ग्रहण आणि अधिक्रमण यांत फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या रेषेत राहू किंवा केतू या बिंदूत चंद्र आला, की सूर्यग्रहण होते. त्याचप्रमाणे कधी कधी बुध किंवा शुक्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या रेषेत त्यांच्या ऊर्ध्व किंवा अधः संपात बिंदूपाशी येतात. अशा वेळी एक काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसतो. या प्रकारालाच अधिक्रमण (transit) असे नाव आहे.
चंद्रबिंबाचा व्यास सूर्यबिंबाएवढाच असल्यामुळे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. सूर्यबिंबाच्या तुलनेत बुध व शुक्र बिंबाचे व्यास अतिशय लहान आहेत. सूर्यबिंबाचा कोनीय व्यास सुमारे 32 कोनीय मिनिटे आहे, तर बुध बिंबाचा कोनीय व्यास सुमारे 5.5 कोनीय सेकंद, तर शुक्राच्या बिंबाचा 30 कोनीय सेकंद आहे. याचा अर्थ बुधाचे बिंब सूर्यबिंबाच्या तुलनेत सुमारे 350 पटींनी लहान आहे. तर शुक्राचे 64 पटींनी लहान आहे. त्यामुळेच अधिक्रमणाच्या वेळी काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसतो.
बुधाची भ्रमणपातळीआयनिक वृत्तपातळीशी 7 अंशाचा कोन करते. अधिक्रमण होण्यासाठी बुध आपल्या ऊर्ध्व किंवा अधः संपात बिंदूपाशी असताना त्याची पृथ्वीबरोबर अंतरयुती व्हायला हवी. दि. 8 किंवा 9 मे व 10 किंवा 11 नोव्हेंबर रोजी पृथ्वी अनुक्रमे बुधाच्या ऊर्ध्व किंवा अधः संपात बिंदूजवळ जाते. अर्थातच या दोन दिवसांच्या आसपास बुधाच्या अधिक्रमणाची शक्यता असते. बुधाच्या ऊर्ध्व किंवा अधः संपात बिंदूपासून पृथ्वीचा मार्ग 2 अंश 10 मिनिटे यापेक्षा जास्त अंतरावरून जात असेल, तर अधिक्रमण होत नाही.
बुध ग्रहाचे अधिक्रमण
बुधाचा भ्रमणमार्ग चांगलाच दीर्घवर्तुळाकृती आहे. मे महिन्यात संपात बिंदूपाशी असताना बुध पृथ्वीपासून सरासरीपेक्षा जास्त अंतरावर असतो. अर्थातच मे महिन्यात वर दिलेली 2 अंश 10 मिनिटे ही अधिक्रमणाची मर्यादा आणखीनच कमी होते व नोव्हेंबर महिन्यात ती थोडी जास्त असते. त्यामुळेच मे महिन्यापेक्षा नोव्हेंबर महिन्यातच अधिक्रमणाची अधिक शक्यता असते.
पृथ्वीच्या संदर्भात सुमारे 116 दिवसांनी किंवा 0.3175 वर्षांनी सूर्य आणि बुध यांची युती होते. या संख्येच्या आधाराने बुधाच्या अधिक्रमणाची चक्रे निश्चित करता येतील. पृथ्वीचे वर्ष आणि बुधाचा युतिकाल यांचे निरनिराळे संबंध पुढीलप्रमाणे आहेत.
- बुधाचे 22 युतिकाल पृथ्वीच्या सुमारे 7 वर्षांइतकेच आहेत. 22 X0.3175 = 6.985 वर्षे
- बुधाचे 41 युतिकाल पृथ्वीच्या 13 वर्षांइतके आहेत. 41 X 0.3175 = 13 वर्षे
- बुधाचे 145 युतिकाल पृथ्वीच्या सुमारे 46 वर्षांइतके आहेत. 145 X 0.3175 = 46 वर्षे
वरील गणिताचा अर्थ असा की, 7, 13 किंवा 46 वर्षांनी तीच तीच अधिक्रमणे पुन्हा पुन्हा दिसायला हवीत. परंतु मे महिन्यातील अधिक्रमण मर्यादा लहान असल्यामुळे ती सात वर्षांच्या कालावधीने दिसत नाहीत.
एकाविसाव्या शतकातील बुधाच्या अधिक्रमणांचे दिनांक पुढीलप्रमाणे आहेत.
- 07 मे 2003
- 08 नोव्हेंबर 2006
- 09 मे 2016
- 11 नोव्हेंबर 2019
- 13 नोव्हेंबर 2032
- 07 नोव्हेंबर 2039
- 07 मे 2049
- 10 मे 2052
- 11 नोव्हेंबर 2065
- 14 नोव्हेंबर 2078
- 07 नोव्हेंबर 2085
- 08 मे 2095
- 10 नोव्हेंबर 2098
- आकाशगंगांचे प्रकार आणि त्यांची सविस्तर माहिती
- धूमकेतू म्हणजे काय? त्यांची संपूर्ण माहिती
- सूर्यमालेची निर्मिती | Birth of Solar System
शुक्र ग्रहाचे अधिक्रमण
शुक्राच्या भ्रमणकक्षेची पातळी आयनिक वृत्तपातळीबरोबर 3.5 अंशाचा कोन करते. दरवर्षी दि. 7 जून आणि 9 डिसेंबर या दोन दिवसांच्या दरम्यान पृथ्वी शुक्राच्या उर्ध्व किंवा अधः संपात बिंदूपासून पृथ्वीचा मार्ग 4 अंशापेक्षा जास्त अंतरावरून जात असेल, तर अधिक्रमण होत नाही.
शुक्राचा युतिकाल 1.5989 वर्षांचा आहे. त्यावरुन शुक्राच्या अधिक्रमण चक्राचा काळ निश्चित करता येतो.
- शुक्राचे 5 युतिकाल पृथ्वीच्या सुमारे 8 वर्षांइतके आहेत. 5 X 1.5989 = 7.99
- शुक्राचे 152 युतिकाल पृथ्वीच्या सुमारे 243 वर्षांइतके आहेत. 152 X 1.5989 = 243 वर्षे
वरील गणिताचा अर्थ असा की दर 8 वर्षांनी 243 वर्षांच्या कालावधीत शुक्राची अधिक्रमणे दिसायला हवीत. प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. एकविसाव्या शतकातील शुक्राच्या अधिक्रमणांचे दिनांक असे आहेत.
8 जून 2004 आणि 6 जून 2012
याचा अर्थ एकविसाव्या शतकात शुक्राची फक्त दोन अधिक्रमणे पाहायला मिळाली. 2004 सालापूर्वी 6 डिसेंबर 1882 साली शुक्राचे अधिक्रमण झाले होते. तसेच 2012 सालानंतर 105 वर्षांनी म्हणजे 11 डिसेंबर 2117 रोजी शुक्राचे अधिक्रमण पाहायला मिळेल.
मंगळावरून साधारण 105 वर्षांनी पृथ्वीचे सूर्यबिंबावरील अधिक्रमण पाहायला मिळते. 10 नोव्हेंबर 2084 रोजी ( पृथ्वीवरील दिनांक ) मंगळावरून पृथ्वीचे सूर्यबिंबावरील अधिक्रमण पाहता येईल. त्यावेळी मानव बहुधा मंगळावर पोहोचलेला असेल.
बुध –
- एका शतकात बुधाची सुमारे 13 अधिक्रमणे पाहायला मिळतात.
- नोव्हेंबर महिन्यातील अधिक्रमणांची संख्या, मे महिन्यातील अधिक्रमणांच्या साधारण दुप्पट असते.
- मे महिन्यातील अधिक्रमण 8 मे या दिनांकाच्या जास्तीत जास्त 3 दिवस पुढे किंवा मागे असते.
- नोव्हेंबर महिन्यातील अधिक्रमणे 10 नोव्हेंबरच्या जास्तीत जास्त 5 दिवस पुढे किंवा मागे होऊ शकते.
शुक्र –
- शुक्राची अधिक्रमणे बुधापेक्षा फारच दुर्मिळ आहेत.
- डिसेंबर महिन्यातील अधिक्रमण 9 डिसेंबरच्या दोन किंवा तीन दिवस पुढे किंवा मागे होऊ शकते.
- जून महिन्यातील अधिक्रमण 7 जून या दिवसांच्या तीन ते चार दिवस पुढे किंवा मागे होऊ शकते.
- दोन अधिक्रमणांमध्ये 8 वर्षांचा कालावधी आला, तर 121.5 किंवा 105 वर्षांनी पुन्हा 8 वर्षांचा कालावधी येतो.
- विसाव्या शतकात शुक्राचे एकही अधिक्रमण झाले नाही.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!