होत असत. साहजिकच, समाजात विधवांची संख्या मोठी असे. त्यांची स्थिती तर अतिशय बिकट होती. विधवा स्त्रियांना भोगावे लागणारे दुःख पाहून ज्योतिबांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीस सक्रिय पाठिंबा दिला. लेख लिहून व भाषणे करून त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा धडाडीने पुरस्कार केला. तसेच स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी पुण्याच्या गोखले बागेत १८६४ मध्ये एक पुनर्विवाहदेखील घडवून आणला. विधवा स्त्रियांचे केशवपन(टक्कल) करण्याच्या दुष्ट प्रथेसही त्यांनी कडाडून विरोध केला.

‘बालहत्या प्रतिबंध गृहा’ची स्थापना

विधवा स्त्रीवर आणखी एक प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याचा प्रसंग काही वेळा ओढवत असे. एखाद्या विधवा स्त्रीचे तारुण्यसुलभ भावनांच्या आहारी गेल्याने चुकून वाकडे पाऊल पडले आणि त्यातून तिला दिवस गेले तर अशा वेळी तिच्यापुढे भृणहत्येखेरीज अन्य पर्याय उरत नसे. अशा दुर्दैवी स्त्रियांवरील अनवस्था प्रसंग टळावा म्हणून सन १८६३ मध्ये महात्मा फुल्यांनी स्वतःच्या घरीच ‘बालहत्या प्रतिबंध गृह‘ सुरू केले. या ठिकाणी बाळंतपणासाठी येणाऱ्या विधवा स्त्रियांच्या मुलांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. इतकेच नव्हे तर अशाच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मास आलेल्या यशवंत नावाच्या मुलास त्यांनी स्वतः दत्तक घेतले.

महात्मा ज्योतिबा फुले- अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य

स्त्रियांप्रमाणेच तत्कालीन समाजातील आणखी एक दुर्दैवी घटक म्हणजे अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचे लोक होत. अस्पृश्यांना तर त्याकाळातील उच्चवर्णीयांनी साधे माणुसकीचे हक्कही नाकारले होते. उच्चवर्णीयांकडून त्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यापेक्षाही लाजीरवाणी गोष्ट म्हणजे अस्पृश्य जातीच्या माणसाच्या स्पर्शानेही सवर्ण हिंदूंना विटाळ होत होता. समाजातील हीन व घाणेरडी कामे अस्पृश्यांच्या वाट्याला आली होती. पराकोटीच्या दारिद्र्यात त्यांना आपले जीवन व्यतीत करावे लागत होते. थोडक्यात, गुलामापेक्षाही येथील अस्पृश्यांचे जगणे हीन बनले होते.

अस्पृश्यांची समाजातील ही स्थिती पाहून महात्मा ज्योतिबा फुले यांचे अंतःकरण द्रवले आणि अस्पृश्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याकरिता अस्पृश्यांना प्रथम शिक्षण देऊन त्यांच्यातील अज्ञान दूर केले पाहिजे, याची जाणीव ज्योतिबांना झाली; म्हणून त्यांनी अस्पृश्यांना शिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. ३ जुलै, १८५२ रोजी पुण्याच्या वेताळ पेठेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुढे १८५२ मध्येच त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलांसाठीच दुसरी शाळाही वेताळ पेठेतच सुरू केली. १८५३ मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी ‘महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी’ या नावाची एक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या वतीने अस्पृश्यांसाठी काही शाळा चालविण्यात आल्या.

अस्पृश्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यात जागृती घडवून आणणे आवश्यक आहे, ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखली होती; त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांमधीलच काही मंडळींना हाताशी धरून या दृष्टीने प्रयत्न चालविले. त्यांनी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाची गोडी उत्पन्न केली. उन्हाळ्यात अस्पृश्यांचे पाण्याविना अतिशय हाल होत असत. ते पाहून फुले यांनी १८६८ मध्ये आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. सत्यशोधक समाजाची स्थापना

महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक म्हणून ओळखले जात असले तरी वरवरच्या सुधारणांवर त्यांचा विश्वास नव्हता. सामाजिक विषमता, अन्याय व शोषण यांवर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेलाच त्यांचा विरोध होता. शूद्रातिशूद्र कनिष्ठ वर्गाचे उच्चवर्णीयांनी वर्षानुवर्षे जे अमानुष शोषण चालविले आहे ते थांबविल्याखेरीज या ठिकाणी न्यायाधिष्ठित समाजव्यवस्था प्रस्थापित होणे शक्य नाही, असे त्यांचे मत होते. आपल्या ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’ इत्यादी ग्रंथांद्वारे त्यांनी हे मत स्पष्ट शब्दांत व्यक्त केले होते.

