इंदिरा गांधी संपूर्ण माहिती मराठी |Indira Gandhi Information in Marathi

google-news-icon
नावइंदिरा गांधी
वडिलांचे नावजवाहरलाल नेहरू
आईचे नावकमला नेहरू
जन्म१९ नोव्हेंबर १९७१
जन्म ठिकाणप्रयागराज
पती फिरोज गांधी
अपत्ये राजीव गांधी आणि संजय गांधी
व्यवसायराजकारणी
यशभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
मृत्यू६ जानेवारी १९८९

इंदिरा गांधी-‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवादी’

श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. लोकप्रिय नेत्या, मुत्सदी राजकारणी, कुशल प्रशासक व कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश करणारे आणि या मूल्यांच्या रक्षणासाठी आयुष्यभर झटणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्या ओळखल्या जातात. भारताचे ऐक्य व एकात्मता अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणांचे मोल देणाऱ्या इंदिराजींचे हे राष्ट्र नेहमीच कृतज्ञतेने स्मरण करील.

इंदिरा गांधींचा परिचय

इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. पंडित जवाहरलाल नेहरू व कमला नेहरू यांच्या त्या कन्या होत्या. त्यांचे शिक्षण प्रयागराज, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले. उच्च शिक्षणासाठी त्या इंग्लंडलाही गेल्या होत्या इंदिराजींचे संपूर्ण घराणेच स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित असल्याने त्यांच्यावर बालपणा- पासूनच राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले होते.

इंदिरा गांधींचा लहानपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीशी संबंध आला होता, सन १९३० मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची ‘वानरसेना’ स्थापन केली होती, त्या ‘बाल चरखा संचा’तही सहभागी झाल्या होत्या.

इंदिरा गांधींचा तुरुंगवास

इंदिरा गांधींनी १९४२ च्या ‘चले जाव‘ आंदोलनात भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. १९४२ मध्ये त्यांचा फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच फाळणीतून निर्माण झालेल्या समस्या, जातीय दंगली, औद्योगिक कलह यांसारखे अनेक गंभीर प्रश्न देशापुढे उभे राहिले होते. या काळात इंदिरा गांधींनी निर्वासित, जातीय दंग्यांतील आपद्ग्रस्त यांच्यासाठी सुरू केलेल्या मदतकार्यात भाग घेऊन या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

स्वातंत्र्योत्तर काळात इंदिराजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. लवकरच त्यांनी भारतीय राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. १९५५ मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्या बनल्या. पुढे १९५९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. पंडित जवाहरलाल नेहरूंना इंदिराजींचे अनेक बाबतीत वेळोवेळी साहाय्य होत असे.

पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर सन १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधींनी माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

शास्त्रीजींच्या निधनानंतर २४ जानेवारी, १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. हा काळ त्यांच्या नेतृत्वगुणांची कसोटी पाहणारा होता. १९६२ चे चिनी आक्रमण आणि १९६५ मध्ये पाकिस्तानशी झालेले युद्ध यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडला होता. देशापुढे अन्नधान्याच्या टंचाईचे संकट उभे राहिले होते. महागाई भडकत चालल्याने सामान्य जनतेत सरकारविषयी असंतोष वाढू लागला होता.

१९६७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अनेक प्रांतांत पराभूत व्हावे लागले होते; त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा धोकाही जाणवू लागला होता. तथापि, अशा कठीण व प्रतिकूल परिस्थितीतही इंदिरा गांधींनी अत्यंत कुशलतेने व समर्थपणे राष्ट्राच्या तसेच पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यायोगे आपल्या नेतृत्वगुणांचा त्यांनी सर्वांना प्रत्यय आणून दिला. या सुरुवातीच्या काळात इंदिराजींची ‘गुँगी गुडिया’ अशी हेटाळणी करण्याचा प्रयत्नही त्यांच्या विरोधकांनी केला होता; परंतु पुढे इंदिराजींनी आपल्या कर्तृत्वाचे असे ‘काही तेज प्रकट केले की या विरोधकांना आपले शब्द गिळणे भाग पडले.

