नाव | नारायण |
जन्म | शके १५३० (इ. स. १६०८) |
जन्मगाव | जांब (मराठवाडा) |
वडिलांचे नाव | सूर्याजीपंत |
आईचे नाव | राणूबाई |
ग्रंथ | दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके एकवीससमासी सोळा लघुकाव्ये दोन रामायणे चौदा ओवीशते स्फुट ओव्या |
मृत्यू | शके १६०३ (इ. स. १६८१) |
मुद्दे
समर्थ रामदास यांचा परिचय
समर्थ रामदासांचा जन्म शके १५३० (इ. स. १६०८) मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत तर आईचे नाव राणूबाई असे होते. रामदासांचे मूळ नाव नारायण, आडनाव ठोसर व घराणे कुलकर्णी. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी विवाहमंडपातून पलायन केले आणि ते अध्यात्ममार्गाकडे वळले.
घरातून बाहेर पडल्यानंतर ते नाशिक-पंचवटीस आले. तेथे टाकळी या ठिकाणी त्यांनी बारा वर्षे घोर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. त्यांच्या या भ्रमंतीचा कालावधीही बारा वर्षे इतका होता.
याप्रमाणे बारा वर्षांची तीर्थयात्रा संपवून समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रात कृष्णातीरी येऊन दाखल झाले. कृष्णेच्या परिसरात त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. याच काळात त्यांनी चाफळ या ठिकाणी शके १५७० (इ. स. १६४८) मध्ये राममंदिर उभारले.
समाजजागृतीचा ध्यास
समर्थ रामदास स्वामी यांनी या कालावधीत अनेक शिष्य जमविले आणि त्यांच्या मदतीने समाजजागृतीचे कार्य हाती घेतले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या ‘रामदासी संप्रदायाची उभारणी केली. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांपासून चालत आलेल्या संतपरंपरेत रामदासांचा समावेश केला जात असला तरी त्यांनी वारकरी संप्रदायापासून वेगळा असा स्वतःचा स्वतंत्र संप्रदाय निर्माण केला होता, हे त्यांचे वेगळेपण या ठिकाणी स्पष्ट होते.
आयुष्याच्या अखेरच्या काळात रामदासांचे वास्तव्य सज्जनगडावर होते. श्रीराम, हनुमान व तुळजाभवानी ही त्यांची उपास्यदैवते होती. शके १६०३ (इ. स. १६८१) मध्ये रामदासांनी सज्जनगडावर देह ठेवला.
समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज भेट- अभ्यासकांच्या मते
रामदासांच्या जीवनातील एक वादग्रस्त विषय म्हणून समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज भेटीच्या प्रसंगाचा उल्लेख करता येईल. या संदर्भात दोन परस्परविरोधी मते मांडण्यात आली आहेत. इतिहासाचार्य राजवाडे, शंकर श्रीकृष्ण देव इत्यादी अभ्यासकांच्या मते, रामदास व शिवाजी यांची प्रथम भेट शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये झाली. याउलट जदुनाथ सरकार, न. र. फाटक, डॉ. बाळकृष्ण चांदोरकर यांसारख्या संशोधकांनी असे मत व्यक्त केले आहे की, या दोघांची भेट पहिल्यांदा शके १५९४ (इ. स. १६७२) मध्ये झाली.
- वसंतदादा पाटील माहिती मराठी
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड माहिती मराठी
- डॉ. जयंत नारळीकर माहिती मराठी
- डॉ. पंजाबराव देशमुख माहिती मराठी
समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज भेटीचा काळ शके १५७१ हा होता, असे प्रतिपादन करणाऱ्या विचारवंतांना असे सुचवावयाचे आहे की, शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा समर्थ रामदासांकडून मिळाली म्हणून रामदास हे शिवाजी महाराजांचे राजकीय गुरू ठरतात. तथापि, बहुसंख्य इतिहासकारांना असे वाटते की, महाराजांना कोणीही राजकीय गुरु नव्हता. त्यांचे व्यक्तिमत्त्व व नेतृत्व स्वयंभू होते. विश्वसनीय स्वरूपाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे बोलावयाचे झाल्यास, समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज यांची भेट शके १५९४ पूर्वी झाली नसावी याच निष्कर्षाप्रत यावे लागते.
अर्थात, समर्थ रामदास स्वामी आणि छ. शिवाजी महाराज यांच्या भेटीसंबंधी वरीलप्रमाणे मतभिन्नता असली तरी शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याला पूरक ठरू शकेल अशी शिकवण समर्थांनी त्या काळी येथील सामान्यजनांना दिली यासंबंधी वाद नसावा.
समर्थ रामदास स्वामी यांची वाङ्मयसंपदा
समर्थ रामदासांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. ‘दासबोध‘ हा त्यांचा सर्वांत प्रसिद्ध असा ग्रंथ होय. याखेरीज मनाचे श्लोक, करुणाष्टके, एकवीससमासी, सोळा लघुकाव्ये, दोन रामायणे, चौदा ओवीशते, स्फुट ओव्या इत्यादी रचनाही त्यांच्या नावावर आहेत. ‘दासबोध’ या ग्रंथात समर्थांचे विचारधन एकवटले आहे. त्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर उपयुक्त व मार्गदर्शनपर असा उपदेश केला आहे.