तत्कालीन ब्राह्मणांनी खोटे धर्मग्रंथ निर्माण करून समाजव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी सर्व सोयीसवलती आपणाकडे घेतल्या आणि शूद्रातिशूद्रांना कायमचे गुलामगिरीच्या खाईत लोटले, भारतीय समाजातील जातिभेदाचे मूळ ब्राह्मणांच्या स्वार्थी धर्मांधतेत आणि अहंकारात आहे. ब्राह्मणी वर्चस्वातूनच येथील समाजात पराकोटीची विषमता निर्माण झाली आहे, अशा शब्दांत महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेचे विश्लेषण केले होते.

सामाजिक विषमता, अन्याय व शोषण यांवर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत बदल घडवून आणावयाचा असेल तर या ठिकाणच्या शूद्रातिशूद्र कनिष्ठ वर्गांनी संघटित होऊन ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, असे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रतिपादन केले. अशा संघर्षाशिवाय कनिष्ठ जातींना त्यांचे न्याय्य हक्क मिळणार नाहीत, असे त्यांचे मत होते. अर्थात, या प्रकारचा संघर्ष करावयाचा तर बहुजन समाजाची स्वतःची संघटना हवी. ही गरज ओळखून त्यांनी २४ सप्टेंबर, १८७३ रोजी पुण्यात ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ज्योतिबा फुले हेच या संघटनेचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष होते.

सत्यशोधक समाजाची प्रमुख तत्त्वे पुढीलप्रमाणे होती-

प्रमुख तत्त्वे

  1. ईश्वर एकच असून तो निर्गुण-निराकार आहे.
  2. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
  3. परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे.
  4. परमेश्वराच्या भक्तीसाठी कीणत्याही मध्यस्थाची गरज नाही. तेव्हा पुरोहित वर्गाच्या मध्यस्थीशिवाय कोणत्याही मनुष्याला परमेश्वराची उपासना व भक्ती करता येते.
  5. माणसाला जातीने नव्हे, तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते.
  6. पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत व त्या कनिष्ठ जातींच्या पिळवणुकीचे कारण आहेत.
  7. कोणताही धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केली आहे इत्यादी.

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुल्यांनी सामाजिक अन्याय व धर्माच्या नावावर चाललेले शोषण यांविरुद्ध आवाज उठविला. तसेच वर्षानुवर्षे निद्रिस्त स्थितीत पडलेल्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाला त्यांनी जागे केले आणि त्यास आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.

सत्यशोधक समाजाच्या वतीने पुरोहिताचे पौरोहित्य नाकारून सत्यशोधक पद्धतीने २५ डिसेंबर, १८७३ रोजी पहिला विवाह लावण्यात आला. पुढे ४ फेब्रुवारी, १८८५ रोजी फुल्यांनी आपला दत्तकपुत्र यशवंत याचाही विवाह याच पद्धतीने संपन केला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे धर्मविषयक विचार अतिशय उदात्त होते. सर्व मानव एकाव परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून मानवांनी परस्परांशी बंधुभावाच्या नात्याने व्यवहार करावा, असे त्यांनी सांगितले. मानवधर्माचा पुरस्कार करताना आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात ज्योतिबा म्हणतात-

“निर्मिके निर्मिला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये ।
पिढीजाद बुद्धी नाही सर्वांमधी, शोध करा आधी पूर्तेपणी ॥
धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी |
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी ।
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी ||”
महात्मा ज्योतिबा फुले

या ओळी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. धर्माच्या नावाखाली रूढ झालेल्या अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा यांना त्यांचा जोरदार विरोध होता. धर्माचा बाजार मांडणाऱ्या पुरोहितांनाही त्यांनी विरोध दर्शविला होता व त्यांची कडक निर्भर्त्सना केली होती. ‘सर्वसाक्षी जगत्यती । त्याला नकोच मध्यस्थी।’ असे त्यांनी म्हटले होते. ज्योतिबांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, ‘ज्या परमेश्वराने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली त्याला नैवेद्य दाखविणे किंवा एखादी वस्तू अर्पण करणे यासारखी मूर्खपणाची गोष्ट दुसरी नाही.’ हिंदू धर्मग्रंथांची निर्मिती येथील वरिष्ठ वर्गाने स्वतःच्या फायद्यासाठी केली असल्याने त्यांतील भाकडकथांवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, असे त्यांचे सांगणे होते.

