नाव | कर्मवीर भाऊराव पाटील |
जन्म | २२ सप्टेंबर १८८७ |
जन्मगाव | कुंभोज जि कोल्हापूर |
वडील | पायगोंडा पाटील |
आई | गंगाबाई पाटील |
पत्नी | लक्ष्मीबाई पाटील |
कार्य | बहुजन समाजाला शिक्षण दिले रयत शिक्षण संस्था स्थापन केली |
मृत्यू | ९ मे १९५९ |
मुद्दे
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. पायगोंडा पाटील यांचे गाव सांगली जिल्ह्यातील ऐतवडे हे होय. ते सरकारी खात्यात कारकून म्हणून कामाला होते. त्यांना आपल्या नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरावे लागले; त्यामुळे भाऊरावांचे बालपण कुंभोज, तासगाव, दहिवडी, विटे यांसारख्या गावी गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही असेच निरनिराळ्या गावी झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण
भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. भाऊरावांच्या स्वभावात लहानपणापासूनच बंडखोर वृत्ती दिसून येत होती. जैन बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांवर कर्मठ धार्मिक नियमांचे पालन करण्यासंबंधी सक्ती केली जात असे. पण भाऊरावांना हे नियम अनावश्यक वाटत; त्यामुळे बोर्डिंगच्या अशा नियमांचे त्यांनी अनेकदा उल्लंघन केले होते व त्याबद्दल वेळोवेळी शिक्षाही भोगली होती. अशाच एका प्रकरणातून त्या वेळचे जैन बोर्डिंगचे सुपरिटेंडेंट अण्णासाहेब लठ्ठे यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. परिणामी, लठ्ठयांनी भाऊरावांची बोर्डिंगमधून हकालपट्टी केली.
कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये भाऊराव पाटील यांनी इंग्रजी सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणात त्यांची विशेष प्रगती दिसून आली नाही. मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण सोडावे लागले. तथापि, कोल्हापूरमधील वास्तव्यात त्यांनी कुस्ती, व्यायाम यांसारख्या गोष्टींकडे भरपूर लक्ष पुरविले. त्या वेळी राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीवर होते. भाऊरावांना काही दिवस महाराजांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या विचारांचा प्रभाव भाऊरावांवर पडला. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. म्हणजे कोल्हापूरच्या सात वर्षांच्या वास्तव्यात भाऊरावांना शालेय शिक्षणात विशेष प्रगती करता आली नसली तरी भावी जीवनात उपयोगी पडणारी वैचारिक पार्श्वभूमी त्यांना याच ठिकाणी लाभली.
भाऊराव पाटील यांना आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न केला. काही काळ त्यांनी खाजगी शिकवण्याही केल्या. पुढे ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून त्यांनी काम केले. आपल्या कामानिमित्ताने त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागा झाला.
महाराष्ट्रातील बहुजन समाज अजूनही अज्ञान, अंधकारात खितपत पडला आहे, त्याला शिक्षणाचा साधा गंधही नाही म्हणूनच तो मागासलेला राहिला आहे. त्याचे सर्व बाजूंनी शोषण चालू आहे, या वास्तवाची भाऊरावांना जाणीव झाली. त्यावरूनच ते अशा निष्कर्षाप्रत आले की, येथील बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याखेरीज त्याची उन्नती होऊ शकणार नाही. सत्यशोधक समाजाच्या शिकवणुकीचा प्रभाव त्यांच्यावर होताच. त्यामुळे बहुजन समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी होती. ग्रामीण समाजाच्या अवलोकनातून भाऊरावांना आपल्या भावी कार्याची दिशा मिळाली. शिक्षण हाच बहुजन समाजाच्या उन्नतीचा खरा मार्ग होय, अशी त्यांची खात्री पटली. म्हणून त्यांनी स्वतःला शिक्षणप्रसाराच्या कार्याला वाहून घेण्याचे ठरविले.
