यशवंतराव चव्हाण माहिती मराठी | Yashavantrao Chavan Information In Marathi

google-news-icon

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीचे राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरदेखील त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली होती.

पूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण
वडिलांचे नाव बळवंतराव चव्हाण
आईचे नाव विठाबाई चव्हाण
काम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
उपपंतप्रधान
केंद्रीय मंत्री
मृत्यू २५ नोव्हेंबर १९८४

यशवंतराव चव्हाण यांचा परिचय

यशवंतरावांचे संपूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण असे होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी १२ मार्च, १९१४ रोजी झाला. त्यांचे शिक्षण देवराष्ट्रे, कऱ्हाड व कोल्हापूर या ठिकाणी झाले. यशवंतरावांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले; त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. साहजिकच, अतिशय खडतर परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागले होते. तथापि, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले बी. ए. एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य

राष्ट्रीय चळवळीत सहभाग

यशवंतराव चव्हाण यांच्यावर विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता. शिक्षण चालू असतानाच त्यांनी सन १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. या तुरुंगवासातून बाहेर आल्यावर राष्ट्रीय चळवळीतही सहभाग त्यांनी चालूच ठेवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते काम करू लागले.

गांधींचा प्रभाव- काँग्रेसचे कार्य

यशवंतराव चव्हाण यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचाही प्रभाव होता. तथापि, त्यामुळे त्यांची काँग्रेस पक्ष व महात्मा गांधींचे नेतृत्व यांवरील निष्ठा मात्र ढळली नाही. १९३० पासून काँग्रेसच्या प्रचारासाठी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनजागृतीची मोहीम हाती घेतली होती. १९३७ मध्ये प्रांतिक कायदेमंडळांसाठी झालेल्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या प्रचारकार्यात सहभागी झाले होते.

यशवंतराव चव्हाण यांची संसदीय कारकिर्द

सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातही यशवंतराव चव्हाणांनी भाग घेतला होता. या चळवळीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून कार्य केले होते. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघटित करून चळवळीची व्याप्ती वाढविण्याची त्यांची योजना होती; पण भूमिगत लढ्याच्या प्रारंभीच्या अवस्थेतच ते पकडले गेले आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पुढे १९४६ च्या निवडणुकीत प्रांतिक कायदेमंडळासाठी त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. मुंबई प्रांताच्या विधानसभेवर ते निवडून आले. या वेळेपासूनच त्यांच्या संसदीय आघाडीवरील कारकिर्दीची सुरुवात झाली. १९४६ मध्ये प्रथम संसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री

सन १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतरावांची मुंबई राज्याच्या विधानसभेवर निवड झाली. त्याच वेळी त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला. सन १९५२ ते १९५६ या काळात त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काम केले. १९५६ मध्ये देशातील घटक राज्यांची भाषेच्या तत्त्वावर पुनर्रचना करण्यात आली; परंतु महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांचे मिळून द्वैभाषिक मुंबई राज्य निर्माण केले गेले. या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांची निवड झाली.

यशवंतराव चव्हाण यांनी द्वैभाषिक राज्याची धुरा यशस्वीरीत्या वाहिली. हा कालखंड यशवंतरावांच्या दृष्टीने अत्यंत कसोटीचा होता; कारण, संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी लोकांच्या भावना अतिशय तीव्र बनल्या होत्या. त्यांना द्वैभाषिक राज्याची निर्मिती व त्याचे अस्तित्व मुळीच हे मान्य नव्हते; त्यामुळे महाराष्ट्रीय जनतेने यशवंतरावांना जोरदार विरोध केला; पण अशाही परिस्थितीत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसश्रेष्ठींचे मन वळविण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण

१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाणांनी मिळविला. या पदावर काम करताना एक उत्कृष्ट प्रशासक असा नावलौकिक त्यांनी मिळविला. महाराष्ट्रातील कृषि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा पाया घालण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी वळण लावण्यात त्याचा प्रमुख वाटा होता. याशिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केली होती.

केंद्रीय राजकारणात प्रवेश

सन १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर यशवंतराव चव्हाण यांची केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी संरक्षण, गृह, अर्थ या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. सन १९७७ मध्ये केंद्रात जनता पक्ष अधिकारावर आल्यावर यशवंतरावांची संसदेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड झाली.

१९७९ मध्ये केंद्रात चौधरी चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाणांनी उपपंतप्रधानपद भूषविले होते. भारताच्या आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाल्यावर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात असलेल्या गटाचे नेतृत्व यशवंतरावांनी केले होते; परंतु इंदिरा गांधी केंद्रात परत सत्तेवर आल्यावर ते लवकरच कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील झाले.

सांस्कृतिक कार्याची आवड

यशवंतराव चव्हाण यांना राजकारणाप्रमाणेच समाजकारण, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतही रस होता. साहित्यिक व कलाकार यांना उत्तेजन देण्याचे धोरण त्यांनी नेहमीच अवलंबिले होते. त्याच उद्देशाने त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा‘ची निर्मिती केली होती. सन १९७५ मध्ये कऱ्हाड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.

‘ऋणानुबंध’ व ‘कृष्णाकाठ’

‘सह्याद्रीचे वारे’ व ‘युगांतर’ या नावाने त्यांच्या भाषणांचे दोन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘ऋणानुबंध‘ या त्यांच्या ग्रंथात त्यांच्या स्वभावाचे अनेक धागे उलगडत जातात व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहावयास मिळतात. ‘कृष्णाकाठ‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे; पण या आत्मचरित्राच्या पहिल्या भागाच्या प्रकाशनानंतर लवकरच २६ नोव्हेंबर, १९८४ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

Jio Air Fiber: १.५ gbps ची स्पीड जणू घरातील टावर इस्रो ने शेअर केली आदित्य एल १ कडून आलेली पहिली माहिती भारतीय वापरत आहेत पाकिस्तानी हॅकर्स ने बनवलेल्या apps Google Photos चे तीन नवीन फीचर्स येत आहेत