काँग्रेसमध्ये फूट

सन १९६९ मध्ये इंदिरा गांधी यांच्यापुढे एक फार मोठे संकट निर्माण झाले. काँग्रेसमधील मोरारजी देसाई, कामराज, निजलिंगप्पा, संजीव रेड्डी, अतुल्य घोष, स. का. पाटील यांसारख्या मातब्बर नेत्यांनी इंदिराजींच्या नेतृत्वाला शह देण्याच्या कारवाया सुरू केल्या; परंतु इंदिराजींनी या नेत्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविला. या वेळी काँग्रेस पक्षात फूट पडून जुन्या कॉंग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली ‘सिंडिकेट काँग्रेस’ व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिकेट काँग्रेस’ असे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आले.

इंदिरा गांधींचे जनताभिमुख धोरण

काँग्रेस पक्षातील या फुटीनंतर इंदिरा गांधींनी जनताभिमुख धोरण स्वीकारून पुरोगामी व लोककल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचा धडाका सुरू केला. प्रथम त्यांनी देशातील चौदा बड्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे जनतेपुढे आपली पुरोगामी समाजवादी प्रतिमा उभी करणे त्यांना शक्य झाले. साहजिकच, देशातील सर्वसामान्य जनतेत त्या कमालीच्या लोकप्रिय झाल्या.

१९७१ मध्ये त्यांनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषित केली. या निवडणुकीमध्ये त्यांनी ‘गरिबी हटाव’ची घोषणा देऊन सामान्य लोकांच्या भावनांनाच हात घातला. आपल्या पक्षातील दुय्यम नेत्यांवर विसंबून राहण्याऐवजी देशातील जनतेलाच थेट आवाहन करण्याच्या मार्गाला त्यांनी पसंती दिली. त्यामुळे १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला, काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती केंद्रित झाली आणि त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या.

नकाशातील बदल

बांगलादेशाची निर्मिती हा इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण मानता येईल. पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी राज्यकर्त्यांनी निवडणुकीतील लोकमताचा कौल धुडकावून पूर्व पाकिस्तानचे नेते मुजिबूर रेहमान यांना सत्तेपासून वंचित ठेवले; त्यामुळे पूर्व पाकिस्तानात जनतेच्या असंतोषाचा प्रचंड उद्रेक झाला. त्याला तोंड देण्यासाठी पश्चिम पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब केला. पूर्व पाकिस्तानातील जनतेवर पाकिस्तानी लष्कराने अनन्वित अत्याचार सुरू केले; त्यामुळे पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. त्यातूनच १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध उद्भवले.

तथापि, युद्धाला प्रत्यक्ष तोंड लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन इंदिराजींनी आपल्या मुत्सद्देगिरीचे व अलौकिक दूरदर्शित्वाचे दर्शन घडवीत मोठ्या धूर्तपणे १९७१ मध्ये सोव्हिएत युनियनशी वीस वर्षांचा ऐतिहासिक असा मैत्री व परस्पर सहकार्य करार घडवून आणला. त्यानंतर लवकरच भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले. या युद्धात भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेचा संपूर्ण पराभव केला. पूर्व पाकिस्तानचा संपूर्ण प्रदेश भारतीय सेनेच्या नियंत्रणाखाली आला.

तथापि, इंदिरा गांधींनी हा प्रदेश बांगलादेशाच्या नेतृत्वाकडे सुपूर्त करून बांगला- देशाच्या निर्मितीस हातभार लावला. या काळात इंदिरा गांधींनी राजकीय मुत्सद्देगिरीचे विलोभनीय दर्शन घडविले. देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. पुढे १९७२ मध्ये त्यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय सिमला करार करून आपल्या मुत्सद्देगिरीचे परत एकदा सर्वांना दर्शन घडविले. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना १९७१ चा ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून गौरविले गेले.

लोकसभेवरील निवड अवैध

यापुढील काळात मात्र काही अडचणींना तोंड देण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. ‘गरिबी हटाव’ ची घोषणा निवडणूक जिंकण्यास उपयोगी पडली असली तरी त्यामुळे जनतेच्या शासनाविषयीच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. जनतेच्या या अपेक्षा पूर्ण करणे शासनाला शक्य न झाल्यामुळे जनतेत नाराजी वाढू लागली होती. शासनातील उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याने शासनसंस्थेची जनमानसातील प्रतिमा डागाळत चालली होती.