- हेही वाचा
- इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती मराठीत
- सॅम बहादूर यांची माहिती मराठीत
- गोपळ कृष्ण गोखले यांची माहिती मराठी
- महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संपूर्ण माहिती मराठीत
भाऊराव पाटीलांचे शैक्षणिक कार्य
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रेरणा महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून घेतली होती. बहुजन समाजाच्या हिताची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी शिक्षणप्रसाराचे कार्य हाती घेतले होते. म्हणजेच शिक्षणाचा विचार त्यांनी एका व्यापक दृष्टिकोनातून केला होता. शाळा-महाविद्यालयांची स्थापना करणे आणि ती चालविणे, एवढ्यापुरताच शिक्षणाचा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. सामाजिक परिवर्तन ही त्यांच्या शैक्षणिक कार्याची मुख्य प्रेरणा होती. येथील बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करून व्यापक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची आकांक्षा त्यांनी बाळगली होती. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन होय, अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीनेच ते शिक्षणप्रसाराच्या कार्याकडे वळले होते.
भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातील दुधगाव या ठिकाणी केली. सन १९१० मध्ये त्यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने ‘दुधगाव विद्याप्रसारक मंडळ’ या नावाची संस्था स्थापन केली. तिच्यामार्फत ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम‘ हे वसतिगृह चालू केले. या वसतिगृहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे सर्व जातिजमातींचे विद्यार्थी एकत्र राहत असत. पुढे दुधगावच्या धर्तीवर नेलें (१९२१) व काले या गावीही कर्मवीरांनी वसतिगृहे सुरू केली.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना
कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी काही काळ सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य केले होते. सन १९१९ मध्ये सत्यशोधक समाजाच्या सातारा जिल्हा शाखेची एक परिषद काले या गावी भरविण्यात आली होती. भाऊराव पाटील हेदेखील या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेच्या अखेरीस भाऊरावांनी सूचना केली की, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही सूचना सर्वांनीच उचलून धरली. त्यानुसार ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी काले येथेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. तिची जबाबदारी भाऊराव पाटील यांनी स्वीकारली. पुढे भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय साताऱ्यातच ठेवण्यात आले.
सन १९२४ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहात सर्व जाति-धर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत असत. भाऊराव पाटील स्वतः खेड्यापाड्यांत फिरून बहुजन समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना गोळा करीत आणि त्यांना शिक्षणासाठी साताऱ्यास घेऊन येत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या राहण्या-जेवणाची सर्व जबाबदारी भाऊराव उचलीत. इतकेच नव्हे तर, आई-वडिलांपासून दूर राहिलेल्या या विद्यार्थ्यांवर ते मायेची पाखर घालीत, त्यांची सर्व प्रकारची काळजी घेत.
वसतिगृहातील विविध जाति-धर्मांच्या विद्यार्थ्यांचे ते खरेखुरे पालक होते. या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी असे असत की, भाऊरावांचा भक्कम आधार त्यांना मिळाला नसता तर त्यांच्या शिक्षणाची द्वारे कधीच बंद झाली असती. आपल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सोय लावण्यासाठी व त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी भाऊरावांनी अविश्रांत कष्ट उपसले. उन्हा-पावसात वणवण फिरून मिळेल त्या ठिकाणाहून त्यांनी मदत गोळा केली. कर्मवीरांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही महत्त्वाचा वाटा होता. वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून या माऊलीने आपले मंगळसूत्र विकण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. वसतिगृहातील मुलांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे मानले आणि त्यांना मातेचे प्रेम दिले.
विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची सोय व्हावी म्हणून सन १९३२ मध्ये त्यांनी पुणे येथे ‘युनियन बोर्डिंग हाऊस‘ची स्थापना केली; त्यास ‘गांधी-आंबेडकर’ यांच्यामधील ‘पुणे करारा’चे निमित्त होते. युनियन बोर्डिंग हाऊसच्या रूपाने कर्मवीरांनी एक प्रकारे ‘पुणे कराराची’ स्मृतीच जतन केली होती.