महात्मा ज्योतिबा फुले- शेतकऱ्यांचे कैवारी

‘भारतीय शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी’ या शब्दांत महात्मा ज्योतीबा फुल्यांचे वर्णन करणे उचित ठरेल. येथील समाजाला व सरकारला शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे विदारक दर्शन घडवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य महात्मा फुल्यांनीच केले. आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ (१८ जुलै, १८८३) या ग्रंथाद्वारे ज्योतिबांनी हिंदी शेतकऱ्यांची दुःखे वेशीवर टांगली. उच्चवर्णीय ऐतखाऊ व सरकारी अधिकारी शेतकऱ्यांचे कसे शोषण करतात, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या दुःख व दारिद्र्याचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे, हे स्पष्ट करताना ते म्हणतात-

विद्येविना मती गेली । मतिविना नीती गेली ।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥
महात्मा ज्योतिबा फुले

‘शेतकऱ्यांचा असूड’ हे आपले पुस्तक शूद्र शेतकऱ्यांच्या बचावासाठी (हितार्थ) लिहिले असे म्हणणारे ज्योतिबा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे लढणारे आणि त्यांची गऱ्हानी सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी पोटतिडिकेने पुढे येणारे महाराष्ट्रातील पहिलेच विचारवंत होत. स्वतः आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांपुढे आधुनिक शेतीचा आदर्श ठेवणारे पहिले कृषितज्ज्ञही त्यांनाच म्हणावे लागेल. भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले होते, की जोपर्यंत राष्ट्रीय सभा शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत नाही तोपर्यंत ती ‘राष्ट्रीय सभा’ या नावाला मुळीच पात्र नाही.

ज्योतिबांच्या कार्याचे मूल्यमापन

महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार होण्याबाबत विशेष आग्रह धरला होता. बहुजन समाजाला शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची प्रगती होणार नाही, असे त्यांचे मत होते. म्हणून शिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसाराकडे सरकारने लक्ष पुरविले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे, ही मागणी करणारे ज्योतिबा हे पहिले भारतीय होत.

सन १८५५ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न‘ या नाटकातून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन केले असून ‘ज्ञानचक्षू’ हा माणसाचा तिसरा डोळा असल्याचा संदेश दिला आहे. ज्योतिबांनी आयुष्यभर धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा करून समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. रूढी व परंपरा यांमधील दोष उघड करून समाजातील उच्चवर्णीयांकडून इतरांची होत असलेली पिळवणूक व पौरोहित्य करणाऱ्या वर्गाच्या मक्तेदारीवर आघात करीत असतानाच स्त्री-पुरुष समतेची नवी दृष्टी समाजाला देण्याचा प्रयत्न केला.

आपल्या धर्मपत्नीस-सावित्रीबाईस शिकवून त्यांच्यातून त्यांनी ‘पहिली भारतीय शिक्षिका’ घडविली. हिंदुस्थानातील शिक्षणाच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९ ऑक्टोबर, १८८२ रोजी नेमलेल्या हंटर आयोगापुढे साक्ष देताना फुल्यांनी सांगितले की, सरकार गरीब शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करते त्या वसुलाचे उत्पन्न वरिष्ठ वर्गाच्या शिक्षणावरच खर्च करते. त्यामुळे कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे. तेव्हा यापुढे बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे.

मुंबई इलाख्यात प्राथमिक शिक्षणाची जी आबाळ होत आहे ती थांबली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले,
छत्रपती शिवरायांविषयी त्यांना नितान्त आदर होता. शिवरायांना तर ते बहुजन समाजाचे दैवतच मानीत. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांनी एक प्रकारे शिवरायांविषयी असलेला त्यांचा आदरभावच व्यक्त केला. सन १८६९ मध्ये त्यांनी लिहिलेला ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा‘ प्रसिद्ध आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक सहकारी नारायणराव लोखंडे यांनी १८८४ मध्ये ‘बॉम्बे मिल हँड असोसिएशन सोसायटी‘ या नावाने मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. भारतातील ही पहिलीच कामगार संघटना होय. लोखंडे यांच्या या कार्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचा आशीर्वाद होता. तेच या कार्यामागील प्रेरकशक्ती होते.

सन १८७६ ते १८८२ या काळात फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. नगरपालिका सदस्यत्वाच्या आपल्या कारकिर्दीतही फुल्यांनी गोरगरिबांच्या हितालाच प्राधान्य दिले होते.

या देशीची गोरगरीब जनता – येथील सामान्य माणूस- विशेषतः हालअपेष्टांत जगत असलेला आणि गरिबीने पिचत असलेला येथील शेतकरी हा ज्योतिबांनी आपल्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदूच मानला होता. २ मार्च, १८८८ रोजी ‘ड्यूक ऑफ कॅनॉट’ यांच्या सन्मानार्थ पुण्यातील एक प्रतिष्ठित नागरिक हरिरावजी चिपळूणकर यांनी दिलेल्या मेजवानीला सामान्य शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून येथील सामान्य शेतकरी कशा प्रकारचे जीवन जगतो, याकडे त्यांनी ड्यूकचे लक्ष वेधले.