रामदासांचे मनाचे श्लोक व करुणाष्टकेदेखील अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. मनाच्या श्लोकांतून त्यांनी दासबोध व एकवीससमासी या ग्रंथांतील विचार सामान्य जनांसाठी सोप्या भाषेत सांगितले आहेत. त्यांची करुणाष्टके म्हणजे त्यांनी साधकावस्थेत श्रीरामाची आर्त स्वराने केलेली आळवणी होय. त्यामध्ये कारुण्य ओतप्रोत भरले आहे. श्रीरामाच्या दर्शनाचा ध्यास घेतलेल्या रामदासांच्या मनाची अवस्था त्यातून प्रगट झाली आहे. या करुणाष्टकांतील-
‘अनुदिन अनुतापें तापलों रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझें नावरें आवरितां
तुजविणें शीण होतो धावरे धाव आता ||’
हे स्तोत्र म्हणजे रामदासांनी अत्यंत व्याकूळतेने श्रीरामाचा केलेला धावाच म्हणता येईल.
काव्यदृष्ट्याही करुणाष्टकांचे मोल निश्चितच मोठे आहे.
तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती अनुलक्षून राजधर्म, क्षत्रियधर्म, प्रजाधर्म इत्यादींचा ऊहापोह त्यांच्या रचनेत आढळतो.
“शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप ।
महाराष्ट्र राज्य करावें जिकडे तिकडे ||”
संभाजीराजांना हा उपदेश दिला तो रामदासांनीच !
प्रपंच आणि परमार्थ यांच्या समन्वयाची शिकवण समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध व इतर ग्रंथांतून प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधण्याची शिकवण दिली आहे. ज्याला धड प्रपंचही करता येत नाही त्याला परमार्थ कसा काय जमणार? म्हणून ‘प्रपंच करावा नेटका’ असे ते सांगतात. प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही ते प्रयत्नवादावरच भर देतात. ‘यत्न तो देव जाणावा’ हेच त्यांचे सांगणे आहे. प्रारब्धावर विशेष भर न देता ‘विवेकपूर्ण वैराग्य’ हा आत्मज्ञानाचा पाया कल्पून त्यांनी परमार्थातील कर्मयोग मांडला आहे. साधकाने प्रपंच आणि परमार्थ यांची सारखीच काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. अध्यात्म व भक्ती यांचे निरूपण करताना रामदास व्यवहारवादाचाही ऊहापोह करतात. परमार्थसिद्धी व आत्मसाक्षात्कार यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे.
सामाजिक संकुचितपणाचा स्पर्श
रामदासांच्या विचारसरणीत काही भाग चिरंतन स्वरूपाचा, तर काही भाग कालसापेक्ष होता. भक्तिमार्ग वाढवावा, वेदान्तातील अद्वैतबोध लोकांच्या गळी उतरवावा आणि धर्माची विस्कटलेली घडी नीट बसवावी, ही त्यांची आकांक्षा होती. तथापि, धर्मरक्षणाच्या प्रश्नाकडे त्यांनी काहीशा संकुचित दृष्टिकोनातून पाहिले आहे, असे म्हणावे लागते. तुकारामादी संतांनी ज्याप्रमाणे सामाजिक समतेचा पुरस्कार केला होता; त्याप्रमाणे रामदासांनी तो केला असल्याचे पाहावयास मिळत नाही. रामदासांचा भर वर्णव्यवस्थेवरच अधिक होता. या संदर्भात ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, “रामदासांच्या बोधातील सामाजिक संकुचितपणा अगदी स्पष्ट होतो. या वैगुण्यामुळे एकनाथ-तुकारामांप्रमाणे रामदासांचे वाङ्मय बहुजन समाजाला प्रेरणा देऊ शकले नाही.
गं. बा. सरदार यांनी रामदासांविषयी असे म्हटले आहे की, “लोकांचे धर्मविषयक औदासीन्य, भ्रांती व भ्रष्टता नाहीशी करून त्यांच्या चित्तात शुद्ध परमार्थ विचार ठसवावा हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते.
दासबोधाची महती
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी रामदासांच्या मोठेपणाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, “स्वामी समर्थांचे व त्यांच्या दासबोध या ग्रंथाचे मराठी भाषेवरील ऋण कधीही न फिटणारे आहे. मराठीचे अपार शब्दवैभव आणि विविध अर्थांची बोधक शब्दसामर्थ्ये समर्थांच्या ग्रंथांइतकी प्राचीन वा अर्वाचीन अशा कोणत्याही मराठी साहित्यात आढळत नाहीत. दासबोधात व इतर रामदासी वाङ्मयात तर्कशुद्ध विचारसरणी व साहित्यसौंदर्य यांचे हृद्य मीलन झाले असून सृष्टीचे व मानवी व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण त्यात प्रतिबिंबित झाले आहे.”
मराठीचे महत्त्व
समर्थ रामदासांना प्राकृत भाषेचा मराठीचा अभिमान होता. मराठीचे महत्त्व सांगताना ते म्हणतात,
“येक म्हणती मन्हाठी काय । हे तो भल्यासी ऐको नये । ती मूर्ख नेणती सोय । अर्थान्वयाची || लोहाची मांदूस केली । नाना रत्ने साठविली । ती अभाग्याने त्यागिलीं । लोखंड म्हणोनी । तैसी भाषा प्राकृत ||
रामदासांच्या भाषेत व एकूण रचनेत गांभीर्य, कणखरपणा व करारीपणा हे गुण आपणास आढळून येतात.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!