प्राथमिक शाळांची निर्मिती
१६ जुलै, १९३५ रोजी कर्मवीरांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथेच ‘सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. तथापि, रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा व्याप वाढू लागला, तो १९३७ या वर्षापासून! १९३७ मध्ये देशात प्रांतिक कायदेमंडळासाठी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत मुंबई प्रांतासह अनेक प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली. मुंबई प्रांताच्या काँग्रेस सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्याची योजना आखली. त्यानुसार खाजगी शिक्षण संस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यात खेडोपाडी प्राथमिक शाळांचे जाळेच निर्माण करण्याचे ठरविले. १९३८-३९ या वर्षात रयत शिक्षण संस्थेने ६१ प्राथमिक शाळा सुरू केल्या; तर त्याच्या पुढच्याच वर्षी ही संख्या १६८ वर गेली. १९४९-५० या वर्षी संस्थेच्या वतीने चालविण्यात आलेल्या प्राथमिक शाळांची संख्या ५७८ इतकी होती. नंतरच्या काळात सरकारने प्राथमिक शाळा स्वतःच चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महाराष्ट्रभर पसरलेल्या जवळजवळ ७०० प्राथमिक शाळा संस्थेने महाराष्ट्र शासनास सुपूर्त केल्या.
माध्यमिक शाळा उघडण्याची मोहीम
मध्यंतरीच्या काळात कर्मवीरांनी माध्यमिक शाळा उघडण्याची मोहीम हाती घेतली होती. रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा साताऱ्यात ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’ या नावाने १९४० मध्ये सुरू झाली. पुढील काळात माध्यमिक शाळांची संख्याही वाढत गेली. सन १९५३-५४ या वर्षी संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या ४४ इतकी होती. कर्मवीरांनी १०१ शाळा उघडण्याची घोषणा केली. पण हे लक्ष्य गाठण्यास संस्थेला फारसा विलंब लागला नाही. १९७७-७८ या वर्षी माध्यमिक शाळांची संख्या ३१२ वर जाऊन पोहोचली.
रयत शिक्षण संस्थेचा प्रसार
माध्यमिक शाळा उघडण्याची मोहीम चालू असतानाच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उच्च शिक्षणाकडेही आपले लक्ष वळविले. सन १९४७ मध्ये रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे ‘छत्रपती ‘शिवाजी कॉलेज’ या नावाने पहिले महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर संस्थेच्या महाविद्यालयांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली. १९५९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रयत शिक्षण संस्थेचे काय होणार, अशी चिंता काही लोकांना लागली होती. परंतु कर्मवीरांच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी कर्मवीरांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आणि संस्थेच्या कार्याची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली.
अलीकडील माहितीनुसार सध्या रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रात सुमारे ४३० माध्यमिक शाळा असून या संस्थेच्या वतीने एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक विधी महाविद्यालय व २ अध्यापक महाविद्यालये यांच्यासह एकूण ४० सामान्य शिक्षण महाविद्यालये, ८ अध्यापक विद्यालये, ७८ वसतिगृहे, २४ प्राथमिक शाळा, ४१ पूर्व प्राथमिक शाळा, ८ आश्रमशाळा व ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालविल्या जातात. रयत शिक्षण संस्थेच्या शाखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पसरल्या असून त्यांपैकी बहुसंख्य शाखा ग्रामीण भागात आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वरील विविध शाखांमधून आज हजारो विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. कर्मवीरांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सुरुवातीच्या इवल्याशा रोपट्याचे संस्थेच्या बोधचिन्हाप्रमाणे आज खरोखरीच एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
स्वावलंबी शिक्षण
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करून त्यास जागृत बनविले. तथापि, शिक्षणासंबंधी त्यांच्या स्वतःच्या काही कल्पना होत्या व त्या प्रत्यक्षात उतरविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कर्मवीरांना समाजात स्वाभिमानाने व ताठ मानेने जगणारे विद्यार्थी तयार करावयाचे होते. विद्यार्थ्यांनी मदतीसाठी दुसऱ्याकडे याचना करावी, ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घ्यावे यावर त्यांनी भर दिला.
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद‘ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका‘ ही योजना सुरू केली आणि त्यामार्फत विद्यार्थ्यांना खडी फोडणे, शेती पिकविणे अशी विविध प्रकारची कामे उपलब्ध करून दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षणावर भर देण्याचे आणखी एक कारण म्हणजे सामान्य परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. या विद्यार्थ्यांचे पालक मुळातच अतिशय दारिद्र्यात जीवन जगत होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या गरीब पालकांवर स्वतःच्या शिक्षणाचा भार टाकू नये, अशी कर्मवीरांची इच्छा होती.
श्रमाची प्रतिष्ठा
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात श्रमप्रतिष्ठेला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे श्रम करण्यात कमीपणा मानू नये, अशी त्यांची शिकवण होती. आपण स्वतःच्या श्रमावर शिकत आहोत, असे सांगण्यात विद्यार्थ्यांना मोठेपणा वाटला पाहिजे; तसेच समाजात श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे आणि श्रम करणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते.
बंधुभाव व सामाजिक समता
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याद्वारे विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता यांचा संदेश दिला. त्यांना जातिभेद मुळीच मान्य नव्हता. रयत शिक्षण संस्थेने चालविलेल्या वसतिगृहांमध्ये विविध जातिधर्मांचे विद्यार्थी एकत्र राहत असत. ते सर्व जण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करीत असत व एकत्रच जेवण घेत असत. अशा प्रकारच्या सहजीवनातून विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता यांचा संदेश मिळावा, हाच कर्मवीरांचा या प्रयोगामागील प्रमुख हेतू होता.
कार्याची महत्ता
कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक भगीरथ होते. त्यांनी शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतील गरीब शेतकऱ्यांच्या व पददलित जनतेच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचविली आणि अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या गोरगरीब समाजाचा उद्धार घडवून आणला; यातच त्यांच्या मोठेपणाचे रहस्य सामावलेले आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रामुख्याने ग्रामीण भागातच उघडल्या; यापाठीमागे त्यांची एक विशिष्ट दृष्टी होती. आपल्या समाजातील जे घटक आतापर्यंत शिक्षणापासून वंचित राहिले होते अशा समाजघटकांना शिक्षणाचा लाभ मिळवून देणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या काळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा विशेष प्रसार झाला नव्हता. बहुसंख्य ग्रामीण जनता अशिक्षित व अज्ञानी होती. म्हणून त्यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणावरच आपले लक्ष केंद्रित केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा झपाट्याने प्रसार झाला आणि ग्रामीण जीवनाचे चित्र बदलण्यास मदत झाली, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. ज्या अस्पृश्य समाजाला परंपरेने शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, त्याच अस्पृश्य समाजातील एका विद्यार्थ्याने संस्कृत विषयाचे पारितोषिक मिळवावे, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घडवून आणलेला चमत्कारच होता. त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याद्वारे बहुजन समाजाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांना मिळालेले पुरस्कार
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना मानपत्रे बहाल केली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली. त्यांच्या कार्याला प्रचंड लोकमान्यताही मिळाली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा सामान्यातील सामान्य माणसाच्या दारी पोहोचविल्याच्या समाधानातच ९ मे, १९५९ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील निजधामास गेले.
बॅ. पी. जी. पाटील यांनी कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान मोठ्या सूत्रमय भाषेत विशद केले आहे. ते म्हणतात, “वसतिगृह जीवनावर भर, जातीय ऐक्य, स्वावलंबन व स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा व श्रमपावित्र्य, भूमातेशी प्रत्यक्ष संबंध, मानवतावाद, विश्वबंधुत्व, स्वातंत्र्यचिंतन व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, आदर्श ग्रामसेवक, त्यागी व सेवामय असे तपः पूत जीवनध्येय, साधेपणा, जनतेशी एकरूपता, प्रसिद्धीपासून मुद्दाम चार पावले दूर राहून अज्ञान-अंधकारात पिचत पडलेल्या रयतेला नंदादीपाप्रमाणे सतत तेवत राहून मार्ग उजळून टाकण्याची शिकवण, ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे ब्रीद, जीवनात तत्त्वांबद्दल केव्हाही तडजोड नाही, न्यायाची चाड, अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे आणि हे सर्व करीत असता पैशामुळे आपले काम केव्हाही अडून राहणार नाही हा दुर्दम्य आशावाद !” राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भाऊरावांच्या या कार्याचा गौरव करताना म्हटले होते- “भाऊराव का कार्यही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है । “
ह. रा. महाजनी कर्मवीरांचा गौरव ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या शब्दांत करतात.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!