परिणामी, शासनाची विश्वासार्हता धोक्यात आली होती. त्यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाचा इंदिराजींच्या निवडणूक खटल्यासंबंधीचा निर्णय बाहेर आला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध राजनारायण यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत इंदिरा गांधी विजयी झाल्या; परंतु त्यांनी निवडून येण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याच्या कारणावरून राजनारायण यांनी त्यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले. यासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयात चाललेल्या खटल्याचा निकाल १२ जून, १९७५ रोजी जाहीर झाला. उच्च न्यायालयाने इंदिराजींची लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरविली.

आणीबाणी आणि सत्तेवरून पायउतार

वरील निकालाने देशात एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली आणि ‘इंदिरा हटाव’ मोहीम हाती घेतली; त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती खूपच गोंधळाची बनली. त्यातून मार्ग काढण्यासाठी इंदिरा गांधींनी २५ जून, १९७५ रोजी अंतर्गत शांतता धोक्यात आल्याचे कारण देऊन देशात आणीबाणीची परिस्थिती लागू करण्यासंबंधी घोषणा केली. आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांवर अनेक निर्बंध लादण्यात आले.

विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले. त्यामुळे लोकशाही पद्धतीचा गळा घोटल्याचा आरोप इंदिराजींवर केला जाऊ लागला. या काळात प्रसारमाध्यमांवरही अनेक निर्बंध घातल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. साहजिकच, त्यांच्याकडून अनेक बाबतीत अतिरेक घडले; त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला. अशा परिस्थितीत इंदिरा गांधींनी १९७७ च्या मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या; परंतु वरील कारणांमुळे निवडणुकीचा कौल त्याच्या विरोधात गेला. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या.

पुन्हा सत्तेवर आपल्या राजकीय जीवनातील या पराभवाने इंदिराजी मुळीच खचल्या नाहीत. लवकरच जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या दिशेने त्या कामाला लागल्या. सन १९७७ मध्ये अधिकारावर आलेल्या जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षांतर्गत संघर्ष निर्माण करून इंदिराजींना अप्रत्यक्ष मदतच केली. अखेरीस जनता पक्षातील भांडणापायीच त्याचे विघटन झाले.

जनता पक्षातील फुटीनंतर कोणत्याही पक्षाला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळू न शकल्याने राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जित करून नव्या निवडणुका जाहीर केल्या. १९८० च्या जानेवारी महिन्यात झालेल्या या निवडणुकीत जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने नेत्रदीपक यश मिळविले. अशा प्रकारे तीन वर्षांच्या आतच इंदिरा गांधी मोठ्या दिमाखात देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनल्या. दुर्दैवाने या विजयानंतर थोड्याच कालावधीत त्यांना संजय गांधींच्या अपघाती निधनामुळे पुत्रवियोगाचा फार मोठा धक्का सहन करावा लागला; परंतु या धक्क्यातूनही धीरोदात्तपणे त्यांनी स्वतःला सावरले.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रतिमा उंचावली

यापुढील काळ इंदिराजींच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील कर्तृत्वाचे दर्शन घडविणारा आहे. त्यांच्या कारकिर्दीत सन १९८२ मध्ये दिल्लीत नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. १९८३ मध्ये नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची सातवी शिखर परिषद भरविली गेली. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले. इंदिराजींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

इंदिरा गांधींची हत्या

भारतात या सुमारास पंजाब समस्येने डोके बरेच वर काढले होते. शीख अतिरेक्यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिरासारख्या पवित्र जागेचे शस्त्रास्त्रांच्या भांडारात रूपांतर करण्याचा प्रयत्न चालविला होता; त्यामुळे इंदिरा गांधींना व्यापक देशहितासाठी सुवर्णमंदिरात सैन्य घुसविण्याचा निर्णय घेणे नाइलाजास्तव भाग पडले. ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी सत्वंतसिंग व बेअंतसिंग या शरीररक्षकांनीच त्यांची भ्याड हत्या केली.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

AI ला विचारलं शक्तिमान आणि आयर्न मॅन सोबत कसे दिसतील तर त्याने हे फोटो केले तयार भारतीय वापरत आहेत पाकिस्तानी हॅकर्स ने बनवलेल्या apps Jio Air Fiber: १.५ gbps ची स्पीड जणू घरातील टावर आयफोन आणि इस्रोची या माध्यमातून झाली युती!