थोडक्यात, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य पददलित जनतेच्या व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले. सामाजिक अन्याय व विषमता यांविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. सन १८७३ मध्ये लिहिलेले आपले ‘गुलामगिरी‘ हे पुस्तक त्यांनी गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अर्पण केले होते, हे या ठिकाणी लक्षात घेणे अगत्याचे आहे.

महाराष्ट्रातील बहुजन समाजात महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैचारिक जागृती घडवून आणली व त्यास कार्यप्रवण बनविले. समाजकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात ते अग्रभागी राहिले आणि खऱ्या मानवधर्माचा त्यांनी सतत पुरस्कार केला. सन १८९१ मध्ये लिहिलेल्या आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म‘ या ग्रंथातून त्यांनी सर्वधर्मभेदांच्या पलीकडे जाऊन ‘सत्य हाच एकमेव धर्म‘ असल्याचे प्रतिपादन करून जणू विश्वकुटुंबवादाचा जाहीरनामाच आपल्यासमोर मांडला आहे.

बौद्धिक परंपरा असलेल्या ब्राह्मण समाजातील तत्कालीन शिक्षित व अल्पशिक्षित ब्राह्मण तरुणांनी आपापल्या कुवतीनुसार व शिक्षणानुसार ब्रिटिशकालीन शासकीय यंत्रणेमध्ये शिरकाव करून घेतला होता. मामलेदार, तलाठी, कुलकर्णी यांसारखी पदे त्यांनी मिळविली होती. सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांत कारकून म्हणूनही याच समाजाने शिरकाव केला होता. आपल्या हाती आलेल्या छोट्या-मोठ्या सत्तेचा वापर त्यांनी तथाकथित शूद्रातिशूद्रांवर अन्याय करण्यासाठीच अधिक केला. ज्योतिबा फुले सात्विक संतापाने त्यांचा उल्लेख ‘कलम कसाई’, ‘ग्रामराक्षस’ अशा शेलक्या शब्दांत करतात.

साहजिकच, ब्राह्मणविरोधक म्हणून ज्योतिबांवर टीकेची झोड उठविण्यात आली. खरेतर, महात्मा ज्योतिबा फुले हे ब्राह्मणविरोधक नव्हते तर ब्राह्मण्यविरोधक होते. ते ब्राह्मणांचा धिक्कार करीत नव्हते तर गोरगरिबांच्या शोषणास कारणीभूत ठरलेल्या ‘ब्राह्मण्य’ या प्रवृत्तीला ते धिक्कारत होते. ‘काशीबाई’ या ब्राह्मण विधवेच्या ‘यशवंत’ नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले होते; हा उल्लेख यापूर्वी आलाच आहे.

आपल्यावरील टीकेला ज्योतिबांनी प्रत्यक्ष कृतीने दिलेले उत्तर म्हणूनच या गोष्टीकडे पाहावे लागेल. महाराष्ट्रात स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा समाजसुधारक, अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा उघडून त्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणारा पहिला दलितोद्धारक, हिंदी शेतकऱ्यांची दुःखे वेशीवर टांगणारा पहिला शेतकरी कैवारी, शूद्रातिशूद्र बहुजन समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारा बहुजन समाजातील पहिला नेता, अशा अनेक विशेषणांनी ज्योतिबांचा रास्त गौरव केला जातो. ते केवळ समाजसुधारक नव्हते तर मूलाग्राही समाजक्रांतिकारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे. समाजपरिवर्तनाच्या कार्यात त्यांची बरोबरी करणारा अन्य पुरुष आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सापडणे शक्य नाही.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेली पुस्तके

  • (१) नाटक तृतीय रत्न (१८५५),
  • (२) पोवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून, १८६९),
  • (३) पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून, १८६९),
  • (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९),
  • (५) गुलामगिरी (१८७३),
  • (६) शेतकऱ्याचा असूड (१८ जुलै, १८८३)
  • (७) सत्सार अंक-१ (१३ जून, १८८५),
  • (८) इशारा (१८८५)
  • (९) सत्सार अंक-२ (ऑक्टोबर, १८८५),
  • (१०) सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक (महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित : १८९१)
  • (११) अखंडादि काव्यरचना इत्यादी.
१९ मे, १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात ज्योतिबांना 'महात्मा' ही पदवी अर्पण करण्यात आली. हा समारंभ नारायणराव | मेघाजी लोखंडे या ज्योतिरावांच्या कर्तबगार सहकाऱ्याने आयोजित केला होता.
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment